ॲकॅरिना : ⇨आर्थ्रोपोडा संघाच्या ⇨ॲरॅक्‍निडा वर्गातील ॲकॅरिना हा एक गण असून त्यात किडी (माइट) आणि गोचिडींचा समावेश होतो. हे आकाराने लहान असतात काही तर सूक्ष्म असतात. शरीर सामान्यतः अंडाकृती असून शिर, वक्ष आणि उदर यांच्या सायुज्यनाने (एकीकरणाने) बनलेले असते त्याचे खंड पडलेले नसतात. शिराचा एक लहानसा भाग निराळा झालेला असून शरीराला जोडलेला असतो तो चल असून त्यावर मुखांगे (मुखाशी संबंध असणारी उपांगे) असतात. डोळे असलेच तर या भागावर केव्हाही नसतात. शरीर आणि पाय यांवर रोम (आखूड, ताठ केस) असतात. हे श्वासनालांनी श्वासोच्छ्‌वास करतात श्वासनाल (श्वासोच्छ्‌वास करताना ज्यांच्यातून हवा आत घेतली जाते त्या नळ्या) सामान्यतः दोन पण कधी चार असतात. मृदू शरीर असणारे पुष्कळ ॲकॅरिना त्वचेन श्वासोच्छ्‌वासकरतात. ॲकॅरिनांच्या जीवनचक्रात अंडे, डिंभ (अळी), अर्भक आणि प्रौढ या चार अवस्था असतात. या प्राण्यांपैकी काही घाणीचा नाश करणारे, काही वनस्पती व प्राणी यांवर बाह्यपरजीवी (अन्न किंवा संरक्षण या बाबतीत स्वतःचा फायदा करून घेण्याकरिता दुसऱ्या प्राण्याच्या शरीरावर राहणारे) आणि थोडे अंतःपरजीवी (दुसऱ्या प्राण्याच्या शरीराच्या आत राहणारे) असतात. काही रक्त शोषणारे असतात.

कर्वे, ज. नी.