रानीखेत : उत्तर प्रदेश राज्याच्या अलमोडा जिल्ह्यातील एक रम्य गिरिस्थान. हे अलमोड्याच्या ईशान्येस २१ किमी., काठगोदामपासून ८५ किमी. व रामनगरपासून ९० किमी. वर असून हिमालयाच्या पूर्व कुमाऊँ टेकडीवर १,८२३ मी. उंचीवर वसलेले छोटेसे परंतु अत्यंत आकर्षक असे पर्यटन केंद्र आहे. रानीखेत कँटोनमेंटची लोकसंख्या १८,१९० (१९८१).

रानीखेतचा आसमंत दाट अरण्यांनी व्यापलेला असून त्यात पाईन, ओक, सीडार, सायप्रस असे विविध प्रकारचे वृक्ष आढळतात. निसर्गरम्य परिसरामुळे याच्या आसपास अनेक सहलीची ठिकाणे असून त्यांतील चौबाटिया, कालिका, कौसानी इ. प्रसिद्ध आहेत. चौबाटिया येथे उत्तर प्रदेश राज्य सरकारने फळबाग केली असून कालिका येथे गोल्फ मैदान आहे. रानीखेतहून १६० किमी. अंतरावर वाहणाऱ्या पिंडारी हिमनदीकडे जाण्याचा मार्ग येथूनच सुरू होतो. पश्चिम नेपाळ मधील अपी व नांपा शिखरांचा प्रचंड दरीसारखा उतार, पूर्वेकडील बद्रिनाथ, पश्चिमेकडील मध्य हिमालयातील टेहरी गढवालचे भव्य सृष्टिसौंदर्य व निरभ्र आकाश असताना सकाळच्या वेळी दृष्टिपथात येणारी हिमाच्छादित हिमालयाची पर्वतरांग, ही प्रवाशांची खास आकर्षणे होत. रानीखेतमध्ये उन्हाळ्यात ब्रिटिशांची पथके वसतीला असल्याने त्यांच्यासाठी अतिथिगृहांची सोय केलेली होती. सांप्रत तेथे विविध पर्यटकांची निवासाची सोय केली जाते.

कौसानी येथील सृष्टिसौंदर्य व शांत वातावरण यांनी प्रभावित होऊन महात्मा गांधीनी गीतेवरील अनासक्ति योग हे टीकापर पुस्तक येथेच लिहिले. रानीखेत येथे लष्करी आरोग्यधाम असून येथील कँटोनमेंट हे रानीखेत व चौबटिया (२,११५ मी.) या दोन पर्वतांदरम्यातन वसले आहे. येथील अरण्यांतील एकांत, उत्तम रस्ते, पर्वतारोहणाच्या, गोल्फ खेळण्याच्या तसेच मृगयेच्या सुविधा यांमुळे रानीखेत हे पर्यटकांचे एक आकर्षण ठरले आहे.

खंडकर, प्रेमलता