संपीडक : वायूचा दाब वाढविण्याच्या प्रक्रियेला वायू संपीडन  म्हणतात. वायूचा दाब वाढविणाऱ्या यंत्राला वायू संपीडक म्हणतात. सर्वसाधारणपणे हवेचे संपीडक असतात. परंतु उत्पादन क्षेत्रात ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, ॲसिटिलीन किंवा प्रशीतन वातानुकूलन क्षेत्रात प्रशीतकाची बाष्पे संपीडित करण्याकरिता संपीडक वापरतात. हवेचे संपीडक व इतर वायूंचे संपीडक यांच्या रचनेमध्ये फारसा फरक नसतो.  दाबयुक्त हवा अभियांत्रिकी क्षेत्रात मोठया प्रमाणावर वापरली जाते. संपीडित हवेचा साठविलेली ऊर्जा म्हणून उपयोग होतो. संपीडित हवेचे  प्रसरण करून विविध सुवाह्य हत्यारे, यंत्रे चालवितात. स्थापत्यशास्त्रात  खडक खोदाईचे किंवा सुरूंगाकरिता भोके पाडण्यासाठी हवेवर चालणारी अवजारे वापरतात. खाणीमध्ये संपीडित हवेवर चालणारी हत्यारे मोठया प्रमाणावर वापरतात. कारखान्यात ओतकामाचे साचे बनविण्याची यंत्रे, लोहारकामाची घडण यंत्रे, धातूचे भाग साफ करण्याकरिता किंवा पृष्ठभाग घासण्याकरिता हवेवर चालणारी यंत्रे वापरतात. तेल, जंतुनाशक यांचे फवारे उडविण्याकरिता, तसेच रंगाचा फवारा उडवून रंगविण्याच्या प्रक्रियेमध्ये संपीडित हवेचा उपयोग करतात. पदार्थाचे परिवहन करणे, कापड गिरणीत कापूस किंवा रासायनिक प्रक्रियेमध्ये द्रव ढवळणे, वाहनांची गती थांबविणारे गतिरोधक इत्यादींकरिता संपीडित हवेचा उपयोग होतो. संपीडकांचे रचने-प्रमाणे दोन गट पडतात : (१) पश्र्चाग्र गती संपीडक व (२) घूर्णक गती संपीडक.

पश्चाग्र गती संपीडक : (आ. १). भुजादंडाला डीझेल एंजिन किंवा विद्युत् चलित्र यामुळे चक्रगती दिली जाते. भुजादंड व संयोजक दंड यांमुळे दट्ट्याला पश्चाग्र गती मिळते. भुजादंडाच्या एका फेरीत दट्ट्याच्या दोन धावा होतात. पहिल्या धावेत दट्ट्या वरून खाली येईपर्यंत सिलिंडरमधील हवेचा आकार वाढत जातो. त्यामुळे हवेचा दाब बाहेरील वातावरणाच्या दाबापेक्षा कमी होतो. शोषक झडप उघडते व बाहेरील हवा गाळणीतून सिलिंडरमध्ये येते. दुसऱ्या धावेत दट्ट्या खालून वर जावयास लागल्यावर हवेचे सिलिंडरमधील आकारमान कमी होते व दाब वाढतो. शोषक झडप बंद होते व हवेचा दाब वाढत जातो. दट्ट्याची दुसरी धाव पूर्ण होण्याच्या अगोदरच अभिकल्पित दाब आल्यावर प्रदान झडप उघडते व उच्च् दाबाची हवा दुसरी धाव पूर्ण होईपर्यंत सिलिंडरमधून बाहेर टाकली जाते. संपीडकातील हवा एका दाबटाकीत साठविली जाते. अशी भुजादंडाची एक फेरी पूर्ण होते. पुढील फऱ्यात अशाच तऱ्हेची क्रिया घडते. ऊष्मागतिकीच्या सिद्धांताप्रमाणे हवेचा दाब वाढत असताना हवेचे तापमानही वाढते. म्हणून सिलिंडर थंड करण्याकरिता आकृतीत दाखविल्याप्रमाणे कंगोरे असतात. त्यावर हवेचा झोत सोडून सिलिंडर थंड केला जातो किंवा सिलिंडरच्या बाहेर पोकळी ठेवून त्यातून पाण्याचे अभिसरण करून सिलिंडर व सिलिंडर-टोपण थंड करतात. आ. १ मध्ये दट्ट्याच्या वरच्या बाजूची हवा संपीडन करण्याची रचना केली आहे परंतु दट्ट्याची रचना बदलून दट्ट्याच्या दोन्ही बाजू हवा संपीडनाकरिता  वापरतात. भुजादंडाच्या प्रत्येक फेरीत दुप्पट हवा संपीडित केली जाते. संपीडकाची रचना क्लिष्ट होते म्हणून लहान संपीडक एका बाजूनेच हवा दाबणारे असतात. मोठया आकाराच्या संपीडकामध्ये एकापेक्षा जास्त  सिलिंडर असतात. त्यांची सापेक्ष रचना विविध पद्धतींनी करतात : एका रेषेमध्ये दोन ते चार सिलिंडर, उभ्या किंवा आडव्या स्थितीत, निम्मे सिलिंडर उभे व निम्मे सिलिंडर आडवे किंवा इंग्रजी अक्षर ‘V’ सारखी रचना.

