शब्दकोश : एखाद्या भाषेतील वापरत असलेल्या तसेच वापरातून गेलेल्या अशा यच्चयावत शब्दांचा संग्रह, त्यांच्या अर्थासहित ज्यात केलेला असतो असा संदर्भग्रंथ. मुद्रित वाङ्‌मयातील शब्दांबरोबरच वाक्संप्रदाय, म्हणी यांचाही त्यांत अंतर्भाव होतो. शब्दांचा अर्थ समजावा आणि जिज्ञासूची शब्दशक्ती वाढावी, हा एक हेतू शब्दकोशरचनेमध्ये असतो. शब्दांच्या अर्थांचे संकेत निश्चित व स्थिर होण्याचे कार्य शब्दकोशामुळे साधते आणि त्यायोगे भाषिक व्यवहार सुलभतेने होऊ शकतात.

जेव्हा मानवी व्यवहार वाढू लागतात, तेव्हा भाषाही वाढू लागते आणि भाषेतील शब्दांचा संग्रह, परिगणना व व्यवस्थापन यांची गरज निर्माण होते. या गरजेतून शब्दकोशाची निर्मिती होते. त्यातील शब्द एका निश्चित क्रमाने –सामान्यतः  वर्णानुक्रमानुसार – ग्रंथित केलेले असतात. शब्दकोश सुधारण्याची, तसेच नवा शब्दकोश तयार करण्याची गरज निर्माण होते. भाषेची प्रवाही प्रकृती आणि परस्परसंवादासाठी तिच्या स्थिरीकरणाची अपेक्षा, या द्वंद्वातून शब्दकोशाचा विकास होत राहतो.

मूळ शब्द व त्याचा अर्थ हे शब्दकोशाचे मुख्य दोन घटक. शब्दकोशामध्ये सामान्यतः शब्द, त्याची व्युत्पत्ती, व्याकरण, त्याची प्रत्ययोपसर्गघटित – रूपे, साधित शब्द, त्याचा अर्थ (असल्यास भिन्नभिन्न अर्थ), अर्थदर्शक उदाहरण, शब्दाच्या अर्थघटनेच्या ऐतिहासिक विकासाचे दिग्दर्शन एवढे घटक असतात. त्यात कधी चित्रेही असतात, तसेच त्याचा उच्चार देण्याकडेही आता प्रवृत्ती होऊ लागली आहे. शब्दकोशामध्ये शब्दाला प्रतिशब्द, तसेच इष्ट तेथे अर्थाचे अधिक विशदीकरण दिलेले असते. प्रत्येक शब्दकोशात हे सर्वच घटक असतील, असे नव्हे. कोशाच्या उद्दिष्टानुसार यांपैकी कमी-जास्त घटक त्याच्यात असतात.

शब्दकोशाची गरज स्थूलपणाने दोन प्रकारची असते. एक स्वभाषकांना आपल्या भाषेतील अर्थ तसेच त्याच्या विविध छटा समजण्यासाठी आणि परस्परसंवादासाठी. दुसरी गरज, परभाषकांना भाषा शिकण्यासाठी. यांनुसार शब्दकोशाचे मुख्यतः दोन वर्ग होतात. एक म्हणजे एकभाषिक शब्दकोश. यात भाषेतील शब्दांचे त्या भाषेतच अर्थ दिलेले असतात. उदा., मराठी –मराठी शब्दकोश. दुसरा वर्ग द्विभाषी कोशांचा. एका भाषेतील शब्दांचे दुसऱ्या भाषेत अर्थ दिलेले असतात. उदा., मराठी –इंग्रजी किंवा इंग्रजी –मराठी शब्दकोश, मराठी –सिंधी शब्दकोश. अनेकभाषी शब्दकोशही असतात. उदा., मराठी –हिंदी – इंग्रजी शब्दकोश.

