अवधान : अवधान म्हणजे कोणतेही कार्य करण्यासाठी प्राण्याने केलेली देह-मनाची सिद्धता होय. अवधानात जाणिवेचे केंद्रीकरण असते आणि इष्ट विषय जाणिवेच्या केंद्रस्थानी आणला जातो. बोधक्षेत्रात मुख्य आकृती कोणती आणि कोणची पार्श्वभूमी ठरेल, कोणती उद्दीपके मध्यवर्ती होतील आणि कोणती सीमावर्ती होतील, हे अवधानांमुळे ठरते. उदा., धावण्याच्या शर्यतीत भाग घेणार्यांचे लक्ष, धावण्याची सूचना केव्हा मिळते, इकडे केंद्रित झालेले असते. म्हणजे धावण्याची सूचना मध्यवर्ती होते व इतर बाबी सीमावर्ती किंवा गौण ठरतात.
अवधान आणि संवेदन या प्रक्रिया परस्परनिगडित असतात. अवधान म्हणजे संवेदनाची पूर्वतयारीच होय. तथापि अवधान जागृत झाले तरी संवेदनाची क्रिया पूर्ण होईलच, असे नाही. तसेच दोन व्यक्तींनी एकाच विषयाकडे अवधान दिले, तरी त्या दोघांचे संवेदन सारखेच असेल, असेही नाही. कारण प्राप्त होणाऱ्या इंद्रिय-वेदनांतून त्यांना कोणता अर्थ प्रतीत होईल, यावर त्यांच्या संवेदनाचे स्वरूप अवलंबून असते. शिवाय अवधान देणारी प्रत्येक व्यक्ती बोधक्षेत्रामधून इष्ट वेदनांची नित्य निवड करीत असते. उदा., बाजारात गेल्यानंतर मुलांचे अवधान दुकानातील खेळण्यांकडे चटकन वेधते, तर प्रौढांचे त्यांना हव्या असलेल्या वस्तूंकडे वेधते.
काही प्रायोगिक संशोधन : गेल्या शतकात, प्रयोगिक मानसशास्त्राच्या प्राथमिक अवस्थेच्या काळात, अवधानाचा अभ्यास मुख्यतः आत्मनिरीक्षणपद्धतीनेच करण्यात येत असे परंतु पुढे या शास्त्राची जसजशी प्रगती होऊ लागली तसतसे अवधानाबाबत नवे आणि सूक्ष्म संशोधन होऊ लागले. अवधानप्रक्रियेत पुढील क्रिया घडतात : (१) ज्ञानेंद्रियांचे अनुकूलन होते (२) एकंदर देहामनाचे अनुकूलन होते (३) संबंधित स्नायूंवर ताण पडतो आणि (४) वेदनांत तपशील आणि सुस्पष्टता प्रतीत होते. या क्रियांविषयी संशोधनात नवी माहिती ज्ञात झाली. उदा., अवधानाच्या वेळी डोळ्यांच्या हालचाली १५ ते २० टक्क्यांनी वाढतात एका ज्ञानेद्रियात अवधान भरले, की इतरही ज्ञानेंद्रिये अधिक कार्यप्रवण होतात. अवधानामध्ये सतत व्यत्यय येत राहिला, तर व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते असे नाही तथापि व्यक्तीला ठराविक कामासाठी अधिक शक्ती खर्च करावी लागते.
एच. डब्ल्यू. मॅगाउन आणि इतर काही संशोधकांना असे आढळून आले, की अवधानात मेंदूच्या अल्फा-लहरींचे निरोधन होते, तर अनवधानात ते होत नाही. आपण जेव्हा विचार करीत असतो किंवा एखाद्या उद्दीपकाकडे लक्ष देतो, तेव्हा मेंदूच्या विद्युत्लेखात अल्फा-लहरी निरोधित झाल्याचे दिसून येते. ए. ब्रोडालने असे सिद्ध केले आहे, की मेंदूच्या ‘जालिकाकार बंध’ –नामक विभागात होणारी प्रक्रिया ही जाणीव आणि जागृतावस्था यांना अत्यंत आवश्यक असते. या जालिकाकार बंधामध्ये विद्युत्प्रवाह सोडला, की मेंदूला जाग येते आणि त्याला तीव्र धक्का पोहोचला, की प्राणी दीर्घकाळ बेशुद्ध पडतो. संदेशवाहक नसांमधल्या काही लहरी या जालिकाकार बंधामध्ये प्रविष्ट झाल्या, की तेथून नव्या लहरी निघून मेंदूमध्ये चौफेर पसरतात आणि त्यांच्या योगे सगळ्या मेंदूला जागृतावस्था प्राप्त होते. त्याच-प्रमाणे वरून म्हणजेच ‘बाह्यक’ नावाच्या मेंदू-विभागातल्या लहरी जालिकाकार बंधामध्ये आल्या, की तेथून काही लहरी निघतात आणि त्या निरोधनात्मक अथवा निवडीच्या प्रक्रिया घडवून आणतात.
