अनुपस्थित मालकी : स्वतःच्या शेतजमिनीवर न राहता व जमिनीची मशागत न करता, शेतीच्या उत्पन्नातील वाटा मात्र जमिनीवरील मालकी हक्काने घेणाऱ्यांना ‘अनुपस्थित मालक’ असे संबोधतात. कूळ-कसणुकीच्या वाढीबरोबर अनुपस्थित मालकीचेही प्रमाण वाढत गेले. अनुपस्थित मालकाचा जमिनीशी प्रत्यक्ष संबंध रहात नाही, उत्पादन-वाढीसाठी जमिनीत सुधारणा करणे यांसारखे भांडवली खर्च तो टाळतो व प्रत्यक्ष शेती कसणाऱ्या जवळ पुरेसे भांडवल नसल्याने आणि कसणुकीसाठी जमीन आपल्याकडे राहीलच याची शाश्वती नसल्याने कूळ जमीन-सुधारणेबाबत उदासीन बनते. परिणामी शेती-सुधारणा अडून बसतात शिवाय अनुपस्थित मालक उत्तरोत्तर उत्पन्नातील मोठा वाटा मागत असल्यामुळे कसणाराचे नुकसान व शोषण होते.
राज्यक्रांतिपूर्व फ्रान्समध्ये अनुपस्थित मालकीच्या प्रथेवर खूप टीका झाली. भारतात एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतसुद्धा अनुपस्थित मालकी नष्ट करावी, असा विचार आग्रहाने मांडला गेला. स्वातंत्र्योत्तर काळात, आपल्या देशातील बहुतेक राज्यासरकारांनी ⇨भू-सुधारणांच्या योगे अनुपस्थित मालकी नष्ट करण्याचे कायदे केले आहेत
काही अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांनी –प्रामुख्याने ⇨व्हेब्लेनने –उद्योगधंद्यांच्या क्षेत्रातही अनुपस्थित मालकीची प्रवृत्ती (प्रत्यक्ष उद्योगधंद्यांच्या प्रक्रियांत भाग न घेता व्यापारी संघटना व वित्तसंस्थांचे जाळे यांच्यामार्फत उत्पादन व किंमतींवर प्रभाव गाजवणाऱ्यांचा नवा वर्ग) निर्माण झाल्याचे प्रथम दृष्टोत्पत्तीस आणले. व्हेब्लेनच्या मते अनुपस्थित मालकीच्या प्रथेतून अनेक सामाजिक, आर्थिक व नैतिक दुष्परिणाम उद्भवतात. औद्योगिक प्रक्रिया व धंद्याचे व्यवस्थापन ही कामे वेगवेगळी माणसे करू लागल्याने एका प्रदेशातील धनिक अन्य प्रदेशांच्या अर्थव्यवहारांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित करतात. मजुरांना योग्य मोबदला दिला न जाता त्यांचे शोषण होते व मालकांचा दैनंदिन व्यवहारांशी संबंध नसल्याने व्यवस्थापन पुरेसे कार्यक्षम रहात नाही.
विसाव्या शतकाच्या तिसऱ्या व चौथ्या दशकांत अमेरिकेतील शास्त्रज्ञांना असे आढळले, की आर्थिक क्षेत्रात व्यवस्थापकीय क्रांती होऊन उत्पादनसाधनांच्या मालकीत हिस्सा असणारांचा वर्ग संख्येने वाढत आहे. त्या सगळ्यांना धंद्याचे व्यवस्थापन चांगल्या रीतीने करणे जमत नाही. व्यवस्थापन हे विशेषीकृत क्षेत्र झाले आहे. त्यामुळे अनुपस्थित मालकीचे प्रमाण वाढत असूनही या विशेषीकृत व्यवस्थापन वर्गाच्या कर्तृत्वामुळे आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम होण्याचे टळले आहे.
सुराणा, पन्नालाल