ॲनाकार्डिएसी : (आम्रकुल). फुलझाडांपैकी (आवृतबीज वनस्पतींपैकी) द्विदलिकित वर्गातील ⇨सॅपिंडेलीझ या गणात ह्या वनस्पतिकुलाचा समावेश होतो. विलिस यांच्या मताप्रमाणे या कुलात सु. ६० वंश व ५०० जाती अंतर्भूत आहेत. सर्व वनस्पती क्षुपे (झुडपे) व वृक्ष असून त्यांचा प्रसार मुख्यत: उष्णकटिबंधात व काहींचा दक्षिण यूरोपात आहे. हचिन्सन यांच्या मते सॅपिंडेलीझ गणातील हे सर्वांत अधिक प्रगत कुल आहे. यातील वनस्पतींची पाने एकाआड एक, क्वचित समोरासमोर, अनुपपर्ण (उपपर्णे नसलेली), साधी किंवा संयुक्त व पिसासारखी असून यांच्या शरीरात रेझीन व गोंद यांनी भरलेल्या भेदोद्भव नलिका व कोशिका आढळतात. फुले नियमित, लहान एकलिंगी व उभयलिंगी, एकाच झाडावर, बहुधा अर-समात्र व अवकिंज असून फांद्यांच्या टोकास किंवा पानांच्या बगलेत परिमंजरीवर येतात. फुलांतील पेल्यासारखे बिंब बहुधा अंत:केसरी, क्वचित केसरमंडलाबाहेर असते [→ आंबा]. संदले ३–७ किंवा ५, सुटी किंवा अंशत: जुळलेली, प्रदले ३–७ (अथवा नसतात), सुटी, फार क्वचित जुळलेली केसरदले प्रदलांच्या दुप्पट, किंवा १०, ५ अधिक किंवा एकच पूर्ण व जननक्षम किंजदले १–५, किंजपुट ऊर्ध्वस्थ, १–५ कप्प्यांचा [→फूल] बीजक एक, लोंबते किंवा उभे ⇨फळ अश्मगर्मी (कोय असलेले) (आंबा) किंवा कपाली (काजू) बी बहुधा पुष्कहीन. आंबा, काजू, चारोळी, बिब्बा, पिस्ता, मोई इ. उपयुक्त वनस्पती याच कुलातील असून लाकूड, फळे, रेझीन तेले, औषधे वगैरेंबद्दल त्या प्रसिद्ध आहेत.
जमदाडे, ज. वि.