अग्निज खडक : पृथ्वीतील तप्त, वितळलेला द्रव थिजून तयार झालेल्या खडकांस ‘अग्निज खडक’ म्हणतात. ज्याच्यापासून अग्निज खडक तयार होतात त्या तप्त द्रवाला ⇨शिलारस  म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठाखाली, खोल किंवा उथळ अशा ठिकाणी शिलारस तयार होतात. शिलारस असलेल्या स्थानापासून निघून कवचाच्या अधिक उथळ भागात जाणाऱ्या भेगा-पोकळ्या नैसर्गिक घडामोडींमुळे उत्प‍न्न झाल्या म्हणजे त्याच्या वाटे खोल व अधिक दाब असलेल्या जागेतील शिलारस अधिक उथळ व कमी दाब असलेल्या जागी येतात. ते पृष्ठाशी येऊ शकले म्हणजे ⇨ज्वालामुखी निर्माण होतात. जागृत ज्वालामुखींतून बाहेर पडणाऱ्या शिलारसाला ‘लाव्हा’ म्हणतात. लाव्हे हे शिलारसाचे आपणास प्रत्यक्ष पाहवयास मिळणारे नमुने होत. लाव्हा थिजून तयार होणाऱ्या खडकास ज्वालामुखी खडक, उद्गीर्ण खडक किंवा लाव्हे असेही म्हणतात.

ज्वालामुखीच्या उद्गिरणात शिलारसाचा काही भागच बाहेर लोटला जातो. उरलेला भाग ज्या पोकळीच्या वाटे शिलारस बाहेर पडला त्या पोकळीत शिल्लक राहतो. कालांतराने तो निवून त्याचाही खडक बनतो. शिलारसातून निघून उथळ भागात येणाऱ्या पण पृष्ठाशी येऊन न पोचणाऱ्या अशा पोकळ्याही असणे शक्य असते व त्यांच्यात शिरलेला शिलारस निवून त्याचेही खडक बनतात. पृथ्वीच्या कवचातल्या भेगा पोकळ्यांत शिलारस थिजून तयार झालेल्या खडकांस ‘अंतर्वेशी खडक’ म्हणतात. ज्वालामुखी व अंतर्वेशी हे अग्निज खडकांचे मुख्य गट होत.

जागृत ज्वालामुखींच्या लाव्ह्यांचे परीक्षण करता येते व त्यांच्यापासून खडक कसे तयार होतात हेही पाहता येते. अंतर्वेशी राशींचे शिलारस प्रत्यक्ष पाहता येत नाहीत व ते निवून खडक कसे तयार होतात हेही पाहता येत नाही. क्षरणाने (झीज होऊन) जमिनीच्या पृष्ठभागाचे खडक नाहीसे झाल्यावर अंतर्वेशी राशींचे खडक उघडे पडतात. त्यांच्या उपस्थितीच्या रीतीवरुन, त्यांच्या गुणधर्मावरून व त्यांच्या लगतच्या खडकांवर अंतर्वेशी शिलारसाचे काही परिणाम झाले असले तर ते पाहून अंतर्वेशी खडकांच्या निर्मितीच्या प्रक्रियांविषयी अनुमान करावे लागते. अग्निज खडकांसारखे खडक किंवा त्यांच्या खनिजांसारखी खनिजे कृत्रिम रीतीने करण्याचे प्रयोग करून पुष्कळ खडक व खनिजे तयार करण्यात आलेली आहेत. अशा प्रयोगांवरूनही अग्निज खडकांच्या उत्पत्तीविषयी माहिती मिळते.

शिलारसांचे रासायनिक संघटक: ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लाव्ह्यांचे व त्याच्यापासून तयार झालेल्या खडकांचे व खोल जागी शिलारस थिजून तयार झालेल्या व क्षरणाने उघड्यावर आलेल्या खडकांचे परीक्षण करून शिलारसांच्या रासायानिक संघटनाविषयी बरीच माहिती मिळते.वितळलेली सिलिकेटे व सिलिका आणि पाण्याची वाफ व इतर काही वायू हे शिलारसांचे मुख्य घटक असतात. शिलारस निवून घनरुप होत असताना त्यांच्यातील वायू निसटून बाहेर जातात व वायूंचा लेशच शिलारसापासून तयार होणाऱ्या खडकांत शिल्लक राहतो. लाव्ह्यांतून वाफ बाहेर पडते हे प्रत्यक्ष दिसतेच. अंतर्वेशी शिलारसातील वायू लगतच्या खडकांत मुरतात. सारांश, मूळच्या शिलारसात असलेले कित्येक बाष्पनशील घटक त्या शिलारसापासून तयार झालेल्या खडकात असत नाहीत. म्हणून शिलारसांचे रासायनिक संघटन व अग्निज खडकांचे रासायनिक संघटन ही अगदी सारखीच नसतात.

शिलारसांचे तापमान: अनेक ज्वालामुखी-क्षेत्रांत केलेल्या मापनांवरून जमिनीवरून वाहत जाणाऱ्या लाव्ह्यांचे तापमान ९०० ते ११०० से. असल्याने व हवाईतल्या ज्वालामुखीच्या तलावातील उकळत्या लाव्ह्यांचे तापमान सर्वांत अधिक म्हणजे ११८५ से. असल्याचे आढळलेले आहे. बेसाल्टी लाव्ह्यांचे तापमान सुमारे ९०० ते ११००से. असते व मध्यम सिकत किंवा सिकत (सिलिकेचे प्रमाण जास्त असलेल्या) लाव्ह्यांचे तापमान त्यापेक्षा कमी असते. जमिनीच्या पृष्ठाखालील शिलारसांचे तापमान प्रत्यक्ष मापता येत नाही. पण खडकांत घुसलेल्या शिलारसाचे उष्णतेचे त्याच्या लगतच्या खडकावर काही परिणाम झाले असले तर ते पाहून शिलारसाचे तापमान ठरविणे शक्य असते [→भूवैज्ञानिक तापमान]. क्षरणाने उघड्या पडलेल्या अंतर्वेशी राशींच्या लगतच्या खडकांचे परीक्षण करून शिलारसांच्या तापमानाविषयी अनुमान केले जाते. अग्निज खडकांसारखे किंवा त्यांच्यातील खनिजांसारखे रासायनिक संघटन असणारे पदार्थ वितळून व वितळलेल्या द्रवांवर प्रयोग करून पाहण्यात आलेले आहेत. अशा प्रयोगांवरूनही शिलारसांचे तापमान ठरविता येते. वरील दोन्ही रीतींनी मिळालेल्या माहितीवरून असे कळून आले आहे की, बेसाल्टी शिलारसाचे तापमान १००० से. पेक्षा कमी, सामान्यत : ८०० – ९०० से. व बेसाल्टापेक्षा अधिक सिकत असणाऱ्या शिलारसांचे तापमान त्याहून कमी, म्हणजे ६०० ते ७०० से. असते.

अग्निज खडकांचे रासायनिक संघटन: ज्ञात अशी बहुतेक सर्व मूलद्रव्ये अग्निज खडकांत सापडलेली आहेत. पण अग्निज खडकांचा शेकडा नव्याण्णवपेक्षा किंचित अधिक इतका भाग ऑक्सिजन, सिलीकॉन, ॲल्युमिनियम, लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम व टिटॅनियम या नऊ मूलद्रव्यांचाच बनलेला आढळतो. अग्निज खडकांत व शिलारसात सर्वांत विपुल असणारी मूलद्रव्ये ऑक्सिजन व सिलिकॉन ही होत. त्यामुळे सर्व अग्निज खडक हे मुख्यत : सिलिकेटी खनिजे व खनिज सिलिका यांचे बनलेले असतात म्हणून अग्‍िनज खडकांना कधी-कधी ‘सिलिकेटी खडक’ म्हणतात.

हजारो अग्‍निज खडकांच्या रासायनिक विश्लेषणांच्या फलांवरून एफ. डब्ल्यू. क्‍लार्क व एच. एस. वॉशिंग्टन यांनी काढलेल्या सरासरीचा महत्त्वाचा भाग पुढे दिला आहे. त्याच्यावरून अग्‍निज खडकांचे सरासरी रासायनिक संघटन कळून येईल.

% %
सिलिका(SiO2) ५९·१२ पोटॅश(K2O) ३·१३
ॲल्युमिना(Al2O3) १५·३४ फेरिक ऑक्साइड(Fe2O3) ३·०८
लाइम(CaO) ५·०८ पाणी(H2O) १·१५
सोडा(Na2O) ३·८४ टिटॅनिया(TiO2) १·०५
फेरस ऑक्साइड(FeO) ३·८० इतर ०·९२
मॅग्नेशिया(MgO) ३·४९

काही थोडे व विरळाच आढळणारे अपवाद वगळले तर इतर सर्व अग्‍निज खडकांत ४० ते ८० टक्‍के सिलिका असते.

अग्‍निज खडकांचे घटक: शिलारसापासून तयार होणारे घन पदार्थ स्फटिकी किंवा अस्फटिकी असतात. काही खडक सर्वस्वी स्फटिकी, तर काही थोडे सर्वस्वी अस्फटीकी पदार्थांचे व काही स्फटिकी व अस्फटिकी पदार्थांच्या मिश्रणाचे असतात. शिलारसापासून तयार होणारा अस्फटिकी पदार्थ काचमय असतो व त्याला काच म्हणतात. शिलारसापासून तयार होणारे स्फटिकी पदार्थ म्हणजे अग्‍निज खनिजे होत. हजारो अग्‍निज खडकांच्या घटकांचे मापन करून त्यांची एफ. डब्ल्यू. क्‍लार्क यांनी काढलेली सरासरी टक्‍केवारी पुढे दिलेली आहे व तिच्यावरून अग्‍निज खडकात कोणती अधिक व कोणती कमी प्रमाणात आढळतात हे कळून येईल.