शब्दकोशाचे आणखी एक वर्गीकरण संभवते. ते म्हणजे सर्वसमावेशक किंवा बृहद-शब्दकोश आणि विशिष्ट शाखीय शब्दकोश. दुसऱ्या प्रकारामध्ये आणखी अनेक उपप्रकार संभवतात. विविध ज्ञानशाखीय शब्दकोश, व्यवसायानुसारी शब्दकोश, परिभाषिक शब्दकोश इत्यादी. स्थूलमानाने शब्दकोशाचे पुढील भेद दाखविता येतात : (१) सर्वसमावेशक किंवा बृहद-शब्दकोश. यात तत्त्वतः आणि सामान्यतः भाषेतील वापरातील किंवा नष्टप्राय अशा यच्चयावत शब्दांचा संग्रह केलेला असतो. अशा शब्दकोशाला मर्यादा असते, ती व्यावहारिक स्वरूपाची. (२) विशिष्ट भाषाभेदांचे शब्दकोश, उदा., ग्रामीण, प्रादेशिक, व्यावसायिक, मुलांचे स्त्रीविशिष्ट, बोली-उपभाषांचे, अशिष्ट शब्दांचे इ. (३) मर्यादित उद्दिष्टाने तयार केलेले शब्दकोश : उदा., शालेय शब्दकोश किंवा सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने नित्योपयोगी असे सुटसुटीत, आटोपशीर शब्दकोश. (४) समानार्थी, किंवा विरूद्धार्थी शब्द देणारे कोश. (५) एकेका ग्रंथातील शब्दांचा अर्थासह केलेला संग्रह. उदा., ज्ञानेश्वरीचा शब्दकोश, बा. भ. बोरकरांच्या भावीण कादंबरीला जोडलेला गोमंतकी शब्दाचा कोश. (६) व्युत्पत्तिकोश, यात शब्दाची व्युत्पत्ती स्पष्ट केलेली असते. शब्दाच्या अर्थाच्या इतिहासक्रमातील बदल, त्याचा विकासक्रम आणि वर्तमानकाळातील अर्थ इ. माहिती यात आढळते. (७) परिभाषा कोश. वेगवेगळ्या ज्ञानशाखांतील संज्ञा, परिभाषा यांचा अर्थ अशा कोशात असतो. उदा., मानसशास्त्रीय परिभाषा कोश, साहित्यसमीक्षा परिभाषा कोश. (८) उच्चारकोश : यात प्रत्येक शब्दाचा (नेहमी वापरल्या जाणाऱ्या  विशेष नामाचाही) उच्चार दिलेला असतो उदा., डॅन्यल जोन्स यंचे इंग्लिश प्रोनान्सिंग डिक्शनरी.

शब्दकोशरचना : उदगम व विकास : इंग्लंडमध्ये लॅटिन ही धर्मभाषा असताना धर्मग्रंथातील अवघड वा अप्रचलित शब्दांचे अर्थ उपलब्ध होतील, तसे ते ग्रंथात नोंदवून ठेवले जात. पुढे अशा अर्थटीपा वेगळ्या तयार करण्यात येऊ लागल्या. त्यांमध्ये शब्दकोशरचनेचे बीज दिसते. सर्वात प्राचीन उपलब्ध कोशरचना म्हणजे अपोलोनियस द सोफिस्ट याने तयार केलेली होमेरिक ग्लॉसरी (इ.स. ले शतक). मध्ययुगाच्या अखेरीला शब्दकोशाच्या विकासाला प्रारंभ झाला. १७५५ मधील डॉ. सॅम्युएल जॉंन्सन यांनी डिक्शनरी ऑफ दि इंग्लीश लँग्वेज’ हा शब्दकोशाच्या विकसतील पहिला महत्त्वाचा ट्प्पा. इंग्रजी भाषेचा हा पहिला अधिकृत शब्दकोश. शब्दांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी यात अवतरणे दिली होती, हा याचा एक नवा विशेष. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक शब्दकोश निर्माण झाले. १८२८ मधील वेब्स्टरचा अँन अमेरिकन डिक्शनरी ऑफ दि इंग्लिश लँग्वेज हा एक महत्त्वाचा शब्दकोश. यात पारिभाषिक तांत्रिक शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी किंवा न्यू इंग्लिश डिक्शनरी ऑन हिस्टॉरिकल प्रिंसिपल्स हा शब्दकोशरचनेच्या विकासातील पुढचा महत्त्वाचा टप्पा. याचा पहिला खंड १८८४ मध्ये आणि अखेरचा तेरावा खंड १९२८ मध्ये निघाला. यात पाच लाखांपेक्षा अधिक शब्द होते. व्यवहारामध्ये केव्हा ना केव्हा प्रचलित असलेल्या प्रत्येक शब्दाचा इतिहास सांगणे, त्याची अर्थनिश्चिती करणे, हे या कोशाचे ध्येय होते.

