कृषिविकास, भारतातील : भारतातील शेती बव्हंशी मोसमी पावसावर अवलंबून आहे. एकूण पावसापैकी सु. पाऊण हिस्सा पाऊस जून-सप्टेंबर या काळात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पडतो. जवळ-जवळ संपूर्ण उत्तर भारत व दक्षिणेच्या पठराचा बहुतेक भाग हे नैर्ऋत्य मान्सूनवर अवलंबून आहेत. दक्षिण पठराच्या आग्नेय भागी मात्र मोसमी वारे परतत असताना ऑक्टोबर-डिसेंबर या महिन्यांत बराच पाऊस पडतो. याच काळात मध्य प्रदेश आणि हैदराबादच्या काही भागांत थोडाफार पाऊस पडतो. 

भारताचे सरासरी पर्जन्यमान सु. १०६·६ सेंमी. असले, तरी त्यात अंतर्गत प्रादेशिक असमानता फार आहे. आसाममध्ये चेरापुंजी येथे सु. १,०८७ सेंमी., तर राजस्थानातील काही भागांत ५० सेंमी. पेक्षाही कमी पाऊस पडतो. शिवाय सालोसालच्या पर्जन्यमानातही बरीच तफावत पडते. एक वर्ष चांगले, एक वर्ष वाईट व तीन वर्षे सर्वसाधारण असे पाच वर्षांचे चक्र पावसाच्या बाबतीत आढळून येते. त्यातच ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी, तेथेच तो अधिक बेभरवशी असलेला दिसतो. शिवाय पाऊस नुसताच पुरेसा पडून उपयोग नसतो त्याची कालवार विभागणीही योग्य असावी लागते. या बाबतीतही बरेच अस्थैर्य दिसून येते. मोसमी पाऊस रत्नागिरी भागात साधारणपणे ७ जूनला सुरू होतो, असे म्हटले तरी क्वचित अगदी लवकर म्हणजे २२ मे रोजी किंवा अगदी उशिरा म्हणजे १९ जूनलाही तो सुरू झाल्याची उदाहरणे आहेत. या सर्व प्रकारच्या अस्थैर्याचा शेतीवर नेहमीचा प्रभाव पडलेला आहे. दर वीस वर्षांनी फार मोठे अवर्षण (१८७७, १८९९, १९१८). अतिवृष्टी आणि पूर (१८७८, १८९२, १९१७) यांचे फटके शेतीला बसत असल्याचे मागच्या १०० वर्षांच्या इतिहासावरून दिसून येते. १९७०–७३ या तीन वर्षांच्या कालावधीत भारतातील अनेक राज्यांत दुष्काळ पडला होता.

पिके : भारतातील कसणुकीच्या जमिनीपैकी सु. ८०% जमिनीवर अन्नपिके (धान्ये, कडधान्ये, भाजीपाला इ.) व इतर जमिनीवर अन्नेतर पिके काढली जातात. १% हून काहीशी कमी जमीन चहा, कॉफी इत्यादींच्या मळ्यांखाली आहे. बाकीच्या सु. १९% जमिनीवर कापूस, ताग, तेलबिया इ. नगदी पिके लावली जातात.

कापूस  

५·१% 

ताग 

०·६% 

तेलबिया(गळिताची धान्ये) 

९·३% 

मळे  

०·८% 

अन्नपिकांखालील क्षेत्रात धान्यांचा भाग सु. ६०% असून धान्यांमध्येही ५०% जमीन तांदूळ व गहू या दोन धान्यांनी व्यापलेली आहे. त्यातही तांदूळ हे सर्वांत महत्त्वाचे धान्य आहे. एकूण कसणुकीच्या क्षेत्रापैकी २३% क्षेत्र भाताखाली व सु. ९% क्षेत्र गव्हाखाली आहे. यानंतर क्रमाने ज्वारी, बाजरी, रागी इ. निकृष्ट धान्ये येतात. फळे आणि भाजीपाल यांची निपज फारच थोडी असून एकूण कसणुकीच्या क्षेत्रापैकी फक्त १·५% क्षेत्र अशा लागवडीखाली येते.

महत्त्वाच्या व्यापारी पिकांखाली होणारी कसणुकीच्या क्षेत्रांची विभागणी वरीलप्रमाणे आहे. 

स्वातंत्र्योत्तर काळ : कृषि-उत्पादन : योजनाकाळात सर्वच मुख्य पिकांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. अन्नधान्यांचे एकूण उत्पादन पुढीलप्रमाणे वाढले.         

