अवटु ग्रंथि : (थायरॉइड ग्‍लँड). मानेच्या पुढच्या भागात असलेल्या द्विखंडी अंतःस्रावी (जिचा स्राव एकदम रक्तात मिसळतो अशा) ग्रंथीला ‘अवटू ग्रंथी’ असे म्हणतात. सर्व पृष्ठवंशीय (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांमध्ये शरीराचे योग्य पोषण आणि वाढ होण्यासाठी आणि चयापचयाच्या (शरीरात सतत होणार्‍या भौतिक व रासायनिक बदलांच्या) नियंत्रणासाठी या ग्रंथीची जरूरी असते. या ग्रंथीचा आकार ढालीसारखा असल्यामुळे तिला ‘ढालग्रंथी’ असेही म्हणतात.

ही ग्रंथी मानेत ‘अवटू’ या नावाच्या उपास्थीच्या (मजबूत व लवचिक असलेल्या पेशी-समूहाच्या म्हणजे ऊतकाच्या, → उपास्थि) दोन्ही बाजूंस द्विखंडात्मक असून ते दोन्ही खंड मध्यभागी जोडलेले असतात. त्या जोडणार्‍या भागाला ‘सेतू’ असे नाव आहे. या ग्रंथीचा रंग पिंगट लालसर असून तिचा आकार त्या त्या वेळच्या शरीरव्यापारावर अवलंबून असतो. साधारणपणे तिचे वजन २० ते ३५ ग्रॅ. असते. या ग्रंथीचा प्रत्येक खंड त्रिकोणाकृती असून त्रिकोणाचा शिरोबिंदू वरच्या बाजूस आणि त्याचा पाया खालच्या बाजूस असतो. प्रत्येक खंडाची लांबी सु. ५ सेंमी., रुंदी सु. ३ सेंमी. आणि जाडी सु. २ सेंमी. असते. दोन्ही खंड जोडणारा सेतू १.२५ सेंमी. लांब व तितकाच रुंद असून त्याची जाडी २ सेंमी. असते. ग्रंथीची मागची बाजू श्वासनालाच्या (मुख्य श्वासनलिकेच्या) वलय-उपास्थीला घट्ट बांधल्यासारखी असून सर्व ग्रंथीभोवती जाड तंत्वात्मक आवरण असते. ग्रंथीचा सेतू श्वासनालाच्या पुढच्या  भागातील दुसऱ्या व तिसऱ्या उपास्थीला बांधलेला असतो. क्वचित सेतू थोडा वर अथवा थोडा खाली असू शकतो. केव्हा केव्हा या ग्रंथीचा एखादा फाटा वर कंठास्थीपर्यंत गेलेला असतो. काही

आ. १. अवटू ग्रंथीचे स्थान. (१) अवटू ग्रंथी, (२) अवटु-उपास्थी, (३) श्वासनाल, (४) फुप्फुसाचा वरचा भाग, (५)सामान्य ग्रीवा रोहिणी, (६) अधोजत्रुक-रोहिणी

व्यक्तींमध्ये या ग्रंथीच्या उपग्रंथी सेतूच्या वरच्या किंवा खालच्या बाजूसही असू शकतात.

अवटू ग्रंथीत रुतून बसल्यासारख्या प्रत्येक बाजूस दोनदोन अशा एकूण चार ग्रंथी असतात. त्यांना ‘परावटु ग्रंथी’ (पॅराथायरॉइड ग्‍लँड) असे म्हणतात. त्यांचे कार्य स्वतंत्र असते [ à परावटु ग्रंथि].

अवटू ग्रंथीला रक्ताचा भरपूर पुरवठा असतो. प्रत्येक खंडाला वरून एक व खालून एक अशा दोन रोहिण्या मिळून एकूण चार रोहिण्यांमधून या ग्रंथीला रक्त पुरविले जाते.

अवटू ग्रंथीला दोन प्रकारांच्या तंत्रिका (मज्जातंतू) असतात : एक अनुकंपी व दुसरी प्राणेशा-तंत्रिका [à तंत्रिका तंत्र]. या दोन्ही तंत्रिकांचा परिणाम रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिण्यांचा आकार कमीजास्त करण्यावर होतो म्हणजे अवटू ग्रंथीतील कोशिकांवर (पेशींवर) त्या तंत्रिकांचे प्रत्यक्ष नियंत्रण नसून ते रक्तवाहिन्यांद्वारे अप्रत्यक्षपणे चालते.