सिलिंडर निष्कासन : संपीडकाचा दट्ट्या वरच्या स्थिर बिंदूवर  असताना सिलिंडर व सिलिंडर-टोपण यांच्यामध्ये पोकळी असते. अशी पोकळी विविध प्रकारच्या संपीडकामध्ये कमी-जास्त असते परंतु थोडी तरी पोकळी असणे आवश्यक असते. ह्या पोकळीला सिलिंडर निष्कासन असे म्हणतात. संपीडकाच्या दट्ट्याची दुसरी धाव पूर्ण झाल्यावर म्हणजे दट्ट्या वरच्या स्थिर बिंदूला आल्यावर वायू बाहेर टाकण्याची क्रिया पूर्ण  होते व सिलिंडर निष्कासनमध्ये उच्च् दाबाचा वायू शिल्ल्क राहतो. हा वायू दट्ट्याच्या पुढील धावेत म्हणजे दट्ट्या खाली जात असता प्रसरण पावतो  व सिलिंडरमधील वायूचा दाब वातावरणातील दाबापेक्षा कमी झाल्या- शिवाय बाहेरील वायू आत येत नाही. म्हणजे प्रत्येक धावेमध्ये बाहेरून येणाऱ्या वायूचे घनफळ दट्ट्याच्या एका धावेतील विस्थापनाच्या घनफळापेक्षा कमी असते. सिलिंडरचे तापमान बाहेरील तापमानापेक्षा   जास्त असल्यास आत येणाऱ्या वायूचे प्रमाण आणखी कमी होते. तसेच झडपांच्या प्रतिरोधामुळेही वायूचे प्रमाण कमी होते. ‘प्रत्येक धावेत किंवा मिनिटास बाहेरून आत येणाऱ्या वायूचे घनफळ (७६० मिमी. पाऱ्याइतका दाब व २०° से. तापमान असताना) भागिले प्रत्येक धावेत किंवा मिनिटास दट्ट्याचे विस्थापित घनफळ’ हे गुणोत्तर महत्त्वाचे असते. त्यास १०० ने गुणल्यास आयतनीय क्षमता मिळते.

संपीडक समुद्रसपाटीवरून उंच ठिकाणी किंवा जास्त तापमान अस लेल्या ठिकाणी वापरावयाचा असल्यास अशा ठिकाणी त्याची आयतनीय क्षमता कमी होते. कारण बाहेरून सिलिंडरमध्ये आत येणाऱ्या वायूचे प्रमाण प्रमाणित दाब व तापमान याला दुरूस्त केल्यास कमी होते. संपीडकाची क्षमता प्रमाणित दाब व तापमानाला दिलेली असल्यामुळे संपीडकाची निवड करताना अशा ठिकाणी होणारी कार्यभारातील घट  लक्षात घ्यावी लागते. साधारणतः प्रत्येक ३०० मी. उंचीवर आयतनीय क्षमता ३% व प्रत्येक ५° से. तापमानातील वाढीला १% आयतनीय क्षमता कमी होते. एकेक सिलिंडर असे तीन सिलिंडर किंवा एका पेक्षा जास्त सिलिंडरांचे तीन गट इंग्रजी अक्षरे Y किंवा W सारख्या आकारात एकाच भुजादंडास जोडतात. हवेचा दाब जास्त पाहिजे असल्यास दाब एकापेक्षा जास्त टप्प्यात वाढवितात. दोन टप्प्यांच्या मध्ये हवा शीतकामध्ये थंड करतात. एकापेक्षा जास्त टप्पे वापरल्यास व दोन टप्प्यांमध्ये हवा थंड केल्यास हवा संपीडकास चलित्राचे कार्य कमी लागते, संपीडकाचा आकार लहान होतो व आर्थिक फायदयाचे होते. साधारणपणे हवेचा दाब १० किगॅ./ सेंमी.२ पर्यंत असल्यास एक टप्पा, ३५ किग्रॅ./सेंमी.२ असल्यास दोन टप्पे व त्यावर तीन ते पाच टप्पे वापरतात. जास्तीत जास्त २,४०० किग्रॅ./सेंमी.२ पर्यंत हवेचा दाब येण्याइतके पश्र्चाग्र गतीचे संपीडक तयार केलेले आहेत.