फेल्सपारांत ऑर्थोक्लेज व मायक्रोक्लीन (दोन्ही पोटॅश फेल्सपारे K2O. Al2 O3. 6SiO2) यांचा व प्लॅजिओक्लेजांचा समावेश होतो. प्लॅजिओक्लेजे ही अल्बाइट (Na2O. Al2 O3. 6SiO2) व ॲनॉर्थाइट (CaO.Al2O3.2SiO2) यांच्या कमीअधिक मिश्रणाची बनलेली असतात.

पायोरोक्सीने ही मॅग्‍नेशियम व लोह यांची किंवा वरील दोन्ही व कॅल्शियम यांची किंवा वरील तिन्ही व ॲल्युमिनियम यांची मेटॅसिलिकेटे असतात. पायरोक्सीन गटातल्या खनिजांसारखे किंवा जवळजवळ तसे रासायनिक संघटन असणारी खनिजे अँफिबोल गटातही आढळतात. पण त्या दोहोंच्या स्फटिकांच्या आकाराच्या ठेवणीत फरक असतो. पायरोक्सीनांपैकी प्रमुख जाती म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह व ॲल्युमिनियम यांचे जटिल मेटॅसिलिकेट असलेले ऑजाइट होय. जवळ जवळ त्याच्यासारखे रासायनिक संघटन असणाऱ्या अँफिबोल गटातल्या जातीला ‘हॉर्नब्‍लेंड’ म्हणतात.

क्वॉर्ट्‌झ म्हणजे स्फटिकी सिलिका (SiO2). अभ्रकांपैकी महत्त्वाची खनिजे म्हणजे कृष्णाभ्रक [K (FeMg)3 (AlSi3O10) (OH)2] व शुभ्र अभ्रक [KAl2 (AlSi3O10) (OH)2] ही होत.

शिलारसात सिलिकेचे मान अपुरे असले म्हणजे पायरोक्सीनाऐवजी ऑलिव्हीन [2(MgFeO). SiO2], अल्बाइटाऐवजी नेफेलीन (Na2O. Al2O3. 2 SiO2) व पोटॅश फेल्सपाराऐवजी ल्यूसाइट (K2O. Al2O3. 4SiO2) ही खनिजे सिलिकेच्या कमतरतेच्या प्रमाणास अनुसरून तयार होतात.

आवश्यक, गौण व द्वितीयक खनिजे : शिलारसाचे स्फटिकीभवन होऊन तयार झालेल्या खनिजांस ‘आद्य खनिजे’ म्हणतात. आद्य खनिजांचेआवश्यक व गौण असे दोन गट केले जातात. त्यांच्यावरून खडकांची जाती ठरविण्यात मदत होते व व्याख्येप्रमाणे जी खडकांत असलीच पाहिजे अशा आद्य खनिजांना ‘आवश्यक खनिजे’ म्हणतात. उदा. ग्रॅनाइटात पोटॅश फेल्सपार व क्वॉर्ट्‌झ ही खनिजे असलीच पाहिजेत. ती नसणाऱ्या खडकास ग्रॅनाइट म्हणणार नाहीत. जी आद्य खनिजे अल्प प्रमाणात असतात व जी असली किंवा नसली तरी खडकाचे वैशिष्ट्य म्हणजे जात बदलत नाही, त्यांना ‘गौण खनिजे’ म्हणतात. मॅग्नेटाइट, इल्मेनाइट, ॲपेटाइट, झिरकॉन, स्फीन ही अग्निज खडकांत वारंवार आढळणारी गौण खनिजे होत. अग्निज खडकाच्या आद्य घटकांवर मागाहून घडून आलेल्या प्रक्रियांचा परिणाम होऊन जी खनिजे तयार होतात त्यांना ‘द्वितीयक खनिजे’ म्हणतात. निवाणाऱ्या अग्निज खडकांतील प्रक्रियांनी किंवा वातावरणाच्या किंवा रूपांतरणाच्या किंवा खडकांत मागाहून शिरलेल्या विद्रावांच्या क्रियांमुळे ती निर्माण झालेली असतात. अशांपैकी काही म्हणजे झिओलाइटे, कॅल्साइट, क्लोराइट, सर्पेंटाइन, हिरवी माती व मृदू-खनिजे ही होत.

घटकांची निर्मिती : शिलारस घन होताना काच तयार होईल का स्फटिक तयार होतील, हे शिलारसाचे तापमान, त्याचे रासायनिक संघटन, निवण्याचा वेग इ. गोष्टींवर अवलंबून असते. काच अस्फटिकी असते. तिच्या घटक कणांची मांडणी स्थिर झालेली असते पण त्यांची रचना नियमित नसते व त्यांच्या रचनेचा कोणताही निश्‍चित साचा नसतो. उलट स्फटिकांचे घटक मूलकण नियमित रीतीने व त्यांच्या एखाद्या विशिष्ट साचा तयार होईल, अशा रीतीने रचिलेले असतात. स्फटिक निर्माण होण्यासाठी खनिजांचे शिलारसात विखुरलेले घटक एकत्र यावे लागतात व स्फटिकांची वाढ होण्यासाठी ते घटक निर्मितीच्या केंद्राकडे येत राहावे लागतात. म्हणजे विसरण होऊ (मिसळू) शकेल अशी शिलारसाची अवस्था असावी लागते. शिलारस तरल (पातळ) असला म्हणजे विसरण सुलभतेने होते व तो श्यान (दाट) असला म्हणजे विसरणास अडथळा होतो सारख्याच परिस्थितीत अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेले) शिलारस तरल असतात व सिकत किंवा मध्यम सिकत, विशेषत: बरेच क्षारीय शिलारस श्यान असतात. कोणत्याही रासायनिक संघटनांचा शिलारस अधिक उच्‍च तापमान असताना अधिक तरल असतो व तापमान कमी होत असताना त्याची श्यानता वेगाने वाढते. पाण्याची वाफ व इतर बाष्पनशील घटक विरघळलेले असल्यास शिलारसाची तरलता त्यांच्या प्रमाणात वाढते. विपुल वायू असलेले शिलारस अतिशय तरल असतात.

घटक एकत्र येऊन स्फटिक निर्माण होण्याला काही वेळ मिळणे आवश्यक असते. शिलारस मंद गतीने निवत असला म्हणजे स्फटिक निर्माण होण्यास पुरेसा वेळ मिळतो व शिलारसापासून पूर्ण स्फटिकी, सर्वस्वी स्फटिकमय असा खडक तयार होतो. उलट तो एकाएकी थंड होऊन घन झाला तर त्याच्यापासून पूर्ण काचमय खडक तयार होतो. तो एकाएकी नव्हे पण वेगाने निवला म्हणजे स्फटिक व काच यांचे मिश्रण असलेला खडक तयार होतो.

ज्वालामुखीतून बाहेर लोटले गेलेले लाव्हे पृथ्वीच्या पृष्ठावर पसरत असतात व वेगाने निवतात. त्यांच्यावरील दाब वातावरणाच्या दाबाहून फारसा अधिक नसतो. त्यांच्यातील वायू वेगाने बाहेर पडत असतात. म्हणून ज्वालामुखी खडकात थोडी फार काच नेहमी आढळते व त्यांच्या घनीभवनाने तयार झालेले स्फटिक सूक्ष्म किंवा बारीक असतात. उलट अंतर्वेशी शिलारस बंदिस्त जागी असतात, त्यांचे निवणे अधिक मंद असते व त्यांच्यातील वायू सहज बाहेर पडू शकत नाहीत. त्यांच्यापासून तयार होणाऱ्या खडकात काच क्‍वचितच आढळते.

काही मिमी. रुंदीपासून तो कित्येक किमी. रुंदी व काही थोडे घन मी. तो कित्येक सहस्त्र घन किमी. इतके आकारमान असणाऱ्या भेगा किंवा पोकळ्या कवचाच्या खडकात निर्माण होऊ शकतात. मोठ्या पोकळ्यांत शिरलेल्या शिलारसाच्या मोठ्या राशींच्या मानाने लहान भेगांत शिरलेल्या लहान राशी अधिक वेगाने निवतात. कवचाच्या उथळ भागातील खडकांचे तापमान कमी असते व त्या भागातल्या पोकळ्यांत शिरलेले शिलारस खोल भागातल्या पोकळ्यांत शिरलेल्या शिलारसापेक्षा अधिक वेगाने निवतात. कवचाच्या उथळ व अधिक थंड खडक असलेल्या भागातील लहानशा पोकळ्यांत शिरलेल्या शिलारसाची सर्व राशी व तेथल्या मोठ्या पोकळ्यांत घुसलेल्या शिलारसाचे, शेजारच्या खडकांशी संस्पर्श झालेल्या पृष्ठालगतचे भाग एकाएकी निवविले जाऊन त्यांच्यापासून काचमय खडक निर्माण होणे शक्य असते.

खोलीबरोबर खडकांच्या भाराचा दाब वाढत असतो व खोल भेगांत घुसलेल्या शिलारसातील वायू सहज बाहेर पडू शकत नाहीत. अतिशय खोल जागेतल्या शिलारसांचे निवणे अगदी मंद असते व त्यांच्यातील वायू अधिक काल टिकून राहतात. शिवाय कोणत्याही पदार्थाच्या काचमय स्वरूपापेक्षा त्याच्या स्फटिकमय स्वरूपाची घनता अधिक असते. म्हणून माथ्यावरील खडकांच्या भारामुळे स्फटिक-निर्मितीस अधिक अनुकूल अशी परिस्थिती असते. या कारणांमुळे खोल जागी निवणाऱ्या  शिलारसापासून तयार होणारे खडक पूर्णस्फटिकी असतात.

