अशिष्ट प्रयोग: कोणत्याही भाषेचे स्वरूप सर्वत्र पूर्णपणे सारखे नसते. त्यात प्रादेशिक, व्यावसायिक, वार्गिक, जातीय इ. अनेक प्रकारचे भेद असतात. हे भेद परंपरागत व स्वाभाविक असतात आणि त्यांच्या विशिष्ट विनिमयक्षेत्रात पाळले जातात. याशिवाय ग्रंथलेखनात, सभासंमेलनात, व्याख्यान देताना एक मान्य रूपाचा प्रयोग करण्याची प्रथा आहे. या रूपाला ‘प्रमाण भाषा’ किंवा ‘शिष्टसंमत भाषा’ म्हणतात.

 नित्य वापरामुळे प्रमाणभाषेतील काही प्रयोग रसहीन वाटतात. त्यांच्या जागी परिणामकारक असे दुसरे प्रयोग करण्याकडे काही कल्पक व्यक्तींची प्रवृत्ती असते. हे प्रयोग जुन्या शब्दांना नवे अर्थ देऊन किंवा पूर्णपणे नवे शब्द बनवून साधण्यात येतात आणि हे करताना व्याकरण, शिष्टसंमती इत्यादींकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे परंपरानिष्ठेला धक्का बसतो आणि जरी मर्यादित वर्तुळात ते लोकांच्या तोंडी असले, तरी जाहीरपणे बोलताना किंवा लिहिताना ते टाळण्यात येतात.

अशा प्रयोगनिर्मितीमध्ये दुसरेही एक कारण आहे. ते म्हणजे इतर लोकांना आपले म्हणणे ऐकू गेले, तरी त्यांना पूर्णपणे कळू नये असे वाटण्याचे. शिक्षकांबद्दल किंवा मुलींबद्दल बोलताना विद्यार्थी, पोलिसांसमोर बोलताना कैदी, आजूबाजूला इतर लोक आहेत याची जाणीव ठेवून बोलणारे कटवाले किंवा गुप्त हेर यांनाही स्वतःची परिभाषा बनवावी लागते.

शिवाय काही सांस्कृतिक कारणेही याच्यामागे असू शकतात. बाप, नवरा इ. शब्द वापरणे कित्येकदा अशिष्ट समजले जाते. अशा ठिकाणी शिष्टभाषा सूचक प्रयोग करते.

अशिष्ट प्रयोग अश्लील किंवा असभ्य असतात असे नाही. त्यांतील काही कालांतराने शिष्ट भाषेत येतात, काही कनिष्ठ वर्गातून वरिष्ठ वर्गापर्यंत पोचतात, काही नाहीसे होतात.

नव्या वा अपरिचित जीवनदर्शी लेखनात असे प्रयोग फार मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यातले काही सुसह्य झाले आहेत, तर काही रूढ होऊ घातले आहेत, असे आपल्याला दिसते. अशिष्ट प्रयोगांबद्दल वर केलेले विवेचन पुढील उदाहरणांनी अधिक स्पष्ट होईल. भिक्षुकवर्गात ‘पुख्खा झोडणे’ (मिष्टान्नावर ताव मारणे) यासारखा भाषाप्रयोग केला जातो. मुलांच्या जगात ‘चमनगोटा’ (डोक्याचे संपूर्ण केस काढून टाकणे), ‘ढ’ (अत्यंत निर्बुद्ध मुलगा), ‘बोऱ्या वाजणे’(फजित होणे) यांसारखे खास भाषाप्रयोग केले जातात. शाळेला किंवा कामाला ‘बुट्टी मारणे’ किंवा ‘दांडी मारणे’ यांसारखा प्रयोग तर सर्वत्र आढळतो. ‘चमचेगिरी’ किंवा ‘चमचा’ (पुढेपुढे करणारा किंवा चुगलीचहाडी करणारा) हे अशिष्ट शब्द आजच्या शिष्ट समाजाच्या प्रवृत्तीवर केलेले जणू भाष्यच वाटतात. मराठीतील नवसाहित्यिकांनी  ‘भंकस’सारखा शब्द रूढ केला आहे. इंग्रजीतील ‘Condemn’ शब्दावरून मराठीत ‘कंडम’ (उपयोगातून गेलेला किंवा टाकाऊ) असा अशुद्ध शब्दप्रयोग रूढ झाला आहे. इंग्रजी भाषेतील अशिष्ट प्रयोगांचे कोशसाहित्यही निर्माण झाल्याचे आढळते. इंग्रजीतील ‘ओ.के.’ हा शब्दप्रयोग अशिष्ट प्रयोगच होय.

कालेलकर, ना. गो.