अँडेसाइन : खनिज. अल्बाइट व ॲनॉर्थाइट या समाकृतिक (सारखे रा. सं. व स्फटिकांचे आकार समान असणाऱ्या) खनिजांच्या मालेतील ७० ते ५०% अल्बाइट रेणू (NaAlSi3O8) व ३० ते ५०% ॲनॉर्थाइट रेणू (CaAl2Si2O8) असे रासायनिक संघटन असणाऱ्या खनिजाचे नाव. स्फटिक त्रिनताक्ष. स्फटिकांचा आकार, यमलन व पाटन अल्बाइटासारखे [→ स्फटिकविज्ञान पाटन फेल्सपार गट]. कठिनता ६. वि.गु. २·६९. रंगहीन, पांढरा किंवा एखादा फिकट रंग. हे खनिज मध्यम सिकत (सिलिकेचे प्रमाण मध्यम असणाऱ्या) ज्वालामुखी खडकांचा, पातालिक (भूपृष्ठाच्या पुष्कळ खाली थंड झालेल्या) खडकांचा किंवा लहान अंतर्वेशी (घुसलेल्या) राशीच्या खडकांचा (उदा., अनुक्रमे अँडेसाइट, डायोराइट, डायोराइट पॉर्फिरी यांचा) एक घटक म्हणून आढळते.
ठाकूर, अ. ना.