भारतीय कोशकल्पनेचा उगम : भारतीय कोशकल्पनेचा उगम निघंटूमध्ये दिसतो [→ निघंटु – २]. धातुपाठ, उदादिसूत्रे, गणपाठ व लिंगानुशासन अशा क्रमाने कोशाचे स्वरूप विकसित होत गेले. निघंटूमध्ये धातूंचाच विचार केलेला आहे, तर कोशामध्ये नामे व अव्यये यांचा समावेश आहे. वैदिक निघंटू हा वैदिक ऋचांच्या स्पष्टीकरणार्थ रचण्यात आला, तर कवींना काव्यरचनेला साह्यभूत व्हावे, यासाठी कोशाची कल्पना उदयास आली. त्यांना योग्य शब्द सुचविण्याकरिता किंवा एकाच शब्दाचे श्लेषादी उपयोगाकरिता अनेक शब्द सुचविण्यासाठी उपयुक्त व्हावे, म्हणून असे शब्दकोश तयार झाले. टीकाकारांनाही ग्रंथ लावण्यासाठी अशा शब्दसंग्रहांचा उययोग होई. बरेचसे कोश खुद्द कवींनीच रचलेले दिसतात. भारतीय कोशाचे मुख्यतः दोन वर्ग दिसतात : (१) समानार्थी शब्दांचा समावेश असलेला कोश, (२) अनेकार्थवाची शब्दांचा कोश, या सर्वांत महत्त्वाचा कोश अमरसिंगविरचित नामलिंगानुशासन ऊर्फ ⇨ अमरकोश. हा समानार्थवादी शब्दकोश असून त्याची तीन कांडॆ आहेत. याची रचना वर्णानुक्रमी नाही.

मराठी शब्दकोशरचनेची परंपरा : मराठीमध्ये बाराव्या शतकापासून कोशरचनेचे प्रयत्न झालेले दिसतात. हेमाद्रीसारख्या पंडिताने रघुवंशावरील टीकेत कठीण संस्कृत शब्दांना सार्वलौकिक मराठी प्रतिशब्द देण्याचा जो उपक्रम केला आहे (तेरावे शतक), तो म्हणजेच द्विभाषिक शब्दकोशाचा प्रारंभ. ही प्रारंभावस्था प्रामुख्याने दुर्बोध किंवा अल्पपरिचित शब्दांच्या याद्यांच्या स्वरूपात दिसते. उपलब्ध ज्युन्यांत जुने शब्दकोश म्हणजे मध्ययुगीन महानुभावीय टीपग्रंथ. टीपग्रंथ म्हणजे मूळ महानुभावीय ग्रंथावर टिका-टिप्पणी. कठीण शब्दांचे अर्थ देणे, हा त्यांचा मुख्य भाग. यात मध्ययुगीन मराठी शब्दांना सुबोध प्रतिशब्द दिले आहेत. या टीपग्रंथांचा आरंभ चौदाव्या शतकात दिसतो.


सोळाव्या शतकानंतर ज्ञानेश्वरीचे परिभाषा – कोश तसेच, पर्याय – कोश तयार होऊ लागले. ज्ञानेश्वरीतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे सु. पन्नास तरी कोश हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांपैकी ज्ञानेश्वरी टिपण (१७४७) हा जगन्नाथ बाळकृष्ण उगावकर यांचा कोश मु. श्री. कानडे, सु. बा. कुलकर्णी यांनी संपादून प्रसिद्ध केला आहे. (१९६८). ज्ञानेश्वरीतील दुर्बोध शब्द कोणत्या अध्यायात, कोणत्या ओवीत आला आहे, ते यात दिले आहे. ज्ञानेश्वरीतील कठीण शब्दांचा सुबोध अर्थ देणे, हा या टिपणाचा प्रधान हेतू आहे. कोशकाराने अध्यायांच्या अनुक्रमाने अकारविल्हे क्रम सांभाळला आहे. अमृतानुभवाचेही परिभाषा-कोश आढळतात. विवेकसिंधूच्या परिभाषेची हस्तलिखिते धुळ्याच्या श्रीसमर्थ वाग्देवता मंदिरात आहेत. ती दोनशे वर्षांपूर्वीची असावीत.

