ॲक्रोमोबॅक्टिरिएसी : यूबॅक्टिरिएलीझ या सूक्ष्मजंतूंच्या गणातील तेरा कुलांपैकी एक कुल. यातील सूक्ष्मजंतू मृदेत, वाहत्या पाण्यात किंवा खाऱ्या पाण्यात आढळतात. बहुतांशी ते परोपजीवी (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणारे) नाहीत. काही मानवांस, जनावरांस अथवा वनस्पतींसच उपद्रवी आहेत. हे लहान-मध्यम शलाकाकार असून कशामिका (सूक्ष्मजंतूंच्या कोशिकेपासून निघणारे व त्यांच्या हालचालीस उपयोगी पडणारे नाजुक धागे) असल्यास शलाकेभोवती पेरिट्रिक्स प्रकारच्या असतात (परिघ-कशाभिकीय म्हणजे शलाकेभोवती सर्व परिघावर हे धागे असतात).

आगरयुक्त (काही विशिष्ट तांबड्या शैवलांपासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थाने युक्त असलेल्या, → आगर) संवर्धकावरची वाढ रंगद्रव्यरहित अथवा रंगद्रव्ययुक्त असते. रंगद्रव्य पिवळे, नारिंगी, बदामी किंवा तांबूस रंगाचे असून आगरामध्ये अभिसारित होत (पसरत) नाही. जिलेटिनाचे द्रवात रूपांतर करतात. ग्‍लुकोजापासून अम्‍लनिर्मिती होते परंतु वायुनिर्मिती होत नाही. दुग्धशर्करेवर (लॅक्टोजावर) परिणाम क्वचितच होतो अथवा होतही नाही. काही जंतू आगराचे (विद्रावण) विघटन करतात. इतर काही कायटिनाचे पाचन करतात. नायट्रेटाचे क्षपण (नायट्राइट किंवा अमोनिया यांमध्ये रूपांतर) होते किंवा होतही नाही. यातील एकही जंतू संदीप्तिशील (उच्च तापमानाशिवाय इतर कारणामुळे प्रकाश बाहेर टाकण्याचा गुणधर्म असलेला) नसतो.

वर्गीकरण : (अ) आगर व कायटिनाचे पाचन होत नाही. शर्करेपासून व विशेषत: दुग्धशर्करेपासून अम्‍लनिर्मिती होत नाही.

(१) आगरयुक्त संवर्धकावर रंगद्रव्यरहित वाढ, परंतु बटाट्यावर ॲक्रोमोबॅक्टराची वाढ पिवळ्या रंगद्रव्याची आढळते.

(क)लिटमसयुक्त दुधात क्षार (अल्कली) बनतो. कार्बनी पदार्थापासून अम्‍ल होत नाही. वंश-अ‍ल्कॅलिजिनस.

(ख)लिटमसयुक्त दुधात थोड्या प्रमाणात अम्‍ल होते अथवा परिणाम दिसत नाही. किंवा क्षार बनते. हेक्झोस शर्करेपासून थोड्या प्रमाणात अम्‍ल होते. वंश-ॲक्रोमोबॅक्टर.

(२) आगरयुक्त संवर्धकावर पिवळे, नारिंगी, बदामी किंवा तांबूस रंगद्रव्य दिसते पण ते पाण्यात विरघळले जात नाही. वंश-फ्लेव्होबॅक्टिरियम.

(आ) आगर किंवा कायटिनाचे पाचन होते. शर्करेचे किण्वन (विघटन होऊन अम्‍ल व काही वेळा कार्बन डाय-ऑक्साइड व अल्कोहॉल तयार होणे) अधिक क्रियाशील परंतु काही जंतूच दुग्धशर्करेचे किण्वन करू शकतात. वाढ रंगद्रव्यरहित वा रंगद्रव्यमुक्त असते. रंगद्रव्ययुक्त असल्यास पिवळी किंवा नारिंगी रंगाची असते. रंगद्रव्य पाण्यात विरघळते.

(१) आगराचे पाचन होते. वंश-आगरबॅक्टिरियम, (२) कायटिनाचे तसेच केराटिनयुक्त पदार्थांचे पाचन होते. वंश-बेनेकिया.