कृषिउत्पादनाचे निर्देशांक (१९४९-५०=१००) 

वर्ष 

अन्नधान्ये 

तेलबिया 

ताग व कापूस 

चहा, कॉफी, रबर 

इतर 

एकूण 

१९५०-५१ 

९०·५ 

९८·५ 

१०८·६ 

१०४·० 

११०·३ 

९५·६ 

१९५५-५६ 

११५·३ 

१०८·६ 

१४९·७ 

११३·२ 

१२०·१ 

११६·८ 

१९६०-६१ 

१३७·१ 

१३४·१ 

१७६·० 

१२९·२ 

१६३·४ 

१४२·२ 

१९६५-६६ 

१२१·३ 

१२६·५ 

१६५·२ 

– 

१५७·० 

१३३·१ 

१९६८-६९ 

१५७·५ 

१३४·२ 

१६०·२ 

१६९·३ 

१८२·६ 

१५९·५ 

१९६९-७० 

१६८·६ 

१४९·० 

१९०·१ 

१६४·५ 

१८४·६ 

१६९·९ 

कापसाचे उत्पादन १९५०-५१ साली २८·७ लाख गासड्या होतेते १९७२-७३ साली ५५ लाख गासड्यां पर्यंत वाढले. तागाचे उत्पादन याच काळात ३३ लाख गासड्यांपासून ६० लाख गासड्यांपर्यंत वाढले. पाच प्रमुख तेलबियांच्या उत्पादनात याच काळात ५१·५ लाख टनांपासून ६७ लाख टनापर्यंत वाढ झाली. निर्देशांकांच्या स्वरूपात शेतीउत्पादनातील वाढ खालील तक्त्यावरून स्पष्ट होते. वरील निर्देशांकांवरून असे आढळते की, स्वातंत्र्योत्तर काळात अन्नधान्यांचे उत्पादन व एकूण शेतीउत्पादन २० वर्षांत सु. ७० टक्क्यांनी वाढले, म्हणजे  प्रतिवर्षी सरासरी ३·५ टक्क्यांनी वाढले. ह्यांपैकी  निम्मी  वाढ  लागवडीखालील क्षेत्र वाढल्यामुळे झाली  आहे. पुढीलकाळात  लागवडीखालील  क्षेत्र  वाढण्याची शक्यता बरीच कमी असल्याने उत्पादनवाढीची  मदार दर  हेक्टरी उत्पादनवाढीवर अवलंबून राहील चौथ्या पंचवार्षिक योजनेअखेर (१९७३-७४  साली)  अन्नधान्याचे उत्पादन १२·९  कोटी  टन,  कापसाचे उत्पादन ८० लाख  गासड्या,  तागाचे ७४ लाख गासड्या  आणि  तेलबियांचे उत्पादन १०५ लाख  टनांपर्यंत  वाढेल, असा अंदाज होता.

अन्नधान्यांचे उत्पादन

वर्ष

कोटी टन

१९५०-५१

५·४९

१९५५-५६

६·६९

१९६०-६१

८·२०

१९६५-६६

७·२३

१९६६-६७

७·४२

१९६७-६८

९·५१

१९६८-६९

९·४०

१९६९-७०

९·९५

१९७०-७१

१०·७८

१९७१-७२

१०·५२

१९७२-७३

९·५२

 

पाणीपुरवठा : भारतातील वहीत जमिनीपैकी ७५% जमीन पिकासाठी केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. म्हणून शेतीउत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने सिंचनाच्या सुविधा जास्त प्रमाणावर पुरवून योग्य वेळी पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करू देणे, हे कृषिविकासास अत्यंत आवश्यक आहे. १९५०-५१ मध्ये सिंचित जमिनीचे क्षेत्र २·२६ कोटी हे. होते ते १९६९-७० अखेर ३·७५ कोटी हे. पर्यंत वाढले. १९५१ मध्ये मोठ्या मध्यम सिंचन योजनांखाली ९७ लाख हे. जमीन होती. १९७१ मार्चअखेर हाती घेतलेल्या ५५७ सिंचन योजनांपैकी ३४५ पुऱ्या झाल्या व त्यांच्यामुळे आणखी १४० लाख हे. क्षेत्राला पाणीपुरवठा उपलब्ध होऊन या योजनांखालील सिंचित क्षेत्र एकूण २·३७ कोटी हे. झाले आहे म्हणजे हे क्षेत्र दुपटीहून अधिक झाले. लहान सिंचन योजनांखाली स्वातंत्र्यपूर्व काळी १·२९ कोटी हे. जमीन होती. ती मार्च १९६७ अखेर १·७७ कोटी हे. पर्यंत वाढली. मोठ्या व मध्यम सिंचन योजनांवरील खर्च पृष्ठ क्र. १७१ वर दाखविल्याप्रमाणे झाला : १९५१-५२ ते १९७२-७३ या काळात मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पांवर २,६७१ कोटी रु. खर्च करण्यात आले. लहान सिंचन योजनांवर पहिल्या तीन योजनाकाळात व १९६६-६७ वर्षी मिळून एकूण ७७९ कोटी रु. खर्च झाले. 

सिंचनासाठी संभाव्य पाणीपुरवठ्याची मोजणी करता पृष्ठभागावर उपलब्ध होऊ शकणारे एकूण पाणी १६८ दशलक्ष हे.मी. असल्याचे आढळते. त्यापैकी फक्त ५६ दशलक्ष हे.मी. इतकेच पाणी सिंचनासाठी वापरता येणे शक्य आहे. १९५१ मध्ये केवळ ९·५ दशलक्ष हे. मी. पाणीच सिंचनासाठी वापरले जाई. १९६८-६९ साली असे वापरात आलेले पाणी २०·५ दशलक्ष हे. मी. इतके होते. चौथ्या योजनाकाळात आणखी ५ दशलक्ष हे. मी. पाण्याचा सिंचनासाठी उपयोग करण्यात यावा, असे उद्दिष्ट होते. 