महाराष्ट्रापासून दूर, तंजावर येथेही, मराठी शब्दकोश – रचना झाली आहे. रामकवीचा भाषाप्रकाश हा पद्यबद्ध कोश आणि अकारादि प्राकृत भाषेचा निघंटू हा शब्दकोश शं.गो.तुळपुळे यांनी संपादून प्रसिद्ध केला आहे. (अनुक्रमे १९६२, १९७३).

महाराष्ट्रात १३१८ पासून पुढे सु. सव्वातीनशे वर्षे इस्लामी अंमल होता. या काळात हिंदु –मुसलमान यांच्यातील व्यवहार सुकर व्हावेत, म्हणून फार्सी-मराठी द्विभाषिक कोश निर्माण होऊ लागले. यानंतर पुन्हा मराठी स्वराज्यस्थापनेचा काळ आला. संस्कृत, मराठी यांची पुन्हा प्रतिष्ठापना झाली. शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून रघुनाथपंत हणमंते यांनी १६७६ – ७७ च्या दरम्यान फार्सी-संस्कृत पर्यायी शब्दांचा राजव्यवहारकोश तयार केला.

अर्वाचीन काळातील कोशरचना : १८१८ मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिश अंमल सुरू झाला. तत्पूर्वी १८१० मध्ये बंगालमधील सेरामपूर येथे विल्यम कॅरी याने डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज या नावाने मराठी शब्दांची एक यादी छापली. यात मराठी शब्द मोडी लिपीत देऊन त्यांचे अर्थ इंग्रजीत दिले आहेत. ब्रिटिश अंमलातील प्रारंभीच्या शब्दकोशांमागे मुख्यतः दोन प्रेरणा होत्या : (१) राज्यकर्त्यांना एतद्देशियांशी संबंध साधण्याची गरज व (२) ख्रिस्ती धर्मप्रसार. १८२४ मध्ये व्हान्स केनेडी याने मुंबईस डिक्शनरी ऑफ द मराठी लँग्वेज हा मराठी – इंग्रजी व इंग्रजी – मराठी शब्दकोश प्रसिद्ध केला. शब्दकोश या संज्ञेला शोभणारा ब्रिटिश अंमलातील पहिला मराठी-मराठी असा एकभाषिक कोश म्हणजे महाराष्ट्र भाषेचा कोश. मोल्सवर्थ-कँडी यांच्या मार्गदर्शानाखाली जगन्नाथशास्त्री क्रमवंत आणि इतर सहा शास्त्री यांनी तो १८२९ मध्ये तयार केला. शास्त्रांचा कोश म्हणूनही तो ओळखला जातो. त्याची पुरवणी १८३१ मध्ये प्रसिद्ध झाली. १८३१ मध्ये मोल्सवर्थने कँडी बंधूंच्या सहकाऱ्याने डिक्शनरी ऑफ मराठी अँड इंग्लिश हा शब्दकोश प्रसिद्ध केला. या कोशाची सुधारलेली व वाढविलेली दुसरी आवृत्ती १८५७ मध्ये निघाली (पुनर्मुद्रित आवृत्ती १९७५). या शब्दकोशात तत्कालीन मराठी माणसांच्या तोंडी असणारे सर्व शब्द घेतले आहेत. शुद्ध-अशुद्ध, सभ्य-अश्लील असा भेदभाव केलेला नाही, तसेच उपयुक्त संस्कृत शब्द स्वीकारणे व बोलीभाषेतीलही शब्द न टाळणे, हे धोरण पाळलेले आहे. हा कोश पुढील काळातील मराठी शब्दकोशांचा महत्त्वाचा आधार ठरला.

या कालखंडात शालेय तसेच इतर स्वरूपांचे शब्दकोशही निर्माण होऊ लागले. बाबा पदमनजींच्या दोन भागांतील शब्दरत्नावलीमध्ये (१८६०) मोल्सवर्थ-कँडी यांच्या शब्दकोशातील निवडक शब्द उतरवून घेतले आहेत. रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा हंसकोश (१८६३), बाळकृष्ण मल्हार बीडकर यांचा रत्नकोश (१८६९), बापट-पंडितांचा शुद्ध मराठी कोश (१८९१) हे एकोणिसाव्या शतकातील आणखी काही उल्लेखनीय शब्दकोश. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात वासुदेव गोविंद आपटे यांचा मराठी शब्दरत्नाकर (१९२२), विद्याधर वामन भिडे यांचा मराठी भाषेचा सरस्वतीकोश (१९३०) हे दोन महत्त्वाचे शब्दकोश तयार झाले. आपट्यांच्या मराठी शब्दरत्नाकराच्या पुढे अनेक आवृत्त्या निघाल्या.