उत्पत्ती : ग्रसनीची (घशाची) वाढ होत असताना तिच्या अंतःस्तरात उत्पन्न होणाऱ्या पहिल्या विदरापासून (खाचेपासून) अवटू ग्रंथी उत्पन्न होते. त्या विदराचे वरचे टोक जिभेच्या मागील भागापर्यंत असते विदराच्या खालच्या भागापासून अवटू ग्रंथीची उत्पत्ती होते. या दोन भागांच्या मधला भाग नळीसारखा असतो. त्याला ‘अवटू जिव्हा-वाहिनी’ असे नाव आहे. ही नळी पुढे बंद पडून नाहीशी होते पण क्वचित प्रसंगी ती नाहीशी न झाल्यास तिच्यापासूनच वर सांगितलेल्या उपग्रंथी उत्पन्न होतात. केव्हाकेव्हा या नळीपासून द्रवार्बुदही (कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण झालेली निरुपयोगी द्रवयुक्त गाठ म्हणजे अर्बुदही) होते. अवटू ग्रंथीतील विशिष्ट कोशिकांचे उत्पादन गर्भाच्या चौथ्या महिन्यापासून होते.

रचना : अवटू ग्रंथीची रचना विशिष्ट तर्‍हेची असते. ही ग्रंथी असंख्य पुटांची बनलेली असून पुटांत मध्यभागी आकाररहित असा श्लेष्माभ (दाट बुळबुळीत) पदार्थ असतो. या पदार्थाभोवती एककेंद्रीय कोशिकांचा एकच थर असतो. ज्या वेळी ग्रंथीचे कार्य जोराने चालू असते त्या वेळी या कोशिका घनाकार असून कार्य कमी असेल त्या वेळी त्या चपट्या असतात. प्रत्येक पुटाभोवती तंत्वात्मक आवरण असून त्या आवरणातून रक्तवाहिन्या पुटांना रक्ताचा पुरवठा करतात.

कार्य : अवटू ग्रंथीची महत्त्वाची कार्ये म्हणजे शरीराची योग्य प्रकारे वाढ करणे व चयापचयावर नियंत्रण ठेवणे ही होत. किशोरावस्था, ऋतुकाल किंवा गर्भिणी-अवस्था या वेळी अवटू ग्रंथीचा आकार मोठा झालेला दिसतो.

बेडूक, मासे वगैरे पृष्ठवंशीय प्राण्यांवर प्रयोग करून अवटू ग्रंथीबद्दलची पुष्कळच माहिती उपलब्ध झालेली आहे. बेडकाची भैकरावस्था (पिलाची वाढ होत असतानाची एक अवस्था) असतानाच अवटू ग्रंथी काढून टाकली तर बेडूक भैकरावस्थेतच राहतो प्रौढावस्थेपर्यंत येऊ शकत नाही. भैकरावस्थेत बेडकाला अवटू ग्रंथी खायला दिली तर त्याला प्रौढावस्था फार लवकर प्राप्त होते यावरून शरीराची वाढ होण्यामध्ये या ग्रंथीचे स्थान फार महत्त्वाचे आहे असे सिद्ध झालेले आहे. शरीराची वाढ पुरी झाल्यानंतर अवटू ग्रंथी काढून टाकल्यावर बेडूक मंद आणि अकार्यक्षम बनतो यावरून असे दिसते की, या ग्रंथीचा शारीरिक चयापचयावर फार परिणाम होत असला पाहिजे. ðपोष ग्रंथि, ðअधिवृक्क ग्रंथी यांचीही शारीरिक वाढीसाठी जरूरी असते. म्हणजे या तीन ग्रंथी एकमेकींच्या सहकार्याने शरीराच्या वाढीमध्ये फार महत्त्वाची कामगिरी बजावतात असे दिसते.

