ओटो, नीकोलाउस आउगुस्ट : (१० जून १८३२ — २६ जानेवारी १८९१). जर्मन यांत्रिक अभियंते. यांनी तयार केलेले वायू एंजिन अंतर्ज्वलन एंजिनांच्या विकासातील एक महत्त्वाची पायरी ठरले आहे. त्यांचा जन्म होल्‌त्सहाउसन येथे झाला. १८५३ मध्ये कोलोनला त्यांनी स्वतःचा धंदा सुरू केला. फ्रान्समधील द रोशा यांनी १८६२ मध्ये वायू एंजिनासाठी चार धावांच्या आवर्तनाच्या केलेल्या वर्णनाचा ओटो व त्यांचे सहकारी लांगन यांनी यशस्वीपणे उपयोग करून एक आवाजरहित वायू एंजिन तयार केले व त्याचे १८७७ मध्ये पेटंटही मिळविले. हे एंजिन लहान कर्मशालांना अतिशय उपयुक्त ठरले. ओटो व लांगन यांनी १८६७ मध्ये तयार केलेल्या एक प्रकारच्या सुट्या दट्‍ट्याच्या एंजिनास पॅरिस येथील प्रदर्शनात सुवर्णपदक मिळाले. ते कोलोन येथे मृत्यू पावले.

कानिटकर, बा. मो.