अष्टछाप कवि : वल्लभाचार्यप्रणीत पुष्टीमार्गातील आठ भक्त कवींना ‘अष्टछाप कवी’ म्हटले जाते. त्यांची नावे : कुंभनदास, सूरदास, परमानंददास, कृष्णदास, नंददास, चतुर्भुजदास, गोविंदस्वामी व छीतस्वामी असून त्यांपैकी पहिले चार वल्लभाचार्यांचे आणि शेवटचे चार विठ्ठलनाथांचे शिष्य होत. विठ्ठलनाथ हे वल्लभाचार्यांचे पुत्र व उत्तराधिकारी. विठ्ठलनाथांनी अनेक शिष्यांतून या आठांची निवड करून त्यांना अनुग्रहपूर्वक ‘अष्टछाप’ असे सन्मानाने संबोधिले. सर्वसाधारणतः हे आठही शिष्य परस्परांचे समकालीन होत. साधारणतः १५०० ते १५८६ हा त्यांचा काव्यरचनाकाल मानला जातो. पुष्टिमार्गात त्यांना ‘अष्टसखा’ असेही म्हटले जाते. ⇨वल्लभाचार्यांनी गोवर्धन पर्वतावर उभारलेल्या श्रीनाथ (श्रीकृष्ण) या आराध्यदैवताच्या मंदिरात भजन-कीर्तन-काव्यादिद्वारे त्यांची उपासना हे कवी करीत. या कवींत ब्राह्मणांपासून शूद्रादी जातींचे कवी होते. सर्वच कवी थोर भक्त व संगीतकार होते. ⇨सूरदास व ⇨नंददास हे तर प्रख्यात भक्तकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. गोविंदस्वामी व छीतस्वामी हे त्या वेळचे प्रख्यात गायक म्हणून प्रसिद्ध आहेत. यांचे संगीत ऐकण्यासाठी तानसेन, अकबर वगैरे मंडळी येत, असे सांगतात. परमानंददासाची कविता परमानंदसागरमध्ये संगृहीत असून ती वात्सल्यरसाने परिपूर्ण आहे. कुंभनदासाची कविता श्रीनाथाच्या अष्टाप्रहर चालणाऱ्या उपासनेबाबत आहे. कृष्णदास, गोविंदस्वामी इत्यादींची पदरचनाही उपलब्ध आहे. नंददासाचा अपवाद सोडल्यास या सर्वच कवींनी आपल्या काव्यात सिद्धांतविवेचन न करता भक्तीकडे अधिक लक्ष पुरविले आहे. नंददासाची रचना मात्र सिद्धांतविवेचनात्मक आहे. दास्य, वात्सल्य, सख्य आणि माधुर्य ह्या चार संबंधांनी या कवींनी आपली ईश्वरविषयक भावना व भक्ती आपल्या काव्यात व्यक्त केली आहे. आपल्या सरस व संगीतपूर्ण पदरचनेच्या आधारे या ⇨पुष्टीमार्गी कवींनी कृष्णभक्तीचा प्रवाह जनताभिमुख केला.
संदर्भ : १. गुप्त, दीनदयालू, अष्टछाप और वल्लभ संप्रदाय, अलाहाबाद, १९३७.
२. वर्मा, धीरेंद्र, अष्टछाप,अलाहाबाद, १९३८.
बांदिवडेकर, चंद्रकांत