ॲडम, जॉन : (४ मे १७७५–४ जून १८२५). ब्रिटिश अंमलाखालील हिंदुस्थानचा जानेवारी १८२३ ते ऑगस्ट या काळातील हंगामी गव्हर्नर जनरल. एडिंबरो येथे शिक्षण झाल्यानंतर ॲडम १७९६ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीत लेखनिक म्हणून नोकरीस लागला. पुढे १८०९ पासून १८१८ पर्यंत तो कंपनीत चिटणिशीची कामे करीत होता. १८१९ पासून १८२५ पर्यंत तो कंपनीच्या सुप्रीम कौन्सिलचा सभासद होता.

आपल्या सहा महिन्यांच्या कारकीर्दीत ॲडमने एकच लक्षात राहणारी गोष्ट केली. कलकत्ता जर्नलचा संपादक जॉन सिल्क बकिंगहॅम हा सरकारी कारभारावर टीका करीत असे. त्याने मद्रासचा गव्हर्नर सर टॉमस मन्‍रो याच्या कारभाराची मुदत वाढविल्याची बातमी प्रसिद्ध केली. या गोष्टीचा राग आल्यामुळे ॲडमने कडक नियम करून वर्तमानपत्राच्या प्रकाशनावर नियंत्रणे घातली आणि बकिंगहॅम यास हद्दपार केले. भारताच्या राजकीय जीवनात वृत्तपत्रीय टीकेचा नवीनच प्रघात पडत होता. ॲडमने त्यास विरोध केल्यामुळे तो अप्रिय झाला. मादागास्करजवळ तो मरण पावला.

देवधर, य. ना.