शोथ : (इन्फ्लमेशन). समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या (पेशींच्या) समूहाला ऊतक म्हणतात. ऊतकाला इजा झाल्यास अथवा ते नष्ट झाल्यास त्याभोवतीच्या सजीव ऊतकांमार्फत होणाऱ्या प्रतिकियेला शोथ म्हणतात. सजीव ऊतकाला हानी पोहोचविणाऱ्या कोणत्याही अपकारक प्रक्रियेने शोथ उद्‌भवू शकतो. उदा., कापणे, खरचटणे, मुकामार, ठेचणे यांसारख्या आघातजन्य इजा, जादा उष्णता वा थंडी, वीज, प्रारणे (उदा., क्ष-किरण, जंबुपार प्रारण, गॅमा किरण), सूक्ष्मजीव (उदा., सूक्ष्मजंतू , कवके, व्हायरस), अम्ले व क्षारकांसारखी रसायने, विषारी द्रव्ये, शरीरात शिरलेले सर्व बाह्य पदार्थ [→ प्रतिजन] इत्यादी. गरमपणा, सूज, स्थानिक लाली व वेदना ही शोथाची चार महत्त्वाची लक्षणे आहेत. साध्या निरीक्षणांतून रोमन वैदय सेल्सस (इ. स. पू. ३० ते इ. स. ३८) यांना ही लक्षणे आढळली होती. कार्यनाश या पाचव्या लक्षणाचा शोध ⇨ गेलेन (इ. स. १३१२०१) या ग्रीक वैदयांनी लावला.

शोथ प्रक्रिया : शोथाचे कारण कोणतेही असले, तरी त्याची सुरूवातीची प्रक्रिया एकाच प्रकारची असते. या प्रकियेत मुख्यतः लहान वाहिन्या व कोशिका भाग घेतात. इजा कोठे व कशी झाली, व्यक्तीचे आरोग्य कसे आहे, उपलब्ध असलेले उपचार व त्यांची परिणामकारकता यांवर शोथ प्रकियेची वाटचाल व परिणाम अवलंबून असतात. स्थानिक प्रतिकियेनंतर ताप, आजारपणाची भावना, अंग व डोके दुखणे, श्वेतकोशिकांची संख्या वाढणे यांसारखी सार्वदेहिक लक्षणेही दिसतात.

ऊतकाला इजा झाली की, लगेचच लगतच्या रोहिणिकांचे काही काळ आकुंचन होते. थोडयच वेळात ते थांबून त्यांचे प्रसरण होते व नीलिकांचे आकुंचन होते. परिणामी कोशिकांच्या जाळ्यातील रक्तपुरवठा वाढून तेथे रक्त साठते. यामुळे केशवाहिन्यांतून द्रायू (द्रव किंवा वायू) पाझरण्याचे प्रमाण वाढते व तो (नि:स्राव) कोशिकेबाहेरील मोकळ्या जागेत साचतो. याबरोबर केशवाहिन्यांची पारगम्यता वाढून रक्तद्रवातील प्रथिनांचे मोठे रेणूही कोशिकेबाहेरील मोकळ्या जागेत साचतात. प्रथिने पाणी धरून ठेवतात व त्यामुळे इजेच्या ठिकाणी द्रायू साचण्यास मदत होते. ऊतकांतील इजा झालेल्या कोशिका हिस्टामीन, ल्युकोटॉक्सीन इ. रसायने मुक्त करतात. या आकर्षणकारी रसायनामुळे रक्तवाहिन्यांतील तांबडय कोशिकांचे प्रमाण आणि रक्तवाहिन्यांच्या भित्तींची पारगम्यता वाढण्यासही मदत होते. नंतर रोहिणीमधील रक्तप्रवाहाच्या मध्य भागातील श्वेतकोशिका आपली नेहमीची जागा सोडून रक्तवाहिन्यांच्या भित्तींना चिकटतात आणि अंत:कला कोशिकांमधील फटींतून कोशिकेबाहेरील मोकळ्या जागेत प्रवेश करतात. पुढे त्या कोशिकाभित्तींलगतच्या इजा झालेल्या ऊतकांपर्यंत जातात.

प्रसरण पावलेल्या रक्तवाहिन्यांमुळे लाली येते. मुख्यतः नि:स्राव निर्माण झाल्याने व थोड्या प्रमाणात प्रसरण पावलेल्या रक्तवाहिन्यांमुळे सूज येते. वाढलेल्या रक्तप्रवाहामुळे उष्णता (व लालीही) निर्माण होते. स्थानिक सूज व रक्तवाहिन्यांचा दाब यांच्यामुळे अंशत: वेदना होतात. तसेच शोथ प्रकियेत निर्माण झालेल्या रसायनांची तंत्रिका तंतूंच्या (मज्जातंतूंच्या) अगांवर किया होऊनही वेदना होतात.