सिंचनासाठी उपलब्ध होऊ शकेल असे पृष्ठांतर्गत पाणी २२ दशलक्ष हे.मी. असून त्याचा पुरवठा २२ दशलक्ष हे. जमिनीला होऊ शकेल. सध्या जवळजवळ ११ दशलक्ष हे. जमिनीला पृष्ठांतर्गत पाण्याच्या सिंचनयोजना पाणीपुरवठा करतात व आणखी तेवढ्याच क्षेत्रात  अशायोजनांची  सोय  करतायेण्यासारखी आहे.


सिंचन योजनांवरील खर्च

काळ

खर्च (कोटी रु.)

पहिली योजना

३८०

दुसरी योजना

३८०

तिसरी योजना

५७६

वार्षिक योजना (१९६६-६७ ते १९६९-७०)

६२०

चौथी योजना (अपेक्षित)

१,०८६

 

भारतात लागवडी योग्य जमीन १७५ दशलक्ष हे. आहे. तीपैकी १३८ दशलक्ष हे. लागवडीखाली असून एकूण वहीत जमीन १५८ दशलक्ष हे. आहे. यापैकी एकूण ८२ दशलक्ष हे. जमिनीस पृष्ठभागावरील व पृष्ठांतर्गत पाण्याचा पुरवठा करता येण्यासारखा आहे, तसेच पुढील १५–२० वर्षांत सिंचनयोजनांनी हे कार्य साधू शकेल असा अंदाज आहे. 

पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण व्हावीत, पण जमिनीला पाणी मिळण्याला फार विलंब लागावा, असा प्रकार प्रारंभीच्या काळी बराच झाला. पण निर्मित सिंचनशक्ती व प्रत्यक्ष सिंचन यांतील अशी तफावत उत्तरोत्तर कमी होत गेली आहे. चौथ्या योजनेत नवी मोठी कामे होती घेण्यापेक्षा चालू कामे त्वरेने पूर्ण करण्यावर व पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने उद्‌भवणारे इतर प्रश्न सोडविण्यावर विशेष भर आहे. याशिवाय नद्यांच्या खोऱ्यांतील प्रदेशात पाणी, जमीन व इतर साधनसामग्री यांचा समुच्चित उपयोग करून एकसंध विकास साधण्याच्या योजनाही हाती घेण्यात येणार आहेत. याच संदर्भात केंद्रीय शासनाने एक सिंचन आयोगही नेमला असून त्याच्या शिफारशीनुसार कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.

 

सहकार आणि शेती : ग्रामीण जनतेच्या, विशेषतः दलित शेतकऱ्यांच्या, आर्थिक विकासाठी सहकाराचे अत्यंत महत्त्व आहे, यावर प्रत्येक योजनाकाळात भर देण्यात आला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात झालेली सहकारी चळवळीची प्रगती व सहकारी संस्थांची वाढ खालील आकडेवारीवरून स्पष्ट होते :

बाबी

१९५१-५२

१९६१-६२

१९६६-६७

१९७०-७१

संस्थांची संख्या (हजार)

१८६

३४२

३३३

३२०

सभासद संख्या (लक्ष)

१३८

३७८

५५९

५९०·६

भाग भांडवल (कोटी रु.)

४९

२६०

५१४

८५०·७

खेळते भांडवल (कोटी रु.)

३०६

१,५३५

३,१८२

६,८०९

गेल्या दहा वर्षात झालेल्या योजनाबद्ध प्रयत्नांमुळे सहकारी संस्थांच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील कार्यामध्ये बरीच वाढ झाली आहे. शेतीकर्जपुरवठा, शेतमालाची विक्री, शेतीसाधनांची खरेदी व वाटप, शेतमालाचे संस्करण व व्यापार इ. क्षेत्रात सहकारी संस्थांनी वाढती जबाबदारी स्वीकारली आहे. सहकारी चळवळीच्या क्षेत्रात एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ निम्म्या लोकांचा समावेश सध्या होत आहे. चौथ्या योजनेतही सहकारी क्षेत्राचा विस्तार आणखी वाढविण्यावर भर दिला आहे.  


सहकारी संस्थांची कार्यव्याप्ती वाढली असली, तरी ग्रामीण भागात  असलेल्या  कर्जाची  मागणी  व  गरजा  यांच्या  मानाने सहकारी संस्थांनी कर्जपुरवठ्याची आणखी कितीतरी जबाबदारी घेणे आवश्यक आहे. १९५१-५२ साली शेतकर्‍यांना एकूण लागणाऱ्या कर्जापैकी फक्त सु. ३·१% कर्जच सहकारी संस्थांमार्फत मिळत असे. हे प्रमाण १९६१-६२ साली १५·५ पर्यंत वाढले आणि सध्या ते सु. ३०% असावे.

