उपसंहार: भाषण, लेख व नाटकादी साहित्यकृती यांच्या अखेरीस असलेला समारोपाचा मजकूर. नीतिपर कथेचे तात्पर्यवजा सार, नाटकाच्या शेवटी येणारे भरतवाक्य व तत्सदृश भाषण अशा विविध प्रकारांत उपसंहार आढळतो.

इंग्रजीत एपिलॉग ची म्हणजे उपसंहाराची कल्पना असून तिचा उगम ग्रीक नाटकातील एपिलोगॉस मध्ये आढळतो. नाट्यप्रयोगाचा प्रारंभ प्रोलॉगने म्हणजे नांदीसारख्या उपोद्घाताने करून त्याचा शेवट एपिलॉग ने करण्याची प्रथा इंग्रजी नाट्यवाङ्मयात सतराव्या अठराव्या शतकांत दिसून येते. या उपसंहारात्मक स्वरूपाच्या भाषणात नाट्यकृतीचे सार ग्रंथित केले असून ते नटानेच प्रेक्षकांना उद्देशून म्हणावयाचे असते व त्यात रसिक प्रेक्षकांकडून रसग्रहणाची अपेक्षा केलेली असते. शेक्सपिअरच्या मिड्समर नाइट्स ड्रीम  या नाटकात पक् ही परी उपसंहारात प्रेक्षकांकडून सद्‌भावनांची अपेक्षा करते तर टेंपेस्ट नाटकात प्रॉस्पेरो आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावे, अशी प्रेक्षकांना प्रार्थना करून मायदेशी जाताना त्यांच्या शुभेच्छांची अपेक्षा बाळगतो. उपसंहाराचा हा मजकूर स्वतः नाटककारच तयार करतो तथापि कधी कधी तो एखाद्या नामवंत कवीकडूनही लिहून घेण्यात येतो. अठराव्या शतकात उपसंहाराचे हे स्वरूप बदलून त्याला मुख्यतः विनोदी किंवा उपहासात्मक स्वरूप प्राप्त झाले. एकोणिसाव्या शतकाच्या पुढे तर त्याचा वापर क्वचितच केला जाई. शॉसारख्या विसाव्या शतकातील नाटककारांनी विनोद, उपहास, विडंबन यांसाठीच उपसंहाराचा आश्रय घेतलेला दिसतो.

संस्कृत नाटकातील नांदी व भरतवाक्य  या कल्पनांशी प्रोलॉगएपिलॉग यांचे बरेचसे साम्य दिसून येते.

भागवत, अ. के.