अश्विनी : मेष राशीतील व नक्षत्रमालिकेतील पहिले नक्षत्र. हे क्रांतिवृत्ताच्या थोडेसे उत्तरेला आहे. यामध्ये पाश्चात्त्य नक्षत्र-पद्धतीतील एरिसपैकी आल्फा (हॅमल : भोग १०० ७७’ शर ८० ३०’, → ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति), बीटा व गॅमा हे तीन तारे येतात. यांपैकी उत्तरेकडील आल्फा हा तारा दुर्बिणीतून निरीक्षण केलेला पहिलाच तारकायुग्म आहे (१६६४). तो तिघांत अधिक तेजस्वी आहे. या तीन ताऱ्यांचा मिळून दिसणारा आकार अश्वमुखासारखा दिसतो म्हणून ‘अश्विनी’ हे नाव पडले. काही ठिकाणी याचे दोनच तारे मानतात. उदा.,ऋग्वेद व इतर संहिता यांत ‘अश्वयुजौ’ असा द्विवचनी उल्लेख आहे. महाभारतात मात्र ‘अश्विनी’ असाच उल्लेख आहे. अश्वरूपी संज्ञानामक सूर्यपत्नीपासून जन्म पावलेल्या अश्विनीकुमारांच्या कथेशी ह्या नक्षत्राचा संबंध जोडण्यात येतो. १३ एप्रिलच्या सुमारास या नक्षत्रास सूर्यप्रवेश होतो.
ठाकूर, अ. ना.