जखमेलगतच्या कोशिकांमधील व नि:स्रावातील द्रायुरूप घटक विविध प्रकारची चिकित्साविषयक कार्ये करतात. जखमेजवळचे सूक्ष्मजंतू , बाह्य पदार्थ व कोशिकांचे अवशेष यांच्यावर श्वेतकोशिका हल्ल करतात व पाचन करून त्यांची विल्हेवाट लावतात. रक्तद्रवातील तंत्वीजन (फायबिनोजेन) हे प्रथिन तेथे साचते व जखमेच्या ठिकाणी त्याचे तंत्वीनात (फायबिनात) रूपांतर होते. रक्तस्राव असल्यास या फायबिनामुळे रक्त गोठून त्याची गुठळी बनते. रक्तद्रवातील गॅमा ग्लोब्युलीन या दुसऱ्या प्रथिनातील ⇨प्रतिपिंडा ची विशेषतः प्रतिजनांशी विक्रिया होते. सूक्ष्मजंतूंनी संसर्गित ऊतकांत झिरपलेल्या प्रतिपिंडांमुळे सूक्ष्मजंतूंची विल्हेवाट लावण्यास श्वेतकोशिकांना मदत होते. जखमी ऊतकाला झिरपलेल्या रक्तद्रवामार्फत ऑक्सिजन व अन्नघटक यांचा पुरवठा होतो. यामुळे तेथील विषारी द्रव्ये सौम्य होतात वा ती धुऊन टाकली जातात. प्रत्यक्ष रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास होणारा रक्तस्राव रोहिणिकांच्या आकुंचनाने लगेच तात्पुरता थांबतो व वरील रीतीने नंतर कायमचा थांबतो.

रक्तवाहिन्यांतील बदलांपाठोपाठ कोशिकीय बदल होतात. त्यांत मुख्यतः श्वेतकोशिका, तंतुजन्य कोशिका व स्नेहकोशिका सहभागी होतात. जखमेच्या ठिकाणी सर्वप्रथम आलेल्या अरंज्य कणकोशिका किंवा बहुरूप केंद्रकी श्वेतकोशिका सूक्ष्मजंतूंचे भक्षण करून त्यांचा नाश करतात. हे करताना मृत झालेल्या या कोशिकांना पुवाच्या (पूय) कोशिका म्हणतात. ऊतकातील स्नेहकोशिकांसारख्या क्षारकरंज्य कणकोशिका हिस्टामीन मुक्त करतात.

नंतर आढळणाऱ्या लसीका कोशिका इजेला कारणीभूत असलेल्या प्रतिजनाविरूद्घच्या प्रतिपिंडनिर्मितीत भाग घेतात. बहुधा रक्तातील एककेंद्रक कोशिकांपासून निर्माण होणाऱ्या महाभक्षी व बृहत् कोशिका भक्षण व नाश करून सूक्ष्मजंतू व मृतकोशिका यांची विल्हेवाट लावतात. ऊतकातील तंतुजन कोशिका जखम भरून येण्याच्या नंतरच्या प्रकियेत तंतुनिर्मितीचे काम करतात.

सर्व शोथांची सुरूवात तीव्र म्हणजे अल्पकालीन साध्या शोथाने होते व त्याची वाटचाल पुढील चार प्रकारांनी होत जाते : शमन, संघटन म्हणजे नवीन ऊतकांची निर्मिती, पूनिर्मिती आणि चिरकारी म्हणजे दीर्घकाल टिकणारा शोथ.

किरकोळ भाजणे, यांत्रिक इजा, हिमदाह, रासायनिक क्षोभ, सूक्ष्मजीवांचा किंवा व्हायरसांचा संसर्ग, अतिवेदनाशीलता ही साध्या तीव्र शोथाची कारणे असू शकतात. ही प्रतिकिया लगेच दिसते, वेगाने वाढते व अल्पकाळ टिकते. या प्रकारात फोड (गळू) वा वण निर्माण होत नाहीत. तसेच हा शोथ सहजपणे बरा होतो. यामध्ये रक्तातील श्वेतकोशिकांचे प्रमाण वाढते, सूज व ताप येतो आणि तांबड्या रक्तकोशिका गुरूत्वाने खाली बसण्याची त्वरा वाढते, कारण स्थानिक रक्तप्रवाह वाढतो. लक्षणांवरून याचे निदान होते. याचे शमन होते म्हणजे नि:स्राव बंद होऊन रोगगस्त भाग प्राकृत (सामान्य) कार्य करू लागतो व त्याची रचना नेहमीसारखी होते.