अवटू ग्रंथी ही एक अंतःस्रावी ग्रंथी आहे म्हणजे हिच्यामध्ये उत्पन्न होणारा स्राव नलिकेवाटे बाहेर न जाता एकदम रक्तात मिसळून रक्तमार्गाने सर्व शरीरात पसरतो व कोशिकांच्या चयापचयाचे नियंत्रण करतो. या ग्रंथीच्या स्रावामध्ये आयोडीन हा पदार्थ प्रामुख्याने दिसून येतो. अन्नातून घेतले जाणारे आयोडीन रक्तात शोषिले गेले म्हणजे ते रक्ताद्वारे अवटू ग्रंथीत जाऊन त्या ठिकाणच्या विशिष्ट यंत्रणेमुळे तेथेच शोषिले व साठविले जाते. शरीरात असलेल्या एकूण आयोडिनापैकी १/३ पेक्षा अधिक आयोडीन या अवघ्या ३०-३५ ग्रॅ. वजनाच्या अवटू ग्रंथीत सापडते. यावरून रक्तातील आयोडीन शोषून घेऊन साठविण्याची खास यंत्रणा अवटू ग्रंथीत असते असे दिसते. या यंत्रणेला ‘आयोडीन-पंजर’ असे म्हणतात. हे आयोडीन अवटू ग्रंथीमध्ये प्रथिनजन्य ॲमिनो अम्‍लांशी (प्रथिने तयार होण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्बनी अम्‍लांशी, à ॲमिनो अम्‍ले) संयोजित झालेले असते. अन्नातील प्रथिनातील टायरोसीन या ॲमिनो अम्‍लाचा आयोडिनाशी संयोग होऊन त्यापासून तयार झालेल्या संयुगाच्या स्वरूपात आयोडीन अवटू ग्रंथीत साठविले जाते. या संयुगाला ‘थायरोग्लोब्युलीन’ असे म्हणतात. अवटू ग्रंथीच्या पुटांत आकारविहीन असा जो श्लेष्माभ पदार्थ आढळतो तोच थायरोग्‍लोब्युलीन होय. शरीराला जसजशी जरूरी लागेल तसतसे या थायरोग्‍लोब्युलिनाचे रूपांत’थायरॉक्सिन’ या विद्राव्य (विरघळू शकणाऱ्या) पदार्थाच्या स्वरूपात होऊन ते रक्तामार्गे सर्व शरीरात पसरते. थायरॉक्सिनामध्ये आयोडिनाचे चार अणू असतात. शिवाय तीन आयोडीन अणू असलेले एक संयुगही अवटू ग्रंथीमध्ये थोड्या प्रमाणात उत्पन्न होऊन रक्तात मिसळते. हे संयुग थायरॉक्सिनापेक्षा अधिक प्रभावी असते. परंतु त्याच्या उत्पादनाचे प्रमाण फार अल्प असते. या संयुगाला ३, ५, ३-ट्रायआयडोथायरोनीन असे म्हणतात.

या दोन्ही पदार्थांची रासायनिक सूत्रे पुढीलप्रमाणे :

या दोन्ही अंतःस्रावी पदार्थांचा शरीरातील सर्व कोशिकांच्या चयापचयावर परिणाम होऊन त्या कोशिका जादा ऑक्सिजन वापरू लागतात. याचाच परिणाम म्हणून कोशिका-कार्य अधिक प्रभावी व सत्वर चालते.

वर वर्णन केलेल्या रासायनिक विक्रियेचे चार टप्पे दिसून येतात : (१) रक्तातील आयोडीन शोषून घेण्याची क्रिया—म्हणजे अवटू ग्रंथीचा आयोडीन-पंजर. (२) या आयोडिनाचे ð ऑक्सिडीभवन होते त्याकरिता पेरॉक्सिडेज एंझाइमाची (रासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणार्‍या प्रथिनयुक्त संयुगाची) मदत होते. (३) ऑक्सिडीभूत आयोडिनाचा टायरोसीन या ॲमिनो अम्‍लाशी संयोग होऊन त्याचे

आ. २. अवटू ग्रंथीचा आडवा छेद. (१) घनाकार कोशिका, (२) पुटांतील श्लेष्माभ पदार्थ.