अग्निज खडकांची आढळण्याची रीती व त्यांच्या मोठ्या संरचना : ज्वालामुखी खडकांचे आकार : ज्वालामुखीतून बाहेर लोटला गेलेला लाव्हा उद्गीरणाच्या द्वारापासून कमी अधिक अंतरापर्यंत वाहत जातो. तो थिजून तयार होणाऱ्या राशीचा आकार नियमित किंवा अनियमित जाडी असलेल्या थरासारखा असतो. लाव्हा तरल असला तर तो निवण्यापूर्वी दूरवर वाहत जातो व त्याच्यापासून तयार होणाऱ्या थराची जाडी सर्वत्र जवळजवळ सारखी असते. तो दाट असला म्हणजे त्याचे वाहणे मंद असते व विशेष दूर जाण्यापूर्वी तो निवून घन होतो. त्याच्यापासून तयार होणाऱ्या थराचा उद्गीरणाच्या द्वाराजवळचा भाग अधिक जाड असतो. काही लाव्हे इतके श्यान असतात की ते उद्गीरणाच्या द्वारापासून फारसे दूर जाऊ शकत नाहीत. त्यांच्यापासून घुमटासारख्या किंवा गड्ड्यासारख्या राशी तयार होतात. उद्गीरणे पुन्हा पुन्हा एकाच स्थानी झाली म्हणजे त्यांच्या लाव्ह्यांपासून अनुक्रमाने तयार झालेले थर साचून नियमित किंवा अनियमित जाडी असलेल्या थरांची राशी तयार होते. ज्वालामुखीचे उद्गीरण नेहमी लाव्ह्याचेच असते असे नाही. अधून मधून ते घन पदार्थांचेही असते. त्याचे पदार्थही ज्वालामुखीच्या केंद्राभोवती पूर्वीच्या लाव्ह्यावर साचतात व त्यानंतर लाव्ह्याचे उद्गीरण झाले तर त्याच्या खडकाने ते झाकले जातात. केंद्रीय उद्गीरणे वारंवार झाली म्हणजे त्यांचे पदार्थ साचून बसकट किंवा उभट शंकूसारखी राशी तयार होते. भेगी उद्गीरणे सामान्यतः बेसाल्टी लाव्ह्यांची असतात व विरळाच घन पदार्थांची असतात. ती वारंवार घडून आली म्हणजे सपाट आडव्या थरांच्या (महाराष्ट्रात आढळतात तशा खडकांच्या)जाड राशी तयार होतात [→ दक्षिण ट्रॅप]

अंतर्वेशी राशींचे आकार : हे अर्थात ज्या भेगा-पोकळ्यांत शिलारस भरला गेला, त्यांच्या आकारावर अवलंबून असतात. नियमित किंवा वेड्यावाकड्या आकाराच्या देशीय खडकांच्या रचनेस समांतर किंवा छेदून जाणाऱ्या अशा भेगा खडकात असतात किंवा निर्माण होतात व भेगांच्या स्वरूपास अनुसरून खडकांच्या रचनेस समांतर असणाऱ्या किंवा छेदून जाणाऱ्या अंतर्वेशी राशी तयार होतात. त्यांचे आकार व शेजारच्या खडकांशी असलेले संबंध लक्षात घेऊन त्यांना नावे दिली जातात. देशीय म्हणजे ज्या खडकात शिलारस घुसला त्या खडकांच्या रचनेस (उदा., गाळांच्या खडकांच्या स्तरणास) छेदून जाणाऱ्या अंतर्वेशी राशींना ‘विसंगत अंतर्वेशी राशी’ रचनेस न छेदणाऱ्या, समांतर राशींस ‘सुसंगत अंतर्वेशी राशी’ म्हणतात. विसंगत राशींपैकी मुख्य म्हणजे भित्ती, ज्वालामुखी नळ व वलयभित्ती, व सुसंगत राशींपैकी मुख्य म्हणजे शिलापट्ट, लॅकोलिथ व लोपोलिथ होत.

भित्ती : देशीय खडकांच्या स्तरणास छेदून जाणाऱ्या व समांतर पृष्ठे असलेल्या भेगेत शिलारस थिजून तयार झालेल्या भिंतीसारख्या राशीला ⇨भित्ती म्हणतात. निसर्गात विपुल आढळणाऱ्या अंतर्वेशी राशींपैकी महत्त्वाच्या म्हणजे भित्ती होत.

आ. भित्ती. गाळाच्या आडव्या थरात घुसलेली उभी भित्ती.

ज्वालामुखी नळ : केंद्रीय ज्वालामुखी जागृत असताना त्याला जिच्या वाटे शिलारसाचा पुरवठा होतो ती वाहिनी अर्थातच पाहता येत नाही. पण तो मृत होऊन क्षरणाने नाहीसा झाला व त्याच्या तळाखालचे खडक उघडे पडले म्हणजे त्या वाहिनीत चोंदून राहिलेली उभ्या मुसळासारखी राशी दृष्टीस पडते. तिला ⇨ज्वालामुखी  नळ म्हणतात.

आ.२ ज्वालामुखी नळ. मध्यभागी त्याचा काळा भाग अग्निज खडकाचा व ठिपके असलेला भाग अग्निदलिक पदार्थाचा बनलेला आहे. त्याच्या दोन्हीं बाजूंस गाळांच्या खडकांचे आडवे किंवा किंचित तिरपे थर (बारीक टिंबांनी दाखविलेले) आहेत.

वलयभित्ती : नळासारख्या आकाराची अंतर्वेशी खडकांची राशी. तिचा दृश्यांश साधारण वर्तुळाकार असतो. ती उभी असून तिची जाडी बरीच असते. तिच्या आत व बाहेर देशीय खडक असतात. एकाबाहेर एक अशा अनेक वलयभित्ती काही जागी आढळतात. वलयभित्ती प्रथम स्कॉटलंडात व नंतर आइसलँड, नॉर्वे, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील न्यू हँपशर, नैऋत्य आफ्रिका, नायजेरिया, सूदान इ. ठिकाणी आढळल्या.

अग्निज शिरा : लांब, अरूंद व लहानशा भेगांत शिलारस थिजून तयार झालेल्या राशींस ‘अग्निज शिरा’ म्हणतात. त्यांचा आकार सामान्यतः वेडावाकडा असतो व त्यांना फाटे असणे शक्य असते. अग्निज शिरा निसर्गात विपुल आढळतात.

शिलापट्ट : खडकांच्या दोन थरांच्या मध्ये त्यांच्या स्तरणाच्या पातळीस समांतर असे शिलारसाचे अंतर्वेशन होऊन त्याच्यापासून तयार झालेल्या दगडी थराला ⇨शिलापट्ट   म्हणतात.

आ. ३ शिलापट्ट. गाळांच्या खडकांच्या किंचित तिरप्या थरांच्या मध्ये घुसलेले दोन शिलापट्ट (काळ्यारंगाचे) दाखविलेले आहेत.

 

लॅकोलिथ : लॅकोलिथांचा तळ सपाट व माथा घुमटासारखा असतो [→ लॅकोलिथ].

आ. ४. लॅकोलिथ. उभा छेद काळा रंग रंगहीन थर-गाळांच्या खडकांचे.

 

लोपोलिथ : याचा आकार तसराळ्यासारखा असतो. जेथील थर खाली वाकविले जाऊन त्यांना द्रोणीसारखा आकार आलेला असतो, अशा प्रदेशांतील थरांमध्ये व त्या थरांच्या स्तरणास अनुसरून असे शिलारसांचे अंतर्वेशन होऊन लोपोलिथ तयार झालेले असते. अमेरिकेच्या सयुंक्त संस्थानांतील मिनेसोटातील डलूथ येथे गॅब्रोचे नमुनेदार लोपोलिथ आहे.

आ. ५. लोपोलिथ, उभा छेद.

बॅथोलिथ : अंतर्वेशी अग्निज खडकांच्या मोठ्या व ज्यांच्या तळाचा ठाव लागत नाही अशा राशींचे नाव. त्यांच्या बाजूंचा उतार तीव्र असतो व जो जो खोल जावे तो तो त्यांचे आकारमान वाढत गेलेले दिसते. बॅथोलिथे हा सर्वस्वी किंवा प्रामुख्येकरून ग्रॅनोडायोराइटाची बनलेली असतात. ती कशी निर्माण झाली याचा उलगडा झालेली नाही [→ बॅथोलिथ]. बॅथोलिथासारखी लक्षणे असणाऱ्या लहा राशीस ‘खोड’ व खोडाची बाह्यरेषा वतुर्ळाकार असेल तर त्याला ‘स्कंध’ म्हणतात. कित्येक स्कंध किंवा खोडे ही एखाद्या खोल जागी दडलेल्या बॅथोलिथाच्या शाखा असतात.

लहान व सूक्ष्म संरचना: खडकांच्या घटकांच्या सूक्ष्म संरचनेला म्हणजे सविस्तर व्यवस्थेला ‘वयन’ (वीण) म्हणतात व त्याच्यात पुढील गोष्टींचा समावेश होतो : (१) स्फटिकीभवनाचे मान, (२) स्फटिकांचे केवल आकारमान, (३) स्फटिकांचे आकार, (४) स्फटिकांचे परस्परांशी व काच असली तर तिच्याशी असलेले संबंध. बहुसंख्य खडकांचे वयन नुसत्या डोळ्यांना ओळखू येत नाही. त्यासाठी खडकांचे पातळ छेद सूक्ष्मदर्शकाने तपासावे लागतात. वयन व संरचना यांच्यामधील भेद नेहमी सहज ओळखता येतो किंवा केला जातो असेही नाही. कित्येक जण वयनाला ‘सूक्ष्म संरचना’ असेही म्हणतात. अग्निज खडकांच्या संरचनांचे व वयनांचे मुख्य प्रकार पुढील होत :

पृषयुक्त(पॉर्फिरिटिक)संरचना किंवा वयन: मोठे स्फटिक व त्यांच्याहून पुष्कळच बारीक असे खनिज पदार्थ मिळून बनलेल्या खडकांच्या संरचनेस ‘पृषयुक्त संरचना’ म्हणतात. मोठ्या स्फटिकांना ‘बृहत्स्फट’ व उरलेल्या भागास ‘आधारक’ म्हणतात. बृहत्स्फटांचा आकार सामान्यतः चांगला, आत्मरूपिक (पूर्णाकृती) किंवा जवळजवळ तसा असतो. आधारक हा केवळ स्फटिकांचा, केवळ काचेचा किंवा त्या दोहोंच्या मिश्रणाचा असतो. ज्वालामुखीतून बाहेर पडण्यापूर्वीच कित्येक लाव्ह्यांत एखाददुसऱ्या खनिजाचे स्फटिक तयार झालेले असतात. लाव्हे पृथ्वीच्या पृष्ठावर ओतले गेल्यावर वेगाने निवू लागतात व त्यांच्या द्रव भागापासून बारीक स्फटिक,सूक्ष्म स्फटिक किंवा काच किंवा ती तिन्ही असलेला आधारक तयार होतो. पुष्कळ ज्वालामुखी खडकांची संरचना पृषयुक्त असते व ती सामान्यत: अशा कारणामुळे उद्भवलेली असते. लहान अंतर्वेशनांपासून किंवा मोठ्या अंतर्वेशनांच्या वेगाने निवविल्या गेलेल्या कंडापासून तयार झालेल्या पुष्कळशा खडकांची संरचनाही अशीच पृषयुक्त असते. इतर कारणांमुळेही पृषयुक्त संरचना निर्माण होणे शक्य असते. पातालिक किंवा इतर अंतर्वेशी खडकांतही पृषयुक्त संरचना आढळते. त्या खडकांचे आधारक पूर्णस्फटित असून आधारकाचे स्फटिक बृहत्स्फटांपेक्षा पुष्कळ लहान, सूक्ष्मकणी किंवा भरड व सामान्यत: निराकार असतात.

