ॲकॅलिफा : (कुल—यूफोर्बिएसी). ह्या विशेषत: उष्ण व उपोष्ण कटिबंधांत आढळणाऱ्या व आपल्या विविध प्रकारच्या पानांनी शोभादायक ठरलेल्या वनस्पतींच्या वंशात सु. २२० जाती आहेत. या ⇨ओषधी, क्षुपे (झुडपे), क्वचित वृक्षही असतात पाने एकाआड एक, करवती, खंडित व विविधरंगी सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ यूफोर्बिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. फुले लहान, बहुधा एकलिंगी व एकाच झाडावर, क्वचित द्विभक्तलिंगी फुलोरा पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकास आलेली मंजरी. पुं-पुष्पे छदहीन, फार लहान व स्त्री-पुष्पे १-२ छदांचे बगलेत, कधी पुं-कणिशाच्या तळाशी किंवा स्वतंत्र कणिशावर. पुं-पुष्पात संदले ४ : प्रदले व बिंब नसतात केसरदले ८, क्वचित अनेक वंध्यकिंज नसते स्त्री-पुष्पात संदले ३-४, बारीक प्रदले व बिंब नसतात. किंजले कधी फार लांब व फणीप्रमाणे [→फूल] फळ (बोंड) तडकून त्याचे तीन भाग होतात.बिया गोलसर सपुष्पक, दलिका रुंद व सपाट. छदांचे प्रकार व स्थान यांना वर्गीकरणात अधिक महत्त्व असते.

खोकली (ॲ. इंडिका) औषधी आहे. ॲ. विल्केसिॲना व ॲ. हिस्पिडा  या जाती बागेत विशेषेकरून लावतात.

जमदाडे, ज. वि.