नफा : रूढ अर्थाने उत्पादकाचे (किंवा व्यापाऱ्याचे) उत्पन्न आणि त्याचा खर्च यांमधील फरक. अर्थशास्त्रात मात्र नफा या संज्ञेला अनेक अर्थ प्राप्त झाले आहेत. एकोणिसाव्या शतकातील काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते नफा म्हणजे प्रवर्तकाला मिळणारा त्याच्या कामाचा मोबदला. काहींच्या मते त्याच्या खास प्रज्ञेला मिळणारे भाडे म्हणजेच नफा. इतरांच्या दृष्टीने त्याने धंद्यासाठी वापरलेल्या स्वतःच्या भांडवलावरील व्याज म्हणजे नफा होय. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी प्रवर्तक जो धोका पतकरतो, त्यासाठी त्याला मिळणारा मोबदला म्हणजे नफा होय असे मानले. त्यांचे म्हणणे ग्राह्य धरण्यात दोन अडचणी उद्‌भवतात. एकतर, धोका आणि निर्णयसत्ता यांची फारकत होऊ शकते. उदा., कंपनीचे भागधारक धोका पतकरतात परंतु निर्णयसत्ता किंवा व्यवस्थापन संचालकांकडे असते. दुसरी अडचण ही की, बऱ्याचशा धोक्यांचा अगाऊच अंदाज करता येतो व विमा पद्धतीने ते कमी किंवा नाहीसेही करता येतात. ॲल्फ्रेड मार्शलच्या मते नफा म्हणजे साहसाचे बक्षीस किंवा व्यवस्थापनाबद्दलची कमाई. या दृष्टीने पाहिल्यास नफा म्हणजे एक प्रकारच्या श्रमांचाच मोबदला किंवा वेतन होय, मार्क्सच्या तत्त्वप्रणालीत अर्थव्यवस्थेत श्रमिक व भांडवल हे दोनच उत्पादन-घटक आढळतात. भांडवलाचे मालक श्रमिकांना केवळ निर्वाह वेतन देतात व श्रमिकांचे उत्पादन विकून येणाऱ्या रकमेतील इतर सर्व मोबदला स्वतःकडे नफा म्हणून ठेवतात. थोडक्यात, भांडवलदार प्रवर्तक कामगारांचे शोषण करून स्वतः श्रीमंत होतात. अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जे. बी. क्लार्क याने नफ्याचे खरे स्वरूप म्हणजे तो परिवर्तनाचा परिपाक होय, असे प्रतिपादिले. त्याच्या मते स्थितिशील व पूर्ण स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत विक्री किंमत आणि उत्पादनखर्च यांच्यात समानता असते परंतु अर्थव्यवस्थेतील परिवर्तनामुळे ही समानता बिघडते आणि त्यामुळे किंमती खर्चापेक्षा अधिक राहून ‘खरा’ नफा उद्‌भवतो अथवा खर्च किंमतीपेक्षा जास्त होत राहून तोटा संभवतो. परिवर्तन हे नफ्याचे मूळ होय, हे क्लार्कचे म्हणणे एफ्. एच्. नाइट या दुसऱ्या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाला मान्य नाही. त्याच्या मते काही परिवर्तनांचा ती घडण्यापूर्वीच अंदाज करता येतो आणि तसे झाल्यास परिवर्तनांमुळे नफा उद्‌भवणार नाही. नाइटच्या म्हणण्याप्रमाणे अनिश्चितता हीच नफ्याच्या मुळाशी आहे. परिवर्तनामुळे नफा उद्‌भवत नसून परिवर्तनातील अनिश्चितपणामुळे नफ्याचा उगम होतो, असे नाइटचे प्रतिपादन आहे. याचाच अर्थ नफा केवळ प्रवर्तकाच्या हालचालीतच असतो असे नाही, तर तो सर्व प्रकारच्या आर्थिक हालचालींमुळे संभवतो. केवळ प्रवर्तकालाच नाही, तर सर्वच उत्पादक-घटकांना नफा मिळू शकतो. जोपर्यंत भविष्यकाळाचे संपूर्ण ज्ञान होत नाही, तोपर्यंत नफ्याचे अस्तित्व टिकून राहणारच.

