ॲरिझोना : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी नैर्ऋत्येकडील राज्य. उ. अक्षांश ३१०२०’ ते ३७० आणि पं. रेखांश १०९०३’ ते ११४०५०’. क्षेत्रफळ २,९६,१६३ चौ.किमी. लोकसंख्या १७,७२,४८२ (१९७०). याच्या दक्षिणेस मेक्सिको देश, पश्चिमेस कॅलिफोर्निया व नेव्हाडा, उत्तरेस अटा आणि पूर्वेस न्यू मेक्सिको ही राज्ये आहेत. चार राज्यांच्या सीमा एकत्र भिडत असलेले एकमेव स्थळ ॲरिझोनाच्या ईशान्य कोपऱ्यात येते. उत्तर भागातील कोलोरॅडो पठाराने राज्याचा २/५ भाग व्यापला आहे. ज्वालामुखींच्या क्रियेने आणि वारा, पाणी इत्यादींमुळे धूप होऊन खडकांच्या विशिष्ट रचना आणि ग्रँड कॅन्यन सारख्या भव्य दऱ्या येथे निर्माण झाल्या आहेत. याच भागात पेंटेड डेझर्टसारखी प्रेक्षणीय वाळवंटे व अश्मीभूत अरण्ये आढळतात. या पठाराच्या दक्षिणेस सु. ६०० मी. उंच भिंतीसारख्या मोगयोन पर्वतराजीवर देशातील सर्वांत मोठे पाँडेरोझा पाइन वृक्षांचे बन आहे. राज्याच्या मध्यभागात १,२४० ते १,८६० मी. उंचीची जी पर्वतमाला वायव्येकडून आग्नेयीकडे गेली आहे, तिच्यात तांबे, सोने, चांदी व इतर खनिजे भरपूर सापडतात. दक्षिण भागात पूर्वेकडे सुपीक नदीखोरी व पश्चिमेस ओसाड प्रदेश आहे पण तेथील माती सकस असल्याने कालव्याच्या पाण्यावर शेती मोठ्या प्रमाणात होते. खनिज-उत्पादनाबद्दल राज्य विशेष प्रसिद्ध आहे. तांब्याचे सर्वांत अधिक उत्पादन गेल्या ५० वर्षांपासून ॲरिझोनातच होत आहे. त्याशिवाय सोने, चांदी, शिसे, जस्त, आता बांधकामाच्या वाढत्या मागणीमुळे वाळू व रेती, नव्यानेच सापडू लागलेले युरेनियम, ॲस्बेस्टॉस आणि इतर अनेक धातू खाणींमधून काढण्यात येतात. मुख्य नदी कोलोरॅडो उत्तर सीमेच्या मध्यावरून येते व पश्चिमेकडे जाऊन राज्याच्या पश्चिम सीमेवरून वाहते. गिला ही तिची उपनदी पूर्वेकडून येऊन राज्याच्या नैर्ऋत्या कोपऱ्यात तिला मिळते. राज्याच्या ईशान्य भागात छोटी कोलोरॅडो मोठीला मिळते. नद्यांच्या पाण्याचे असाधारण महत्त्व ध्यानात घेऊन शासनाने वेगवेगळ्या नद्यांवर हूव्हर, कूलिज, रूझवेल्ट, डेव्हीस, पार्कर, ग्लेन कॅन्यन अशी धरणे बांधल्यामुळे जल व भूसंरक्षण-योजना फलद्रूप झाल्या आहेत. कोलोरॅडोवरच्या हूव्हर धरणाने मीड हा विस्तीर्ण तलाव व इतर धरणांनीही अनेक लहानमोठे जलाशय निर्माण झाले आहेत. ॲरिझोनाच्या वाळवंटात पावसाचे प्रमाण १२ ते १७ सेंमी. तर पर्वतप्रदेशात ते ५० सेंमी. असते. तपमान वाळवंटात ४३·३० से. पर्यंत चढते, पण हिवाळा मात्र सौम्य असतो. उत्तरेच्या पठारावर कमाल तपमान ३२० से. असते, पण थंडी मात्र कडक पडून प्रसंगी हिमवादळेही होतात. पर्वतप्रदेशात कधीकधी हिवाळ्यात फार कमी तपमान असले, तरी वसंतऋतू शीतल