मराठी शब्दकोश रचनेतील आजवरचा सर्वात मोठा व महत्त्वाचा एकभाषी शब्दकोश म्हणजे महाराष्ट्र शब्दकोश. य. रा. दाते, चिं. ग. कर्वे, आबा चांदोरकर, चिं. शं. दातार यांच्या संपादकमंडळाने अनेकांच्या साहाय्याने तो तयार केला. बारा वर्षे चाललेला महाराष्ट्रीय ज्ञानकोश पुरा होत आला असता, त्या कामातून हे महाराष्ट्र शब्दकोशाचे काम १ एप्रिल १९२८ पासून सुरू झाले. त्याचा पहिला भाग १९३२ मध्ये व अखेरचा सातवा भाग १९३८ मध्ये प्रसिद्ध झाला. त्याच्या आठवा पुरवणी विभाग १९५० मध्ये प्रसिद्ध करण्यात आला (पुनर्मुद्रण १९८८). या कोशात एकूण १,३०,६७० शब्द विवेचिले आहेत. या शब्दकोशात जुनी शास्त्रीय पद्धती आणि नवी शास्त्रीय पद्धती यांचा मेळ घातलेला आहे. या शब्दकोशामध्ये ज्ञानेश्वरांपूर्वीच्या महानुभव वाङ्‌मयातील शब्द, संतकाव्य, पंडिती काव्य व शाहिरी काव्य यांच्यातील शब्द, त्याचप्रमाणे अव्वल शब्दांची अपभ्रष्ट रूपेही घेतली आहेत. या कोशाच्या पहिल्या सात खंडांना अभ्यासपूर्ण, संशोधनपर व विवेचक प्रस्तावना आहेत.

महाराष्ट्रात शब्दकोशानंतर अनेक लहानमोठे, मर्यादित उद्दिष्ट असणारे, वेगवेगळ्या स्वरूपाचे शब्दकोश निर्माण झाले. स्वातंत्रप्राप्तीनंतर कोशकार्यामागील प्रेरणा, प्रयोजन हेही बदलले. कोशकार्याला गती आली. तांत्रिक, पारिभाषिक कोश वाढू लागले. शासकीय पातळीवर कोश निर्माण होऊ लागले. कोशकार्याला शासकीय पुरस्कार मिळू लागला. काही उल्लेखनीय कोश म्हणून सुगम मराठी शब्दकोश (श्री. ना. बनहट्टी, भाऊ धर्माधिकारी, १९६८), आदर्श मराठी शब्दकोश (प्र.न.जोशी १९७०), श्रीविद्या शालेय मराठी शब्दकोश (रा. ग. जाधव, व. द. देसाई, १९९५), शालेय मराठी शब्दकोश (वसंत आबाजी डहाके व गिरीष पतके, १९९७, २०००) यांचा निर्देश करता येईल. महाराष्ट्र शब्दकोशानंतरचा महत्त्वाचा, सर्वसमावेशक, एकभाषी बृह्द शब्दकोश म्हणजे द. ह. अग्निहोत्री यांचा अभिनव मराठी-मराठी शब्दकोश (१९८३ – ८५). हा पाच खंडांत असून त्यात शब्दांचे उच्चार निर्दिष्ट केले आहेत. मराठी-इंग्रजी चाऊस डिक्शनरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. (२००५).