संपीडकाची क्षमता दर मिनिटाला संपीडित होणाऱ्या वायुराशीवर  मोजतात. वायूची राशी मोजण्याकरिता वायूचा दाब ७६० मिमी. पाऱ्याच्या स्तंभाइतका व तापमान २०°से. इतके धरले जाते. वायुराशी घन मीटरमध्ये मोजतात. म्हणून संपीडकाची क्षमता दर मिनिटाला संपीडित होणाऱ्या घन मीटरमध्ये मोजतात. पश्र्चाग्र संपीडकाची क्षमता दर मिनिटाला २,८०० घनमीटर इतकी  असू शकते.

संपीडकांच्या झडपा निरनिराळ्या प्रकारच्या असतात. आधुनिक संपीडकात झडपा तबकडीसारख्या स्प्रिंग पोलादाच्या असतात किंवा लहान लहान पातळ स्प्रिंग पोलादाच्या पट्ट्या असतात. आ. २ मध्ये अशा तऱ्हेची झडप दाखविली आहे. तिची उघड-झाप हवेच्या दाबामुळे होते व स्प्रिंग पोलादाची असल्यामुळे पट्टयंचा आकार कायम राहतो. तसेच झडप रक्षकामुळे (आ.२ इ) झडपेची सरक मर्यादित राहते. उच्च् दाबाच्या संपीडकामध्ये झडपेची उघडझाप हवेच्या दाबामुळेच न होता त्याकरिता अंतर्ज्वलन-एंजिनासारखे कॅमदंड व इतर आनुषंगिक भाग यांचा उपयोग करतात.

संपीडक चालू करताना चालकावरील भार कमी करावा लागतो. म्हणून शोषक झडप उघडी ठेवण्याची यंत्रणा केलेली असते. त्यामुळे संपीडकांमध्ये हवा दाबलीच जात नाही. चालकाची गती योग्य प्रमाणात आल्यावर शोषक झडप बंद करतात व त्यानंतर हवेचे संपीडन व्हावयास लागते. संपीडित हवेचा वापर करणाऱ्या यंत्रांचा कार्यभार बदलत असतो किंवा काही यंत्रे बंद होतात. अशा वेळी संपीडकावरील कार्यभार बदलत असतो. संपीडक एकसारखा चालूच राहिला तर दाबटाकीमधून वापरल्या जाणाऱ्या हवेपेक्षा संपीडकाकडून दाबटाकीत येणारी हवा जास्त होईल म्हणून कार्य कमी झाल्यास संपीडकाचे प्रदान (वायू संपीडित करण्याची क्षमता) कमी करण्याच्या यंत्रणेचा अंतर्भाव करावा लागतो. एका व्यवस्थे-मध्ये पश्र्चाग्र संपीडकांचा कार्यभार कमी झाल्यास संपीडक थांबविला जातो व दाबपात्रातील हवा कमी झाल्यास संपीडक चालू केला जातो. अशा तऱ्हेची योजना स्वयंचलित असते व दाबपात्रातील हवेच्या दाबातील फरकामुळे कार्यान्वित होते. दुसऱ्या प्रकारच्या यंत्रणेत हवेच्या दाबातील फरकामुळे शोषक झडप उघडण्याची व्यवस्था असते. दाब जास्त झाल्यास झडप उघडतात व कमी झाल्यावर झडप बंद होते. अशा तऱ्हेने कार्यभार व प्रदान यांची सांगड घातली जाते. याशिवाय प्रदान नळीमध्ये एकमार्गी झडप बसविलेली असते व ही झडप उघडून प्रदान नळीतील हवा वातावरणात फेकली जाते व दाबटाकीकडे जाणारी हवा कमी होते. आणखी एका पद्धतीत विशिष्ट झडपेच्या साहाय्याने सिलिंडर निष्कासन कमी-जास्त करण्याची स्वयंचलित व्यवस्था असते. सिलिंडर निष्कासन वाढविल्यास आयतनीय क्षमता कमी होते व संपीडकाचे प्रदान कमी होते.