असतो. राज्यातले नित्य वारे नैर्ऋत्येकडून वाहतात. वर्षावने सोडल्यास येथे सर्व प्रकारच्या वनस्पती आढळतात. ४२ टक्के भागात वाळवंट-वनस्पती २३ टक्के भागात गवत, १९ टक्के भागात पिनॉ-जूनिपर अरण्ये, ९ टक्के इतर अरण्ये व ७ टक्के सदाहरित झुडपे आढळतात. राज्यात डग्लस फर, व्हाइट फर, ओक, ॲल्डर, सिकॅमोर, अक्रोड, ॲस्पेन, स्प्रूस, ताड इ. वृक्ष आहेत. वाळवंटातील निवडुंगाच्या प्रचंड साग्वारो व इतर शेकडो जाती हे येथील वैशिष्ट्य आहे. प्राण्यांपैकी कूगर, लिंक्स, बॉबकॅट, हरिणांचे अनेक प्रकार, बॅजर, बीव्हर, ऑटर, खोकड, एल्क यांची संख्या विशेष असून पक्ष्यांच्या ४०० हून अधिक प्रकारांपैकी गरूड व जंगल टर्की या जाती उल्लेखनीय आहेत. त्यांखेरीज रॅटल व कोरल सर्प, टॅरँट्युला व ब्लॅकविडो हे विषारी कोळी, भयंकर विंचू, घोणी व गिला मॉन्स्टर हा सरड्यासारखा प्राणी हे वाळवंट-भागात आढळतात.
इतिहास व राज्यव्यवस्था : २०,००० वर्षांपूर्वीपासून कडेकपारींतून राहणाऱ्या कित्येक प्रगत मानव वंशांचे अवशेष या राज्यात आहेत. ते प्राचीन लोक कालवे बांधणारे, मातीची भांडी घडविणारे व टोपल्या विणणारे होते. इसवी सनाच्या १६ व्या शतकापासून स्पॅनिश लोकांच्या धर्मप्रसाराला आणि आक्रमणाला सुरुवात झाली. त्यानंतर आदिवासी रेड इंडियनांची बंडे, मेक्सिकोचा स्पेनविरुद्ध स्वातंत्र्यलढा, फ्रान्सिस्कन मिशनऱ्यांची हकालपट्टी, मेक्सिकोचे अमेरिकेशी युद्ध या घटना होऊन गेल्यावर गिला नदीच्या उत्तरेचा प्रदेश अमेरिकेला मिळाला आणि १८५३ मध्ये गॅडझ्डन खरेदीनंतर दक्षिणेचाही प्रदेश प्राप्त झाला. १८६३ पर्यंत हा भूभाग न्यू मेक्सिको राज्यात होता. त्या दिवसांत खनिजे शोधणारे वसाहतकरी आणि धर्मस्वातंत्र्याखातर मॉर्मन पंथाचे लोक इकडे येऊ लागले. नव्या लोकांवर आदिवासी रेड इंडियनांचे हल्ले १८८६ पर्यंत चालू होते. नंतर खाणीसाठी पाहणी करणारे, शेती सुरू करणारे, गुरांचे व मेंढ्यांचे कळप पाळणारे अशांची वर्दळ चालू झाली. चराईवर गुरे की मेंढ्या, याबाबत मोठी चुरस जुंपली होती. १९११ मध्ये राज्याचा दर्जा मिळविण्यासाठीच ॲरिझोनाचा अर्ज निवडलेल्या न्यायाधिशांना परत बोलावण्याच्या मतदारांच्या अधिकाराला आक्षेप घेऊन राष्ट्राध्यक्षाने फेटाळला. तेवढे कलम वगळून १९१२ साली ४८ वे राज्य म्हणून अमेरिकेत दाखल होताच पुढच्याच वर्षी ॲरिझोनाने आपल्या संविधानात ते कलम पुन्हा घातले. या संविधानात मतदारांना विशेष स्वातंत्र्य व जास्त अधिकार आहेत. १९१२ पासून संविधानाच वेळोवेळी अनेक दुरुस्त्या झाल्या आहेत. राज्याची अंतर्गत शासनव्यवस्था सामान्यत: देशातल्या इतर राज्यांसारखीच आहे. राष्ट्रीय विधिमंडळावर तीन प्रतिनिधी व दोन सेनेटर ॲरिझोनातून निवडून जातात.
