ॲरॅक्निडा : ॲरॅक्निडा (अष्टपाद वर्ग) हा आर्थ्रोपोडा (संधिपाद) प्राणिसंघातील एक वर्ग आहे. विंचू, कोळी, गोचिडी वगैरे आपल्या चांगल्या परिचयाच्या आणि इतर अपरिचित प्राण्यांचाही यात समावेश होतो. बहुतेक सगळे अष्टपाद (ॲरॅक्निड) भूचर आहेत. ज्या ज्या ठिकाणी कीटक आढळतात त्या त्या ठिकाणी अष्टपाद असतात. पर्वत, अरण्य, वाळवंट इ. सर्व प्रकारच्या भू-भागांवर ते आढळतात. या वर्गातील काही प्राणी पृथ्वीवरील अतिप्राचीन भूचरांपैकी असून सिल्युरियन (सु. ४२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातले आहेत.
इतर आर्थ्रोपोडांप्रमाणेच यांच्या शरीरावर कायटिनी बहीकंकाल (बाहेरचा सांगाडा) आणि संधियुक्त उपांगे असतात. यांच्या शरीराचे दोन भाग असतात : एक शिरोवक्ष (डोके आणि छाती यांच्या एकीकरणाने बनलेला भाग) आणि दुसरा उदर (पोट). शिरोवक्ष निदान सहा खंडांचे बनलेले असते. शिरोवक्षाचा पृष्ठभाग पृष्ठवर्माने (कायटिनमय ढालीने) झाकलेला असतो. या भागावर उपांगांच्या सहा जोड्या असतात. पहिल्या उपांगाला कीलिसेरा (नखरिका) म्हणतात. काही अष्टपादांत याच्या टोकावर चिमटा असून भक्ष्य पकडण्याकरिता व ते चिरडण्याकरिता त्याचा उपयोग होतो. कोळ्यांचे हे उपांग वाघनखासारखे असून विषारी असते. ते भक्ष्याच्या अंगात खुपसून विषाच्या अंतक्षेपणाने (टोचून शरीरात घालण्याने) ते त्याला ठार मारतात.
दुसऱ्या उपांगाला पादमृश (स्पर्श करण्याकरिता किंवा भक्ष्य पकडण्याकरिता उपयोगी पडणारे उपांग) म्हणतात आणि त्यात विविधता आढळते. कोळ्यांमध्ये ते लांब असतात, तर विंचवांमध्ये ते फार मोठे असून त्यांच्या टोकावर मोठा चिमटा असतो त्याने भक्ष्य पकडता येते. बहुतेक अष्टपाद पादमृशाचा उपयोग स्पर्शेंद्रिय किंवा परिग्राही (धरण्याकरिता असलेले) अंग म्हणून करतात. कोळी पादमृशाचा उपयोग लैंगिक प्रवेशी अंग (नराचे मैथुनाकरिता उपयोगी पडणारे इंद्रिय) म्हणून करतात. उपांगांच्या बाकीच्या चार जोड्या चालण्याकरिता उपयोगी पडतात. काही जातींत पायांचे स्पर्शेंद्रियांत परिवर्तन होते.
उदराचे बारा खंड असतात आणि त्यांचे अनेक प्रकारे परिवर्तन झालेले असते. काही जातींत उदर बरेच लांब असते, तर काहींत आखूड असून खंडीभवन स्पष्ट नसते. दुसऱ्या उदरखंडाच्या अधर पृष्ठावर जननरंध्र असून पुष्कळदा ते जननपट्टाने झाकलेले असते.
बहुतेक अष्टपाद मांसाहारी आहेत. त्यांना जबडे नसल्यामुळे अन्नाचे चर्वण करता येत नाही, म्हणून ते अन्नाचे पूर्वपचन (अन्न गिळण्यापूर्वी त्याचे पचन करणे) करतात व नंतर भक्ष्याच्या शरीरातील रस चोखून घेतात.
अष्टपाद श्वासनलिकांनी किंवा पुस्तक-फुप्फुसांनी (पुस्तकाच्या पानांप्रमाणे एकावर एक ठेवलेल्या पातळ पटलिकांच्या बनलेल्या आणि एका चिरेने बाहेर उघडणाऱ्या फुप्फुसांनी) श्वासोच्छ्वास करतात काही प्रकारांत ही दोन्हीही श्वसनांगे असतात. पुस्तक-फुप्फुस पिशवीसारखे असून त्यातील पटलिका अतिशय पातळ असतात.
अष्टपादांचे रुधिर परिवहन-तंत्र अनावृत (उघडे) असून ते हृदय, रोहिण्या, शिरा आणि विस्तीर्ण रुधिर-कोटरांचे (रक्त असलेल्या पोकळ्या किंवा खळगे यांचे) बनलेले असते. उत्सर्जनांगांमध्ये (निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकणाऱ्या इंद्रियांमध्ये) विविधता आढळते. काहींत मालपीगीनलिका (आतड्यात उघडणाऱ्या नलिका), तर काहींत कक्षग्रंथी (पायांच्या बुडाशी असणाऱ्या ग्रंथी) असतात. कोळ्यांच्या रेशीम उत्पन्न करणाऱ्या ग्रंथी परिवर्तित वृक्कक (निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणारी नळीसारखी इंद्रिये) होत, अशी समजूत आहे. अन्ननलिकेच्या अग्रभागाभोवती असलेला एक भक्कम गुच्छिका-पुंज (तंत्रिका कोशिकांचा म्हणजे मज्जापेशींचा आणि तंत्रिका-रज्जू (मज्जातंतूंचा दोरीसारखा जुडगा) यांचा तंत्रिका तंत्रात (मज्जासंस्थेत) समावेश होतो. डोळे आणि स्पर्शरोम अष्टपाद प्राण्यांची ज्ञानेंद्रिये होत.
विंचवाखेरीज बाकीचे सगळे अंडी घालतात. विंचवांना पिल्ले होतात. त्यांचे प्रौढांशी निकट साम्य असते. अनेकदा कात टाकून ती मोठी होतात.
अष्टपाद महत्त्वाचे प्राणी आहेत. कोळी अनेक उपद्रवी कीटकांचा संहार करतात. खरजेसारखे त्वचारोग किडींमुळे (माइटांमुळे) उत्पन्न होतात. पुष्कळ किडी आणि गोचिडी रोगवाहक आहेत.
पहा : ॲकॅरिना आर्थ्रोपोडा कोळी गोचीड माइट विंचू.
कर्वे, ज. नी.