संपीडकाच्या चालकाचा वेग कमी करून उत्पादन कमी करता येते. पश्र्चाग्र संपीडक व अंतर्ज्वलन-एंजिन एकाच रेषेत जोडता येतात, परंतु विद्युत् चलित्रावरून पश्र्चाग्र संपीडक चालविण्याकरिता व्ही पट्टयंचा उपयोग करतात.

घूर्णक गती किंवा चक्रगती संपीडक : चक्रगती संपीडकामध्ये दोन प्रकारचे संपीडक आहेत : (१) स्पष्ट विस्थापन संपीडक, (२) अस्पष्ट विस्थापन संपीडक. पहिल्या प्रकारात तीन संपीडकांचा विचार केला आहे: (१) सरकणाऱ्या पात्यांचा संपीडक, (२) व्दिघूर्णक संपीडक, (३) द्रव- दट्ट्या संपीडक. दुसऱ्या प्रकारात दोन संपीडकांचा विचार केला आहे :  (१) अपकेंद्री संपीडक, (२) अक्षीय संपीडक.

सरकणाऱ्या पात्यांचा संपीडक : आ.३ मध्ये दाखविलेल्या अ पासून आ पर्यंतच्या पात्यांमध्ये शोषक नलिकेतून हवा घेतली जाते. घूर्णक व कवच उत्केंद्री असल्यामुळे घूर्णक फिरल्यावर ‘आ’पासून ‘इ’पर्यंतच्या भागात घूर्णक व कवच यांमधील हवेची राशी कमीकमी होत जाते. आशी कमी झाल्यामुळे हवेचा दाब वाढतो. पाती अपकेंद्री बलामुळे किंवा स्प्रिंगमुळे कवचाला चिकटतात व हवेचे झरण होत नाही. घूर्णक ‘ इ ’पर्यंत आल्यावर पदान छिद्रातून हवा कोठीत जाऊ लागते व घूर्णक ‘ ई ’पर्यंत फिरून जात असताना हवा प्रदान कोठीत टाकली जाते. प्रदान कोठीतून हवा दुसऱ्या टप्प्याच्या घूर्णकाकडे जाते. तेथेही अशाच प्रकारची प्रक्रिया होऊन प्रदान नळीतून हवा दाबटाकीमध्ये साठविली जाते. साधारण एका टप्प्यामध्ये ३ किग्रॅ./सेंमी.२, तर दोन टप्प्यांमध्ये १० किग्रॅ./सेंमी.२ पर्यंत हवेचा दाब वाढविता येतो. संपीडकाची क्षमता दरमिनिटाला १५० घ. मी. हवा संपीडन करण्याइतकी असते.

व्दिघूर्णक संपीडक : (आ. ४). व्दिघूर्णक संपीडकाचे कवच दीर्घ-वर्तुळाकार आहे व दोन दंडांवर विशिष्ट आकाराचे घूर्णक बसविले आहेत. कवचाच्या बाहेर दोन्ही दंड दंतचकांनी जोडलेले आहेत त्यामुळे घूर्णक एकमेकांच्या विरूद्ध दिशेने फिरत असतात. डाव्या बाजूच्या घूर्णकातील पोकळी शोषक नलिकेला जोडली असल्यामुळे बाहेरील हवा आत येते. घूर्णक फिरविल्यावर घूर्णकाची दोन्ही टोके ‘अ’ व ‘आ’ कवचाला  चिकटतील आणि त्या पोकळीत सापडलेल्या हवेचा दाब वाढेल. आणखी  पुढे घूर्णक फिरल्यावर ‘A’ बाजू प्रदान नलिकेकडे येईल. ‘आ’ बाजू कवचाला चिकटलेलीच असते. आ. ४ मध्ये उजवीकडील घूर्णकातील दाबयुक्त हवा प्रदान नलिकेमध्ये जात आहे. अशा तऱ्हेने दोन्ही घूर्णक आलटून पालटून हवा शोषून घेतात व प्रदान नलिकेत दाब वाढवून टाकत असतात. असा संपीडक १ किग्रॅ./सेंमी.२ पर्यंत एका टप्प्यात हवेचा दाब वाढवू शकतो. त्यापेक्षा जास्त दाब पाहिजे असल्यास दोन संपीडक  एकापुढे एक असे जोडतात. व्दिघूर्णक संपीडकाची हवा संपीडन करण्याची क्षमता दर मिनिटाला १,४०० घ.मी. इतकी असते.