प्राचीन मराठी साहित्याचे शब्दकोश : प्राचीन मराठी साहित्याच्या शब्दकोशांचे दोन वर्ग करता येतील. एक, प्राचीन काळी तयार झालेले आणि दुसरा, आर्वाचीन काळात तयार झालेले. प्राचीन काळातील असे शब्दकोश म्हणजे श्रीज्ञानेश्वरी शब्दार्थकोश (शि. न. भावे, १९५१). ज्ञानेश्वरीचे शब्दभांडार ( रा.ना. वेलिंगकर, १९५९), श्रीतुकाराम-गाथा शब्दार्थ संदर्भकोश (मु.श्री. कानडे, रा.शं. नगरकर, १९९९) हे होत. ऐतिहासिक कागदपत्रे, बखरी इत्यादींच्या अभ्यासाला साहाय्य व्हावे, म्हणून मा. त्रिं. पटवर्धन यांनी फार्सी-मराठी शब्दकोश तयार केला. (१९२५) तो पुढे अपुरा पडू लागला म्हणून य. न. केळकर यांनी ऎतिहासिक शब्दकोश दोन भागात तयार केला (१९६२). यात एकूण १५,००० शब्द आहेत. ह. श्री. शेणोलीकरांच्या मराठी-संत-तत्त्वज्ञान संज्ञाकोशात (तीन खंड,१९४४) तत्त्वज्ञानपर संतसाहित्यातील तात्त्विक संज्ञांचे अर्थ, स्पष्टीकरण, मूळ संदर्भ, विविधार्थच्छटादर्शक संदर्भ, तत्त्वज्ञानात्मक मूलभूत सूत्रे आणि अन्य प्रमाणे इ. दिलेली आहेत. प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासास हा तत्त्वज्ञानविषयक संकल्पना-कोश उपयुक्त आहे. शं. गो. तुळपुळे व अँन फेल्डहाऊस यांच्या ए डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी (१९९९) या शब्दकोशात शिलालेखांपासून ते वारकरी साहित्यापर्यंतच्या प्राचीन मराठी वाड्मयात आढळणा-या सु. १८,००० शब्दांचे अर्थ दिले आहेत.

द्विभाषिक व बहुभाषिक शब्दकोश : एकभाषी शब्दकोशांबरोबरच अनेक द्विभाषिक व काही थोडे बहुभाषिक शब्दकोशही झाले आहेत. त्यांपैकी काही उल्लेखनीय द्विभाषिक शब्दकोश असे : इंग्लिश आणि मराठी शब्दकोश (श्रीकृष्ण रघुनाथ तळॅकर,१८६१), द ट्वेटिएथ सेंचरी इंग्लिश-मराठी डिक्शनरी (नी.बा. रानडे, १९०३-१९१६) द न्यू स्टॅडर्ड डिक्शनरी हा शब्दकोश मराठी-इंग्रजी-मराठी असा असून त्यात सुमारे पाऊण लाख शब्द आहेत. संस्कृत-इंग्लिश व इंग्लिश-संस्कृत डिक्शनरी (मोनिअर मोनिअर विल्यम्स), द स्टुडण्टस संस्कृत-इंग्लिश/इंग्लिश-संस्कृत डिक्शनरी (वा. शि. आपटे, १८९०). तसेच मराठी-रशियन यांसारखे परदेशी भाषांशी संबंधित काही द्विभाषिक शब्दकोशही झाले आहेत.

काही थोडे बहुभाषिक शब्दकोशही झाले आहेत. त्यांपैकी तेरा भाषा आणि एकतीस भाषांचे मासले (प्रकाशक द. गो. सडेकर,१९१३), इंग्लिश-गुजराती-मराठी-संस्कृत डिक्शनरी (१८८५) हे शब्दकोश वैशिष्ट्यपूर्ण होत. विशेष उल्लेखनीय बहुभाषी शब्दकोश म्हणजे विश्वनाथ दिनकर नरवणे यांचा भारतीय व्यवहारकोश (१९६१) हा होय. या शब्दकोशातही हिंदी शब्द व वाक्ये यांना अन्य चौदा भारतीय भाषांतील व इंग्रजीतील पर्याय दिलेले आहेत. मराठीत समानार्थी वा पर्यायी शब्दकोशही झाले आहेत. बाबा पदमनजींनी १८६० मध्ये शब्दरत्नावलीमध्ये असा प्रयत्न केला. असा शब्दकोश म्हणजे य. ब. पटवर्धन यांचा शब्दकौमुदी किंवा सम-शब्द-कल्पना-भांडार (१९६५), अगदी अलीकडे वि.श. ठकार यांचा अभिनव मराठी-मराठी-इंग्रजी पर्याय-शब्दकोश (पुणे, मेहता, २०००) आणि मो.वि.भाटवडेकर यांचा मराठी पर्यायी शब्दांचा कोश (पुणे, साधना,२०००) हे कोश प्रसिद्ध आहेत. श्रीपाद जोशी यांनीही विविध उद्देशाने विविध स्वरूपाचे सु. दहा शब्दकोश केले आहेत. मराठी-हिंदी, उर्दू असेही शब्दकोश आहेत. डॉ. रघुवीर यांची कॉप्रिहेन्सिव्ह इंग्लिश-हिंदी डिक्शनरी ऑफ एज्युकेशनल वर्ड्स अँड फ्रेझीस प्रसिद्ध आहे.