प्राथमिक शेतीकर्जपुरवठा सहकारी संस्थांचा विकास खालील तक्त्यात दाखविला आहे :

 

१९५१-५२ 

१९६१-६२

१९७०-७१

संस्थांची संख्या

१,०७,९२५

२,१५,०८१

१,६०,७८०

सभासद संख्या (हजार)

४,७७७

१९,५७२

३०,९६३

भाग भांडवल (लक्ष रु.)

८९२

६,८६१

२०,५७४

खेळते भांडवल (लक्ष रु.)

४,५२२

३२,५३३

१,१५,३४०

वर्षातील कर्जपुरवठा (कोटी रु.)

२४.२१

२२८.३१

५७७.८८

थकबाकी (कोटी रु.)

८·५२

६२·९३

३२२·३६

कर्जपुरवठा करण्याच्या बाबतीत सहकारी संस्थांनी केलेली प्रगती खालील तक्त्यात दिसून येते :

 

दुसर्‍या योजने अखेर

तिसर्‍यायोजने अखेर

१९७०

ते

१९७१

चौथ्या

योजनेतील

उद्दीष्ट

प्राथमिक कर्जपुरवठा संस्था (लक्ष)

२·१

१·९७

१·६१

१·२०

सभासद संख्या (कोटी)

१·७०

२·७०

३·०९

४·२०

खेड्यांची व्याप्ती (शेकडा)

७५

९०

९५

कर्जपुरवठा :

       

अल्प व मध्यम मुदती (कोटी रु.)

२०३

३४६

५७८

७५०

दीर्घमुदती (कोटी रु.)

३८

१६५

१७०

७००

कर्जपुरवठ्याचे धोरण लहान शेतकऱ्यांना जास्त सोईचे व्हावे असे  प्रयत्न  चालू  आहेत. खतांचा  पुरवठा करण्यासाठी सहकारी संस्थांना बँकांकडून कर्जे मिळणे सुलभ झाले आहे. भूविकास बँकांनीही दीर्घमुदती कर्जे देण्याबाबत बरीच प्रगती केली आहे. ग्रामीण विद्युतीकरण निगमाची १९६९ मध्ये स्थापना झाली असून त्यामार्फत ग्रामीण  विद्युत् सहकारी संस्थांना मदत करण्यात येत आहे. त्याचप्रमणे संसद अधिनियमान्वये राष्ट्रीय सहकारी विकास निगमाची स्थापना झाली असून या निगमाकडे शेतमालाचे उत्पादन, संस्करण, साठवण आणि विपणन यांची सोय सहकारी संस्थांमार्फत अधिकाधिक प्रमाणावर करण्याची जबाबदारी आहे. 

सहकारी चळवळीची गेल्या २० वर्षात मोठी प्रगती झाली असली, तरी कर्जपुरवठा सोडून इतर क्षेत्रांत तिची चाल मंद आहे. झालेली प्रगती आकडेवारीत मोठी दिसत असली, तरी गुणवत्तेच्या दृष्टीने बऱ्याच सुधारणेला अद्याप वाव आहे [→ कृषिअर्थकारण सहकार].

भूसुधारणा व शेती :जमीनदार, जहागिरदार, इनामदार इ. मध्यस्थ वर्गाचे उच्चाटन करणे, कसणाऱ्या कुळांना संरक्षण देणे व त्यां चे खंड कमी करणे, त्यांना जमिनीचे मालक किंवा कब्जेदार बनविणे, जमीनधारणावर कमाल मर्यादा घालून तिचे अधिक समान वाटप करणे,धारणाचे वेगवेगळे तुकडे एकत्र करणे आणि सहकारी शेतीला उत्तेजन देणे, असा विविध कार्यक्रम भूसुधारणांच्या कक्षेत येतो [→ भूसुधारणा].

   मध्यस्थांचे उच्चाटन भारतात सगळीकडे करण्यात आले आहे. जवळजवळ १७ कोटी एकर (एकूण वहीत जमिनीच्या ४५%) क्षेत्रावरून मध्यस्थ बाजूला करण्यात आले असून सु. २ कोटी कुळांना कब्जेदारीचे हक्क बहाल करण्यात आले आहेत. कुळांना संरक्षण देणारे व खंडाची पातळी कमी करणारे कायदे बहुतेक राज्यांमधून करण्यात आले आहेत. परंतु कायद्यातील तरतुदी व वस्तुस्थिती यांत बरीच तफावत आढळते ती दूर होणे जरूर आहे. तसे झाल्यास भूसुधारणांची कार्यवाही प्रगत शेतीला अधिक उपकारक होऊ शकेल [→ कृषिनीति].

जमीनधारणावर कमाल मर्यादा व वरकड जमिनीचे वाटप यांबाबत फारसे यश न आल्यामुळे, १९७२ पासून या प्रश्नाकडे विशेष लक्ष पुरविण्यात येऊ लागले. जमीन वाटपातील विषमता कमी व्हावी, या उद्देशाने केंद्रीय शासनाने आखलेल्या धोरणानुसार निरनिराळ्या राज्यांत अधिनियम संमत केले जात आहेत. 


