आंतरराष्ट्रीय देणीघेणी निर्धारण बँक : (बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स). ह्या बँकेची स्थापना बाझेल (स्वित्झर्लंड) येथे १९३० मध्ये पुढील उद्दिष्टांसाठी करण्यात आली : (१) पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीकडून नुकसानभरपाईच्या रकमा घेऊन त्यांचे दोस्त राष्ट्रांत वाटप करण्याची जबाबदारी घेणे (२) जगातील विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांमध्ये सहकारभाव वाढण्याकरिता प्रोत्साहन देणे व आंतरराष्ट्रीय चलनविषयक व्यवहारसौकर्याचा प्रयत्‍न करणे आणि (३) बँकेकडे विश्वस्त किंवा मुखत्यार म्हणून त्या त्या देशाने सोपविलेल्या आंतरराष्ट्रीय चलनविषयक देण्याघेण्यांचा हिशेब पूर्ण करणे.

बँकेचे मूळ भांडवल पन्नास कोटी सुवर्णफ्रँक ठरविण्यात आले १९६१ पर्यंत त्यापैकी एकचतुर्थांश भांडवल जमा होऊ शकले. ह्या भांडवलाची हमी समान भागांत बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इंग्‍लंड व इटली ह्या देशांच्या मध्यवर्ती बँका आणि जपान व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील बँकगट ह्यांनी घेतलेली होती. १९५१ मध्ये जपानने बँकेवरील भागभांडवल स्वरूपातील आपले हक्क सोडल्यावर यूरोपीय मध्यवर्ती बँकांनी ते भाग १९५२ मध्ये परत खरेदी केले. १९६० नंतरच्या काळात अमेरिकेचे बहुतेक सर्व भागभांडवल सर्व यूरोपीय मध्यवर्ती बँकांच्या हाती गेले. प्रारंभी जर्मनीकडून युद्धनुकसानभरपाईची रक्कम घेऊन ती प्रत्येक जेत्या देशाला काही ठराविक प्रमाणात सुपूर्द करण्याचे काम बँकेकडे होते. परंतु ⇨महामंदीमुळे जर्मनीने द्यावयाची रक्कम १९३१ च्या हूव्हर अधिस्थगनामुळे रद्द करण्यात आली. ह्या आर्थिक संकटाच्या निरसनकार्यात बँकेने भाग घेतला आणि आंतरराष्ट्रीय कर्जे देऊन तो पार पाडला. बँकेने जर्मनीत सु. तीस कोटी सुवर्णफ्रँकांची गुंतवणूक केली १९५३ मध्ये ह्या गुंतवणुकीच्या देण्याघेण्यांचे हिशेब पूर्ण करण्याच्या संदर्भात करार करण्यात आला.

बँकेचा ताळेबंद ३० सप्टेंबर १९७३ रोजी ३,०११·८८ कोटी सुवर्णफ्रँक होता बँकेचे प्राधिकृत, विक्रीस काढलेले आणि भरणा झालेले भांडवल अनुक्रमे १५० कोटी, १२० कोटी व ३० कोटी सुवर्णफ्रँक होते राखीव निधी ५४·८२ कोटी सुवर्णफ्रँक होता. एखाद्या संस्थेस मध्यवर्ती बँकेकडून मिळणाऱ्या पैशाच्या बदली जलद द्रव्यरोखता उपलब्ध करता येण्याच्या दृष्टीने आणि ह्या बँकेच्या अनेकविध सुवर्णव्यवहारांचा पाया म्हणून, हे द्रव्य सोन्यात ठेवण्यात येते. विशिष्ट देशाच्या चलनविषयक धोरणाच्या चौकटीत बसू शकतील, असेच व्यवहार ही बँक नियमानुसार करते. कर्जे देणे आणि सोने व परदेशी हुंडणावळ यांच्या खरेदी-विक्रिसंबंधातील बँकेचे व्यवहार अल्प मुदतीचे असतात. १९४५ हे वर्ष वगळता, प्रत्येक वर्षी बँकेला फायदा झालेला आहे.

रचना : बेल्जियम, फ्रान्स, प. जर्मनी, इटली, नेदर्लंड्स, स्वीडन, स्वित्झर्लंड व इंग्‍लंड या देशांच्या मध्यवर्ती बँकांचे नियामक किंवा अध्यक्ष आणि त्यांनी सुचविलेले आणखी पाच सभासद मिळून तेरा सभासदांच्या मंडळाकरवी बँकेचे प्रशासन चालते.

मार्शल योजनेखालील पहिल्या आंतरयूरोपीय नुकसानभरपाई कराराच्या अंमलबजावणीसाठी मुखत्यार म्हणून बँकेची नियुक्ती झाली. १९५० मध्ये यूरोपीय द्रव्यभरपाई संघाच्या बाबतीतही बँक यूरोपीय आर्थिक सहकारसंघटनेची प्रतिनिधी म्हणून काम करू लागली. १९५८ मध्ये त्या संघाचे विसर्जन झाल्यावर बँकेची यूरोपीय चलनविषयक करारांबाबत ‘आर्थिक सहकार व विकास संघटने’ची (ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट) मुखत्यार म्हणून नियुक्ती झाली. बँक आणि यूरोपीय कोळसा व पोलाद समुच्चय (युरोपियन कोल अँड स्टील कम्यूनिटी) ह्यांच्यामध्ये झालेल्या एका करारान्वये काही कामे बँकेकडे सोपविण्यात आली.

बँकेचा आर्थिक व चलनविषयक विभाग वार्षिक अहवाल तयार करतो. ह्या विभागाने विशिष्ट देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या विनंतीवरून, विशिष्ट देशाच्या वा प्रदेशांच्या (उदा., ऑस्ट्रिया, फ्रान्स, इटली आणि स्टर्लिंगविभागातील देश) आर्थिक व चलनविषयक स्थितीचे विशेष अभ्यासअहवाल तयार केले आहेत.

ही खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय बँक असून तिने यूरोपीय मध्यवर्ती बँकांसाठी, आर्थिक व चलनविषयक संशोधन व मार्गदर्शनकेंद्र म्हणून आणि विशिष्ट करारांच्या पूर्ततेसाठी मुखत्यार म्हणून आपल्या सेवा उपलब्ध केल्या आहेत. ह्या बँकेमुळे विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या उच्चाधिकाऱ्यांची एकत्र भेट होऊन परस्परांत विचारांचे आदानप्रदान होत राहावे, हाच बँकसंस्थापकांच्या मनात प्रमुख हेतू होता तो सफल होत आहे. बाझेलमध्ये बँकेच्या संचालनमंडळाच्या दरमहा बैठकी होतात इतर देशांच्या मध्यवर्ती बँकांचे नियामकही या बँकेच्या वार्षिक व प्रासंगिक सभांना उपस्थित राहतात. दोन जानेवारी १९७० रोजी जपानने आणि कॅनडाने बँकेचे सदस्यत्व स्वीकारल्यामुळे तिचे कार्यक्षेत्र अधिकच विस्तारले आहे.

गद्रे, वि. रा.