अर्थव्यवस्थेच्या पूर्ण स्पर्धात्मक समतोल परिस्थितीमध्ये शुद्ध नफा असू शकत नाही कारण त्या परिस्थितीत स्पर्धेमुळे जमीन, भांडवल व श्रमिक जेथे त्यांना सर्वांत जास्त मोबदला मिळेल तेथेच वापरले जातील. असे होऊनही नफा उद्‌भवला, तर त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन किंमती घसरतील व परिणामी नफा नाहीसा होईल परंतु सत्यसृष्टी पूर्ण स्पर्धात्मक असतेच असे नाही आणि म्हणून नफा अनेक कारणांमुळे सत्यसृष्टीत अस्तित्वात येऊ शकतो. एकतर, नवप्रवर्तक जेव्हा एखादे नवे उत्पादन-तंत्र अंमलात आणतो, तेव्हा सुरुवातीस त्याला प्रवर्तकीय नफा मिळू शकतो आणि म्हणूनच नफा हे तांत्रिक विकासाचे एक प्रोत्साहन बनते. शिवाय, उपभोक्त्यांच्या रुचींमध्ये बदल झाल्यास त्या रुचींचे समाधान करू शकणाऱ्या उद्योगसंस्थांचे उत्पन्न खर्चापेक्षा बरेच वाढून त्यांना अनपेक्षित लाभ होतो. त्याचप्रमाणे निर्मित वस्तूंच्या किंमती उतरून त्या उत्पादनखर्चाच्या पातळीवर येऊ नयेत, म्हणून एखाद्या उद्योगसंस्थेने आपले उत्पादन मर्यादित केल्यास तिला मक्तेदारी नफाही मिळू शकतो.

अर्थव्यवस्थेतील उत्पादक-घटकांना प्रवर्तक करारानुसार मोबदला देतात. त्यांना आपणास किती मोबदला मिळणार हे आधीच माहीत असते परंतु त्यांना कराराप्रमाणे मोबदला दिल्यानंतर म्हणजेच उत्पादन खर्च वजा जाता उरणारी शिल्लक प्रवर्तकाचा नफा असतो. प्रवर्तकाने एखाद्या धंद्यात टिकून राहावे म्हणून त्याला काही किमान नफा मिळालाच पाहिजे. हा नफा म्हणजे त्याच्या स्वतःच्या भांडवलाबद्दल आणि प्रवर्तन श्रमाबद्दल त्याला मिळणारा मोबदला होय. या अपेक्षित नफ्यास प्रसामान्य (नॉर्मल) नफा म्हणतात. पूर्ण स्पर्धात्मक स्थितिशील अर्थव्यवस्थेत याखेरीज अन्य नफा टिकून राहू शकत नाही कारण नफा हा गतिमान समाजातच उद्‍भवतो. अशा समाजात भविष्याविषयी अनिश्चितता असते आणि तिला तोंड देण्याचे कार्य केल्याबद्दल प्रवर्तकाला नफा होत असतो. निरनिराळ्या उद्योगांत अनिश्चिततेचे प्रमाण वेगवेगळे असल्याने नफ्याचे प्रमाणही वेगळे असते. आपल्या धंद्यावर होणाऱ्या अनिश्चिततेच्या परिणामांविषयी प्रवर्तक स्वतःशी काही अंदाज बांधून आपल्या कार्याविषयी हरतऱ्हेचे निर्णय घेत असतो. त्याचे अंदाज अचूक ठरले, तर त्याला नफा मिळतो ते चुकीचे ठरले, तर त्याला तोटा होऊन व्यवसाय बंद करण्याची त्याच्यावर पाळी येते. म्हणूनच सर्व प्रकारच्या नफ्याची उत्पत्ती अनिश्चिततेपासून होते, असे नाइटचे म्हणणे आहे मग ती अनिश्चितता बाजार संरचनेसंबंधी असो वा शासकीय धोरणाविषयी किंवा नवप्रवर्तनाच्या यशासंबंधी असो. अशा अनिश्चित परिस्थितीत यशस्वी रीत्या निर्णय घेणाऱ्या प्रवर्तकास मिळणारा मोबदला म्हणजेच नफा होय.

