अवसाद : (शॉक). गंभीर स्वरूपाची इजा, आकस्मिक दुर्घटना वगैरे कारणांमुळे रक्तप्रवाहामध्ये एकदम बिघाड झाल्यामुळे होणाऱ्या  शक्तिपातास ‘अवसाद’ म्हणतात.

कारणे : (१) भावनोद्रेक, (२) तीव्र स्वरूपाची शारीरिक इजा, (३) गंभीर स्वरूपाच्या शस्त्रक्रिया (विशेषतः पोटातील इंद्रियांवरील), (४) अंतस्त्यांमधील (शरीराच्या आतील इंद्रियांमधील) अकस्मात उत्पन्न झालेले अनर्थ (जठर किंवा आतड्याचा भेद, पाशबद्ध अंतर्गळ वगैरे) आणि (५) तीव्र रक्तस्राव.

प्रकार : अवसादाचे दोन प्रकार कल्पिले आहेत.

(१)प्राथमिक : हा बहुधा भावनोद्रेकासारख्या मानसिक कारणांमुळे होतो.एकदम रक्त दृष्टीस पडणे, तीव्र वेदना, भीती वगैरे परिस्थितींत तीव्र शक्तिपात होतो. यास ‘प्राथमिक अवसाद’ म्हणतात. हा अवसाद आघातानंतर ताबडतोब होतो आणि त्वरित उपचारांनी बरा होतो.

(२)द्वितीयक किंवा अनुषंगी : हा अवसाद गंभीर स्वरूपाचा असतो. अकस्मात रक्तस्राव, भाजल्यानंतरचा, जंतुजन्य व इतर विषांचा परिणाम, अतितीव्र वेदना किंवा भावनोद्रेक, हृदयाचे आकस्मित विकार वगैरे कारणांमुळे या प्रकारचा अवसाद होतो. हा प्रकार आघातानंतर काही काळानंतर होतो.

संप्राप्ती : यात रक्ताचे घनफळ व रक्तपरिवहनतंत्राची (रक्ताभिसरण व्यूहाची) रक्तधारणाक्षमता यांमध्ये विसंवाद उत्पन्न होणे ही मुख्य विकृती असते. परिवहनातील रक्ताचे घनफळ एकाएकी कमी झाले किंवा केशिकांची (सूक्ष्मतम रक्तवाहिन्यांची) रक्त सामावून घेण्याची प्रवृत्ती एकदम वाढली तर अवसाद होतो. रक्तस्रावाने किंवा भाजल्यानंतर रक्त व रक्तद्रव एकदम बाहेर पडल्यामुळे रक्ताचे घनफळ एकदम कमी होते. त्यामुळे हृदय, मेंदू, यकृतादी जीवनाला अत्यावश्यक असलेल्या इंद्रियांना रक्ताचा पुरवठा योग्य अशा दाबाने मिळू शकत नाही. शरीरातील सर्व ऊतकांत (समान रचना व कार्य असणार्‍या शरीरातील सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या समूहांत) केशिकांचे जाळे असते. पण एकाच वेळी सर्व कोशिकांमध्ये रक्त वाहत नाही. त्या त्या इंद्रियाच्या कार्याच्या जरूरीप्रमाणे केशिकांत रक्त जाते. हे नियंत्रण केशिकांच्या सुरुवातीस असलेल्या स्‍नायूंच्या आकुंचन-प्रसणामुळे होते. हे केशिकांचे नियंत्रण करणारे स्‍नायू अवसादामध्ये एकदम शिथिल होतात व त्यामुळे केशिकांमध्ये रक्त साठून राहते. तंत्रिका तंत्राचे (मज्जातंतू व्यूहाचे) त्या स्‍नायूंवरील नियंत्रण नाहीसे झाल्यामुळे ही स्थिती उत्पन्न होते. केशिकांमध्ये रक्त साठून राहिल्यामुळे परिवहनास पुरेसे रक्त रक्तवाहिन्यांत राहतच नाही. त्यामुळे हृदयाकडे पुरेसे रक्त जात नाही व रक्तदाब कमी होऊन मस्तिष्क (मेंदू), हृदय वगैरे आवश्यक इंद्रियांना रक्ताचा पुरवठा कमी पडतो. याच्या साधारण तीन अवस्था असतात. पहिल्या अवस्थेत रक्ताचे प्रमाण कमी असले, तरी रोहिण्यांच्या संकोचामुळे रक्तदाब फार कमी होत नाही. त्यामुळे अवसाद असला तरी हृदयाची व मेंदूची क्रिया, मंद गतीने का होईना, चालू राहते. दुसर्‍या अवस्थेत सूक्ष्म रोहिण्या व केशिकांचे प्रसरण होऊन उदरगुहेतील (पोकळीतील) अंतस्त्यांत रक्त साठून राहिल्यामुळे रक्तदाब कमी होतो व त्यामुळे हृदयाची क्रिया जोराने चालूनही आवश्यक इंद्रियांना रक्ताचा पुरवठा कमी पडतो. तिसर्‍या अवस्थेत रक्तदाब फारच कमी पडून हृदय, मेंदू वगैरे इंद्रियांचा रक्ताचा पुरवठा बंद होऊन मृत्यू ओढवतो.

लक्षणे : रोगी निपचित पडून राहतो. त्वचा व चेहरा पांढरा फटफटीत पडतो. सर्वांगास घाम सुटून तोंडावर व कपाळावर घामाचे थेंब दिसतात. डोळे खोल व निस्तेज दिसतात. तापमान कमी होते. नाडी व श्वासोच्छ्‌वास ही प्रथम शीघ्र व पुढील अवस्थेत मंद गतीची होतात. रक्तदाब फारच कमी होतो. अवसादाच्या अवस्थेप्रमाणे ही लक्षणे कमी-जास्त तीव्र असतात.

चिकित्सा : रोग्याची डोक्याची बाजू खाली करून मेंजूस रक्त पोचेल अशी व्यवस्था करतात. नीलेतून रक्त देणे (रक्ताधान) व लवणशर्करा विद्राव (सलाइन) देणे, नॉर ॲड्रेनॅलीन (रक्तदाब स्थिर ठेवण्यास मदत करणारे हॉर्मोन, →  हॉर्मोने) देणे वगैरे उपचार करतात.

बापट, श्री. ह.