रूपांतर ‘थायरोग्‍लोब्युलीन’ असे होत व त्या स्वरूपात ते अवटू ग्रंथीत साठविले जाते. (४) साठवून ठेविलेल्या थायरोग्‍लोब्युलिनाचे जरूरीप्रमाणे थायरॉक्सिनामध्ये रूपांतर होऊन ते रक्तामार्गे शरीरभर पसरते व चयापचयावर नियंत्रण करते.

अवटू ग्रंथीच्या या कार्यांवर दोन तऱ्हेचे नियंत्रण असते. रक्ताचा पुरवठा कमीजास्त झाल्यामुळे जे नियंत्रण होते त्याचा उल्लेख वर आलाच आहे. हे नियंत्रण विशेष प्रभावी नसते पण मस्तिष्काच्या (मेंदूच्या) तळाशी असलेल्या पोष ग्रंथीच्या पुढच्या भागात उत्पन्न होणार्‍या अंतःस्रावाचे अवटू ग्रंथीवर संपूर्ण नियंत्रण असते. या पोष ग्रंथीचे तीन भाग असतात. त्यांपैकी पुढच्या भागात

तयार होणाऱ्या एका प्रवर्तकाला (अंतःस्रावी ग्रंथीने रक्तात सोडलेल्या पदार्थाला म्हणजे हॉर्मोनाला, → हॉर्मोने) ‘अवटु-उद्दीपक प्रवर्तक’ असे नाव आहे. या अंतःस्रावी प्रवर्तकाचा अवटू ग्रंथीवर परिणाम होऊन त्या ग्रंथीची अंतःस्राव-उत्पादक शक्ती वाढलेली दिसते. प्रयोगान्ती असे सिद्ध झाले आहे की, अवटु-उद्दीपक प्रवर्तक रक्तात मिसळले म्हणजे अवटू ग्रंथीचा आकार वाढतो व त्या ग्रंथीत अंतःस्राव अधिक उत्पन्न होतो. अवटू ग्रंथीच्या अंतःस्रावाचा परिणाम पोष ग्रंथीवर होतो म्हणजे त्या दोन ग्रंथींच्या परस्परसहकार्याने थायरॉक्सिनाचे उत्पादन होऊन त्याने शारीरिक चयापचयाचे नियंत्रण होते. पोष ग्रंथीवर मस्तिष्कातील अधोथॅलॅमस (मोठ्या मेंदूच्या पुढच्या भागाच्या मध्यभागी असलेल्या थॅलॅमस नावाच्या करड्या रंगाच्या पदार्थाच्या खालच्या भागातील) केंद्राचे नियंत्रण असते. म्हणजे अवटू ग्रंथीवरही त्या केंद्राचे अप्रत्यक्ष नियंत्रण चालते. या सर्व गोष्टी वर दाखविलेल्या मांडणीवरून स्पष्ट होतील.

एखाद्या व्यक्तीवर मानसिक आघात झाला तर अधोथॅलॅमसाच्या मार्फत अवटू ग्रंथीचा स्राव जास्त होऊन कित्येक वेळा रोगोत्पत्ती होते. अवटू ग्रंथीचा अंतःस्राव अधिक झाला तर पोष ग्रंथीवर त्याचा परिणाम होऊन तेथे अवटु-उद्दीपक प्रवर्तकाच्या उत्पादनाचे प्रमाण कमी होते अशा रीतीने या दोन्ही अंतःस्रावी ग्रंथी परस्परसहकार्याने अंतःस्रवणाचे कार्य करतात.

अन्नातच आयोडीन कमी पडले तर अवटू ग्रंथीचे अंतःस्रवण कमी पडते त्यामुळे पोषग्रंथीमध्ये अवटु-उद्दीपक प्रवर्तक अधिक स्रवले जाऊन त्याचा परिणाम म्हणून अवटू ग्रंथीचा आकार वाढतो, परंतु अन्नातच पुरेसे आयोडीन नसल्यामुळे अवटू ग्रंथी मोठी असूनही तिच्यात पुरेसे थायरॉक्सिन उत्पन्न होऊ शकत नाही. त्यामुळे रोगलक्षणे दिसू लागतात.