तीव्र शोथाची परिणती कधीकधी तेथे पू व गळू निर्माण होण्यात होते. ऊतकांना होणाऱ्या विशिष्ट सूक्ष्मजंतूंच्या संसर्गातून मुख्यतः पूनिर्मिती होते. अशा सूक्ष्मजंतूंच्या शरीरातच विषारी द्रव्ये असतात किंवा ते ती निर्माण करतात. अशा विषांमुळे श्वेतकोशिका व ऊतके मरतात. सूक्ष्मजंतूंनी स्रवलेल्या किंवा खुद्द मृत कोशिकांमार्फत निर्माण झालेल्या ⇨ एंझाइमांनी मृत कोशिकांचे दाट द्रवात रूपांतर होऊन पूनिर्मिती होते. तो पिवळसर, हिरवट किंवा क्वचित तांबूस रंगाचा असतो.

इजेमुळे शरीराच्या एखादया भागाची जास्त पण भरून येण्यासारखी हानी होते म्हणजे तेथे शोथाबरोबर ऊतकनाशही होतो, अशा वेळी तो भागभरून येणे आवश्यक असते. पुनर्निर्मिती व संघटन अशा दुहेरी क्रियांनी जखमभरून येते. टिकून राहिलेल्या जिवंत ऊतककोशिकांचे पुन:पुन्हा विभेदन होऊन कोशिकांची संख्या वाढते व जखम भरून येते. ऊतकांची पुनर्निर्मितिक्षमता प्रकारानुसार वेगवेगळी असते [उदा., मेंदू व तंत्रिका तंत्राच्या घटकांतील ऊतकात पुनर्निर्मितिक्षमताच नसते → तंत्रिका तंत्र]. शोथाच्या काही हानिकारक प्रकारांत संयोजी ऊतकात दोष राहतो. भाजले असता संयोजी ऊतके मोठया प्रमाणात नष्ट होतात. अशा वेळी होणारी वण-ऊतकांची निर्मिती आश्चर्यकारक असते.


चिरकारी शोथ प्रक्रिया काही आठवडे ते काही महिने चालते (अथवा चालू राहते). प्रतिपिंडे निर्माण करणाऱ्या लसीका-कोशिका, रक्तद्रव-कोशिका व एककेंद्रक-कोशिका या प्रकियेत मोठया प्रमाणात सहभागी होतात. चिरकारी शोथाच्या अधिक गंभीर अशा खास प्रकारांना कणार्बुदीय शोथ म्हणतात. यात कणार्बुदीय रचना सुट्यासुट्या व विखुरलेल्या आढळतात. या शोथात विकारगस्त भागात महाभक्षी, उपकलाभ, लसीका, प्लाविका, तंतुजन व बृहत् या विशिष्ट प्रकारच्या कोशिकांचे अंत:स्यंदन (पाझरण्याची किया) होते आणि त्यातून बनणाऱ्या नि:स्रावाचे स्वरूप शोथाच्या कारणानुसार बदलते. क्षयरोगात उपकलाभ व उपदंशात प्लाविका कोशिकांचे आधिक्य असते. क्षय, कवकजन्य शोथ व संधिवाताभ संधिशोथ यांमध्ये कणार्बुदीय स्वरूपाचा शोथ आढळतो. कुष्ठरोग, उपदंश यांतही चिरकारी शोथ आढळतो. चिरकारी मूत्रपिंडदाह, यकृत सूत्रण रोग किंवा चिरकारी पित्ताशयशोथ यांचाही अंतर्भाव चिरकारी शोथात होतो.

चिरकारी शोथात इजेचे कारण बाह्य पदार्थ, क्षयाचे वा कुष्ठरोगाचे सूक्ष्मजंतू अथवा अज्ञात स्वरूपाचे असते. यामुळे यात रूग्ण झटपट मृत्यू पावत नाही. त्याचप्रमाणे शरीराच्या रोगप्रतिकारक्षमतेने या कारणाचे निर्मूलनही झटपट होऊ शकत नाही. अशा प्रकारे रोगकारक आक्रमक सूक्ष्मजीव (उदा., क्षय व कुष्ठरोग यांचे सूक्ष्मजंतू) व त्यांना आश्रय देणारा जीव (मानव) यांच्यात सहजीवन (सिंबायोसिस) निर्माण होते.