पारिभाषिक कोश : विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानव्यविद्या व कला यांतील परिभाषिक संज्ञा, परिभाषा, शब्द इत्यादींना मराठी प्रतिशब्द तयार करण्याचे कामही अभ्यासकांकडून करण्यात येत आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शासकीय (उदा., मराठी विश्वकोश : परिभाषासंग्रह) व विद्यापीठीय पातळीवर असे अनेक उपक्रम होत आहेत. शास्त्रीय परिभाषा-कोश (म. वि. आपटे, मा. पु. जोशी, १९३६,१९६२) भारतीय मानसशास्त्र परिभाषा (दे.द. वाडेकर,१९४४) शास्त्रीय परिभाषा कोश (य. रा. दाते, चिं. ग. कर्वे, १९४८) इंग्रजी-मराठी स्थापत्य-शिल्पकोश (रा.वि.मराठे, १९६५), पुरातत्त्व कोश (रा. वि. मराठे, १९८३) इ. परिभाषाकोश उल्लेखनीय आहेत.

मराठी व्युत्पत्ति-कोश : वि.का.राजवाडे यांनी मराठी धातुकोश व नामादिशब्दव्युत्पत्तिकोश तयार करून ठेवलेले होते. ते दोन्ही त्यांच्या पश्चात अनुक्रमे १९३७ व १९४२ मध्ये प्रकाशित झाले. कृ. पां. कुलकर्णी यांचा मराठी व्युत्पत्तिकोश (ऐतिहासिक व तौलनिक) १९४६ मध्ये प्रसिद्ध झाला.

शासकीय शब्दकोश-कार्याचे प्रयत्न : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इंग्रजीऐवजी हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांतून व्यवहार करण्याची आवश्यकता उत्पन्न झाली. त्यामुळे शासकीय पातळीवरही अनेक प्रकारचे कोश होऊ लागले. स्वातंत्र्यपूर्वकाळात बदोडे संस्थांनचे अधिपती सयाजीराव महाराज गायकवाड यांनी श्रीसयाजीशासन कल्पतरू हा कोश करवून घेतला (१९३१), यात शासनविषयक इंग्रजी शब्दांना गुजराती, हिंदी, बंगाली, उर्दू, फार्सी व संस्कृत या भाषांतील पर्याय दिले आहेत. व शेवटी सर्वमान्य होईल असा पर्यायी शब्दही सुचविला आहे. महाराष्ट्र शासनाने १९६२ मध्ये पदनामकोश तयार केला. त्यात शासन व्यवहारातील इंग्रजी संज्ञा व त्यांना मराठी पर्याय दिलेले आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या आंतरभारती मालेखाली गुजराती-मराठी, उर्दू-मराठी, कन्नड-मराठी, तमीळ-मराठी असे द्विभाषिक कोश तयार करण्यात आले आहेत. ते दुहेरी स्वरूपाचे म्हणजे उर्दू-मराठी आणि मराठी-उर्दू असे योजिलेले आहेत. यांत गुजराती, कन्नड, तमीळ, उर्दू इ. भाषांतील शब्द देवनागरी लिपीत दिलेले असून कंसात त्यांच्या मूळ लिपीमध्येही दिलेले आहेत व पुढे त्यांचा अर्थ मराठीत नमूद केला आहे. सुशिक्षित मराठी व्यक्तीला इतर भाषा स्वप्रयत्नाने शिकता याव्यात हा त्यामागे हेतू आहे. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या वतीने सरोजिनी बाबर यांनी लोकसाहित्य शब्दकोश (१९७२) संपादून प्रसिद्ध केला आहे. त्यात मुख्यतः या समितीने प्रकाशित केलेल्या लोकसाहित्याच्या अनेक संग्रहांतील शब्द व त्यांचे अर्थ दिलेले आहेत.


