पारद : पारा हे द्रव्य आयुर्वेदीयांनी सर्वगुणसंपन्न, अमृतमय, मृतसंजीवन, शरीरघटक विशुद्धतम बनवणारे परमश्रेष्ठ औषधिद्रव्य शोधून काढले. पाऱ्यावर योग्य संस्कार केले तर तो देहसिद्धी-परमारोग्य-योगावस्था निर्माण करतो, तसेच धातुसिद्धी ताम्ररौप्यादि धातूंचे सोने करतो, असा आयुर्वेदीयांचा अनुभव आहे. म्हणून त्यांना तो योगेश्वर शंकरच वाटतो.

असा एकही रोग नाही की, ज्यात पाराघटित औषध त्या रोगावर नाही. पारा आपले गुण न सोडता ज्याच्याशी संयुक्त होतो त्याचेही गुण घेतो इतकेच नाही, तर ते वाढवितो, दीर्घकाल टिकवितो.

पारा पार्थिव आहे. इतर पार्थिवांचे स्थूल कठीण गुण यात नाहीत. पण अती चंचल आहे. म्हणून गंधकासारख्या द्रव्यांबरोबर त्याला बद्ध करावयाचे असते. गंधकबद्ध पारद औषधात फार उपयुक्त होतो. कज्जली हा घर्षणबद्ध व रससिंदूर हा अग्निबद्ध होय.

पारा हा जितका सूक्ष्म तितका तो प्रभावी होतो. रससिंदुरातून पारा काढून त्यात पुन्हा गंधक घालून रससिंदूर बनवल्याने पारा सूक्ष्म होतो. अशा रीतीने सहापट, दहापट, शंभरपट, हजारपट गंधक घालून तो बनवून त्याचा उपयोग करण्यास सांगितला आहे. या प्रकाराला गंधक-जारण म्हणतात. षडगुण, दशगुण, सहस्रगुण गंधकजारित पारा असे त्या पाऱ्याला म्हणतात. गंधकासारखेच सोने, अभ्रक इ. जीर्ण पारा गुणाला श्रेष्ठतर होतो. असा पारा हा शरीराचा व धातूंचा सर्वोत्तम किमयागार आहे. पार्याशचे भौतिक व रासायनिक गुणधर्म आणि इतर उपयोग यांसंबंधीची माहिती ‘पारा’ या नोंदीत दिलेली आहे.

पारद संस्कार : पारा त्याच्या मूळ स्वरूपात पोटात देता येत नाही, कारण तो फार चंचल असतो व त्यात अनेक दोष व विषार असतात. ते दोष व विष काढून टाकणे, पोटात देण्यास योग्य करणे, त्याच्या ठिकाणी रोगहरणसामर्थ्य व शरीरघटक उत्कृष्ट दर्जाचे निर्माण करण्याची योग्यता उत्पन्न करणे यांकरिता त्याच्यावर संस्कार करावे लागतात, असे संस्कार कमीतकमी ९ आहेत व जास्तीतजास्त १९ आहेत. हे संस्कार त्या त्या संस्काराचे लक्षण निर्माण होईपर्यंत करावयाचे असतात. प्रत्येक संस्कार तीनदा करावा. पहिले ८ संस्कार शरीरोपयोगी आहेत, बाकीचे नाहीत असे एक मत आहे.

किमया : १८ संस्कार हे किमयेकरिता अत्यावश्यक आहेत व ते सात सात वेळा केले पाहिजेत असा दंडक आहे.

संस्कार : (१) स्वेदन : पारा औषधी पाण्यात विशिष्ट पद्धतीने उकळणे. (२) मर्दन : औषधीत खलणे. (३) मूर्च्छन : औषधीशी एकरूप होऊन तो दिसणार नाही इतका खलणे. (४) वृत्थापन : तो औषधीतून वेगळा करणे. (५) पातन : (अ) ऊर्ध्वपातन : उक्त औषधीत खलून पाऱ्याची वाफ करून ती वर नेऊन वरच्या मातीच्या भांड्यात थंड करून पुन्हा द्रव स्वरूपात त्याला आणणे. (आ) अधःपतन : वरच्या भांड्यात औषधीयुक्त पाऱ्याची वाफ करून खाली आणणे. (इ) तिर्यक् पातन : बाजूच्या भांड्यात त्याची वाफ करून दुसऱ्या भांड्यात तो आणणे. (६) बोधन : त्याला कार्य करण्यास समर्थ करणे. (७) नियमन : पाऱ्याचे चंचलत्व कमी करणे. (८) संदीपन : पाऱ्याचा अग्नी वाढवणे.

हे संस्कार वनस्पतिज, खनिज व प्राणिज द्रव्यांच्या साहाय्याने करावे लागतात. प्रत्येक संस्कार करताना पारा व खल संस्कारी द्रव्ये ही उष्णच असली पाहिजेत, तप्त खलातच पारा खलला पाहिजे. पातन संस्कार मडक्यातच केले पाहिजेत. वाफेने उडून जाणारे धातू, विषे व इतर घातक दोष मडक्याच्या छिद्रातून बाहेर निघून जाणे जरूर असते. काचेच्या भांड्यातून वाफा बाहेर जाणार नाहीत व पारा शुद्ध होणार नाही. नियमन संस्काराने चंचलत्व कमी झाले, तरी गंधकादि द्रव्यांनी तो बद्ध करून, त्याचे भस्म करून नंतरच तो पोटात देता येतो. सिद्धौषधीत पारा इतर द्रव्यांशी बद्ध किंवा त्यात मूर्च्छित असतो.

(९) अनुवासन : पारा प्रभावशाली बनविणे. (१०) जारण : पारा कितीही शुद्ध व प्रभावशाली झाला, तरी तो एकटा शरीरात कार्यकारी होत नाही. त्यात अभ्रक, सोने, गंधक इ. जिरवून तो द्यावयाचा असतो. ते जिरवण्याचा संस्कार जारण होय. अभ्रक, सोने जिरवलेला पारा फार कार्यकारी होतो. गंधक-जारण : पाऱ्यात गंधक जितका जिरवावा तितका तो प्रभावी, शीघ्रकारी व निरुपद्रवी होतो. अधिकाधिक गंधक-जारणाने पारा अधिकाधिक सूक्ष्म होत असतो. शरीरातील सूक्ष्म स्रोतसांत खिळलेले रोग तो नाहीसे करतो. पाऱ्याच्या समभाग-समगुण गंधक तरी जीर्ण करावा. षडगुणजीर्ण चांगला. दशगुण, शतगुण, सहस्त्रगुण असा जितका जीर्ण करता येईल तितका करावा. असा जीर्ण पारा उत्तरोत्तर अधिकाधिक प्रभावी होतो.

जोशी, वेणीमाधवशास्त्री