अश्वघोष : (इ.स. चे पहिले शतक). संस्कृतमधील एक महाकवी, नाटककार आणि बौद्ध तत्त्वज्ञ. याच्या ग्रंथांतील व्यक्तिगत निर्देशांवरून याची काही माहिती मिळते. हा साकेत (अयोध्या) येथे राहणारा. याच्या आईचे नाव सुवर्णाक्षी. यास ‘आचार्य’, ‘भदंत’, ‘महाकवी’ आणि ‘महावादी’ या पदव्या होत्या. उपनिषदे, भगवद्गीता, सांख्यादी दर्शने आणि रामायणादी पूर्वकालीन काव्ये यांचा त्याने उत्तम अभ्यास केला होता. त्याच्या कृतींमध्ये दिसून येणारे ब्राह्मण धर्म व संस्कृतीचे सखोल ज्ञान, तत्संबंधीचा आदर आणि धर्मपरिवर्तनाच्या कथा यांवरून तो जन्माने ब्राह्मण असून पुढे त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला असावा, असा तर्क केला जातो. हा कनिष्काचा धर्मविषयक सल्लागार असून त्याच्या कारकिर्दीत झालेल्या बौद्धधर्मपरिषदेचा अध्यक्ष होता, अशी पारंपरिक समजूत आहे. हा हीनयान (श्रावकयान) पंथाचा होता.
बुद्धचरित, सौदरनंद, शारिपुत्रप्रकरण (सारिपुत्रप्रकरण किंवा शारद्वतीपुत्रप्रकरण), वज्रसूची, गण्डीस्तोत्रगाथा, सूत्रालंकार, महायान श्रद्धोत्पादशास्त्रइ. ग्रंथ अश्वघोषाचे म्हणून सांगण्यात येतात. तथापिबुद्धचरित व सौदरनंद ही महाकाव्ये आणि शारिपुत्रप्रकरण हे नाटक, एवढे तीनच ग्रंथ निर्विवादपणे अश्वघोषाचे आहेत.
बुद्धचरिताचे मूळ अठ्ठावीस सर्ग असावेत, असे त्याच्या चिनी व तिबेटी आवृत्त्यांवरून दिसते. आज मात्र त्या मूळ संस्कृत महाकाव्याचे फक्त चौदाच सर्ग उपलब्ध आहेत. त्यांतही पहिल्या सर्गाचे सु. तीन पाद आणि चौदाव्या सर्गाच्या पहिल्या पादातील ३१ श्लोकच मिळतात. एकोणिसाव्या शतकात अमृतानंद नावाच्या एका नेपाळी पंडिताने चौदा ते सतरा हे सर्ग स्वतःच लिहून काढले. अंशत:च उपलब्ध असलेल्या या महाकाव्यात बुद्धाच्या आत्मसाक्षात्कारापर्यंतची कथा आलेली आहे.
राजपुत्र सर्वार्थसिद्धीची नगरयात्रा त्याला पाहण्यासाठी जमलेला स्त्रियांचा मेळावा रोग, वार्धक्य आणि मृत्यू यांची दृश्ये राजपुत्राला सर्वसंगपरित्यागापासून परावृत्त करण्यासाठी राजपुरोहिताने केलेले युक्तिवाद इत्यादींच्या वर्णनांतून अश्वघोषाची वेधक कथनशैली आणि निरनिराळ्या व्यक्ती व प्रसंग रंगविण्याचे कौशल्य प्रत्ययास येते. हे काव्य रचताना बुद्धासंबंधीच्या अधिकृत माहितीचाच उपयोग करण्याकडे त्याची प्रवृत्ती दिसते. तसेच, आवश्यक तेथे त्याने परंपरेला मान दिला आहेच. बौद्धधर्मतत्त्वांचा प्रचार हे या काव्याचे उद्दिष्ट असले, तरी अश्वघोषाने हे काव्य रुक्ष होऊ दिले नाही. सौदरनंदाचे एकूण १८ सर्ग असून ते उपलब्ध आहेत. बुद्धाने नंद या आपल्या सावत्र भावाचे धर्मांतर कसे घडवून आणले, हा या काव्याचा विषय आहे. नंद हा अत्यंत देखणा असल्यामुळे ‘सुंदर’ या नावानेच ओळखला जाई. त्याची पत्नी सुंदरी हीसुद्धा अतिशय रूपवान होती. तिच्यासह सुखोपभोगात तो मग्न असे. बुद्धाने त्याचे डोळे उघडले आणि संसारलालसा सोडून तो बुद्धाचा अनुयायी झाला, असे या महाकाव्यात दाखविले आहे. सौदरनंदात काव्याबरोबर तत्त्वचर्चाही आली आहे. धर्मोपदेशक अश्वघोष या काव्यात अधिक प्रकर्षाने जाणवतो. शारिपुत्रप्रकरण ह्या नाटकात शारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे बुद्धाने घडवून आणलेले धर्मांतर दाखविले आहे. तथापि हे नाटक अत्यंत त्रुटित स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे या धर्मांतराची महावग्गासारख्या ग्रंथांतून आढळणारी कथा या नाटकात अश्वघोषाने कशी मांडली होती, यासंबंधीची नीटशी कल्पना येऊ शकत नाही.
सर्वसामान्यांना बौद्ध धर्माचे महत्त्व पटवून देण्यासाठीच अश्वघोष काव्य-नाटकांसारख्या ललितरचनेकडे वळला. ‘कडू औषध मधाबरोबर दिले की घेववते त्याचप्रमाणे मोक्षधर्माचा उपदेशही काव्यबंधाने मनोरम ठरतो’ अशा आशयाचे उद्गार सौदरनंदाच्या अखेरीस त्याने काढले आहेत. काव्याच्या तंत्रकौशल्याकडे त्याने फारसे लक्ष पुरविले नाही. तथापि त्याच्या साध्या, सरळ, पण मधुर भाषेनेच त्याच्या काव्याला एक आकर्षक रूप प्राप्त करून दिले आहे. अश्वघोष आणि कालिदास यांच्या काव्यांत काही लक्षणीय साम्यस्थळे आढळतात. त्यांवरून त्याच्या काव्याचा कालिदासाने उत्तम अभ्यास केला असावा, असे मत अनेक विद्वानांनी व्यक्त केले आहे. याच्या उलट अश्वघोषाचा काळ कालिदासानंतरचा असून त्यानेच कालिदासाचे अनुकरण केले असावे, असाही विचार काही विद्वानांनी मांडला आहे. तथापि अश्वघोष हा कालिदासचा पूर्वसूरी होय हेच मत सर्वसाधारणतः मान्य केले जाते.
संदर्भ : Shastri, Haraprasad, Ed. Saundarananda Kavya of Arya Bhadanta, Calcutta,1939.
भट, गो. के.