अन्नातून शोषिल्या गेलेल्या आयोडिनापैकी काही आयोडीन रक्तातून लाला ग्रंथी आणि वृक्क (मूत्रपिंड) यांच्या स्रावातून रक्ताबाहेर पडते. परंतु लाला ग्रंथिस्रावातून बाहेर पडलेले आयोडीन आतड्यात पुनः शोषिले जाते. वृक्कातून बाहेर पडलेले आयोडीन मूत्रमार्गे शरीरातून बाहेर उत्सर्जित होते तसेच थोडेसे विष्ठेतूनही जाते.

पोष ग्रंथीप्रमाणेच अधिवृक्काच्या बाह्यकाचाही शरीराच्या वाढीशी निकटचा संबंध असतो म्हणजे पोष ग्रंथी, अधिवृक्क ग्रंथी आणि अवटू ग्रंथी या तीन अंतःस्रावी ग्रंथींचे मिळून शरीराच्या वाढीवर नियंत्रण असून या तिन्ही ग्रंथी एकमेकींवर अवलंबून असतात.

अवटू ग्रंथीच्या कार्याचे जे चार टप्पे वर वर्णिले आहेत, त्यांवर काही विशिष्ट औषधिद्रव्यांचा परिणाम होतो. त्यांपैकी महत्त्वाची द्रव्ये म्हणजे थायोसायनेट, गंधक असलेले थायोयूरिया आणि सल्फा औषधे ही होत. त्यांपैकी काही औषधांमुळे आयोडीन-पंजर विस्कटतो, तर काहींमुळे थायरॉक्सिन तयार होण्याच्या क्रियेत बिघाड होतो. म्हणून या औषधिद्रव्यांचा अवटू ग्रंथीच्या अंतःस्रावाधिक्य-विकारात उपयोग केला जातो.

शरीरातील चालू असलेल्या चयापचयाचे मापन करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. या पद्धतीने अवटू ग्रंथीच्या कार्याबद्दल पुष्कळ महत्त्वाची माहिती मिळते.  या पद्धतीत वापरण्यात येणाऱ्या परिमाणाला ‘मूल-चयापचयी परिमाण’ (शरीराच्या स्थायी अवस्थेमध्ये ऑक्सिजन आत घेण्याचे व उष्णता बाहेर टाकण्याचे परिमाण) असे म्हणतात. या पद्धतीत व्यक्तीला हलके अन्न घेतल्यानंतर १२ ते १४ तास अगदी स्वस्थ निजवून ठेवून तिच्या नाडीचे प्रमाण स्थिरावले म्हणजे श्वासाबरोबर शरीरात घेतल्या जाणाऱ्या ऑक्सिजनाचे मापन करतात. या आत घेतल्या जाणाऱ्या ऑक्सिजनाची तुलना प्राकृत (सर्वसाधारण) माणसाने आत घेतलेल्या ऑक्सिजनाशी करून ते प्रमाण कमीजास्त झाले आहे की काय हे पाहतात. अवटू ग्रंथीचे कार्य मंद झाले असेल तर हे प्रमाण कमी दिसते आणि जर त्या ग्रंथीचे कार्य अधिक झाले असेल तर हे प्रमाण वाढलेले दिसते. या परीक्षेला अवटू ग्रंथीच्या विकारात फार महत्त्व आहे.

अवटू ग्रंथीचे विकार

(१) अवटू ग्रंथि-शोथ : शोथ म्हणजे दाहयुक्त सूज. हा विकार अगदी क्वचित दिसतो. त्याचे तीव्र आणि चिरकारी (दीर्घकालिक) असे प्रकार असून तो जंतुजन्य आहे. या विकारात ग्रंथी लाल, वेदनायुक्त आणि सुजलेली असते. ज्वर, अरुची वगैरे लक्षणे दिसतात. ग्रंथिस्राव अधिक झाल्यास हातापायास कंप, जलद नाडी, घाबरटपणा वगैरे लक्षणेही असतात. ज्या जंतुसंसर्गामुळे हा शोथ होतो त्यामुळे शरीरातील इतर इंद्रियांनाही शोथ आलेला दिसतो, म्हणजे हा रोग सार्वदेहिक रोगाचा एक भाग असतो. प्रतिजैव औषधांचा [ → प्रतिजैव पदार्थ] उपयोग केल्यास हा रोग बरा होतो.