ग्रॅनाइटी संरचना किंवा वयन: खडक पूर्णस्फटित असून त्यांच्या प्रमुख खनिजांचे स्फटिक निराकार किंवा क्वचित उपात्मरूपिक असतात व त्यांचे आकारमान एकसमान असते. अशा खडकांच्या संरचनेस ‘ग्रॅनाइटी संरचना’ म्हणतात. खनिजांचे कण भरड, मध्यम किंवा बारीकही असू शकतात.

समावृत(पोइकिलिटिक)वयन: एखाद्या खनिजाचे लहान पण आत्मरूपिक व नियमित मांडणी नसलेले स्फटिक दुसऱ्या एखाद्या खनिजाच्या निराकार व मोठ्या स्फटिकात रुतलेले असले म्हणजे त्या वयनाला समावृत वयन म्हणतात.

सर्पचित्रित(ऑफिटिक)वयन: समावृत वयनाच्या डोलेराइटात आढळणाऱ्या विशिष्ट प्रकाराला हे नाव देतात. या खडकातले प्लॅजिओक्लेजाचे स्फटिक रिपेच्या आकाराचे असतात व ते पायरोक्सीनाच्या मोठ्या व निराकार स्फटिकात इतस्तत: रुतलेले असतात.

आंतरवृद्ध वयन: कधीकधी दोन व क्वचित अधिक खनिजांची गुंतागुंत होऊन ती एकमेकांत घुसलेली आढळतात. त्यांपैकी एका खनिजात दुसऱ्याचे जे भाग घुसलेले असतात ते सलग असतातच असे नाही. पण ते तुटक असले तरी बऱ्‍याच क्षेत्रातले तुटक कण प्रकाशकीय दृष्ट्या सलग असतात. अशा वयनाला ‘आंतरवृद्ध वयन’ म्हणतात. क्वॉर्ट्‌झ व पोटॅश फेल्सपार यांची किंवा समचतुर्भुज व एकनताक्ष पायरोक्सीनांची आंतरवृद्धी वारंवार आढळते. आंतरवृद्ध वयन असणाऱ्‍या ग्रॅनाइटात जे फेल्सपार असते त्याच्या स्फटिकात कॉर्ट्‌झाचे काडीसारखे किंवा पाचरीसारखे तुकडे रुतलेले असतात. ते चित्रलिपीतल्या लेखासारखे दिसतात, म्हणून त्या ग्रॅनाइटांना ‘आलेखी ग्रॅनाइट’ व त्यांच्या वयनाला ‘आलेखी वयन’ म्हणतात.

काचमय संरचना: सर्वस्वी काचमय असे अग्निज खडक विरळाच आढळतात. त्यांच्यापैकी महत्त्वाचे म्हणजे सिकत लाव्ह्यांपासून तयार झालेला ⇨ज्वालाकाच  व सिकत अंतर्वेशी शिलारसांच्या कडा एकाएकी निवून तयार झालेले ⇨पिचस्टोन  हे होत. ज्वालाकाच व पिचस्टोन यांच्यासारख्या काचमय दिसणाऱ्‍या खडकांच्या पातळ छेदांची सूक्ष्मदर्शकाने पाहणी केली, तर त्यांच्यातही काही सूक्ष्म स्फटिक किंवा कणांच्या, काड्यांच्या किंवा इतर आकारांचे भ्रूणस्फटिक असलेले सामान्यत: आढळतात.

गूढस्फटिकी वयन: काही खडकांचा सर्व भाग किंवा काही पृषयुक्त खडकांचा आधारक इतक्या सूक्ष्म स्फटिकांचा बनलेला असतो की, सूक्ष्मदर्शक वापरूनही स्फटिक ओळखता येत नाहीत. अशा वयनाला ‘गूढस्फटिकी वयन’ म्हणतात.

अग्निज खडकांच्या पद्धतशीर अध्ययनासाठी पुढील गोष्टी कराव्या लागतात : (१) खडकांच्या उपस्थितीच्या रीतीचे म्हणजे निसर्गात ते जसे आढळतात, तसेच त्यांच्या राशींचे आकार, आकारमान व लगतच्या खडकांशी असलेले संबंध व ते अंतर्वेशी आहेत की ज्वालामुखी आहेत यांविषयी माहिती मिळविणे.(२) ज्या खडकाचे अध्ययन करावयाचे आहे, त्याचे प्रातिनिधिक असे नमुने दगड फोडून किंवा खणून मिळविणे. (३) त्या नमुन्यांचे प्रयोगशाळेत परीक्षण करून त्यांचे घटक, त्या घटकांचे प्रमाण व खडकांची संरचना व वयन यांची माहिती मिळवणे. बारीक व सूक्ष्मकणी खडकांची खनिजे किंवा संरचना केवळ नुसत्या डोळ्यांनी किंवा साधे भिंग वापरून ओळखता येत नाहीत. म्हणून खडकाचे तुकडे घासून तयार केलेल्या अगदी पातळशा चकत्या काचेवर चिकटवून व त्यांचे सूक्ष्मदर्शकाने परीक्षण करून ती ओळखावी लागतात. पातळ चकत्यांचे सूक्ष्मदर्शकाने परीक्षण करून खडकांचे घटक व संरचना ही दोन्ही कळतात. दगडाचा बारीक भुगा करून तो पाण्याने धुतल्यावर त्याच्यातील कणांचे परीक्षणही सूक्ष्मदर्शकाने केले जाते. या पद्धतीने खडकांचे घटक कळतात पण संरचना कळत नाही. लोहचुंबक, भारी द्रव, वाहते पाणी इ. वापरून किंवा निवडून खडकाच्या भुग्यातील निरनिराळी खनिजे अलग काढता येतात व त्यांचे भौतिक किंवा रासायनिक परीक्षण करून त्यांच्या जाती ठरविता येतात. नेहमीच्या पद्धतींनी खडकांचे विशिष्ट गुरूत्व काढतात. कित्येक कामांसाठी खडकांचे रासायनिक संघटनही माहीत असावे लागते व विश्लेषणाच्या नेहमीच्या रासायनिक किंवा विशेष पद्धती वापरून ते काढले जाते. खडकात काच व खनिजे किती आहेत, निरनिराळ्या खनिजांचे प्रमाण किती आहे व खडकाची संरचना व वयन कोणती आहेत, या गोष्टी लक्षात घेऊन त्याची जात ठरविली जाते व त्याला नाव दिले जाते.

अग्निज खडकांचे प्रकार : प्राण्यांत किंवा वनस्पतींत जशा जाती असतात तशा खडकांत नसतात. सर्वस्वी स्फटिकमय व सर्वस्वी काचमय किंवा ८०% पेक्षा अधिक सिलिका व ४०%पेक्षा कमी सिलिका किंवा ६०% पेक्षा अधिक क्वॉर्ट्‌झ  किंवा दुसरे एखादे खनिज असलेल्या व क्वॉर्ट्‌झ किंवा ते दुसरे खनिज मुळीच नसलेल्या व त्या दोहोंच्या मधले कोणतेही प्रमाण असलेल्या खडकांच्या वेगवेगळ्या राशी निसर्गात आढळतात. शिवाय कधी कधी एकाच राशीत वर उल्लेख केल्यासारखे भिन्न भिन्न लक्षणे असलेले खडक आढळतात. उदा., ग्रॅनोडायोराइटातील क्वॉर्ट्‌झाचे प्रमाण हळूहळू कमी होत जाऊन तयार झालेले क्वॉर्ट्‌झ डायोराइट व डायोराइट यांसारखे खडक कित्येक बॅथोलिथांत आढळतात व त्यांच्यापैकी एक खडक कोठे संपतो व दुसरा कोठे सुरू होतो, हे निश्चित ठरविता येत नाही. म्हणून अग्निज खडकांचे काटेकोर वर्गीकरण करता येत नाही व त्यांचे वर्गीकरण कसे करावे याविषयी एकमत नाही. निरनिराळ्या कामांसाठी वर्गीकरणाच्या निरनिराळ्या पद्धती वापरल्या जातात. सर्वसामान्य व्यवहारासाठी खडकांची स्थूल लक्षणे लक्षात घेऊन वर्गीकरण केले जाते. सविस्तर अध्ययनासाठी सूक्ष्मदर्शकाने दिसणारी लक्षणेही लक्षात घेतली जातात. काही कामांसाठी सूक्ष्मदर्शकाने दिसणाऱ्‍या लक्षणांच्या जोडीने रासायनिक संघटनही लक्षात घेऊन वर्गीकरण केले जाते. केवळ रासायनिक संघटनावर आधारलेल्या वर्गीकरणाच्या योजनाही आहेत पण त्या विरळाच वापरल्या जातात. वर्गीकरणाच्या बहुतेक सर्व योजना खडकांच्या स्थूल व सूक्ष्म संरचना व त्यांचे खनिज संघटन यांच्यावर मुख्यत: आधारलेल्या असतात.

