ॲम्स्टरडॅम : नेदर्लंड्सची संविधानमान्य राजधानी. लोकसंख्या ८,०७,७४२ (१९७२). हे शहर उत्तर हॉलंड प्रांतात ॲम्स्टेल नदीच्या मुखाजवळ वसलेले आहे. नॉर्थ सी कालवा व नॉर्थ हॉलंड कालवा यांनी ॲम्स्टरडॅम उत्तर समुद्राला व मेरवेदे कालव्याने ऱ्हाईनच्या त्रिभुज प्रदेशाशी व वायव्य जर्मनीशी जोडलेले आहे.
जमीन भुसभुशीत असल्याने खोलवर खांब घालून त्यांवरील चबुतऱ्यांवर तेथील घरे बांधली आहेत. ॲम्स्टरडॅमला ‘कालव्यांचे शहर’ म्हणतात. अर्धचंद्राकृती अनेक कालव्यांना छेदून जाणाऱ्या अन्य कालव्यांच्या दोहो बाजूंना रस्ते व रस्त्याच्या कडेला झाडे व झाडांच्या आडोशाला घरे असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. ॲम्स्टरडॅममधील कालव्यांची लांबी सु. ८० किमी. असून त्यांमुळे बनलेल्या बेटाची संख्या ७० आहे. सुलभ संचारासाठी कालव्यांवर बांधलेल्या पुलांची संख्या ५०० आहे. हेरेन, कैसर, प्रिन्सेन या प्रमुख कालव्यांच्या घाटांवर पूर्वी श्रीमंत व्यापाऱ्यांची निवासस्थाने होती. आता तेथे बँका, कचेऱ्या, संग्रहालये आहेत. वास्तुशिल्पाच्या दृष्टीने या इमारती अभ्यसनीय आहेत.
जोर्दान या मजूरवस्तीत १७ व्या शतकातील वेस्टरकर्क हे प्रसिद्ध चर्च आहे. औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळातील मजूरवस्त्या गलिच्छ असल्या, तरी अलीकडील नव्या वस्त्यांची आखणी व रचना आदर्श असल्याने शहररचनेच्या बाबतीत ॲम्स्टरडॅमची ख्याती आहे.
पूर्वी ॲम्स्टरडॅम लहानसे मच्छीमारी खेडे होते. चौदाव्या शतकाच्या प्रारंभी त्याला शहराचा दर्जा मिळाला. यावर काही काळ हॅन्झाएटिक संघाचा प्रभाव होता. धर्मसुधारणेच्या चळवळीने प्रभावित होऊन येथील बहुसंख्य लोकांनी प्रॉटेस्टंट पंथ स्वीकारला. स्पेन, पोर्तुगाल आदी देशांतील संकुचित धार्मिक धोरणाला व तदंगभूत छळाला कंटाळून तेथील कित्येक कारागीर ॲम्स्टरडॅमला येऊन राहिले. त्यांतील हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या अनेक कारागिरांनी येथे आपले बस्तान बसविल्यापासून ॲम्स्टरडॅमचा हा एक प्रमुख व्यवसाय झाला. १६४८ च्या वेस्टफेलियाच्या तहाने स्केल्ट नदीवरील व्यापाराला प्रतिबंध पडल्याने अँटवर्पचे महत्त्व घटून ॲम्स्टरडॅमचे वाढले. सतराव्या शतकाच्या अखेरीस डच ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेनंतर ॲम्स्टरडॅमची भरभराट झपाट्याने झाली. यूरोपातील एक मोठे बंदर म्हणून ते ओळखले जाऊ लागले. फ्रेंचांच्या अल्पकालीन राजवटीत नेपोलियनने राजधानीच येथे नेली व १८१४ च्या संविधानाने ती कायम झाली. प्रत्यक्षात मात्र मंत्रिमंडळाचा शपथविधी, राज्यारोहण वगैरे औपचारिक प्रसंग सोडता राजधानीने अन्य व्यवहार हेगहून चालतात.
