अनाम : अतिपूर्वेकडील ऐतिहासिक राज्य. हल्ली याचा काही भाग उत्तर व्हिएटनाममध्ये असून बराचसा भाग दक्षिण व्हिएटनाममध्ये मोडतो. उत्तरेकडे टाँकिनचे आखात, पश्चिमेकडे सध्याचे लाओस व ख्मेर प्रजासत्ताक (कंबोडिया), नैर्ऋत्येकडे कोचीन चायना (सध्याचे दक्षिण व्हिएटनाम) आणि आग्नेयीस व पूर्वेस चिनी समुद्र या सीमांनी वेढलेल्या अनामचे क्षेत्रफळ सु. ९३,००० चौ.किमी. होते.
एकोणीसशे चोपन्नपर्यंत स्वतंत्र अस्तित्व असलेल्या अनामचा इतिहास भारतीयांच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. इ.स.पू. दुसऱ्या शतकापासून सु. पंधराव्या शतकापर्यंत अनाममध्ये हिंदूंची सत्ता होती. येथील चंपा या हिंदूंच्या राज्याचा संस्थापक श्री-मार हा असावा. चंपापूर ही त्याची राजधानी होती.श्री-मारनंतर भद्रवर्मन् राजा झाला असावा. चौथ्या शतकातील एका संस्कृत शिलालेखात याचा उल्लेख मिळतो. भद्रवर्मनच्या कारकीर्दीत चंपांची खूपच भरभराट झाली होती. उत्तरेकडून चीनचे हल्ले चंपावर नेहमीच होत असत. बराच काळ चंपाचे राज्य चीनच्या साम्राज्याचे मांडलिक म्हणून राहिले. चंपाच्या उत्तरेकडील अनामी लोकांनी चीनविरुद्ध १४२८त बंड पुकारून स्वातंत्र्य मिळविले व चीनच्याच साह्याने १४७२ मध्ये त्यांनी चंपाचा पराभव केला. सोळाव्या शतकात अनामच्या राजघराण्याचे दोन विभाग होऊन एक हानोई येथून व दुसरा राजवंश ह्यूए येथून राज्य करू लागला. अठराव्या शतकात फ्रेंचांनी येथे प्रवेश केला व त्यांनी १८८४ मध्ये अनामला फ्रान्सचे संरक्षित राष्ट्र बनविले. १८८७ मध्ये फ्रेचांच्या इंडोचायना संघराज्याचा तो एक भाग झाला. दुसऱ्या महायुद्धात हे काही काळ जपानच्या ताब्यात होते. युद्धानंतर ते व्हिएटनामचा भाग बनले.
पहा : बृहत् भारत व्हिएटनाम.
जोशी, चंद्रहास