ॲक्रोमोबॅक्टर : या वंशातील सूक्ष्मजंतू सामान्यत: मृदा व पाण्यात तसेच मत्स्यावरणातील अवपंकातही (सूक्ष्मकणी चिकटसर चिखलातही) आढळतात. ते अपरोपजीवी (दुसऱ्या जीवांवर उपजीविका न करणारे) व रंगद्रव्यरहित असतात. या वंशातील पंधरा जाती महत्त्वाच्या असून त्या अंडी, मांस इत्यादींच्या नासाडीस कारणीभूत होतात. यांपैकी ॲ. क्झेरॉसिस जातीचे जंतू ‘क्झेरॉसीन’ नावाचे द्रव्य निर्माण करतात. या द्रव्याने उंदरावर न्युमोनियामुळे उद्भवणारे क्षत दबतात.

अल्कॅलिजिनस : या वंशातील सूक्ष्मजंतू रंगद्रव्यरहित असून लिटमसयुक्त दूध क्षारमय बनवितात. ते मानवाच्या आतड्यांतही आढळतात. हे निरुपद्रवी आहेत, परंतु वैद्यकीय परीक्षेच्या वेळी चुकून कॉलर्‍याचे जंतू म्हणून समजले जाण्याची शक्यता असते. दुधाला तार सुटण्याची क्रिया अ. व्हिस्कोलॅक्टिस जंतूंच्यामुळे घडते.

फ्लेव्होबॅक्टिरिमय : यांचे रंगद्रव्योत्पादनाचे वैशिष्ट्य असून रंगद्रव्ये पिवळसर, तांबड्या, नारिंगी, गुलाबी रंगांची व कॅरोटिनयुक्त आढळतात. ते वाहत्या अथवा खाऱ्या पाण्यात प्रामुख्याने तसेच मृदेतही आढळतात. काही जाती रोगोत्पादक आहेत. फुप्फुसावरणी गुहेतून (पोकळीतून), मस्तिष्क मेरू द्रवातून (मोठ्या मेंदूतील पोकळ्यांत व मज्जारज्जूच्या मध्यवर्ती पोकळ मार्गात असणाऱ्या द्रवातून) आणि मानवी रक्तातून या विलगित केलेल्या आहेत. खाऱ्या पाण्यातील माशांच्या रोगास फ्ले. पिसिसिडा जातीचे जंतू कारणीभूत होतात.

आगरबॅक्टिरियम : हे जंतू आगराचे विघटन करतात.

बेनेकिया : हे जंतू ‘ग्रॅम-रंजक-अव्यक्त’ (ग्रॅम यांची रंजकक्रिया केली असता तयार होणारा जांभळटसर रंग टिकून न राहणारे) असून कीटक, क्रस्टेशिया (कवचधारी प्राणी) व ⇨कवकांत आढळणाऱ्या कायटिन या बहुशर्करेचे पाचन करतात. या वंशातील जातींचे विलगीकरण समुद्रातील त्याच्या नैसर्गिक निवासस्थानापासून करतात.

काही शास्त्रज्ञांच्या मते या कुलात ॲसिटोबॅक्टर वंशाचाही समावेश व्हावयास हवा. ॲसिटोबॅक्टर वंश स्यूडोमोनेडेसी कुलात सध्या समाविष्ट केला जातो. ॲसिटोबॅक्टर वंशातील जंतूंचे दोन प्रकार आढळतात. एका प्रकारात जंतूंना टोकाशी एकच कशाभिका असते. दुसऱ्यात अनेक कशाभिका शलाकेभोवती आढळतात. एकच कशाभिका असलेले जंतू ॲसिटोमोनस वंशात व स्यूडोमोनेडेसी कुलात असावेत व अनेक कशाभिका असलेले जंतू ॲसिटोबॅक्टर वंशात व ॲक्रोमोबॅक्टिरिएसी या कुलात समाविष्ट व्हावेत, असे त्यांचे मत आहे. अद्यापि या मतानुसार तज्ज्ञांचा निर्णय आंतरराष्ट्रीय मान्यतेच्या बर्गीज मॅन्युअल ऑफ डिटरमिनेटिव्ह बॅक्टिरिऑलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेला नाही.

पहा : सूक्ष्मजीवशास्त्र

संदर्भ : 1. Frobischer, M. Fundamentals of Microbiology, Tokyo, 1961.

    2. Salle, A. J. Fundamental Principles of Bacteriology, New York, 1961.

कुलकर्णी, नी. बा.