अपपोषण : शरीराच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात पोषक अन्नघटक (उदा., प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेटे इ.) मिळाले नाहीत, तर शरीराच्या होणाऱ्या अवस्थेस ‘अपपोषण’ असे म्हणतात. पोषक घटकांचे अन्नातील हे प्रमाण कमीअधिक असणे, अन्नपदार्थ कमी प्रमाणात शोषले जाणे वगैरे कारणांमुळे अपपोषण होऊ शकते. अन्नामध्ये आवश्यक असे पोषक घटक पुरेसे नसल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या अवस्थेला ‘हीनपोषण’ म्हणतात. त्या अवस्थेचे विशेष उदाहरण म्हणजे उपासमार होय. क्षयासारख्या रोगात पुरेसे अन्न मिळून हीनपोषण होऊ शकते. त्याचे वर्णन येथे अभिप्रेत नाही.
अन्नातील पोषक घटकांची संख्या व प्रमाण कसेही असले, तरी त्यांचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे शरीरातील कोशिकांचे (शरीरातील सूक्ष्म घटकांचे) पोषण करणे हे होय. खाल्लेल्या अन्नाचे पचन, शोषण आणि सात्मीकरण या क्रिया पूर्ण होण्याचे कार्य शरीरातील विशिष्ट कोशिकांच्या द्वारे चालू असते.
शरीरातील कोशिकांचे महत्त्वानुक्रमे वर्गीकरण केलेले आहे.⇨तंत्रिका तंत्रातील कोशिका इतर कोशिकांवर नियंत्रण करीत असल्यामुळे त्यांचे महत्त्व सर्वाधिक आहे. हृदयातील कोशिका सतत कार्य करीत असल्यामुळे त्याचेही विशेष महत्त्व आहे. यकृत, अग्निपिंड वगैरे ठिकाणच्या कोशिका पुष्कळ कोशिकाबाह्य प्रथिने तयार करीत असल्यामुळे त्यांनाही महत्त्व आहे. याउलट संयोजी ऊतकांतील (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांतील) कोशिकांचे महत्त्व त्या मानाने कमी असते. उपपोषण कोशिकांवर होणारा परिणाम त्या कोशिकांच्या महत्त्वानुक्रमे जाणवतो.
आहारातील महत्त्वाचे घटक म्हणजे प्रथिने, कार्बोहायड्रेटे व वसा हे होत. यांशिवाय पाणी, लवणे आणि जीवनसत्त्वे यांचीही शरीराला जरूरी असते. त्या प्रत्येक घटकाचे कोशिकाकार्यात विशिष्ट स्थान असते.
प्रथिने : आहारात प्रथिनांचे विशेष महत्त्व असून प्रथिने रक्तात ⇨ॲमिनो अम्लांच्या स्वरूपात प्रवेश करतात. अशी ॲमिनो अम्ले सु. २० ते २५ असून त्यांपैकी आठ शरीरात तयार होत नाहीत. ती अन्नातूनच शोषिली जातात. अन्नात त्यांची न्यूनता झाल्यास अपपोषण होते. ही ॲमिनो अम्ले पुढीलप्रमाणे आहेत : (१) ल्यूसीन, (२) आयसोल्यूसीन, (३) लायसीन, (४) फिनिल ॲलॅनीन, (५) ट्रिप्टोफेन, (६) थ्रिओनीन, (७) मिथिओनीन आणि (८) व्हॅलीन.
अपपोषणात ही ॲमिनो अम्ले मुळीच नसतात असे नव्हे परंतु कोशिकांच्या वाढीच्या जरूरीच्या दृष्टीने सापेक्षतेने ती कमी पडल्यास अपपोषणाची लक्षणे दिसतात. आफ्रिका व आशिया खंडांच्या काही भागांत प्रथिनन्यूनतेमुळे विशेषत: बालकांत होणाऱ्या अपपोषणाला ⇨ क्वोशिओरकोर असे नाव आहे.
