अनुकरण : अनुकरण म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या वा उद्दीपकाच्या वर्तनाची केलेली नक्कल अथवा प्रतिकृती होय. अनुकरणकर्ता हा अनुकरणीय व्यक्तीच्या वा उद्दीपकाच्या वर्तनासमान क्रिया करतो. अर्थात अनुकरण हे कधी सहेतुक घडते, तर कधी अभावितपणे घडते. ज्या प्रक्रियेत उद्दीपकाशी समान असे वर्तन दिसून येईल, तिला ‘अनुकरण’ ही संज्ञा लावता येईल.

कोंबडी पळू लागली की तिची पिल्लेही पळू लागतात. इतर माणसे हसू लागली की आपणासही हसू येते. जेव्हा एक व्यक्ती दुसरीचे अनुकरण करते तेव्हा त्या दोहोंच्या वर्तनात समानता येते, हे उघड आहे. परंतु ‘वर्तनातील साम्य’ आणि ‘वर्तनाचे अनुकरण’ या दोन संकल्पनांत भेद करणे जरूरीचे आहे. वर्तनाची समानता ही नेहमी अनुकरणमूलकच असते असे नाही. उदा., नाट्यमंदिरात तिसरी घंटा वाजली, की सगळे प्रेक्षक आपसातली बोलणी थांबवून रंगमंचाकडे नजरा वळवितात हे अनुकरणापायी घडते, असे म्हणता येणार नाही. उद्दीपक प्रसंग सारखाच असेल, तर व्यक्तींच्या प्रतिक्रियाही सारख्याच होतात.

अनुकरण-संकल्पनेचे ऐतिहासिक महत्त्व : गेल्या शतकाच्या अखेरीस जेव्हा सामाजिक मानसशास्त्र आकारास येत होते, तेव्हा ‘अनुकरण’ या संकल्पनेस अमाप महत्त्व प्राप्त झाले होते. बॅजट, तार्द, रॉस, बॉल्डविन, मीड आदी सामाजिक विचारवंतांना अनुकरणाच्या प्रक्रियेतच समग्र सामाजिक जीवनाचे मर्म साठविलेले आहे, असे वाटत असे. त्यांच्या मते, मानवी समाजातल्या रूढी, लोकाचार, सांस्कृतिक परंपरा आदींच्या मुळाशी अनुकरण हीच प्रक्रिया असते.

गाब्रीएल तार्दने तर असेही म्हटले, की ‘पुनरावर्तन’ हे एक वैश्विक तत्त्व आहे व अनुकरण म्हणजे त्या विश्वव्यापी तत्त्वाचाच एक आविष्कार आहे. त्याच्या मते, समाजजीवन म्हणजे अनुकरणच होय. त्याने अनुकरणाचे पुढीलप्रमाणे नियमही बसवले : (१) बहुधा समाजाच्या वरच्या पातळीवरच्यांचे अनुकरण खालच्या पातळीवरचे लोक करतात. (२) अनुकरण हे नेहमी प्रथम आंतरिक गोष्टींचे (विचारप्रणाली, मते इत्यादींचे) होते व मग बाह्य गोष्टींचे (वर्तनप्रकारांचे) होत असते. (३) अनुकरणाचा फैलाव समाजात भूमिती-श्रेणीने होत असतो. (४) विचारप्रणालीपेक्षा आचारप्रणाली समाजात दीर्घकाळ टिकून राहतात.+

सामाजिक जीवनात माणसे एकमेकांचे पुष्कळदा अनुकरण करतात, ही वस्तुस्थिती आहे. परंतु अनुकरण ही संकल्पना वर्णनात्मक आहे, स्पष्टीकरणात्मक नाही कारण एक व्यक्ती दुसरीचे अनुकरण का करते? केव्हा करते? किती प्रमाणात करते? या प्रश्नांची उत्तरे केवळ ‘अनुकरण’ ह्या संकल्पनेद्वारा मिळत नाहीत.

