पत्रमैत्री: मैत्रीसंपादनाचे एक माध्यम. समान आवडीनिवडी, अभिरुची व आस्थाविषय असलेल्या व्यक्तींना परस्परांशी  पत्रद्वारा स्नेहसंबंध जोडण्यासाठी काही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था वा वृत्तपत्रे मध्यस्थासारखे कार्य करीत असतात. त्यामुळे आधुनिक काळात पत्रमैत्रीचा हा उपक्रम बराच लोकप्रिय ठरला आहे.

पत्रमैत्रीच्या चळवळीचा उदय पाश्चिमात्य देशांत झाला असला, तरी तिचा प्रसार आता बहुतेक सर्वच देशांत झालेला आढळतो. केवळ स्वदेशातीलच नव्हे, तर परकीय देशांतीलही समानशील व्यक्तींशी पत्रमैत्री संपादन करण्याच्या सोयी उपलब्ध आहेत. पत्रमैत्री हा आधुनिक काळातील एक वैशिष्ट्यपूर्ण छंद होय. अपरिचित अशा समाजातील किंवा देशातील कुमारवयीन मुलामुलींना आणि युवकयुवतींना एकमेकांचा पत्रद्वारा परिचय करून घेण्यात एकप्रकारचे आगळे कुतूहल व आनंद असतो. अज्ञात जगातील मित्र मिळविणे, हे कुमारवयीन साहसप्रियतेला मोठे आव्हान असते. या साहसप्रियतेला अनुसरूनच नव्या पिढीवर आंतरराष्ट्रीय स्नेहभावाचे, बंधुत्वाचे, परस्परांविषयीच्या आदरभावनेचे संस्कार करून विश्वशांतीला पोषक वातावरण निर्माण करणे, हे पत्रमैत्री चळवळीचे उद्दिष्ट मानता येईल. सद्यःस्थितीत तर ती एक काळाची गरज ठरली आहे. वृत्तपत्रे, ग्रंथ, रेडिओ, दूरचित्रवाणी, क्रीडासामने, कलासाहित्य, चित्रपटसृष्टी व रंगभूमी इ. माध्यमांद्वारा वरील कार्य काही प्रमाणात होत असले, तरी त्यांतून व्यक्तिगत जिव्हाळा निर्माण होत नाही  म्हणूनच पत्रमैत्री चळवळीची विशेष गरज आहे. ही चळवळ सर्व वयोगटांतील स्त्रीपुरुषांसाठी असली, तरी तिचा रोख मुख्यतः संस्कारक्षम अशा बालवयीन, कुमारवयीन व तरुण मुलामुलींच्या मैत्रीसंपादनावरच अधिक आहे.

विसाव्या शतकातील दोन महायुद्धांच्या भयंकर विध्वंसक शक्तीमुळे मानवी मनाला जे तडे गेले आहेत, ते सांधण्यासाठी सांप्रत विश्वबंधुत्वासारख्या मानवतावादी कल्पनांच्या प्रसार-प्रचारावर जोर देण्यात येत असल्यामुळे पत्रमैत्रीच्या सीमा बऱ्याच व्यापक होत चालल्या आहेत. केवळ व्यक्तिगत अभिरुची किंवा आवडनिवड यांपुरतेच पत्रमैत्रीचे उद्दिष्ट आता मर्यादित राहिलेले नाही. उलट परस्परांची कलादृष्टी, साहित्याभिरुची, इतिहासासंबंधी आवड तसेच संस्कृती व धर्म यांसंबंधीच्या जिज्ञासापूर्तीचेही ते एक साधन ठरले आहे.

पत्रमित्रांचे संघटन करणाऱ्या अनेक संस्था सद्यःस्थितीत पश्चिमी देशांत उदयाला आल्या असल्या, तरी त्यांच्यापैकीच एक असलेली फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन फॉर स्कूल्स कॉरिस्पाँडन्स अँड एक्स्चेंज (याच्या मूळ फ्रेंच नावाचा संक्षेप ‘फायोसेस’) ही एक प्रमुख संस्था मानली जाते . ती द युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (युनेस्को) हिच्या युवककार्याशी संबंधित असलेली शाखा असून आंतरराष्ट्रीय पातळीवरून विविध देशांतील तरुणवर्गात स्नेह-सामंजस्य वाढविण्याचे कार्य ती करते.

भारतामध्येही या प्रकारच्या काही संस्था आहेत. तथापि दिल्ली येथील नेशन्स लीग ऑफ पेन फ्रेंड्स (एन्. एल्. पी. – स्थापना १९२४) ही संस्था अग्रगण्य मानली जाते. ‘सर्वांवर प्रेम करा द्वेष कुणाचाही करू नका’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. प्रस्तुत संस्थेचा संबंध वर निर्दिष्ट केलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेशी असून दोन्ही संस्था परस्परांना पूरक ठरणारे उपक्रम पार पाडतात. त्यासाठी एन्. एल. पी. द्वारा इंग्रजीत पेन-फ्रेंड्स व हिंदीमध्ये पत्रमित्र ही दोन नियतकालिके चालविली जातात. त्यांतून नवीन पत्रमित्रांचा परिचय, छायाचित्रे व पत्रे आणि लेखही प्रकाशित करण्यात येतात. तसेच थोरांचे संदेश, वचने इत्यादींचाही परिचय वाचकांना करून देण्यात येतो. त्यांचा उपयोग नैतिक मूल्ये प्रस्थापित करण्याकडे होतो. या नियतकालिकांचे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष, महात्मा गांधी जयंती, सामाजिक शिक्षण या वा अशा प्रकारच्या विविध विषयांवर वैशिष्ट्यपूर्ण विशेषांकही प्रसंगविशेषी प्रकाशित करण्यात येतात. प्रस्तुत संस्थेचे भारत व भारताबाहेर विविध देशांतील मिळून सु. १६-१७ हजारांवरील सभासद आहेत. यांखेरीज पत्रमित्रांची निवड करणे सुलभ व्हावे, म्हणून काही वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांतूनही एक स्वतंत्र सदर नियमितपणे चालविले जाते. त्यातून पत्रमैत्रीसाठी उत्सुक असलेल्या व्यक्तींची व्यक्तिगत माहिती, वय, आवडीनिवडी यांसारखे तपशील व छायाचित्रेही दिली जातात. त्या माहितीच्या आधारे इच्छुकांना पत्रमित्रांची ओळख होते व निवड करणे सुलभ जाते.

जोशी, चंद्रहास