(२) अवटू ग्रंथि-स्रावन्यूनत्व : हा विकार शरीराची पूर्ण वाढ होण्यापूर्वी म्हणजे गर्भावस्थेत किंवा बालपणी झाला, तर शारीरिक व मानसिक वाढ खुंटते. या स्थितीला ‘अवटुजन्य जडवामनता’ [ à क्रेटिनिझम] असे म्हणतात. असे स्रावन्यूनत्व शरीराची पूर्ण वाढ झाल्यानंतर उत्पन्न झाले, तर त्या विकाराला श्लेष्म-घन शोफ असे म्हणतात. पोष ग्रंथीत उत्पन्न होणारे ‘अवटू उद्दीपक प्रवर्तक’ कमी पडले अथवा इतर काही कारणांनी अवटु-अंतःस्राव कमी होऊ लागला तर हा विकार दिसतो.

या विकारात चेहर्‍यावरील रेघा व सुरकुत्या नाहीशा झाल्यामुळे चेहरा निर्विकार दिसतो. त्वचेचा वर्ण फिकट पांढरट दिसतो. त्वचा जाड, कोरडी आणि खरखरीत होऊन केस गळतात वा तुटतात. जीभ जाड होऊन बोलण्यात जडत्व आणि घोगरेपणा येतो. बुद्धिमांद्य आल्यामुळे बाह्य परिस्थितीचे लवकर आकलन होत नाही. सर्व शारीरिक क्रिया मंद चालून थंडी सोसवत नाही. स्रियांमध्ये या विकारामुळे ऋतुस्राव जास्त दिवस आणि अधिक प्रमाणात होतो. वारंवार सर्दी होऊन नाक वाहू लागते. बहिरेपणा, सांधेदुखी व अशक्तपणा येतो.

या विकाराचे निदान कठीण नाही परंतु रोगाच्या अगदी प्रारंभकाळी ते करण्यास अडचण पडते. अशा वेळी ‘मूल-चयापचयी-परिमाण’ मोजल्यास निश्चित निदान करणे सोपे होते. अवटू ग्रंथीचा अंतःस्राव म्हणजे थायरॉक्सिन दिल्याबरोबर लक्षणे कमी होऊ लागतात. थायरॉक्सिन आता कृत्रिम तर्‍हेने करण्यात यश आले असून ते स्फटिकरूपातही मिळू शकते. या कृत्रिम थायरॉक्सिनाची क्रिया नैसर्गिक थायरॉक्सिनासारखीच आहे हे सिद्ध झाले आहे. हे औषध देत असताना त्याची मात्रा  विशेष काळजीपूर्वक ठरवावी लागते जास्त मात्रा दिली गेल्यास औषधाचाच विपरीत परिणाम होतो.

या विकारात सर्वसाधरणपणे थायरॉक्सिन नेहमीच घेत राहावे लागते. प्रत्येक रोग्याच्या जरूरीप्रमाणे व विकाराच्या तीव्रतेप्रमाणे औषध कायम देत राहावे लागते.

(३)अत्यवटुत्व : (अवटुस्रावाचे आधिक्य). या विकाराचे अनेक प्रकार आहेत. एका प्रकारात डोळ्याची बुबुळे पुढे ढकलल्यासारखी झाल्यामुळे डोळे मोठे व वटारल्यासारखे दिसतात. हा प्रकार विशेष तीव्र असून त्यामध्ये पोष ग्रंथीचा विकारही संभवतो. यास ‘विषाक्त अवटुत्व’, ‘तुंगनेत्र अवटुत्व’ आणि ‘ग्रेव्ह, पॅरी व बासेडो यांचा विकार’ (ग्रेव्ह, पॅरी व बासेडो या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला) असेही म्हणतात. या विकारात अवटू ग्रंथी मोठी झालेली असते. ग्रंथीच्या आकारावर लक्षणांची तीव्रता अवलंबून नसते. यात बहुधा काही मानसिक आघात झाल्याचे पूर्ववृत्त मिळते. त्यावरून असा तर्क केला जातो की, त्या मानसिक आघाताचा परिणाम अधोथॅलॅमसावर होऊन त्यामुळे पोष ग्रंथी व अवटू ग्रंथी यांचा हा विकार होत असावा.