रासायनिक संयुगांना किंवा प्राण्या-वनस्पतींना नावे देण्याच्या नामकरण पद्धतीसारख्या पद्धती खडकांच्या बाबतीत वापरता येत नाहीत. खडकांची सायेनाइट व बेसाल्ट यांसारखी काही नावे प्राचीन कालापासून चालत आलेली आहेत. काही खडकांची नावे ते प्रथम आढळले त्या स्थानांवरून किंवा देशांवरून व काहींची त्यांच्या गुणधर्मांवरून, संरचनेवरून किंवा मुख्य खनिजावरून दिली गेली आहेत. सामान्य व्यवहारातील नावे काळजीपूर्वक वापरली जातात असे नाही व खडकांच्या निरनिराळ्या जातींना एकच नाव दिलेलेही पुष्कळदा आढळते. खडकांच्या नावांच्या बाबतीतील गोंधळ काढून टाकण्याचे प्रयत्न झालेले आहेत पण ते यशस्वी झालेले नाहीत.

बारीकसारीक व कित्येकदा अगदी उपेक्षणीय असे भेद लक्षात घेऊन ठरविलेल्या अग्निज खडकांच्या जातींची व त्यांच्या नावांची संख्या सातशेपेक्षा अधिक भरते. पण इतक्या जाती मानण्याची आवश्यकता नाही. सुमारे साठ जाती मानून काम भागेल. त्या साठांपैकीही बहुसंख्य जाती विरळाच आढळणाऱ्‍या आहेत व त्यांच्यपैकी अधिक महत्त्वाच्या अशा जातींची नावे खालील तक्त्यात दिलेली आहेत.

तक्त्यातील वर्गीकरणात वयनावर आधारलेले भरडकणी, मध्यमकणी व सूक्ष्मकणी असे तीन प्रमुख विभाग आहेत. भरडकणी विभागात मुख्यत: मोठ्या अंतर्वेशनांच्या खडकांचा, मध्यमकणी विभागात मुख्यत:  गौण  म्हणजे लहान अंतर्वेशनांच्या खडकांचा व सूक्ष्मकणी विभागात मुख्यत: ज्वालामुखी खडकांचा समावेश होतो. अंतर्वेशी राशींच्या वेगाने किंवा एकाएकी निवलेल्या गेलेल्या भागांपासून थोडी किंवा पुष्कळ काच किंवा गूढ, भ्रूण किंवा सूक्ष्म स्फटिक असलेले खडक तयार होतात व त्यांचा समावेशही सूक्ष्मकणी विभागात केला जातो.

अंतर्वेशी अग्निज खडकांचे, पातालिक म्हणजे खोल जागी तयार झालेले व उपपातालिक म्हणजे कवचाच्या उथळ भागात तयार झालेले, असे विभाग पूर्वी केले जात. पातालिक खडक पूर्णस्फटिकी व सापेक्षत: भरडकणी असतात व त्यांच्या राशी मोठ्या असतात. उपपातालिक राशी लहान असतात. त्यांचे खडक सापेक्षत: बारीक कणी असतात व त्यांच्यात कधीकधी काच किंवा गूढ, भ्रूण किंवा सूक्ष्म स्फटिक असतात. अग्निज खडकांचे अधिक अध्ययन झाल्यावर असे दिसून आले की, शिलारसांचे स्फटिकीभवन हे केवळ त्याच्या खोलीवर अवलंबून नसते व उथळ जागेतही पातालिक खडकांसारखे पूर्णस्फटिकी व भरडकणी खडक तयार होणे शक्य असते. म्हणून ‘उपपातालिक’ ही संज्ञा आता वापरली जात नाही. तिच्याऐवजी गौण ही संज्ञा कधीकधी वापरली जाते.

पातालिक ही संज्ञा अद्यापिही वापरली जाते व पूर्णस्फटिकी व भरडकणी खडकांच्या मोठ्या राशीस उद्देशून ती वापरली जाते. पातालिकाऐवजी महा-अंतर्वेशन ही संज्ञा कधीकधी वापरली जाते. तक्त्यातील भरडकणी व मध्यमकणी विभाग हे स्थूल मानाने पातालिक व उपपातालिक यांच्याशी अनुक्रमे तुल्य आहेत.

सिकत, मध्यम सिकत व अल्पसिकत खडकांतील एकूण खनिजांपैकी जवळजवळ अर्धी किंवा अर्ध्याहून अधिक खनिजे फेल्सपारे असतात. सिकत खडकात बरेच क्वॉर्ट्‌झ असते. इतर खडकांत ते नसते किंवा अगदी गौण असते. सिकत खडकांत लोह-मॅग्नेशिया यांची खनिजे सामान्यत: अल्प, मध्यम खडकांत किंचित अधिक व अल्पसिकत खडकांत बरीच अधिक असतात. सिकत खडकांचा रंग फिकट, मध्यम खडकांचा किंचित काळसर व अल्पसिकत खडकांचा काळसर ते काळा असतो. सिकत खडकांचे विशिष्ट गुरूत्व सामान्यत: कमी (२·६ ते २·७), मध्यम सिकत खडकांचे किंचित अधिक व अल्पसिकत खडकांचे त्यापेक्षा अधिक (२·४ ते ३·१) असते.

प्रमुख अग्निज खडकांची नावे वरील तक्त्यात  दिली आहेत व प्रत्येक खडकाच्या तक्त्यातील स्थानावरून त्याच्या प्रमुख लक्षणांची कल्पना येते.

ग्रॅनाइट-पॉर्फिरी, सायेनाइट-पॉर्फिरी, डायोराइट-पॉर्फिराइट यांचे खनिज संघटन अनुक्रमे ग्रॅनाइट, सायेनाइट व डायोराइट यांच्यासारखे पण वयन मध्यमकणी व पृषयुक्त असते. त्या सर्वांत फेल्सपारांचे बृहत्स्फट असतात. ग्रॅनाइट व ग्रॅनोडायोराइट-पॉर्फिरीत क्वॉर्ट्‌झाचेही बृहत्स्फटक कित्येकदा असतात व ते असलेल्या खडकांना ‘क्वॉर्ट्‌झ-पॉर्फिरी’ असे नाव कधीकधी देतात. सायेनाइट-पॉर्फिरीला नुसते ‘पॉर्फिरी’ असेही म्हणतात. डायोराइट-पॉर्फिराइटात फेल्सपारांच्याशिवाय हॉर्नब्लेंड व कृष्णाभ्रक यांचेही बृहत्स्फट सामान्यत: असतात. अत्यल्पसिकत खडकातल्या सिलिकेचे मान अल्पसिकत खडकापेक्षा कमी असते किंवा खरोखरी अत्यल्प असते असे नाही. ते खडक सर्वस्वी किंवा प्रामुख्याने लोह-मॅग्नेशिया यांच्या खनिजांचे बनलेले असल्यामुळे त्यांना ‘अल्ट्राफेमिक’ (अतिलोह-मॅग्नेशिया खनिजी) असे अधिक समर्पक नाव कित्येकजण वापरतात.

शिलारसाची उत्पत्ती : अतिप्राचीन म्हणजे आर्कीयन कालाच्या प्रारंभापासून तो आतापर्यंतच्या कालावधीत पृथ्वीच्या कोणत्या ना कोणत्या भागात ज्वालामुखी उद्गीरणे व शिलारसांची अंतर्वेशने कधी अल्प तर कधी प्रचंड प्रमाणात घडून आलेली आहेत, असे कवचाच्या खडकांवरून दिसून येते. शिलारस हे पृथ्वीच्या पृष्ठाखाली, कवचाच्या उथळ किंवा खोल भागात किंवा कवचाच्या खालच्या घन थरात तयार होत असले पाहिजेत. पण ते कसे तयार होतात याचा उलगडा झालेला नाही.

बारिकसारीक भेद लक्षात घेतले तर अग्निज खडकांचे सातशेहून अधिक प्रकार व अगदी ढोबळ भेद लक्षात घेतले तरी सुमारे साठ प्रकार किंवा जाती भरतील. प्रत्येक अग्निज खडक एखाद्या शिलारसापासून तयार झालेला असतो म्हणून अग्निज खडकांच्या एकूण जातींइतक्याच शिलारसांच्याही जाती असल्या पाहिजेत. शिलारसांच्या तितक्या जाती स्वतंत्रपणे अस्तित्वात होत्या का काही थोड्या आद्य शिलारसांत काही भौतिक किंवा रासायनिक घडामोडी होऊन इतक्या जाती निर्माण झाल्या, असे प्रश्न उद्भवतात.

अग्निज खडकांच्या वर उल्लेख केलेल्या जातींपैकी बहुतेक सर्व जाती विरळाच आढळतात व त्यांच्या राशी लहान किंवा क्षुल्लकही असतात. वारंवार आढळणारे व ज्यांच्या राशी प्रचंड असतात असे अग्निज खडक फारच थोडे आहेत. ते म्हणजे बेसाल्ट व पायरोक्सीन-अँडेसाइट हे ज्वालामुखी व ग्रॅनाइट व ग्रॅनोडायोराइट हे अंतर्वेशी खडक होत. एकूण ज्वालामुखी खडकांपैकी शेकडा ऐंशी इतके बेसाल्ट असतात. एकूण पातालिक राशींपैकी  ग्रॅनाइट व ग्रॅनोडायोराइट यांच्या राशी सर्वांत विपुल असून, त्या इतर सर्व पातालिक खडक मिळून होणाऱ्‍या राशींच्या वीसपट भरतात, असे डेली यांनी केलेले आकलन (अंदाज) आहे. आणखी असे की, भौतिक मापनांवरून असे अनुमान करण्यात आलेले आहे की, खंडे ही मुख्यत: सियालाची म्हणजे ग्रॅनाइटासारखे रासायनिक संघटन असणाऱ्‍या खडकांची बनलेली आहेत व ती ज्या थरावर म्हणजे सिमावर बसलेली आहेत त्याचे रासायनिक संघटन बेसाल्टासारखे आहे. सारांश, वरील दोन व इतर पुराव्यांवरून असे दिसून येते की, बेसाल्टी व ग्रॅनाइटी शिलारस हे पृथ्वीतील शिलारसांपैकी अत्यंत विपुल असे असले पाहिजेत.

