अतत्त्वाभिनिवेश : (आयुर्वेद). हा मानसिक रोग आहे.

स्वरूप : रुग्ण आरोग्याला हितकर ते अहितकर व अहितकर ते हितकर मानतो तसेच नित्य ते अनित्य व अनित्य ते नित्य मानतो. या रोगाला ‘बुद्धिविभ्रंश’ ही म्हणतात. हा महागद (मोठा रोग) मानतात.

कारणे : दुबळ्या मनाचा व रज आणि मोह यांनी व्यापलेल्या मनाचा मनुष्य मलमूत्रांचे वेग रोकतो मलिन अन्न नेहमी खातो शीतोष्ण, स्निग्ध, रूक्ष इत्यादी आहार अती प्रमाणात घेतो.

संप्राप्ती : रज व तम हे मानसिक दोष अधिक वाढल्याने आणि मन व बुद्धी विकृत झाल्याने उत्पन्न झालेले दोष बुद्धीचा भ्रंश करतात.

उपचार : स्नेहन करून, घाम काढून, वांती, रेच, रक्तस्त्राव इत्यादींनी दोष बाहेर काढून टाकावेत शरीर निर्दोष झाल्यावर ‘बुद्धिवर्धक’ अन्नपान म्हणजे आहारात तांदूळ, जव, तीळ, गहू, तित्तिर भोर इत्यादींचे मांस गायीचे दूध, तूप, लोणी महाळुंग, शिवण फळ इ. असावेत. पंचगव्याबरोबर ब्राह्मीचा रस, शंखपुष्पी, ज्येष्ठमध, गुळवेल इ. रसायने द्यावीत. धार्मिक व स्मृतिसमाधियुक्त अशा मित्रांनी धैर्यज्ञानादी उत्पन्न करणारे वातावरण रूग्णाभोवती नित्य ठेवावे.

जोशी, वेणीमाधवशास्त्री