बोलीभाषांचे शब्दकोश : मराठीच्या वेगवेगळ्या बोलीभाषांचेही शब्दकोश झाले आहेत. उदा, कोलामी-मराठी शब्दसंग्रह (कोलाम, भाऊ मांडवकर, १९६६), नागपुरी मराठी शब्दसंग्रह (नागपुरी बोली, वसंत कृष्ण व-हाडपांडे, १९७३) वैदर्भी बोलीचा कोश (दे. ग. सोटे, १९७४) महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळातर्फे, अ. म. घाटगे यांच्या संचालकत्वाखाली `सर्व्हे ऑफ मराठी डायलेक्ट्स’ योजनेत अनेक बोलीभाषांचे कोश प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

बायबलमधील विशेषनामे, स्थलनामे, ईश्वरासंबंधी संज्ञा इत्यादींची अर्थासहित माहिती देणारा पहिला मराठी शब्दकोश रेव्ह, कासम ढालवाणी, रेव्ह. हेन्री ब्रूस यांनी १८८५ मध्ये तयार केला. पुढे शंभर वर्षांनी (१९८५) विश्वनाथ गोठोस्कर यांनी संपादित केलेला पवित्र-शास्त्र शब्दकोश प्रसिद्ध झाला.

म्हणी व वाक्संप्रदाय कोश : शब्दकोशांच्याच वर्गात मोडणारे कोश म्हणजे म्हणी, वाक्संप्रदाय, वाक्प्रचार, उखाणे इत्यादींचे कोश, मराठीत अशा प्रकारचे कोश झालेले आहेत. सर्व देशांतील निवडक म्हणी (१८५८) या सदाशिव विश्वनाथ यांच्या पुस्तकात इंग्रजी वर्णानुक्रमाने म्हणी छापल्या आहेत. यात चार हजारांवर इंग्रजी, मराठी म्हणी आहेत. मराठी प्रॉव्हर्ब्स (१८९९) या कोशात कॅप्टन ए. मॅनवेरिंग यांनी मराठी म्हणीँचे इंग्रजी भाषांतर छापले आहे. या प्रकारातील उल्लेखनीय दोन कोश म्हणजे मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी (वि.वा.भिडे, १९१०) आणि मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी (वा. गो. आपटे, १९१०) हे होत. य. रा. दाते व चिं. ग. कर्वे यांच्या महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश (विभाग १-१९४२ विभाग २-१९४७) विशेष उल्लेखनीय आहे. या कोशात चाळीस हजारांवर वाक्प्रचार, वाक्संप्रदाय व म्हणी समाविष्ट आहेत. याच्या दुसऱ्या खंडाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना आहे. विश्वनाथ दिनकर नरवणे यांनी भारतातील सोळा भाषांतील म्हणींचा भारतीय कहावत संग्रह हा दोन खंडांत प्रसिद्ध केला आहे. (१९८०)

शब्दकोश-वाङ्‌मयाचा इतिहास म्हणजे अगदी प्रारंभिक अशा शब्दांच्या याद्यांपासून समग्र, समावेशक व शास्त्रीय पद्धतीने तयार झालेल्या शब्दकोशांपर्यंतची वाटचाल व विकास होय. समाजाच्या भाषिक व्यवहाराचे क्षेत्र जसजसे वाढत जाते, अन्यभाषासंपर्क व्यापक होत जातो आणि ज्ञानविज्ञानांच्या परिभाषा तयार होत जातात, तसतसे शब्दकोशाचे स्वरूप विविध प्रकारे बदलत व विकसित होत जाते. शब्दकोश हा एक वर्धिष्णू कोशव्यवहार आहे.

संदर्भ : 1. Hartman R. R. K. Ed. Leciography : Principles and Practice, London, 1983.

2. Jonson, R. Ed. Dictionary, Lexicography and Language Learning, 1985.

३. देव, सदाशिव, कोशवाङ्‌मय : विचार आणि व्यवहार, पुणे, २००२.

४. वैद्य, सरोजिनी व इतर (संपा.), कोश व सूची वाङ्‌मय, स्वरूप आणि साध्य, मुंबई, १९९७.

चुनेकर, सु. रा.