पशुधन : सर्व प्रकारच्या मनुष्यजीवनोपयोगी प्राण्यांची संख्या भारतात इतर कोणत्याही देशापेक्षा मोठी आहे. १९६६ च्या पशुधन गणनेनुसार प्राण्यांची एकूण संख्या ३४·४ कोटी आहे. एकूण पशुधनाचा बराचसा बाग अशक्त व रोगट असल्यामुळे जवळजवळ निकामी आहे त्यामुळे दूध, मांस, अंडी इ. सत्त्वयुक्त अन्नाचे उत्पादन कातडी, लोकर इ. औद्योगिक मालाचे उत्पादन व शेतीची आणि वाहतुकीची कामे यांसाठी त्यांचा फार थोडा उपयोग होतो. एकूण कृषिउत्पादनापैकी फक्त १२% उत्पादन पशुधनापासून उपलब्ध होत आहे. शिवाय निकामी जनावरांमुळे शेतीची प्रगती व माणसांच्या राहणीमानातील सुधारणाही मंदावतात. 

जनावरांची संख्या मर्यादित करणे, श्रमशक्ती व उत्पादनशक्ती वाढविण्यासाठी त्यांच्या अवलादी सुधारणे, चाऱ्याचे उत्पादन वाढविणे, रोगराईचे नियमन करणे व पशुसंगोपन व्यवस्था सुधारणे, ही पशुधनविषयक धोरणाची मुख्य अंगे आहेत. पिकांचे उत्पादन आणि पशुसंगोपन यांची योग्य सांगड घालण्याने कृषिउत्पन्नात वाढ होते, जमिनीची उत्पादकता सुधारते व रोजगारीतही भर पडते. म्हणूनच पशुसंगोपनासाठी चौथ्या योजनेत एकूण ९४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. 

‘पशुधनसुधारणा अधिनियम’ आणि ‘संसर्गजन्य रोगनियंत्रण अधिनियम’ यांन्वये बऱ्याच राज्यांतून प्रसव-नियमन केले जाते आणि पशुवैद्यकीय मदत दिली जाते. पशुसंगोपनासाठी नियोजनकाळात हाती घेतलेला महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे ‘की व्हिलेज स्कीम’ हा होय. ह्या ग्रामीण केंद्रांतून अशक्त जनावरांना खच्ची करणे, जनावरांची कृत्रिम गर्भधारणा करणे, चाऱ्याचे उत्पादन वाढविणे, सहकारी संस्थांमार्फत विक्रीव्यवहारांना उत्तेजन देणे इ. कार्यक्रम संकल्पिलेले आहेत. प्रत्येक गटात ६ ते १० केंद्रगावे, अशा प्रकारचे २०९ गट तिसऱ्या योजनेअखेर अस्तित्वात होते आणि चौथ्या योजनेत आणखी १०० गटांचा अंतर्भाव करण्यात यावयाचा होता केंद्रगावांना नेमून दिलेले काम व्यापक असले, तरी त्यांचा मुख्य भर पशुवैद्यकीय मदतीवर व कृत्रिम प्रजोत्पादनावर असून इतर अंगे दुर्लक्षित आहेत. चारा-उत्पादनाचे फारसे प्रयत्न झालेले नाहीत. शेतीच्या प्रगतीसाठी अतिरिक्त जनावरांचे उच्चाटन होणे, ही फार महत्त्वाची बाब आहे.

दुग्धव्यवसाय : पंचवार्षिक योजनांखाली दुग्धव्यवसाय विकासाचे विशेष प्रयत्न झाले आहेत. १९७०-७१ मध्ये भारतात एकूण १०६ दुग्धव्यवसाय केंद्रे अस्तित्वात होती व आणखी २८ प्रकल्प हाती घेतलेले होते. त्यांचा उद्देश उत्पादकांना योग्य भाव मिळावेत आणि जनतेला योग्य किंमतीत दूधपुरवठा उपलब्ध व्हावा, हा आहे. दुग्धोत्पादकांचे ८,००० सहकारी संघ असून चौथ्या योजनेत संघांचा आकार वाढविणे व सरकारी दुग्धकेंद्रे सहकारी संघांकडे देणे, यांविषयी प्रयत्न करण्याचे धोरण आहे.

   वनसंपत्ती : भारतातील जंगलाखालील क्षेत्र ७·५५ लक्ष चौ. किमी. म्हणजेच एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सु. २३% आहे. भारतात जंगलक्षेत्र प्रतिडोई फक्त ०·१५ हे आहे. १९५२ मध्ये ठरलेल्या वनसंपत्ति-धोरणानुसार जंगलक्षेत्राखाली डोंगराळ भागापैकी ६०% व सपाट प्रदेशातील २०% म्हणजे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी १/३ जमीन आणणे हे उद्दिष्ट आहे. 