एकाच शिलारसापासून दोन किंवा अधिक जातीचे खडक उत्पन्न झाले असले पाहिजेत असे दर्शविणारे पुरावे अनेक अंतर्वेशी अग्निज राशींत मिळतात. उदा., कित्येक शिलापट्टांच्या माथ्यांचा खडक त्यांच्या तळभागाच्या खडकाहून वेगळा असलेला आढळतो व त्या दोहोंच्यामधे त्या दोहोंपेक्षा भिन्न अशा खडकाचे एक किंवा अधिक भाग असलेलेही कधीकधी आढळतात. तसेच कित्येक बॅथोलिथांच्या कडेचा खडक आतल्या भागाच्या खडकापेक्षा भिन्न असलेला आढळतो. अशा शिलापट्टांच्या किंवा बॅथोलिथांच्या मूळच्या शिलारसात काही विक्रिया घडून येऊन भिन्न खडक तयार झाले असावेत, असे त्या राशींच्या एकूण लक्षणावरून सूचित होते. समांग किंवा स्थूल मानाने समांग असे रासायनिक संघटन असणाऱ्‍या शिलारसांचे भिन्न भिन्न संघटन असणारे भाग तयार होऊन त्यांच्यापासून भिन्न खडक तयार होणाऱ्‍या घटनेला ‘शिलारसाचे भिन्नीभवन’ म्हणतात. वरील उदाहरणातील शिलापट्टांचे किंवा बॅथोलिथांचे शिलारस मूळ जागेत असताना त्यांचे भिन्नीभवन झालेले असून त्यांच्या भिन्नभवनाने तयार झालेले खडक शिलारसाचे मूळ व्यापिलेल्या जागेतच राहिलेले आहेत. पण भिन्नीभवनाने तयार झालेल्या भागाचे स्थलांतर होण्याची शक्यता असते व ते निरनिराळ्या जागी नेले गेले, तर त्यांच्यापासून तयार झालेले खडक निरनिराळ्या जागी आढळतील व ते सर्व मूळच्या एकाच शिलारसापासून झालेले आहेत, हे कळणे कठीण किंवा अशक्यही होईल. शिलारसांचे भिन्नीभवन होणे शक्य असते हे मान्य केले तर वर उल्लेख केलेल्या दोन प्रमुख म्हणजे बेसाल्टी व ग्रॅनाइटी शिलारसांचे भिन्नीभवन होऊन अग्निज खडकांचे बहुसंख्य प्रकार निर्माण झाले असणे शक्य आहे असे दिसून येईल. म्हणून त्या दोन शिलारसांना ‘आद्य शिलारस’ असे म्हणता येईल.

बाहेरील घन किंवा द्रव पदार्थ शिलारसात मिसळले जाऊन व ते आत्मसात केले जाऊन मूळ शिलारसापासून तयार होणाऱ्‍या खडकांपासून वेगळा असा खडक निर्माण होणे शक्य असते. अशा घटनेला ‘सात्मीकरण’ म्हणतात. सात्मीकरणानेही कित्येक अग्निज खडक निर्माण झाले असणे शक्य आहे व त्याचा विचार पुढे केला आहे.

भिन्नीभवनाच्या प्रक्रिया : १६५ से. पेक्षा अधिक तापमान असताना ॲनिलीन व पाणी यांचे मिश्रण अगदी समांग असते, पण तापमान त्यापेक्षा कमी होताच त्या विद्रावाचे ॲनिलिनात पाणी व पाण्यात ॲनिलीन असणारे असे दोन विद्राव होतात. त्याप्रमाणे शिलारसांचे दोन अमिश्रणीय विद्राव होत असावेत असे प्रथम वाटले होते. ज्यांच्यात वितळलेल्या सिलिकेटांशी संबंध येतो अशा हजारो क्रिया कित्येक कारखान्यातील कामात केल्या जातात व वितळलेल्या सिलिकेटांवरही शेकडो प्रयोग करून पाहण्यात आलेले आहेत. त्या सर्वांवरून असे आढळून आलेले आहे की, ज्या तापमानाच्या मर्यादेत अग्निज खडक तयार होतात त्या मर्यादेतले तापमान असताना अग्निज खडकांसारखे रासायनिक संघटन असणाऱ्‍या विद्रावाचे अमिश्रणीय द्रव विभाग होत नाहीत. म्हणून शिलारस सर्वस्वी द्रव असताना त्याचे भिन्नीभवन होत नाही हे आता बहुतेक सर्वांस मान्य झालेले आहे.

शिलारस निवू लागला म्हणजे सापेक्षत: उच्च तापमान असताना स्फटिकीभवन होऊन तयार होणारी प्रारंभीची खनिजे ही कमी तापमानात तयार होणाऱ्‍या खनिजांहून अगदी वेगळी असतात. कोणत्याही प्रक्रियेमुळे आधी तयार झालेली खनिजे मागाहून तयार होणाऱ्‍या खनिजांपासून वेगळी केली गेली म्हणजे भिन्नभवन घडून येते. म्हणून स्फटिकीभवनास सुरुवात झाल्यावर मात्र भिन्नीभवनाचा संभव असतो. शिलारस वेगाने किंवा एकाएकी निवविला गेला तर भिन्नीभवन होण्यास वेळच मिळत नाही. तो सावकाश निवविला गेला तरच भिन्नीभवन होण्यास वेळ मिळतो. म्हणून भिन्नीभवनाची चांगली उदाहरणे अंतर्वेशी राशींतच आढळतात.

बोएन-विक्रियामाला : शिलारसाच्या स्फटिकीभवनाने तयार होणाऱ्‍या खनिजांचा अनुक्रम कसा लागतो हे एन. एल. बोएन यांनी केलेल्या प्रयोगांवरून कळून आलेले आहे. तो अनक्रम आ. ६ मध्ये दाखविला आहे.

आ. ६. बोएन-विक्रियामाला. आकृतीतील उजवीकडील चौकोनात १ या रेषेने दाखविलेल्या स्फटिकांपासून ग्रॅव्रोसारखे २ या रेषेने दाखविलेल्या टप्प्यातील स्फटिकांपासून डायोराइटासारखे ३ या रेषेने दाखविलेल्या टप्प्यातील स्फटिकांपासून ग्रॅनोडायोराइटासारखे व ४ या रेषेने दाखविलेल्या टप्प्यातील स्फटिकांपासून ग्रॅनाइटासारखे खडक तयार होतील.

येथे लक्षात घेण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही तापमानात तयार होणारी खनिजे तापमान उतरत असताना सामान्यतः तशीच टिकून राहत नाहीत, तर बदलत्या तापमानात त्यांची शिलारसाशी विक्रिया होते व त्यांच्यापासून नवी व बदललेल्या तापमानात स्थिर अशी खनिजे तयार होतात. उदा., आकृतीतील डाव्या बाजूची ऑलिव्हीन ते बायोटाइट (कृष्णाभ्रक) ही माला घ्या. या मालेतील प्रथम तयार होणारे खनिज ऑलिव्हीन होय. शिलारस निवून तापमान विवक्षित झाल्यावर ऑलिव्हिनाची शिलारसाशी विक्रिया होऊ लागून मॅग्नेशियम पायरोक्सीन तयार होऊ लागते व ऑलिव्हीन नाहीसे होऊ लागते. अखेरीस सर्व ऑलिव्हीन नाहीसे होणे शक्य असते. त्यानंतर तापमान उतरून ते विवक्षित झाल्यावर मॅग्नेशियम पायरोक्सीनाचे कॅल्शियम पायरोक्सीन होते व त्याच रीतीने अनुक्रमे अँफिबोले व कृष्णाभ्रक ही मागाहून तयार होतात. वरील बदल टप्प्या-टप्प्याने होत असल्यामुळे या मालांना ‘खंडित विक्रियामाला’ म्हणतात. उजव्या बाजूला प्लॅजिओक्लेजाच्या मालेतील प्रथम तयार होणारे खनिज म्हणजे कॅल्शियम विपुल असणारे प्लॅजिओक्लेज होय. तापमान उतरत असताना त्याची शिलारसाशी विक्रिया होते व अधिक सोडा असणारी प्लॅजिओक्लेजे सतत तयार होतात. बदलत्या तापमानाबरोबर प्लॅजिओक्लेजांचे रासायनिक संघटनही सतत बदलत असते. म्हणून प्लॅजिओक्लेजांच्या मालेला ‘अखंड विक्रियामाला’ म्हणतात. वरील मालांच्या खनिजांच्या नंतर उरलेली खनिजे आकृतीत दाखविलेल्या क्रमाने तयार होतात.

या आकृतीवरून असे दिसून येईल की, आधी तयार होणारी खनिजे सापेक्षत: कमी सिकत व मागाहून तयार होणारी खनिजे अधिक सिकत असतात, म्हणून आधी व मागाहून तयार होणारी खनिजे वेगळी केली गेली तर त्यांच्यापासून दोन निरनिराळ्या प्रकारचे खडक तयार होतात. स्फटिकीभवन सुरू झाल्यावर आधी तयार झालेली खनिजे पुढील दोन रीतींनी वेगळी केली जाणे शक्य असते.

आ.७ पॅलिसेड येथील शिलापट्टा उभा छेद. १ व ६ देशीय खडक आहेत व २ ते ५ हे शिलापट्टे भाग आहेत. (१) तळाखालचा खडक, (२) एकाएकी निवलेला भाग, (३) ऑलिव्हीन विपुल असलेला भाग, (४) उत्तरोत्तर वरती प्लॅजिओक्लेज अधिक होत गेलेला भाग, (५) एकाएकी निवलेला भाग, (६) माथ्यावरचा खडक.

