अली : (सु. ६००—२४ जानेवारी ६६१). इस्लामी परंपरेतील चौथा खलीफा मुहंमद पैगंबरांचा चुलत भाऊ व जावई. त्याचे संपूर्ण नाव अली बिन अबू तालिब. फातिमा ही त्याची पत्नी व हसन-हुसेन हे पुत्र. खदीजानंतर मुहंमदांचा तोच पहिला किंवा दुसरा अनुयायी होय. ज्या दहा व्यक्तींवर मुहंमदांचा प्रत्यक्ष अनुग्रह झाला होता, त्यात अलीही होता. तसेच दुसरा खलीफा⇨उमर याने आपल्या मृत्युसमयी खलीफा होण्यास पात्र असणाऱ्या ज्या सहा व्यक्तींची निवड केली होती, त्यांतही अली होता.
मुहंमद पैगंबरांस मक्केहून मदीनेस (यस्रिब) गुप्तपणे निघून जाण्यास अलीने मदत केली होती. एका तेबूक लढाईचा अपवाद सोडल्यास जवळ-जवळ सर्वच लढायांत अली मुहंमदांबरोबर होता. तेबूकच्या लढाईच्या वेळी अलीवर मदीनेच्या संरक्षणाची जबाबदारी होती. ६२८ मध्ये फदक येथील ज्यू जमातीविरुद्धच्या लढाईचे नेतृत्व अलीने एकट्यानेच केले होते. ६३० मध्ये मुहंमदांनी त्याला मीना येथे लोकांपुढे कुराणातील ९ व्या सूरेचे जाहीर वाचन करण्यासाठी पाठविले होते. ६३१-३२ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली येमेनची लढाई झाली आणि परिणामी हमदानींनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला.
खलीफा उमर यास अलीनेच इस्लामी कालगणना (हिजरी सन) सुरू करण्याचा सल्ला दिला होता. खलीफा ⇨उस्मानविरुद्ध जेव्हा असंतोष पसरला, तेव्हा उस्मान व असंतुष्ट लोक यांच्यात अलीनेच मध्यस्थी केली. लोकांचा अलीवर विश्वास होता. खलीफा उस्मानच्या खुनानंतर अलीची खलीफा म्हणून निवड झाली आणि २४ जून ६५६ रोजी मदीना येथे त्याला खलीफाची वस्रे बहाल केली गेली. नंतर तो मदीना सोडून आयेशा, तलह आणि झुबेर यांचे बंड मोडून काढण्यासाठी बसरा येथे गेला. ४ डिसेंबर ६५६ रोजी त्याने त्यांचा पराभव केला.‘उंटाची लढाई’म्हणून ही लढाई प्रसिद्ध आहे. याच वर्षी त्याने इराकमधील कूफा जिंकून घेतले आणि आपली राजधानी मदीनेहून कूफा येथे हलविली, जुलै ६५७ मध्ये त्याने रक्काजवळ युफ्रेटीस नदी पार करून मुआवियाशी सतत दोन महिने लढा दिला. अली हा अत्यंत शूर व अनुभवी योद्धा होता आणि ही लढाईही त्याने जवळजवळ जिंकलीच होती तथापि खलीफापदाचा निर्णय लवादामार्फत करण्याचे मान्य करणे भाग पडल्यामुळे त्याला खलीफापद गमवावे लागले. लवादाची कल्पना अलीने मान्य केल्यामुळे त्याच्या पक्षात फूट पडून संघर्ष सुरू झाला.‘ईश्वराशिवाय कोणाचाही निर्णय असू शकत नाही ’, अशी त्यांतील एका पक्षाची घोषणा होती. त्यांनी अली, उस्मान व मुआविया हे अश्रद्ध व धर्मद्रोही असून त्यांच्याविरुद्धच धर्मयुद्ध करावयास हवे असे प्रतिपादन केले. या वेळेपासून हा पंथ ‘खारिजी’ (म्हणजे फुटीर किंवा वेगळे झालेले) म्हणून ओळखला जाऊ लागला.
अलीने १७ जुलै ६५९ रोजी खारिजींचा नारवान येथे संपूर्ण पराभव केला तथापि मुआवियाचे पारिपत्य करण्यासाठी त्याला पुरेसा अवधी मिळाला नाही, कारण अब्द अल्-रहमान बिन मुल्जम नावाच्या खारिजीने अलीचा तो मशिदीत प्रवेश करत असताना खून केला.
अली मदीना येथे असताना त्याची मते प्रमाणभूत मानली जात आणि कठीण प्रश्नावर त्याचा सल्ला घेतला जाई. तो वृत्तीने अत्यंत धार्मिक व उदार होता. कुशल राज्यकर्ता मात्र त्याला म्हणता यावयाचे नाही. शिया पंथात त्याला मुहंमद पैगंबरांच्या खालोखाल आदराचे स्थान आहे. शियांच्या मते अली हा ईश्वराचा मित्र
(‘वली अल्ला’) आहे त्यामुळेच त्याच्या शब्दाला पावित्र्य प्राप्त होते. शिया पंथातील सर्वच पंथोपपंथांच्या मते अली हा इस्लाममधील सर्वश्रेष्ठ संत असून ह्या गुणामुळेच तो मुहंमदांहून वेगळा आहे. मुहंमद हे एकमेव
‘नबी’म्हणजे ईश्वराचे प्रेषित आहेत. अली हा ‘इमाम’, ‘योद्धा’ व ‘संत’ होता, याबाबत सर्व शिया पंथोपपंथांचे एकमत आहे. शौर्य व संतत्व ह्या गुणांविषयी अलीसंबंधी अनेक आख्यायिका आहेत. त्याने केलेल्या अनेक अद्भुत चमत्कारां-संबंधीही आख्यायिका आहेत. त्याच्या कूफाजवळील कबरीभोवती शियांनी अल्-नजफ हे शहर वसविले [→ शिया पंथ].
शियांमधील नुसैरी हा उपपंथ अलीला ईश्वारावतार मानतो. अली हा त्रयदेवांतील (ट्रिनिटी) पहिला देव आहे, असे ते मानतात. हा नुसैरी पंथ इराणमध्ये अजूनही ‘अली-इलाही’ ह्या नावाने ओळखला जातो.
सुर्वे, भा. ग.
“