द्रवदट्ट्या संपीडक : (आ. ५). या प्रकारच्या संपीडकाचे कवच दीर्घवर्तुळाकार असते व घूर्णकाला पाती बसविली असतात. घूर्णकामध्ये पाणी किंवा कोणतेही कमी श्यानता असलेले द्रव असते. अपकेंद्री बलामुळे व कवचाच्या विशिष्ट आकारामुळे घूर्णकाच्या एका फऱ्यात द्रव दोनदा पात्यामधील अवकाशातून बाहेर टाकले  जाते व परत पात्यामध्ये येते. द्रव बाहेर गेल्यावर बाहेरील हवा आत येते व परत आल्यावर हवेचा दाब वाढतो. अशा तऱ्हेचे संपीडक एका टप्प्यामध्ये ५ किग्रॅ. प्रती सेंमी.२ पर्यंत दाब वाढवू शकतात. त्यापेक्षा जास्त दाबाकरिता अधिक टप्पे वापरतात. तसेच कार्यक्षमता दर मिनिटाला १४० घ. मी. इतकी असू शकते.

अपकेंद्री संपीडक : (आ. ६). अपकेंद्री संपीडकामध्ये गति-कीय ऊर्जा नोदकाच्या चकीय गतीमुळे मिळते व गतिकीय ऊर्जेचे रूपांतर दाब ऊर्जेमध्ये स्थिर विसारकामध्ये केले जाते. विसारक शंक्वाकृती असतो व त्यात हवेचा वेग कमी करून दाब वाढविला जातो. नोदकामधून  बाहेर पडणाऱ्या हवेच्या वेगावर संपीडका-मधून  मि ळ णा रा  दाब अ व लं बू न अ स तो. म्हणून नोदकाचे प्रमिफे (प्रती मिनिटास फेरे) शक्य तितके जास्त ठेवतात. असे संपीडक टरबाइनाला किंवा विद्युत् चलित्राला जोडले जातात. पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात हवा जाण्याकरिता हवेची दिशा बदलावी लागते. सर्व टप्प्यांचे नोदक एकाच दंडांवर बसवितात. अशा संपीडकांची दर मिनिटाला १५ घ.मी. ते ४,००० घ.मी. हवा संपीडन करण्याची क्षमता असते. हवेचा दाब ३५० किग्रॅ./सेंमी.२ पर्यंत बहुटप्पी संपीडकात मिळू शकतो.

बहुपदी अक्षीय संपीडक : या संपीडकामध्ये फिरती पाती एका  घूर्णकावर बसविलेली असतात. स्थिर पाती कवचाच्या आतील बाजूस बसविलेली असतात. एका टप्प्यामध्ये एक फिरत्या पात्यांचे घूर्णक व त्याला संबंधित स्थिर पात्याचा संच असतो. आ. ७ मध्ये दाखविल्याप्रमाणे एक फिरता व एक स्थिर संच असे एकाआड एक असतात. सर्व फिरते संच एकाच दंडावर बसविलेले असतात. अपकेंद्री संपीडकापेक्षा प्रत्येक टप्प्यांत हवेचा दाब कमी प्रमाणात वाढतो. अक्षीय संपीडकात हवेचा दाब  १० किग्रॅ./सेंमी .२ पर्यंत मिळू शकतो. तसेच त्याची क्षमता दर मिनिटाला ३,००० घन मीटरपर्यंत असू शकते. काही संपीडक दर मिनिटाला ४,००० घ.मी. इतक्या क्षमतेचे तयार केलेले आहेत.

सर्व प्रकारच्या संपीडकांना शोषक नळीवर गाळणी वापरतात. त्यामुळे शुद्घ हवेचे संपीडकात संपीडन होते व संपीडकाचे हलणारे भाग झिजत नाहीत. मोठमोठया संपीडकांचा आवाज फार मोठा होतो. म्हणून ध्वनि-शामक वापरतात. तसेच आंतरटप्प्यामध्ये हवा थंड करण्याकरिता आंतरशीतक वापरतात. दाब दाखविण्याकरिता दाबमापक बसविलेला असतो.