जंगलांपासून मिळणाऱ्या उत्पन्नात पहिल्या तीन योजनांमध्ये १९ कोटी रु. पासून १०८ कोटी रु. पर्यंत वाढ झाली आहे. इमारती लाकूड, कागद उत्पादनास लागणारा कच्चा माल, आगकाड्यांसाठी लागणारे लाकूड यांशिवाय गोंद, कातडी कमाईसाठी लागणारे अनेक प्रकारचे पदार्थ व औषधी वनस्पती यांचे उत्पादन जंगलांतून मिळते. म्हणून नवीन जंगले लावणे, त्यांच्या प्रादेशिक विभागणीत समतोल साधणे, वृक्षांची व गवताच्या नव्या जातींची लागवड करणे, उत्पादनाच्या व तोडणीच्या पद्धतींत तांत्रिक सुधारणा करणे, जंगलांचे व्यवस्थापन सुधारणे, उपलब्ध सामग्रीचे नवे औद्योगिक उपयोग शोधून काढणे इ. प्रयत्नांना अद्याप बराच वाव आहे. हा सर्वच विषय संशोधनाच्या दृष्टीनेही काहीसा उपेक्षित राहिला आहे. चौथ्या योजनेत जंगल संशोधन संस्था, डेहराडून आणि जंगल संशोधन प्रयोगशाळा, बंगलोर यांच्या संयुक्त प्रयत्नांनी संशोधन प्रकल्प हाती घेतले जावयाचे होते. १९६५ मध्ये सुरू झालेले जंगलसंपत्तीच्या पाहणीचे कामही पुढे चालू राहणार आहे. 

शेतीचे नियोजन : समाजाच्या वाढत्या आर्थिक गरजा अधिक प्रमाणात भागाव्यात, यासाठी अर्थव्यवहारांचे नियोजन करून त्यांचा जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न भारतात चालू आहे व हेच पंचवार्षिक योजनांचे मुख्य उद्दिष्ट आहे. अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून शेतीचे नियोजन करून कृषिविकास साधण्यात येत आहे. परंतु योजनाकाळात लोकसंख्या आणि वाढती क्रयशक्ती यांच्या वाढीइतकी प्रगती न झाल्यामुळे शेती नियोजनाविषयी आज काहीसे असमाधानही आहे. 

भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतीय कृषि तंत्र मागासलेलेच होते, जमिनीची उत्पादकताही कमी होती, शेतकऱ्यांचे उत्पन्नही अल्पसे होते आणि शेतीउत्पादनातही प्रतिवर्षी खूपच चढउतार होत असत. अशा परिस्थितीतच फाळणीमुळे बरीचशी सुपीक जमीन पा किस्तानकडे गेल्याने कृषिप्रश्न आणखीच बिकट झाला. अन्नधान्याच्या बाबतीत जेमतेम स्वंयपूर्णता असण्याऐवजी भारताला अन्नधान्यासाठी परावलंबी होण्याची पाळी आली. म्हणूनच सुरुवातीस नियोजनधोरणात कृषीला सर्वांत अधिक महत्त्व देण्यात आले. ह्या प्रयत्नांना पहिल्या योज नेत चांगलेच यश मिळाले. एकूण कृषिउत्पादनाचा निर्देशांक १९५०-५१ मध्ये ९५·६ होता तो १९५५-५६ मध्ये ११६·८ पर्यंत वर गेला. दुसऱ्या योजनेत मूलभूत उद्योगांवर विशेष भर असला, तरी कृषीकडे दुर्लक्ष झाले असे म्हणता येत नाही. सिंचनाकडे विशेष लक्ष पुरवून सिंचनक्षेत्रात बरीच वाढ करण्यात आली, परंतु उत्पादनात हवी तेवढी वाढ झाली नाही. लोकसंख्या वाढल्याने धान्याची गरज एकसारखी वाढतच होती. १९६१ मधील लोकसंख्या १९५१ पेक्षा २१ टक्क्यांनी अधिक होती. समाजविकासकार्यक्रमावर विशेष भिस्त टाकली गेली. परंतु तो कार्यक्रम केवळ उत्पादनान्वेषी नसल्याने व अन्नधान्याची मोठ्या प्रमाणावर आयात करणे पी. एल. ४८० मुळे सोपे झाले असल्याने कृषिविकासाचा जोरदार पाठपुरावा करण्याची आवश्यकता विशेष जाणवली नाही. तरीसुद्धा अन्नधान्य उत्पादनाचा निर्देशांक द्वितीय योजनेअखेर १३७·१ पर्यंत  वाढला  व एकूण कृषिउत्पादनाचा निर्देशांक दुसऱ्या योजनाकाळात ११६·८ वरून १४२·२ पर्यंत पोहोचला. याचे निम्मे श्रेय वहीत जमीनविस्ताराला दिले पाहिजे. तिसऱ्या योजनेत कृषिधोरण काहीसे बदलण्यात आले. १९६०-६१ मध्ये तीन जिल्ह्यांत सुरू केलेला सघन शेतीचा कार्यक्रम नंतर १३ जिल्ह्यांना लागू करण्यात आला. तरीसुद्धा कृषितंत्रात फारशी सुधारणा न झाल्यामुळे शेतीउत्पादनात विशेष प्रगती झाली नाही. १९६५-६६ व १९६६-६७ या दोन वर्षांत अन्नपरिस्थिती आणखीच बिघडली. अवर्षणामुळे १९६५ च्या ८९ दशलक्ष टनांवरून अन्नधान्य-उत्पादन १९६६ मध्ये ७२ दशलक्ष टन व १९६७ मध्ये ७४ दशलक्ष टनांपर्यंत खाली आले. सुदैवाने याच सुमारास नवीन सुधारित बियाणे व खते यांच्या वाढत्या वापरामुळे कृषीमध्ये एक प्रकारची क्रांतीच (हरित क्रांती) घडून आली व भारत पुन्हा आपल्या पायावर उभा राहू शकण्याची चिन्हे दिसू लागली. नियोजनाच्या पहिल्या २० वर्षानंतरसुद्धा भारताचा कृषिविकास अपुरा पडला. याची जबाबदारी मुख्यत्वे लोकसंख्यावाढ व तिच्या क्रयशक्तीत झालेल्या वाढीमुळे अन्नधान्याला आलेली वाढती मागणी, या दोन घटकांवरच आहे.

