ॲबर्डीन : ग्रेट ब्रिटनच्या स्कॉटलंड प्रदेशातील ॲबर्डीनशर परगण्याचे मुख्य ठिकाण, स्कॉटलंडमधील तिसरे शहर व उत्तर स्कॉटलंडमधील प्रमुख बंदर. लोकसंख्या १,८१,७८५ (१९७१). हे एडिंबरोच्या ईशान्येस लोहमार्गाने २१० किमी. सडकेने आणि जलमार्गाने १९० किमी. आहे. शहराच्या दक्षिणेस डी नदीचे मुख असून उत्तरेस डॉन नदीचे मुख आहे. परिसरात विपुलतेने मिळणाऱ्या ग्रॅनाइट खडकाच्या दगडांनी बांधलेल्या येथील इमारती लांबून चमकत असल्याने शहरास ‘ग्रॅनाइट-सिटी’ अथवा ‘सिल्व्हर-सिटी’ म्हणतात. मच्छीमारीचे हे मोठे केंद्र असून त्याशिवाय जहाजबांधणी, खाणकाम, चर्मोद्योग, लोकर, कागद, यंत्रोत्पादन, रसायने, खते, रंग, प्लॅस्टिक इ. उद्योग येथे आहेत. पशुधन व शेतीमालाच्या व्यापाराकरिताही हे प्रसिद्ध आहे. ११७९ मध्ये शहरास प्रथम सनद मिळाली. स्कॉटलंडच्या स्वातंत्र्ययुद्धात या शहराने भाग घेतला होता. १२-१६ शतकांतील अनेक वास्तू, चर्च, विद्यापीठ, आणि इतर संस्था यांमुळे हे सध्या पर्यटन केंद्र बनले आहे.
यादीं, ह. व्यं.