अनुकरणामागील प्रेरणा : आपण इतरांचे नेहमीच व प्रत्येक बाबतीत अनुकरण करतो, असे नाही. रेल्वेत अथवा मोटारीत इतर प्रवासी भांडू लागले, की त्या भांडणात आपण सामील होतोच, असे नाही. ज्या क्रियांना आपल्या प्रयोजनांच्या दृष्टीने काही ना काही अर्थ असतो, त्याच क्रियांचे आपण अनुकरण करतो. भोवतालची माणसे संकटकाळी पळू लागली व आपल्यावरही ते संकट आहे असे आपणास वाटले, म्हणजे आपण पळू लागतो केवळ अनुकरणासाठी अनुकरण, असा प्रकार होत नाही. अनुकरण ही काही उपजत व अनिवार्य सहजप्रवृत्ती नव्हे. जैव किंवा मानसिक प्रयोजनपूर्तीशी अनुकरण संबंधित असते.

मुले मोठी होऊ लागली, की आईवडिलांचा तसेच परिसरातील विविध जेष्ठ व्यक्तींचा आदर्श स्वीकारून त्यांचे अनुकरण करतात. प्रौढ माणसेदेखील स्वतः थोरामोठ्या व्यक्तींच्या जीवनाचे आदर्श अनुसरण्याचा प्रयत्न करतात. कथाकादंबऱ्यांतल्या, काव्यनाटकांतल्या तसेच चित्रपटांतल्याही उदात्त वा अन्यथा आकर्षक व्यक्तींच्या वर्तनप्रकारांनीही कित्येक माणसे प्रभावित होतात व त्यांचे अनुकरण करू लागतात.

ॲल्बर्ट बँडुरा याच्या मते, अनुकरणप्रक्रिया म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला आलेले इष्ट अनुभव आत्मसात करण्याची अथवा परानुभवाद्वारे ज्ञान मिळविण्याची प्रक्रिया होय. ज्या गोष्टी शिकावयास इतरांना महत्प्रयास पडले किंवा धोके पतकरावे लागले, त्या गोष्टी त्यांच्या अनुकरणाद्वारे सहजासहजी, म्हणजे मूळच्या शिक्षणप्रक्रियेतले सायास आणि धोके टाळून, ग्रहण होत असतात.

मुलांच्या मानसिक विकासात अनुकरणाचे महत्त्व सांगताना जे. बॉल्डविन म्हणतो, की अनुकरण हा बालकांच्या मनोविकासाचा गाभाच आहे. त्याच्या मते, अनुकरणाचे अहेतुक व सहेतुक असे किमानपक्षी दोन प्रकार मानले पाहिजेत. या प्रक्रियेत ग्रहण, आत्मसातकरण व उत्क्षेपण अशा तीन अवस्था असतात. पहिल्या अवस्थेत बालक आदर्शाचे प्रतिमाग्रहण करीत असते तर दुसरीत ते आपल्या हालचाली, लकबी, वृत्ती इ. गोष्टी आत्मसात करीत असते आणि तिसरीत त्याला आपल्या आदर्शाची चांगलीच जाण आलेली असते. आदर्शरूप व्यक्तीच्या भावजीवनाची तसेच आपण तिच्यासारखे वागत असतो याचीही उमज बालकाला आलेली असते. याच अवस्थेत अनुकरणाद्वारे ‘इतरांचे’ आकलन बालकास होत असते.

