अच्युतानंद दास : (१४८९—सु. १५६८). एक ओडिया वैष्णव कवी. ओरिसातील कटक जिल्ह्यात तिलकाना येथे त्याचा जन्म झाला. त्याच्या वेळचा एक मठ अजूनही तिलकाना येथे आहे. आपला जन्म शूद्रकुलात झाल्याचे कवी सांगतो. ओरिसातील वैष्णव कविसंप्रदायात  ⇨पंचसखानावाने ओळखल्या जाणाऱ्‍या कविपंचकातील अच्युतानंद हा वयाने सर्वांत लहान कवी. आपण कोळी व गोप जातींचे गुरू असल्याचे त्याने म्हटले आहे. ओरिसातील ह्या जाती अच्युतानंदाने रचिलेल्याकैवर्त गीताआणिगोपालांक उगालह्या ग्रंथांना आपले पवित्र धर्मग्रंथ म्हणून फार मानतात.

नाकार संहिताह्या ग्रंथात आपण ३६ संहिता, ७८ गीते व १०० मालिका लिहिल्या असल्याचे अच्युतानंदाने म्हटले आहे. त्याच्या नावावर २७ वंशचरित्रे (हरिवंशग्रंथाच्या ७ खंडांशिवाय), १२ उपवंश आणि काही कोइली, चौतिसा, टीका, विलास, निर्णय, उगाल, गुज्जरी, भंजन इ. एक लक्ष संख्येची ग्रंथरचना असल्याचे सांगितले जाते. ही सर्व रचना आज तरी उपलब्ध नाही. बारा संहिता, सहा गीते व एक मालिका एवढीच त्याची रचना आज उपलब्ध आहे.हरिवंशहा त्याच सर्वोत्कृष्ट ग्रंथ होय. त्याचीलोकप्रियता ओरिसात  ⇨भागवतग्रंथाखालोखाल आहे. मूळ संस्कृत साचा सोडला, तरहरिवंशही त्याची जवळजवळ स्वतंत्र रचना म्हणता येईल. त्यात कृष्णचरित्र वर्णिले असून ओरिसातील गोपजातीच्या सामाजिक जाणिवा प्रतिबिंबित झालेल्या आहेत.

अच्युतानंद हा एक गूढवादी व आध्यात्मिक कवी होता. त्याच्या अनेक भक्तिगीतांवरून प्रेम आणि भक्ती ह्या भावना उत्कटतेने व्यक्त करण्याची त्याची हातोटी आणि भावकवी म्हणून त्याची योग्यता नजरेत भरते. माणसात देव पाहणारा आणि माणसातील देवत्वाचा पुरस्कार करणारा तो एक महान द्रष्टा होता. त्याने विपुल काव्यरचना केली असली, तरी संत आणि द्रष्टा म्हणून त्याची योग्यता व जनमानसातील स्थान मात्र बरेच वरचे आहे.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्रनाथ (इं.) शिरोडकर, द. स. (म.)