वरील विवेचनावरून निर्णय घेणाऱ्या प्रवर्तकास मोबदला मिळवून देण्याचे कार्य नफ्याचे आहे, हे उघड होते. याचाच अर्थ नफा हा उत्पादनाचा आधारस्तंभ आहे. नफ्याचे आणखीही एक दुय्यम कार्य आहे. ते म्हणजे, भांडवली विनियोगामध्ये वाढ करण्यासाठी लागणारी रक्कम नफ्यामधून मिळू शकते. अशा रीतीने आर्थिक विकासास मदत करण्याचे एक साधन म्हणूनही नफ्याचा उपयोग होऊ शकतो. मोठमोठ्या कंपन्या प्रतिवर्षी होणाऱ्या त्यांच्या नफ्यातून काही रकमा बाजूला काढून ठेवतात व त्यांचा उपयोग भांडवली विनियोगाचा विस्तार करून उत्पादनाचे परिमाण वाढविण्यासाठी करीत असतात. नफ्याचे तिसरे कार्य म्हणजे प्रवर्तकांना भांडवली विनियोगाची दिशा दाखविणे. भांडवलदारी अर्थव्यवस्थेमध्ये उपभोग्य व भांडवली वस्तूच्या उत्पादनासंबंधीचे निर्णय नफ्यावरच अवलंबून असतात. ज्या उद्योगांत नफा कमी, त्यांमध्ये भांडवलविनियोग कमी असल्याने उत्पादनही कमीच असते. उलट ज्या धंद्यात नफ्याचे प्रमाण अधिक, तिकडे भांडवलाचा ओघ आकर्षिला जातो.

नफा हा उत्पन्न मिळविण्याचा एक मार्ग असला, तरी तो इतर प्रकारच्या उत्पन्नांहून वेगळा आहे. एकतर, इतर उत्पादक घटकांना मिळणारे उत्पन्न (उदा., भाडे, वेतन, व्याज) कधीही अभावरूप (निगेटिव्ह) असू शकत नाही. तसे नफ्याचे नाही कारण प्रतिवर्षी कित्येक उद्योगसंस्थांना नफा होत नाही किंवा तोटा होतो. दुसरे म्हणजे नफ्याच्या प्रमाणात इतर उत्पन्नांच्या प्रमाणापेक्षा कितीतरी चढउतार होत असतात. विशेषतः व्यापारचक्राच्या तेजीमंदीच्या काळांमध्ये वेतनदर, व्याजाचे दर किंवा भाडे यांच्यामध्ये फारसे बदल आढळत नाहीत परंतु नफ्यात मात्र प्रकर्षाने बदल जाणवतो. शिवाय इतर उत्पन्नांप्रमाणे नफा हा पूर्वनिश्चित नसून शिलकी स्वरूपाचा असल्याने सतत बदलणारा व अनिश्चित असतो.

नफ्याचा आणि आर्थिक विकासाचा जवळचा संबंध आहे. एखादी उद्योगसंस्था यशस्वी नवप्रवर्तनाने विकासास मदत करू शकते. नवप्रवर्तन यशस्वी झाल्यास प्रवर्तकाला नफा मिळतो व त्याचा उपयोग अधिक विकासासाठी करता येतो. अशा रीतीने नफ्याच्या अपेक्षेने प्रवर्तक नवप्रवर्तनाचा प्रयत्न करतात व त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून आर्थिक विकास शक्य होतो.

संदर्भ : Cairncross, A. Introduction to Economics, London, 1960.

धोंगडे, ए. रा.