बॉल्डविनने वर्णिलेल्या उत्क्षेपण अवस्थेला केंद्रस्थानी कल्पून जी. एच. मीडने सामाजिकीकरण सिद्धांत प्रसृत केला आहे. उत्क्षेपण अवस्थेच्या योगानेच आपण इतरांची भूमिका उमजू शकतो. इथे आपण केवळ अंधानुकरणच करीत असतो असे नव्हे तर त्या कृतीत आदर्शरूप व्यक्तीच्या भूमिकेची जाण आणि स्वतःचे निरीक्षण यांची गुंफणही होत असते. म्हणूनच करपल्लवी, नेत्रपल्लवी इ. संकेतांची देवाणघेवाण होऊ शकते. परिणामतः दोन व्यक्तींमध्ये सुसंवाद निर्माण होतो. पुढे अधिक विकास होत जाऊन प्राथमिक स्वरूपाच्या पल्लवींच्या ऐवजी अर्थगर्भ शब्दांची योजना होऊ लागते.

अनुकरणासंबंधी काही उपपत्ती : अनुकरणाच्या प्रक्रियेचे मानसशास्त्रज्ञांनी विविध प्रकारे स्पष्टीकरण केलेले आहे :

(१) बॅजट, तार्द बॉल्डविन, रॉस, जेम्स, मॅक्डूगल आदी मानसशास्त्रज्ञांच्या मते अनुकरण करणे ही मानव प्राण्यातील एक जन्मजात सहजप्रेरणा आहे.

(२) शारीरिक हालचाल कल्पनाप्रेरित असते, ह्या प्राचीन सिद्धांताच्या आधारे सी.एच्. कूलीसारखे विचारवंत म्हणतात, की दुसरा माणूस करीत असलेल्या क्रियेची स्पष्ट कल्पना आपल्या मनात ठसली, की ती कल्पना आपोआपच आपल्या वर्तनात प्रकट होते.

(३) एफ्. एच्. ऑल्पोर्टसारखे वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ अनुकरणप्रक्रियेचे स्वरूप अवलंबीकरणाच्या (अभिसंधानाच्या)तत्त्वानुसार विशद करतात. ई.बी. व्होल्टचे प्रतिपादन असे आहे, की प्रतिध्वनीच्या तत्त्वानुसार एका माणसाच्या वर्तनाचे पडसाद इतरांच्या वर्तनात अपरिहार्यपणे उमटतात.

(४) अलीकडील वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ ‘साधनात्मक अवलंबीकरण’ सिद्धांताचा आश्रय घेऊन म्हणतात, की अनुकरणाच्या प्रक्रियेत परितोषिक आणि समाधान यांचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

(५) व्यूहवादी मानसशास्त्रज्ञांच्या मते, व्यक्तीच्या असे ध्यानात येते, की या कृतीचा आपल्या उद्दिष्टांशी साधन म्हणून उपयोग शक्य आहे, तेव्हा चट्‌दशी ती त्या कृतीचे अनुकरण करावयास प्रवृत्त होते.

(६) सिग्मंड फ्रॉइड आणि अन्य मनोविश्लेषकांच्या मते, बालकाचे मातापित्यांशी भावनिक तादात्म्य अथवा एकात्मता होते आणि त्यामुळे ते त्यांच्या वर्तनाचे व नैतिक आदर्शांचे अनुकरण करते.

(७) जी.डब्ल्यू. ऑल्पोर्टच्या मते, अनुकरणाच्या प्रक्रियेत मुख्यतः ⇨समानुभूती अनुस्यूत असते.

यांतील काही उपपत्ती कालबाह्य ठरलेल्या असून इतरांत तात्त्विक वैगुण्ये दाखविता येण्यासारखी आहेत.

वरील विवेचनावरून हे स्पष्ट होईल, की अनुकरणप्रक्रियेसंबंधी एकवाक्यता होणे सध्या तरी दुरापास्त आहे. पण जसजसे तिच्याविषयीचे ज्ञान अधिक स्पष्ट होत जाईल तसतशा या उत्पत्तीही जवळ येत जातील, अशी शक्यता आहे.

संदर्भ : 1. McDougall, W. Introduction to Social Psychology, Methuen, 1956.

          2. Miller, N.E. Dollard, J. Social Learning and Imitation, New Haven, 1941.

कुलकर्णी, वा. मा.