वसा :वसामय पदार्थांतून मिळणाऱ्या वसाम्लांपैकी तीन वसाम्ले शरीरात तयार होत नाहीत ती म्हणजे: (१) ॲरॅकिडॉनिक अम्ल, (२) लिनोलीनिक अम्ल आणि (३) लिनोलिक अम्ल. शरीरात वसा आणि प्रथिने यांची संयुगे असतात. वसायुक्त पदार्थ कोशिकांच्या आवरणांच्या संरचनेस आवश्यक असतो. वसाम्लांच्या अपपोषणाची उदाहरणे फारशी नाहीत.
कार्बोहायड्रेटे : ही (पिष्ठमय पदार्थ) प्रत्यक्ष कोशिकांची महत्त्वाची घटकद्रव्ये नसली, तरी कोशिकाबाह्य आधार-ऊतकांचे एक महत्त्वाचे अंग आहेत. या पदार्थांचा मुख्य उपयोग शरीरातील ऊर्जाजनन (ऊर्जेची निर्मिती करणे) हे होय.
खनिजे-आयने : कोशिकांच्या चयापचयात (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिक बदलांत) खनिजांचा फार महत्त्वाचा भाग असतो. सोडियम व पोटॅशियम यांची कार्बोनेटे, फॉस्फेटे व क्लोराइडे ही कोशिकांमधील जलसंचयाचे नियंत्रण करतात. विशेषत: पोटॅशियम व मॅग्नेशियम यांच्या संयुगांची एंझाइम-प्रक्रियेत आवश्यकता असते. रक्तरूग्णाच्या (हीमोग्लोबिनच्या) उत्पत्तीस लोहाची जरूरी असते. ते कमी पडल्यास रक्तोत्पती नीट होऊ शकत नाही. आयोडीन कमी पडल्यास ⇨अवटुग्रंथींचे विकार उद्भवतात. जस्त, मँगॅनीज, कोबाल्ट आणि तांबे या खनिजांच्या न्यूनतेमुळे विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत परंतु उपासमारीमध्ये यांची उणीव आढळते.
जीवनसत्त्वे : काही जीवनसत्त्वाच्या न्यूनतेमुळे काही पदार्थांचे शोषण पुरेसे होत नाही व त्यामुळे काही रोग होतात [→त्रुटिजन्य रोग].
सामान्य अपपोषण : सामान्यपणे ५५ किग्रॅ. वजनाच्या मनुष्याला त्याचे नेहमीचे काम करीत असताना दर दिवशी २,४०० ते ३,००० किकॅ. ऊर्जा उत्पन्न करू शकेल एवढा आहार लागतो. त्याने घेतलेल्या आहारात १,२०० किंवा त्याहून कमी किकॅ. मिळत असतील, तर अपपोषणाची लक्षणे दिसू लागतात. ती लक्षणे म्हणजे तीव्र अस्वास्थ, वाढ खुंटणे, अशक्तपणा, पांडुता आणि तीव्र प्रकारात शोफ (आंतरकोशिकीय आवकाशात प्रमाणाबाहेर द्रव साचणे, → शोफ) ही होत. अंतस्त्यांचा (शरीराच्या आतील इंद्रियांचा) आकार लहान होतो कारण त्यांतील कोशिकांचा संकोच झालेला असून कोशिकांत वसामय रिक्तिका दिसू लागतात. यकृत व स्नायू यांच्यामधील ग्लायकोजेनचे प्रमाण कमी पडते. प्रथिने योग्य प्रकारे तयार होत नाहीत. मनुष्य कृश बनतो. सूक्ष्मजंतू व व्हायरस यांचा संसर्ग होण्याची प्रवृत्ती वाढते. तपमानातील फरकांना प्रतिरोध करण्याची शक्ती कमी होते व त्यामुळे रोग होण्याची शक्यता अधिक असते. प्रतिपिंडे (सूक्ष्मजंतू, त्यांच्यापासून निर्माण होणारी विषद्रव्ये व इतर विशिष्ट पदार्थांना प्रतिरोध करण्याची रक्तद्रवात होणारे पदार्थ, → प्रतिपिंड) तयार करण्याची शरीराची शक्ती कमी होत असल्यामुळे संसर्गरोग-प्रवृत्ती वाढत असावी असे दिसते.