अवधानात मेंदूची सर्वस्वी स्वतंत्र अशी काही प्रक्रिया घडते काय? प्रत्यावर्तनीय आकृतीच्या अनुभूतीमध्ये, तसेच संमोहनावरील प्रयोगांमध्ये, असे दिसते, की अशी एखादी केंद्रीय प्रक्रिया घडत असली पाहिजे. स्मिथ आणि इतर काही संशोधकांनी केलेल्या प्रयोगांत एका रोग्याच्या शरीराचे स्नायू त्याच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊ न देता एका औषधाने बधिर केले. अशाही स्थितीत त्याचा मेंदू व्यवस्थित काम करीत होता आणि त्याचे डोळे व कान शाबूत होते. यावरून ‘मेंदूच्या अवधान विचारादी प्रक्रिया ह्या मेंदूतील केंद्रीय यंत्रणेमुळे चालू राहतात’ ह्या मतास पुष्टी मिळते. म्हणजे अवधानाची प्रक्रिया ही केवळ अस्नायवी स्वरूपाची असते आणि ती मेंदूच्या केंद्रीय यंत्रणेमुळे चालू राहते, असे म्हणता येईल. तथापि ही उपपत्ती निर्विवादपणे सिद्ध झालेली नाही आणि म्हणूनच वेदनेंद्रिय क्रियाशील असल्याशिवाय ही मेंदूची केंद्रीय यंत्रणा स्वतंत्रपणे कार्य करते असे निश्चितपणे म्हणता येत नाही.
अवलोकनाची कक्षा आणि अवधानाची चंचलता : एका वेळी जास्तीत जास्त किती गोष्टींचे अवलोकन करता येते? टेबलावर जर सहा-सात केळी अथवा पेन्सिली पडलेल्या असतील, तर त्यांची संख्या क्षणार्धाच्या दृष्टिक्षेपात बिनचूक सांगता येते. परंतु जर त्या वस्तूंची संख्या वाढविली, तर ती बिनचूक सांगता येत नाही. अवलोकनाची कक्षा अशी मर्यादित असते. सामान्यतः माणासाला एका वेळी एकाच गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते. तथापि ते अत्यंत चंचल असते. अवधानाची ही चंचलता जीवनोपयोगी असते. कारण आत्मरक्षणासाठी प्राण्याला परिसरातील असंख्य गोष्टींकडे लक्ष देणे जरूरीचे असते पण या असंख्य गोष्टी एकाच वेळी अवलोकनाच्या कक्षेत आणता येत नाहीत. त्यामुळे अवधान हे सारखे या गोष्टीकडून त्या गोष्टीकडे वळवावे लागते. यायोगे प्राण्याला परिसरातील सगळ्या गोष्टींशी संपर्क ठेवता येतो. जे एकसमयावच्छेदेकरून अवलोकनात आणता येत नाही, त्याकडे क्रमशः ध्यान देणे जरूरीचे असते.
अतिशय हुशार माणसे दोन किंवा तीन काम एकाच वेळी करताना दिसतात. विमान चालविणाऱ्या वैमानिकाला अनेक गोष्टींकडे सतत अवधान द्यावे लागते. सर्कसमध्ये आपल्या दोन हातांनी एकाच वेळी दोन भिन्न खेळ करून दाखविणारे खेळाडू असतात. आपण कधी कधी ‘अष्टावधानी’ आणि ‘शतावधानी’ व्यक्तींच्या कथा ऐकतो. या व्यक्तींच्या कार्यक्षमतेचे रहस्य असे, की त्यांचे अवधान मोठ्या चपळाईने एका कामाकडून दुसऱ्या कामाकडे, असे सारखे मागेपुढे धावत असते. तशात त्यांचे एखादे काम सवयीने इतके पक्के झालेले असते, की ते सहजगत्या यांत्रिक रीतीने त्यांच्या हातून घडत असते. त्या सरावाच्या कामकडे लक्ष देण्याची त्यांना विशेष गरजच भासत नाही. कधी कधी त्यांच्या कामामध्ये एकप्रकारची सूत्र-बद्धता अथवा लय उत्पन्न झालेली असते. म्हणूनच पियानो अथवा हार्मोनियमवादकाला आपल्या दोन हातांच्या हालचाली एकाच वेळी आणि एकाच लयीत अगदी सहज करता येतात.
अवधानाची नियामके : अवधानाची नियामके बाह्य आणि आंतरिक अशी दोन प्रकारची आहेत. बाह्य नियमांपैकी प्रमुख म्हणजे उद्दीपकाचे स्वरूप, स्थान, तीव्रता, आकारमान, गतिपुनरावृत्ती, नावीन्य, बदल आणि विरोध ही होत. आंतरिक नियामकांत प्रवर्तना, हेतू, आवड, अभिरुची, अपेक्षा, परिचय, सवय, तात्कालिक गरज, मनःस्थिती ही महत्त्वाची होत. ज्या गोष्टीची आपणास गरज अथवा आवड असते तिच्याकडे आपले लक्ष चटकन वेधते. तसेच काही वेळा आपली इच्छा असो वा नसो, काही वस्तू आपले लक्ष वेधून घेतात. याला आपले अबोध हेतू कारण असतात. अवधानाच्या नियामकांसंबंधीची माहिती जाहिरात, वृत्तपत्र-व्यवसाय, चित्रपट, नभोवाणी इ. क्षेत्रात अत्यंत उपयोगी असते. अर्थात लक्ष वेधून घेणे आणि ते दीर्घकाळ खिळवून ठेवणे यांत फरक आहे. तीव्रता, नावीन्य आदी बाह्य नियामकांनी जरी त्वरित लक्ष वेधून घेता आले, तरी ते दीर्घ काळ टिकवून धरण्या-साठी व्यक्तीच्या आंतरिक हेतूंना आणि प्रेरणांना स्पर्श करणे जरूरीचे असते.
संदर्भ : Woodworth, R. S. Schlosberg, H. Experimental Psychology, New York, 1954.
काळे, श्री. वा.