गहू व तांदूळ यांच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती व बाजरी, मका आणि ज्वारी यांच्या संकरित बियाणांचा वापर, खतांचा मुबलक पुरवठा व शेतीतंत्रात योग्य ते बदल यांच्या सहयोगाने धान्योत्पादन वाढविण्याचे प्रयत्न  १९६६-६७ पासून  सुरू  झाले. त्यांचा योग्य  तो  परिणाम  होऊन  अन्नधान्याच्या  उत्पादनाने १९७०-७१ मध्ये १०८ दशलक्ष टनांचा उच्चांक गाठला. १९७२-७३ मध्ये  मात्र  उत्पादन  ९५·२ दशलक्ष  टन  इतकेच  झाले.  ही परिस्थिती  पूर्णतः  समाधानकारक  मानता  येणार नाही कारण गव्हाचे उत्पादन समाधानकारक असून इतर धान्यांच्या उत्पादनातील वाढ  बेताचीच  आहे  व  नगदी  पिकांचे  उत्पादन  तर घटलेच आहे.  एकूण  शेतीउत्पादनात  प्रतिवर्षी  पाच  टक्के  वाढ व्हावी, हे उद्दीष्ट  असूनही  प्रत्यक्षात  वाढ  शेकडा  तीनच्या आसपासच होत आहे. म्हणूनच कृषिउत्पादनवाढीच्या प्रयत्नांवर अजूनही भर देण्याची गरज आहे. कृषिउत्पादनातील  संतुलन, पाणीपुरवठा योजनांचा पुरेपूर उपयोग, कोरडवाहू शेतीच्या उत्पादनतंत्रातील संशोधन व बदल आणि कृषिव्यवसाच्या संघटनांमध्ये आवश्यक ते फेरफार करून कृषिविकास साधणे अत्यंत आवश्यक आहे. असे करताना खालील गोष्टींकडे विशेष लक्ष पुरविले पाहिजे : (१) इतर क्षेत्रांचे योग्य नियोजन व विकास यांवर कृषिविकासाचे यश अवलंबून आहे. (२) कृषिविकासासाठी औद्योगिक क्षेत्रामधून अवजारे, वीज, खते, रोगनाशके, सिंचनयोजनांसाठी  सिमेंट, पोलाद इ. साधने वेळेवर मिळाली पाहिजेत. (३) कृषिविषयक प्रशासनयंत्रणा पुरेशी कार्यक्षम असली पाहिजे. (४) राष्ट्रीय नियोजन स्थानिक नियोजनातून आकारास आले पाहिजे. (५) भावधोरणाबद्दलची  धरसोड  शेतीला मारक होण्याचा संभव असतो. (६) जमीनहक्कासंबंधीच्या  धोरणकार्यवाहीत  व्यत्यय व दिरंगाई झाल्यास शेतीउत्पादनावर त्यांचे प्रतिकूल परिणाम होतात.  (७) वाढत्या उत्पादनाबरोबर भावांच्या पातळीत समतोल राखणे, कर्ज व साधनसामग्रीचा पुरवठा, साठवण व विक्रीची व्यवस्था करणे, इ. जबाबदाऱ्याही यशस्वी रीत्या हाताळणे कृषिविकासास आवश्यक आहे.

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र सु. ३०७·७ लक्ष चौ. किमी. आहे. त्याचा वापर स्थूलमानाने पुढीलप्रमाणे होतो :

वापर प्रकार

महाराष्ट्र राज्य

(टक्केवारी)

भारत

(टक्केवारी)

कसवणुकीची निव्वळ जमीन

५९·५३

४५·७२

चालू पड

३·५२

३·९६

कसण्यायोग्य पण न कसलेली

२·४६

५·४४

चराऊ राने, राया इत्यादी

४·५४

४·५४

इतर पड

३·८१

२·८७

जंगल

१७·५९

२०·४०

नापीक व बिगरशेती इत्यादी

५·७०

१०·६४

इतर जमीन

२·८५

६·४३

एकूण

१००·००

१००·००

ठोक कसणुकीची जमीन १९०·४ लक्ष हे. असून तीपैकी सु. ८·३% जमिनीला पाणीपुरवठ्याची सोय आहे. कसणुकीच्या जमिनीचा वापर स्थूलमानाने खालीलप्रमाणे केला जातो :