 (१) उच्च तापमानात स्फटिकीभूत होणाऱ्‍या खनिजांची घनता शिलारसाच्या त्या तापमानातील घनतेपेक्षा अधिक असते व ती खनिजे बुडून खाली जाऊन शिलारसाच्या तळाशी साचतात. विशेषत: ऑलिव्हीनाचे किंवा ऑलिव्हीन व पायरोक्सीन यांचे स्फटिक तळाशी साचून तयार झालेले थर कित्येक अल्पसिकत शिलापट्टांच्या तळाशी आढळतात. उदा., न्यू जर्सीतील पॅलिसेड नावाचा डोलेराइटाचा शिलापट्ट. तो आडव्या थरासारखा आहे. त्याची जाडी ३०० मीटरांपेक्षा अधिक आहे. शिलारसाचे अंतर्वेशन झाल्यावर त्याच्या माथ्याचा व तळाचा काही भाग वेगाने निवविला जाऊन त्या भागांपासून तयार झालेला सामान्य ऑलिव्हीन डोलेराइट शिलापट्टाच्या माथ्याशी व तळाशी आढळतो (आ. ७ पहा). त्या दोन भागांत भिन्नीभवन झालेले नाही. पण उरलेल्या भागात भिन्नीभवनाने तयार झालेले खडक आढळतात. वेगाने निवून तयार झालेल्या तळाच्या खडकावर जो खडक आहे त्याच्यात ऑलिव्हीन व पायरोक्सीन ही खनिजे विपुल आहेत. शिलापट्टाच्या खालच्या एक तृतीयांश भागातच ऑलिव्हीन आहे. आधी तयार होणारी व मॅग्नेशियम विपुल असणारी पायरोक्सीने शिलापट्टाच्या वरच्या भागात आहेत. तळाकडील भागात सु. ४० टक्के प्लॅजिओक्लेज असून ते कॅल्शियम विपुल असलेल्या जातीचे आहे.

 शिलापट्टाच्या वरच्या भागात प्लॅजिओक्लेज अधिक म्हणजे सु. ६० टक्के असून ते सोडियम विपुल असलेल्या जातीचे आहे. सारांश, आधी तयार होणारी खनिजे शिलापट्टाच्या खालच्या व मागाहून तयार होणारी खनिजे शिलापट्टाच्या वरच्या भागात आहेत. आधी तयार झालेले अधिक भारी खनिजे गुरुत्वार्कषणामुळे खाली गेली असावी असे शिलापट्टांतील खनिजांच्या वाटणीवरून दिसून येते.

शिलारसाचे स्फटिकीभवन बरेचसे प्रगत झाल्यावर त्याचा पुष्कळसा भाग एकमेकांस किंचित चिकटलेल्या स्फटिकांचा बनलेला असतो व स्फटिकांमधील जागा  शिलारसाच्या अद्यापि स्फटिकीभूत न झालेल्या द्रवाने व्यापिलेली असते. स्फटिक व द्रव मिळून झालेली राशी पाण्याने भरलेला स्पंज असावा त्यासारखी असते. कोणत्याही कारणाने ती दाबली गेली तर तिच्यातील द्रव भाग बाहेर घालविला जाणे शक्य असते. दाबामुळे त्या राशीतील स्फटिक एकमेकांच्या अधिकाधिक जवळ आणले जातात व कमी दाब असलेल्या भागाकडे द्रव जाऊ लागतो. तो द्रव स्फटिकीभवनाने तयार झालेल्या राशीच्या सापेक्षतः कमी दाब असलेल्या भागात शिरणे व नंतर तो तेथेच निवून त्याच्या शिरा तयार होणे शक्य असते. पण दाब बराच असेल तर तो द्रव त्या राशीच्या बाहेर घालविला जाऊन त्याच्यापासून एखादी स्वतंत्र राशी तयार होते. अंशत: घनीभूत झालेल्या शिलारसांवर दाब पडण्याचे मुख्य कारण म्हणजे कवचाच्या हालचालींमुळे पडणारे दाब होत. दाब पडून निवणाऱ्या शिलारसातील घन व द्रव पदार्थ वेगळे होत असल्यामुळे या प्रक्रियेला ‘दाब-गाळणे’ म्हणतात. दाबगाळण्याने बाहेर घालविला गेलेला द्रव दुसऱ्‍या जागेत गेल्यावर वरील प्रक्रियेने त्याचे पुन्हा भिन्नीभवन होणे व खडकांचे आणखी नवे प्रकार निर्माण होणे शक्य असते.

गुरुत्वाकर्षणामुळे खनिजे शिलारसात बुडून खाली जाणे व अंशत: स्फटिकीभूत झालेला शिलारस दाब-गाळला जाणे, या वर वर्णन केलेल्या दोन प्रक्रिया भिन्नीभवन घडवून आणणाऱ्‍या मुख्य प्रक्रिया होत. पण भिन्नीभवनाने तयार झालेल्या कित्येक राशींच्या उत्पत्तीचा उलगडा वरील केवळ दोन प्रक्रियांनी करता येत नाही. त्यांच्याशिवाय इतर प्रक्रियांमुळेही भिन्नीभवन घडून येत असावे असे दिसते.

आ.८. जमिनीखाली खोल जागी असलेल्या शिलारसाच्या काल्पनिक कोठराचा छेद दाखविणारे चित्र.

जमिनीखाली खोल जागी असलेल्या एका काल्पनिक कोठारात समांग असा शिलारस घुसला आहे व तो निवत आहे अशी कल्पना करू. तापमान उतरत असताना निरनिराळ्या वेळी तयार झालेल्या खनिजांचे स्फटिक अनुक्रमाने (म्हणजे प्रथम उच्च तापमानात व नंतर उत्तरोत्तर कमी तापमानात तयार झालेले) शिलारसाच्या तळाकडील भागात गोळा झालेले आहेत व त्यामुळे शिलारसाचे भिन्न भिन्न संघटन असलेले भाग झालेले आहेत (आ.८). अशा स्थितीत ने दाखविल्यासारखी भेग पडून तिच्यातून थोडा थोडा शिलारस थांबून थांबून बाहेर पृथ्वीच्या पृष्ठावर येत राहिला तर प्रथम अँडेसाइट व नंतर अनुक्रमे बेसाल्ट, ऑलिव्हीन-बेसाल्ट व विपुल ऑलिव्हीन असलेला बेसाल्ट, अशा संघटनांचे लाव्हे बाहेर पडतील. पण कवचाच्या हालचालीच्या तीव्र दाबामुळे कोठारातील शिलारस खळबळविला जाऊन बाहेर पडला तर शिलारसाचे असमांग मिश्रण असलेला लाव्हा बाहेर पडणे शक्य असते.

कोठाराच्या भोवतालच्या खडकात अनेक जागी भेगा तयार होऊन व त्या कोठाराच्या निरनिराळ्या भागांपासून निघून पृष्ठभागी न येता भोवतालच्या खडकातच थांबल्या तर त्यांच्यात शिरलेला शिलारस निवून भिन्न भिन्न अंतर्वेशी खडक तयार होतील. या भेगा पृष्ठाशी येऊन पोचल्या तर त्यांच्या वाटे बाहेर पडलेल्या शिलारसापासून भिन्न भिन्न, उदा., (१) येथून अँडेसाइट, (२) येथून बेसाल्ट, (३) येथून ऑलिव्हीन-बेसाल्ट, (४) येथून विपुल ऑलिव्हीन असलेला बेसाल्ट, असे लाव्हे बाहेर पडतील.

या उदाहरणातील कोठारासारख्या कोठाराच्या भोवतालच्या खडकात एखादी कोठडी निर्माण होणे शक्य असते व तिच्यात पहिल्या कोठारातील व आधीच भिन्नीभूत झालेला शिलारस घुसविला जाणे व नंतर त्या कोठडीत त्याचे भिन्नीभवन होणे व खडकांचे अधिक नवे प्रकार तयार होणे अशा घटना घडू शकतात. उदा., वरील उदाहरणातील शिलारसापासून ट्रॅकाइटासारखा ज्वालामुखी खडक तयार होणे शक्य असते.

आ.८ ही सारत: बेसाल्टी शिलारसाच्या स्फटिकीभवनाचा क्रम दाखविणारी आकृती आहे. शिलारसाच्या निवण्याच्या निरनिराळ्या अवस्थांत तयार होणाऱ्‍या अंशापासून बेसाल्टाहून भिन्न अशा अनेक जातींचे खडक तयार होणे शक्य असते हे त्या आकृतीवरून कळून येईल. बेसाल्टी शिलारसाच्या भिन्नीभवनाच्या अखेरच्या अवस्थेतील द्रव भागांपासून ग्रॅनाइटासारखे खडक तयार होतात. म्हणून बेसाल्टी शिलारस हा एकच आद्य शिलारस असावा असे काही भूवैज्ञानिकांचे मत आहे.

आ.९ खोड (स्टॉक). खोडाच्या कडांशी अल्पसिकत खनिजे अधिक प्रमाणात व अंतर्भागात विरल आहेत. ठिपक्यांची दाटी अल्पसिकत खनिजांच्या प्रमाणात आहे.

(२) कित्येक बॅथोलिथांच्या किंवा खोडांच्या कडेशी लोहमॅग्नेशियाची काळसर व अधिक भारी खनिजे विपुल असलेला खडक असतो व कडेपासून आत जावे तो तो त्या खनिजांचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते व मध्याजवळील भागात फेल्सपारे व क्वॉर्ट्‌झ विपुल असलेला खडक असतो. इतर काही बॅथोलिथांत खनिजांचे फरक मंदपणे न होता एकाएकी झालेले आढळतात. बॅथोलिथांच्या कडेशी काळसर खनिजे प्रमुख असणाऱ्‍या खडकांचा पट्टा असतो. या दोहोंपेक्षा स्पष्ट वेगळा व काळसर खनिजे अल्प असणारा खडक मध्याजवळ असतो.