लक्षणे : अवटू ग्रंथी मोठी होते व तिच्या भोवतीच्या रक्तवाहिन्या विस्फारित झालेल्या दिसतात. डोळ्यांची बुबुळे फार पुढे आली असल्यामुळे पापण्या नीट मिटत नाहीत. त्यांची उघडझाप कमी झाल्यामुळे डोळ्यात फूल (व्रण) पडू शकते. डोळ्यांची बुबुळे आणि पापण्या यांची हालचाल सुसूत्र होत नाही. हातांना सूक्ष्म कंप असतो. रोगी घाबरल्यासारखा दिसतो. वसा आणि मांस झडल्यामुळे फार कृशता येते. घाम येणे, धाप लागणे, छातीत धडधडणे, अनियमित नाडी, कित्येक वेळा अतिजलद नाडी व इतर नाडीविकार आढळतात. रक्तदाबाच्या दोन अवस्थांमध्ये (म्हणजे हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी असणारा रक्तदाब आणि प्रसरणाच्या वेळेचा रक्तदाब यांमध्ये) फार अंतर पडते. स्त्रियांमध्ये ऋतुस्राव फार कमी व अनियमित होतो.

निदान व चिकित्सा : मूल-चयापचयी-परिमाण व डोळ्यामध्ये दिसणारी लक्षणे यांवरून निदान सुलभ होते. आयोडीन काही दिवस दिल्याने लक्षणे कमी पडतात. त्याच वेळी शस्त्रक्रिया करून अवटू ग्रंथीचा काही भाग काढून टाकतात अथवा त्या ग्रंथीला रक्त पुरविणाऱ्या रोहिण्यांपैकी काही रोहिण्या बांधून टाकून बंद करतात. या शस्त्रक्रियेने विकार कायमचा बरा होतो. अलीकडे निघालेल्या थायोयुरासिल वगैरे औषधांनी लक्षणे कमी पडतात. रेडियम-किरणांचा उपयोगही चांगला होतो. शस्त्रक्रियेच्या वेळी किंवा रेडियम-चिकित्सेत अवटू ग्रंथीत रुतून बसलेल्या परावटू ग्रंथींना अपाय होणार नाही अशी खबरदारी घ्यावी लागते.

अत्यवटुत्वाचे इतर काही प्रकार आहेत. त्यांमध्ये वर दिलेल्या डोळ्यांच्या विकाराखेरीज बाकीची सर्व लक्षणे वरीलप्रमाणेच असतात आणि त्यांची चिकित्साही तशीच परंतु सौम्य प्रमाणात असते.

(४) गलगंड : अवटू ग्रंथी मोठी झाली म्हणजे त्या विकाराला गलगंड असे म्हणतात. त्याचे अनेक प्रकार आहेत. त्यांपैकी सामान्य व ग्रंथिमय हे दोन महत्त्वाचे प्रकार होत [ → गलगंड].

(५) अवटु-कर्करोग : या कर्करोगाचे तीव्र आणि सौम्य असे प्रकार असूनदोहोंतही अंतःस्रावाधिक्याची लक्षणे दिसतात. या कर्क-प्रकारात प्रक्षेप (दुय्यम अर्बुदे) होण्याची प्रवृत्ती कमी असते. शक्य तितक्या लवकर शस्त्रक्रिया करून कर्कग्रस्त भाग अथवा सर्व ग्रंथीच काढून टाकावी लागते, ग्रस्त लसीका ग्रंथीही [ → लसीका तंत्र] काढून टाकतात. त्यानंतर रेडियम-चिकित्सा करावी लागते आणि अवटु-अंतःस्राव पुढे नेहमीच देत राहावे लागते. (चित्रपत्र ६१)

संदर्भ : 1. Bailey, H. Love, M. A. Short Practice of Surgery, London, 1962.

2. Best, C. H. Taylor, N. B. The Physiological Basis of Medical Practice, Baltimore, 1961.

3. Boyd, W. Textbook of Pathology, Philadelphia, 1961.

4. Rose, W. Carless A. Manual of Surgery,London, 1960.

ढमढेरे, वा. रा.


अवटू ग्रंथी : (१) उजवा खंड, (२) डावा खंड, (३) सेतू, (४) अवटू जिव्हा-वाहिनीचा उर्वरित भाग.