व्यक्तिगत अपपोषणाची लक्षणे वर दिली आहेत. परंतु दुष्काळ, अन्नधान्याची टंचाई इत्यादींसारख्या परिस्थितीत समाजाच्या सर्व थरांत जे अपपोषण आढळते ते ओळखण्याची, इतकेच नव्हे तर त्या समाजाचे एकूण अारोग्यमान ओळखण्याची अनेक साधने आहेत. त्यांपैकी प्रमुख म्हणजे जीवसांख्यिकीच्या (जीवशास्त्रीय प्रश्नांकरिता सांख्यिकीय पद्धतींचा उपयोग करणे, → जीवसांख्यिकी) मदतीने केलेली पाहणी, मुलांच्या वाढीचा वेग, माता व बालमृत्यूंचे प्रमाण इ. होत. एकूण उपलब्ध असलेले अन्न व लोकसंख्येला जरूर असलेले अन्न यांच्या एकमेकांतील प्रमाणावरूनही अंदाज बांधता येतात.
याशिवाय पोषण पाहाणी करून एखाद्या समाजात पुरेसे अन्न मिळते की नाही यासंबंधीही काही निष्कर्ष काढता येतात. पाहणीमध्ये तपासलेल्या व्यक्तींना मिळणारे अन्न, त्यांना होणारे रोग, यांची उपरुग्ण पद्धतीने (प्रायोगिक पद्धतींचा अवलंब न करता प्रत्यक्ष रुग्णांचे निरीक्षण व त्यांच्यावर केलेले उपचार यांवर आधारलेल्या पद्धतीने) पाहाणी केल्यास पुष्कळ उपयुक्त माहिती मिळते. डोळा, त्वचा, श्लेष्मकला (आतडे, श्वासनलिका
अपपोषणाचे प्रमाण व त्यामुळे होणारी लक्षणे
अपपोषण |
वजन कमी होण्याचे % प्रमाण |
लक्षणे |
थोडे |
१० |
नाहीत |
मध्यम |
१० ते २० |
लक्षणे फार नसतात काम करणे शक्य |
गंभीर |
२० ते ३० |
थोडे काम केल्याबरोबर थकवा |
अतिशय |
३० पेक्षा अधिक |
रुग्णावस्था काम करणे अशक्य |
पराकाष्ठेचे |
५० पेक्षा अधिक |
गंभीर अवस्था मृत्युकारक |
इत्यादींसारख्या नलिकाकार पोकळ्यांच्या आतील बाजूस आढळणारा ऊतकांचा थर), अस्थी व अधस्त्वक् (त्वचेच्या किंचित खाली असलेली) वसा यांचे परीक्षण करतात. कारण अपपोषणामुळे उत्पन्न होणारी चिन्हे याच ठिकाणी विशेषत्वाने दिसतात. मुख्यत: मूलभूत चयापचय-परिमाण कमी होणे, नाडी मंद चालणे, रक्तदाब कमी पडणे, स्त्रियांत रजोहीनता, त्वचा रुक्ष व खरखरीत होणे, डोळे लाल होणे, निद्रानाश आणि अस्थी मऊ पडल्यामुळे अस्थिभंग होणे ही लक्षणे सामान्यत: दिसतात. अपपोषण चिरकारी (दीर्घकालीन) असल्यास तोंड येणे, हातापायांची जळजळ, शोफ, ओठांच्या कोपऱ्यांवर चिरम्या पडणे व तोंडाला पाणी सुटणे ही लक्षणे दिसतात.
पृ. २७९ वरील कोष्टकात अपपोषणाचे प्रमाण व त्यामुळे होणारी लक्षणे दिली आहेत.
पहा : अन्न आहार व आहारशास्त्र उपासमार पोषण.
पानसे, के.वि.
“