(३) लोह-मॅग्नेशिया यांची खनिजे सामान्यत: अंतर्वेशी राशींच्या कडेशी व फेल्सपारे व क्वॉर्ट्‌झ ही त्यांच्या अंतर्भागात गोळा झालेली आढळतात. याच्या उलट व्यवस्था असलेली म्हणजे लोह-मॅग्नेशिया यांची खनिजे मध्याजवळ सांद्रित (एकत्रित) झाल्याची उदाहरणेही क्वचित पण विरळाच आढळतात.

सात्मीकरण : एखाद्या शिलारसात एखादा परका घन किंवा द्रव पदार्थ म्हणजे खडक किंवा दुसरा एखादा शिलारस मिसळून तो पदार्थ त्या शिलारसाने आत्मसात केल्या जाणाऱ्‍या प्रक्रियेस ‘सात्मीकरण’ म्हणतात. अशा बाह्य पदार्थाचे सात्मीकरण झाल्यावर त्या शिलारसापासून सहाजिकच वेगळ्याच प्रकारचा खडक तयार होतो.

अंतर्वेशी अग्निज खडकांच्या कित्येक व विशेषत: मोठ्या राशींच्या बाह्य पृष्ठलगतच्या खडकात शेजारच्या परकी खडकांचे लहानमोठे तुकडे (बाह्याश्म) रुतलेले आढळतात. त्यांच्यापैकी कित्येकांत काहीच बदल झालेला नसतो. पण इतर कित्येकांत थोडे बदल झालेले असतात व ते बदल त्यांची शिलारसाशी विक्रिया झाल्यामुळे झालेले असतात. इतर काहींत बरेच अधिक बदल झालेले असतात, तर कित्येकांचे घटक पूर्ण बदलले जाऊन त्यांच्यात मूळच्या घटकांच्या आकाराच्या अंधुक खुणा मात्र उरलेल्या असतात. बाह्याश्मांशी विक्रिया झाल्यामुळे शिलारसाचे रासायनिक संघटन व त्याच्यापासून तयार होणाऱ्‍या खडकाचे खनिज संघटन बदलणे शक्य असते. उदा., अल्पसिकत शिलारस व शेलाचे बाह्याश्म यांच्या विक्रियेने कुरुविंद, स्पिनेल, सिलिमनाइट यांसारखी व अग्निज खडकात सामान्यत: न आढळणारी खनिजे तयार होतात व ती बाह्याश्मांनी संदूषित झालेल्या कित्येक अग्निज खडकांत आढळतात.

खडक वितळविण्यास आवश्यक तेवढी उष्णता शिलारसांच्या अंगी नसते व त्यांच्याशी संपर्क येणारे खडक वितळविले जाऊन व त्यांचा वितळलेला द्रव शिलारसात मिसळून सात्मीकरण होणे शक्य नसते, असे प्रयोगसिद्ध पुराव्यावरून कळून आलेले आहे. उदा., ज्याच्यात लॅब्रॅडोराइट व ऑजाइट ही खनिजे आहेत अशा गॅब्रो खडकातील पोकळीत ग्रॅनाइटी शिलारस शिरला आहे व तो निवत असून त्याचे अंशत: स्फटिकीभवन होऊन हॉर्नब्लेंडाचे व ऑलिगोक्लेजाचे स्फटिक तयार होण्यास सुरूवात झालेली आहे अशी कल्पना करू. शिलारसाशी संपर्क येणाऱ्‍या भिंतीच्या गॅब्रोतील लॅब्रॅडोराइटाचे अखंड विक्रियामालेतील स्थान ऑलिगोक्लेजाच्या आधीचे व ऑजाइटाचे खंडित विक्रियामालेतील स्थान हॉर्नब्लेंडाच्या आधीचे आहे. त्यामुळे ऑलिगोक्लेज व हॉर्नब्लेंड तयार होण्याच्या अवस्थेत शिलारस हा लॅब्रॅडोराइट व ऑजाइट यांनी आधीच अतिसंतृप्त झालेला असतो व ती खनिजे शिलारसात विरघळणार नाहीत. परंतु त्यांची व शिलारसाची जटिल विक्रिया घडून येते व या विवक्षित अवस्थेत शिलारसाशी समतोल असणाऱ्‍या अशा अनुक्रमे ऑलिगोक्लेजात व हॉर्नब्लेंडात त्यांचे परिवर्तन होऊ लागते. विक्रिया पुरेसा काल घडून आली तर परिवर्तन पूर्ण होते. या उदाहरणातील शिलारसापेक्षा अधिक तापमान असणारा व ज्याच्यात मॅग्नेशियम-ऑलिव्हिनाचे स्फटिक तयार होत आहेत अशा शिलारसाचा संपर्क ज्याच्यात ऑजाइट आहे अशा खडकाशी आला तर ऑजाइटाचे विक्रियामालेतील स्थान ऑलिव्हिनापेक्षा खालचे असल्यामुळे ऑजाइट वितळेल व त्याला वितळविण्यास आवश्यक तेवढी सुप्त उष्णता ऑलिव्हिनाचे स्फटिक तुल्य प्रमाणात अवक्षेपित होऊन पुरविली जाईल.

सारांश, शिलारस व बाह्याश्म यांच्यामधील विक्रिया कशी होईल हे निवण्याच्या कोणत्या अवस्थेत शिलारस आहे, म्हणजे स्फटिकीभवनाने त्याच्यात जी खनिजे तयार होत असतील त्यांची विक्रियामालातील स्थाने कोणती आहेत व शिलारसाशी संपर्क येणाऱ्‍या खडकात कोणती खनिजे आहेत, या गोष्टींवर अवलंबून असते. शिलारसात एखादे खनिज तयार होत असताना विक्रियामालेतील खालचे स्थान असलेल्या बाह्य खनिजांशी शिलारसाचा संपर्क झाला तर बाह्य खनिज वितळेल. तयार होत असलेल्या खनिजापेक्षा विक्रियामालेतील वरचे स्थान असलेल्या बाह्य खनिजाचा शिलारसाशी संपर्क झाला तर त्या दोहोंमधील विक्रियेने बाह्य खनिजाचे शिलारसाच्या त्या अवस्थेत उचित अशा खनिजात परिवर्तन होईल. निवण्याच्या विवक्षित अवस्थेत अनुरूप अशा बाह्य खनिजांचा शिलारसाशी संपर्क झाला तर त्यांच्यात बदल न होता ती तशीच टिकून राहतील. परंतु विक्रिया कशीही झाली तरी शिलारस संदूषित होतो व त्याच्यापासून होणारे खडक संकरज असतात. असे संकरज खडक पातालिक खडकांच्या मोठ्या राशींच्या कडांलगतच्या भागात वारंवार आढळतात. ग्रॅनाइटी शिलारस व त्याच्या भोवतालच्या भिंतीचा गॅब्रो किंवा चुनखडक यांच्यामधील विक्रियेने तयार झालेला डायोराइट कित्येक ग्रॅनाइटांच्या कडांशी आढळतो. संकर न होता केवळ अग्निज प्रक्रियांनी तयार झालेले डायोराइटही असतात. शिलारसाची राशी पुरेशी मोठी नसली व बाह्याश्मांशी विक्रिया पुरी होण्याच्या आधीच त्याचा द्रव संपला म्हणजे त्याच्यापासून तयार होणाऱ्‍या खडकात अंशत: परिवर्तन झालेले किंवा परिवर्तन न झालेले बाह्याश्म सापडतात.

द्रव शिलारसांचे मिश्रण होणे: एक सिकत व एक अल्पसिकत असे दोन आद्य शिलारस सर्व पृथ्वीत पसरलेले असून ते निरनिराळ्या प्रमाणांत मिसळले गेले असावेत व त्यांच्या मिश्रणाचे तयार झालेल्या व निरनिराळे रासायनिक संघटन असलेल्या शिलारसांपासून अग्निज खडकांचे आपणास आढळतात तितके विविध प्रकार निर्माण झाले असावेत, असे बन्सन यांनी सुचविले होते (१८५१). पण ती कल्पना समाधानकारक नाही असे त्यानंतर झालेल्या अध्ययनावरून दिसून आलेले आहे. दोन शिलारस एकाच कोठडीत घुसविले जाऊन त्यांचे मिश्रण होण्याचा संभव बहुधा नसतो. पण अंशत: स्फटिकीभूत झालेले दोन शिलारस काही परिस्थितीत एकमेकांत मिसळण्याचा संभव असतो व तसे होऊन काही ज्वालामुखी खडक व उथळ अंतर्वेशी खडक निर्माण झाले असावेत असे दिसते. अगदी भिन्न भिन्न रासायनिक संघटन असलेल्या प्लॅजिओक्लेजांचे बृहत्स्फट काही ज्वालामुखी खडकांत सर्वत्र विखुरलेले आढळतात व त्यांपैकी कित्येकांचे रासायनिक संघटन त्यांच्या आधारकाच्या रासायनिक संघटनाशी समतोल नसावे असे दिसते. एकाच किंवा एकमेकांशेजारी असलेल्या निर्गमद्वारातून लागोपाठ लौकर बाहेर पडलेल्या लाव्ह्यांचे मिश्रण होऊन असे बृहत्स्फट असलेले खडक तयार झाले असावेत. कोलोरॅडोतील सॅन वॉन नावाच्या ज्वालामुखी खडकांच्या प्रदेशात, कॅलिफोर्नियात व जपानात असे बृहत्स्फट असलेले बेसाल्ट, अँडेसाइट, रायोलाइट इ. ज्वालामुखी खडक सापडतात.

संदर्भ :  1. Hatch, F. H. Wells, A. K. Wells, N. K. Petrology of Igneous Rocks, London, 1961.

             2. Turner, F. J., Verhoogen, J. Igneous and Metamorphic Petrology, Bombay, 1961.

             3. Tyrrel, G. W. The Principles of  Petrology, London, 1960.

केळकर, क. वा.