अँग्‍लो-सॅक्सन : प्राचीन इंग्‍लंडमधील जर्मनसदृश भाषा बोलणार्‍या लोकांना ‘अँग्‍लो सॅक्सन’ही सर्वसाधारण संज्ञा दिली जाते. रोमनांनी ४१० त ब्रिटन सोडले आणि त्यानंतर उत्तर जर्मनीतून अनुक्रमे अँगल्स, सॅक्सन व ज्यूट ह्या तीन जमातींनी ब्रिटनवर स्वारी केली. ते मूळच्या लोकांस ‘वेल्स’ म्हणत त्यांचे वंशज अद्यापि ह्याच नावाने ओळखले जातात आणि ते स्थायिक झालेला इंग्‍लंडचा पश्चिम भागही वेल्स ह्या नावाने प्रसिद्ध आहे. अँगल्स हे श्‍लेझविग मध्ये राहत, सॅक्सन एल्ब व आयडर नद्यांच्या दुआबात राहत, तर जूट हे ऱ्हाईनच्या परिसरात जटलंडमध्ये राहत होते. येथे स्थायिक होण्यापूर्वीच ह्यांच्यात परस्परसंकराला सुरुवात झाली होती. ती सामाजिक प्रक्रिया पुढेही चालू राहिली. त्यातूनच एक संमिश्र जात निर्माण झाली. तिचे अँग्‍लो-सॅक्सन हे नाव रूढ झाले. ह्या लोकांनी रोमनांची भाषा, कायदे किंवा कला ह्यांचे अनुकरण न करता स्वतःची भाषा समृद्ध केली. सहाव्या शतकापर्यंत त्यांनी ख्रिस्ती धर्माचाही अंगीकार केला नव्हता. ह्यांनी ब्रिटॉन ह्या मूळच्या लोकांना हुसकावून आपल्या वसाहती इंग्‍लंडमध्ये स्थापन केल्या. या वसाहतींचा विकास होऊन ईस्ट अँग्‍लिया, मर्सिया, नॉर्थंब्रिया ही अँगल्स राज्ये व ससेक्स, वेसेक्स आणि एसेक्स ही सॅक्सन राज्ये अस्तित्वात आली. ही सहा व ज्यूट लोकांचे केंटमधील राज्य मिळून ब्रिटनमधील प्रसिद्ध सात राज्ये होतात. वेसेक्सचा राजा एजबर्ट याने ह्या छोट्या छोट्या राज्यांचे एकीकरण करून (८३४) ब्रिटनच्या ऐक्याचा पाया घातला. कालांतराने डेन्मार्कमधील डेन टोळ्यांचे इंग्‍लंडवर आक्रमण सुरू झाले, तेव्हा याच वंशातील ॲल्फ्रेड द ग्रेटने त्यांचा पराभव करून (८८६) अर्वाचीन इंग्‍लंडची मुहूर्तमेढ रोवली. प्राचीन काळी इंग्‍लंडमध्ये स्थायिक झालेल्या ⇨नॉर्ननडेन आदी सर्वच जमातींना अलीकडे अँग्‍लो-सॅक्सन ह्या नावानेच संबोधण्यात येते.

ओक,द.ह.