घूर्णक संपीडकात प्रदान व कार्यभार यांचा समन्वय साधण्याकरिता आदान मार्गात मार्गदर्शक पाती बसवितात. मार्गदर्शक पात्यांचा कोन बदलून आदान मार्गातून संपीडकात येणाऱ्या वायूची दिशा बदलतात. याचा परिणाम आदान मार्गात झडप बसविण्यासारखा होतो. वायूची दिशा बदलून संपीडकाचा प्रदान बदलता येतो. घूर्णक संपीडकांचा कार्यभार विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी करता येत नाही. एका विशिष्ट प्रदानाला नोदकामधील वायूचा प्रवाह खंडित होतोव संपीडक अस्थिर होऊन कंपन सुरू होते. ज्या कार्यभाराला कंपन सुरू होते त्या कार्यभारापेक्षा जास्त कार्यभारास संपीडक चालविणे जरूर असते. कंपन बिंदूच्या खाली कार्यभार जाऊ नये म्हणून स्वयंचलित यंत्रणा बसविलेली असते. चलित्राचा वेग कमी-जास्त करून थोडया मर्यादेत संपीडकाचे प्रदान कमी-जास्त करता येते.

अवात मुद्रित संपीडक : प्रशीतन व वातानुकूलन क्षेत्रात मोहोरबंद संपीडक वापरतात. या संपीडकामध्ये विद्युत् चलित्र व संपीडक एकाच  दंडावर असतात आणि दोन्ही मिळून पत्र्याच्या कवचात मोहोरबंद केलेले असतात. त्यातील शोषण व प्रदान नलिका बाहेर काढलेली असते. वंगणा-करिता लागणारे तेल कवचातच घातलेले असते. प्रशीतन क्षेत्रात प्रशीतक पुनःपुन्हा वापरले जाते म्हणून अशा तऱ्हेची रचना करतात. या प्रकारचे संपीडक पश्चाग्र गतीचे किंवा चकीय गतीचे असतात. अशा प्रकारचे संपीडक प्रशीतन व वातानुकूलन क्षेत्रामध्ये वापरतात. संपीडक व विद्युत् चलित्र एका बंद कवचात असल्यामुळे प्रशीतक झरत नाही. हे यंत्र आकाराने लहान असल्याने कमी जागेमध्ये बसविता येते. वंगणाचे तेल कवचात असल्यामुळे देखभाल जवळजवळ लागतच नाही. परंतु अशा प्रकारच्या संपीडकाचा कार्यभार कमी असतो. प्रशीतन क्षेत्रात संपीडक बिघडल्यास साधारणपणे दुसरा नवा संपीडक घालतात. संपीडक बनविणाऱ्या कारखान्यातच त्याची दुरूस्ती केलेली चांगली असते.

पश्र्चाग्र गतीच्या संपीडकाचा सिलिंडर व दट्ट्या यांमधील घर्षण कमी करण्याकरिता वंगणाची गरज असते. लहान संपीडकामधील भुजादंड-पेटीत योग्य पातळीपर्यंत वंगण घालतात. भुजादंड खालच्या स्थिर बिंदूकडे येताना वंगणात बुडतो आणि त्याच्या गतीमुळे दट्ट्या व सिलिंडर यांवर फवारा उडतो. मोठया संपीडकात धारवे व सिलिंडर यांना वंगण देण्याकरिता यांत्रिक व्यवस्था असते. ही यांत्रिक व्यवस्था बंद पडल्यास संपीडकाचे चलित्र आपोआप थांबण्याची व्यवस्था असते. इतर प्रकारच्या संपीडका-मध्ये धारव्यांना वंगण लागते. आकाराच्या मानाने यांत्रिक किंवा मानवीय व्यवस्था असते. वंगणाची निवड करताना संपीडकातील जास्तीत जास्त तापमान व संपीडित वायू यांचा विचार करावा लागतो. संपीडित वायू व वंगण यांची रासायनिक विक्रिया होता कामा नये.

पश्र्चाग्र गतीच्या संपीडकात भुजादंड भुजादंड-पेटीतून बाहेर काढून त्यावर चालन कप्पी बसवितात. त्याचप्रमाणे घूर्णक गतीच्या संपीड-कात नोदक-दंड कवचातून बाहेर काढावा लागतो. संपीडित वायू अशा दंडांच्या बाजूने झरतो. ही झरण थांबविण्याकरिता झिरपरोधक (सील) वापरावी लागते. संपीडकाचा जास्तीत जास्त दाब व फिरण्याचा वेग यांवर झिरपरोधकाची निवड करतात.

संदर्भ : 1. Brown, R. N. Compressors, 1986.

2. Harris, Norman C.  Modern Air Conditioning Practice, New York, 1959.

3. Japikse, D. and others Centrifugal Compressor Design, 1988.

सप्रे, गो. वि.