ॲम्स्टरडॅम बंदराचा व्यवहार प्रचंड आहे. सालीना सु. ७,००० बोटी येथे ये-जा करतात. डच साम्राज्यातील विविध देशांमधून कोळसा, अशुद्ध धातू, धान्य, पेट्रोल, तंबाखू, चहा, कॉफी, कोको, तेलबिया, इमारती लाकूड यांची आयात व दुग्धपदार्थ, कागद, कृत्रिम खते, साखर यांची निर्यात या बंदरातून होते. येथील शेअरबाजार जुना व जगप्रसिद्ध आहे. येथे विमाकंपन्या, बँका आदींच्या मुख्य कचेऱ्या व अंतर्गत व्यापाराची पेठ असल्याने आर्थिक घडामोडींचे केंद्र म्हणून ॲम्स्टरडॅमला महत्त्व आहे. दळणवळणाच्या अत्याधुनिक सोयी असूनही सायकलींचे प्रमाण येथे फार मोठे आहे.
ॲम्स्टरडॅम औद्योगिक शहर आहे. हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या येथील व्यवसायाला जागतिक महत्त्व आहे. लोखंड, रंग, रसायने, साबू, तेल, खाद्यपदार्थ, कागद, कातडीकाम, साखरशुद्धी-कारखाने, जहाजबांधणी, गोद्या, मुद्राक्षर-ओतशाळा, ग्रंथ-प्रकाशन आदींना औद्योगिक क्षेत्रात अग्रस्थान आहे. १९५० मध्ये औद्योगिक कामगार दीड लाखांवर होते. त्यांपैकी २५ टक्के स्त्रिया होत्या.
नेदर्लंड्च्या सांस्कृतिक जीवनात ॲम्स्टरडॅमला विशेष महत्त्व आहे. चित्रकार हॉबेमा, कोनिंक कुटुंब, व्हेल्डे कुटुंब व तत्त्वज्ञ स्पिनोझा, यांचे हे जन्मस्थान, तर सुप्रसिद्ध चित्रकार रेम्ब्रँटची ही कर्मभूमी असल्याने त्याच्याशी निगडित असलेल्या ॲम्स्टरडॅममधील वास्तू यात्रास्थानेच बनल्या आहेत. नेपोलियनने १८०८ मध्ये स्थापलेल्या येथील राष्ट्रीय संग्रहालयात रेम्ब्रँटची व अन्य चित्रकारांची प्रसिद्ध चित्रे आहेत. येथील महानगरपालिकेचे संग्रहालय (यात व्हान गॉखचा चित्रसंग्रह आहे), रेम्ब्रँटच्या निवासस्थानातील संग्रहालय व अन्य संग्रहालयेही प्रसिद्ध आहेत, १६३२ मध्ये स्थापन झालेल्या अकादमीचे १८७६ मध्ये विद्यापीठात रूपांतर झाल्यापासून उच्च शिक्षण व संशोधनक्षेत्रातही ॲम्स्टरडॅमला मोलाचे कार्य होते. शहराजवळ अलीकडे ‘बॉस प्लॅन’ नावाचे कृत्रिम वन तयार करण्यात आल्याने शहराच्या शोभेत भर पडली आहे.
ॲम्स्टरडॅममध्ये नव्याजुन्याचा सुंदर मिलाफ झालेला असून, १५-१६ व्या शतकातील न्यू कर्क हे गॉथिक चर्च, १७ व्या शतकातील राजवाडा, १४ व्या शतकातील जुने चर्च, १६ व्या शतकातील नगरभुवन वगैरे वास्तुकलेचे ऐतिहासिक नमुने शहराच्या आकर्षणात भर घालतात.
दुसऱ्या महायुद्धातील जर्मन बाँबहल्ल्यांमुळे ॲम्स्टरडॅमला बरीच झळ पोहोचली. पण झालेले नुकसान युद्धोत्तर काळात योजनाबद्ध रीतीने भरून काढून शहराचे सौंदर्य वाढविण्यात आले आहे. ‘यूरोपातील एक अग्रगण्य व्यापारी व औद्योगिक शहर आणि कलेचे माहेरघर’ अशी आजही ॲम्स्टरडॅमची ख्याती आहे.
ओक, द. ह.
“