नॅशनल बुक ट्रस्ट: एक ग्रंथप्रसारक राष्ट्रीय संस्था. स्थापना १९५७. ग्रंथप्रेम निर्माण करण्याच्या उद्देशाने, भूतपूर्व पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रेरणेने केंद्रीय शिक्षण मंत्रालयांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेचे पहिले अध्यक्ष डॉ. जॉन मथाई हे असून त्यानंतर डॉ. चिं. द्वा. देशमुख हे काही काळ अध्यक्ष होते.

ग्रंथप्रदर्शन भरविणे तसेच लेखन, अनुवाद, प्रकाशन आणि वितरण या प्रश्नांबाबत विचार करण्यासाठी लेखकांची शिबिरे भरवून त्यांद्वारे चर्चा वा परिसंवाद घडवून आणणे हे या संस्थेचे प्रमुख कार्य आहे. याशिवाय ग्रंथप्रसाराचा उद्देश व कार्यसाफल्य यांसाठी भारतीय भाषांमधील उत्तमोत्तम ग्रंथांना उत्तेजन देणे व ते प्रकाशित करणे आणि प्रकाशित साहित्य ग्रंथालये, शैक्षणिक संस्था व वाचक इत्यादींना अल्पदरांत उपलब्ध करून देणे, हे कार्यही प्रस्तुत संस्था करीत असते. याशिवाय महाविद्यालयीन पातळीवरील ग्रंथांना प्रकाशनार्थ अनुदानही संस्थेकडून देण्यात येते.

आजवर संस्थेने चौदाशेंहून अधिक पुस्तके विविध भारतीय भाषांमधून प्रसिद्ध केली आहेत. यामागे संस्थेचा उद्देश म्हणजे देशाच्या भावनात्मक व सांस्कृतिक ऐक्यास हातभार लावणे हाच असतो. नामवंत भारतीय लेखकांच्या ललित कृतींप्रमाणेच भारताविषयीची विविध प्रकारची माहिती देणारे ग्रंथही संस्थेतर्फे प्रसिद्ध होत असतात. तसेच अशा ग्रंथांखेरीज काही ग्रंथमालाही संस्थेद्वारा प्रकाशित करण्यात येतात. उदा., ‘आदान प्रदान’, ‘नेहरू बाल पुस्तकालय’, ‘भारत – देश आणि लोक’, ‘राष्ट्रीय जीवनचरित्र माला’, ‘भारतीय लोकसंस्कृती व साहित्यमाला’, ‘तरुण – भारती’, ‘लोकोपयोगी विज्ञानमाला’, ‘आजचे विश्व’ इत्यादी. या संस्थेने १९७२ साली पहिली व १९७६ साली दुसरी अशा दोन जागतिक पुस्तक जत्रा दिल्लीत भरविल्या होत्या. यांखेरीज संस्थेने आजपर्यंत मुंबई, कलकत्ता, हैदराबाद आणि अहमदाबाद या ठिकाणी मिळून एकूण आठ राष्ट्रीय पुस्तक जत्रा भरविल्या आहेत तर भारतातील विविध राज्यांतील निरनिराळ्या ठिकाणी एकूण ७७ प्रादेशिक ग्रंथप्रदर्शनेही भरविली आहेत, तसेच भारताबाहेरील एकूण ७३ ग्रंथप्रदर्शनांत भाग घेतला आहे.

जाजोदिया, सविता