आर्थिक व सामाजिक स्थिती : राज्यातले मुख्य कृषि-उत्पादन कपाशी असून त्याखालोखाल पालेभाज्या, चारागवत, अन्नधान्ये व खरबुजे निघतात. त्याचप्रमाणे मांसासाठी गुरे व डुकरे पोसणे, दूधदुभत्याचा व्यवसाय, मेंढ्यांच्या लोकरीची पैदास व कुक्कुटपालन हे कृषिसंलग्न धंदे येथे चालतात. मोठमोठी धरणे बांधून झाल्यानंतर राज्याची प्रगती झपाट्याने झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर तर उद्योगधंद्यांत फारच मोठी वाढ होऊन लोकसंख्याही एक दशकात जवळजवळ दुप्पट झाली. खाणी व कारखानदारी राज्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. राजधानी फीनिक्स येथे इलेक्ट्रॉनिक उपकरणनिर्मितीचे महत्त्वाचे केंद्र, देशातील सर्वांत मोठा ॲल्युमिनियमचा कारखाना आणि खनिजशुद्धीचे व वैमानिक यंत्रसामग्रीचे कारखाने आहेत. खंडपार जाणारे दोन मार्ग धरून एकूण ३,५०० किमी. हून जास्त लोहमार्ग, चार राष्ट्रीय राजमार्गांसह ६०,००० किमी. वर पक्के रस्ते, आणि १२० विमानतळ या संचारसाधनांखेरीज तीन लाखांवर दूरचित्रवाणी-यंत्रे, ६२ नभोवाणी- व आठ दूरचित्रवाणी-केंद्रे, १५ दैनिके व ६० इतर नियतकालिके ही संपर्कसाधने या राज्यात आहेत. बहुसंख्य लोक ख्रिस्ती धर्माच्या विविध पंथांचे असून होपी इंडियनसारख्या कित्येक आदिवासी जमाती आपला परंपरागत धर्म पाळतात. ॲरिझोनातली ७५% वस्ती नागरी असून त्यांच्यातले ८०% लोक फीनिक्स व टूसॉन या दोनच शहरांत केंद्रित झाले आहेत. गौरेतर लोक ८३,००० असून इतर राज्यांच्या मानाने सर्वाधिक आदिवासी रेड इंडियन लोक येथे राहतात. त्यांच्या १५ जमाती राज्यातील वेगवेगळ्या राखीव विभागांतून राहतात. त्यांच्याखेरीज राज्यात ४०,००० निग्रोही आहेत. लोकजीवनात परंपरागत स्पॅनिश उत्सव हौसेने साजरे होतात. देशातील आदिवासींचा सर्वांत मोठा मेळावा याच राज्यात भरतो. लोकभाषा इंग्रजी असून शिक्षण ७ ते १६ वयापर्यंत मोफत व सक्तीचे आहे. शहरांतून व राखीव विभागांतून रेड इंडियन लोकांसाठी वेगळ्या शाळा आहेत. उच्च शिक्षणासाठी दोन विद्यापीठे, चार महाविद्यालये व परराष्ट्रव्यापार-शिक्षणाची एक खास संस्था असून, पाच वस्तुसंग्रहालये व १०,००० नमुने असलेले एक वनस्पति-उद्यानही राज्यात आहे. विश्वविख्यात स्थापत्यकल्पक फ्रँक लॉइड राइट याच राज्यात राहत असे. ग्रँड कॅन्यन व इतर दऱ्या, विविधरंगी वाळवंट, विविध पर्वतप्रदेश अशा असामान्य निसर्गदृश्यांप्रमाणेच तेथील वनस्पती, प्राणी व जुनी खाणींची गावे पाहण्यासाठीही अगणित सुखसोयी उपलब्घ असल्याने, हौशी प्रवाशांसाठी पर्यटनव्यवस्थेचा धंदा ॲरिझोनात तेजीत चालतो.
ओक, शा. नि.