महाभक्षिकोशिकांत सूक्ष्मजंतूंसारख्या क्षोभक पदार्थांचे अंतर्गहण झाल्यावर त्या अशा पदार्थांचे पाचन करून निर्मूलन करतात. असे निर्मूलन न झाल्यास साध्या शोथाचे चिरकारी प्रकारात परिवर्तन होते. क्षयरोग, कुष्ठरोग यांसारख्या काही विकारांत महाभक्षिकोशिकांत सूक्ष्मजंतूंची संख्यावाढ होते. मात्र त्यांचे निर्मूलन न होण्यामागील कारण ज्ञात नाही. विशिष्ट सूक्ष्मजीवांचे रासायनिक संघटन किंवा भक्षिकोशिकांच्या पाचनयंत्रणेतील त्रूटी अथवा रोगप्रतिकारक्षमतेमधील किंवा ॲलर्जीविषयक यंत्रणेतील दोष यांमुळे असे निर्मूलन होत नसावे. बाह्य पदार्थामुळे उद्‌भवणाऱ्या प्रतिकियेच्या बाबतीतही शरीर हे शोथजनक पदार्थांना अतिसंवेदनशील होत असावे व प्रतिकिया दीर्घकाळ चालू राहत किंवा वाढत जात असावी.

चिकित्सा : शक्य असेल तेथे शोथाच्या कारणाचे निर्मूलन करणे, हे चिकित्सेचे उद्दिष्ट असते. उदा., सूक्ष्मजंतुजन्य शोथात पेनिसिलीन व टेट्रासायक्लीन यांसारखे प्रतिजैव पदार्थ देतात. मात्र सूक्ष्मजंतूंचे काही वाण त्यास दाद देत नाहीत. क्षयरोगातील चिरकारी शोथाच्या बाबतीत कधीकधी आयसोनिॲझीड यांसारख्या क्षयरोग प्रतिबंधक औषधांबरोबर स्ट्रेप्टोमायसिनासारखे प्रतिजैव औषध देतात. तसेच क्षोभक ठरलेला बाह्य पदार्थ शस्त्रकियेने काढून टाकतात.

शोथाचे कारण माहीत नसल्यास किंवा विशिष्ट चिकित्सेला ते दाद देणारे नसल्यास प्रतिशोथकारक औषधे वापरतात. यात शोथाची चिन्हे व लक्षणे कमी करणारी द्रव्ये देतात. मात्र त्यामुळे शोथांच्या कारणावर परिणाम होतोच असे नाही. अशी औषधे पोटात वा इंजेक्शनाव्दारे देतात.उदा., कॉर्टिसोन हे कॉर्टिकोस्टेरॉइड, ॲस्पिरिनासारखी सॅलिसिलेटे इत्यादी. दीर्घकालीन अनुभवांतून स्पष्ट झालेली लक्षणानुसारी चिकित्साही वापरली जाते. उदा., कापडाची सुकी वा ओली अशी थंड किंवा गरम घडी, गरम पोटीस, वेदनाहारक व प्रतिक्षोभक औषधे इ. शोथग्रस्त जागी लावणे.

वेदना व ऊतकनाश कमी करणे इष्ट असले, तरी कोणत्याही चिकित्सेत शोथ प्रकियेच्या शरीरसंरक्षक कार्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. शोथाचे मूळ कार्य शरीराचे संरक्षण करणे हेच असते. इजेच्या ठिकाणी रक्तपुरवठा वाढविणे, इजा करणाऱ्या पदार्थाची तीव्रता कमी करणे. भक्षण व नाश करून त्याची विल्हेवाट लावणे, प्रतिपिंडांची मोठया प्रमाणात निर्मिती करून ती इजेच्या ठिकाणी उपलब्ध करून देणे आणि जखम भरून येण्यासाठीची प्रक्रिया सुरू करणे ही शरीरसंरक्षक कार्ये शोथाव्दारे होत असतात. इजा करणाऱ्या पदार्थाचे अस्तित्व न आढळणाऱ्या संधिवाताभ संधिशोथासारख्या विकारात स्वतःच्या शरीरातील घटकांविरूद्घच हानिकारक, अनियंत्रित व दिशाहीन शोथ प्रक्रिया सुरू होते.

पहा : अस्थिमज्जाशोथ आंत्रशोथ परिफुप्फुसशोथ परिहृदयशोथ बृहदांत्रशोथ विकृतिविज्ञान शेषांत्रशोथ.

संदर्भ: 1. Bonta, I. L. Brary, M. A. Eds., The Pharmacology of Inflammation, 1985.

2. Gallin, J. I. and others, Eds., Inflammation : Basic Principles and Clinical Correlates, 1988.

ढमढेरे, वा. रा.