अन्नधान्ये

टक्केवारी

धान्ये व डाळी

६७·२५

ऊस

१·१४

फळे व भाज्या

१·०५

मसाल्याचे पदार्थ

१·००

इतर अन्नधान्ये

०·०३

एकूण

७०·४७

बिगर अन्नपिके

टक्केवारी

गळिताची धान्ये

८·८३

कापूस इत्यादी

१४·९२

चारा

५·६७

इतर

०·११

एकूण

२९·५३

समग्र

१००.००

 

महाराष्ट्रात शेतीचे काहीसे व्यापारीकरण झाले आहे ,हे वरील माहितीवरून दिसून येत एकूण कृषिक्षेत्राच्या सु. १/३ जमीन नगदी पिकांखाली असून एकूण शेतीउत्पन्नातील त्यांचा वाटा सु ४५% आहे. पण एरव्ही महाराष्ट्रातील पीकप्रबंध निकृष्ट आहे असेच म्हटले पाहिजे. कारण ज्वारी, बाजरी या हलक्या प्रतींच्या धान्यावरच महाराष्ट्राच्या शेतीची विशेष मदार आहे. 

शेतकरीवर्ग हा लोकसंख्येचा सर्वांत मोठाभाग असून तो एकूण लोकसंख्येच्या ६९·९१% एवढा आहे. अशारीतीने लोकसंख्येच्या उपजीविकेच्या दृष्टीने शेती हा सर्वात महत्त्वाचा व्यवसाय आहे, पण राज्याच्या एकूण उत्पन्नात शेतीचा वाटा सु. ३४% आणि पशुपालनाचा तर केवळ १% आहे. शेतीच्या उत्पादकतेचा कनिष्ठ दर्जायातूनसूचित होतो. भारताच्या सरासरीपेक्षाही महाराष्ट्रातील शेतीची उत्पादनक्षमता कमी आहे. भारतातील एकूण लागवडीच्या जमिनीपैकी १२% जमीन महाराष्ट्रात आहे, पण भारताच्या एकूण शेतीउत्पन्नापैकी फक्त १०% उत्पन्न महाराष्ट्रात तयार होते. राज्यातील दर हे. उत्पादन भारतीय सरासरीच्या सु. ८०% आहे. महाराष्ट्रातील शेतीच्या मागासलेपणाची कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील : (१) कमी पर्जन्यमान. कोकणपट्टीत सरासरी पाऊस वर्षाकाठी २५४ सेंमी. व अगदी घाटमाथ्यावर ३८१ सेंमी. ते ५०८ सेंमी. पर्यंत पडतो, पण पूर्वेकडे जावे तसतसे पावसाचे मान फार कमी होत जाते. घाटमाथ्यापासून ४८–६४ किमी. च्या आतच ते ६३·५ सेंमी. वर येऊन ठेपते आणि आणखी पूर्वेला ३८ सेंमी. ते ५०·८ सेंमी. च्या घरात येते. शिवाय कोकण व घाटमाथा सोडला, तर इतरत्र पाऊस अस्थिर स्वरूपाचा असतो. चांदा, भंडारा व नागपूर या जिल्ह्यांमध्ये मात्र १०१·६ सेंमी. पेक्षा अधिक पाऊस पडतो. (२) जमिनीच्या कसाची प्रतही निकृष्ट आहे. रत्नागिरी, कुलाबा, अकोला, वर्धा, अमरावती हे जिल्हे त्यातल्या त्यात चांगल्या प्रतीचे आहेत. जमिनीच्या गुणवत्तेचा महाराष्ट्रातील अधिकतम निर्देशांक ७२ असून न्यूनतम निर्देशांक ५४ आहे. मराठवाड्यातील जमीन सर्वांत निकृष्ट प्रतीची आहे. शिवाय कोकणात व पठार प्रदेशात जमिनीची धूप वेगाने होत आहे. (३) पाणीपुरवठ्याची स्थिती शोचनीय आहे. फक्त ६% जमिनीला कृत्रिम पाणीपुरवठ्याची सोय आहे, तर हेच प्रमाण भारतात सरासरीने १८% पडते. (४) उत्पादनाच्या पद्धती मागासलेल्या आहेत. (५) जनावरांचा भार फार मोठा आहे. देशात दर चौ. किमी. मागे ४७, तर महाराष्ट्रात १११ गुरे आहेत. त्यांतील बहुतेक निकृष्ट प्रतीची आहेत. या सर्व कारणांमुळे ग्रामीण विभागाची आर्थिक स्थिती फारच निकृष्ट आहे. ग्रामीण दरडोई उत्पन्न नागरी उत्पन्नाच्या १/३ पेक्षाही कमी आहे. कसणाऱ्या कुटुंबाचे दरडोई वार्षिक उत्पन्न २३० ते २४० रु असून शेतमजुरांचे त्याहीपेक्षा कमी आहे.

याशिवाय शेतीच्या क्षेत्रातील विषमताही ध्यानात घेतली पाहिजे. ६०% कसणारे २.०२ हे. खालील जमिनीचे मालक असून त्यांच्याकडे एकूण शेतजमिनीच्या फक्त ७% जमीन आहे. १० हे. वर मालकी असणारे मालक ७% असून त्यांच्याकडे ४०% जमीन आहे. ग्रामीण भागातील २०% कुटुंबे भूमिहीन आहेत. भारताशी तुलना करता ही विषमता काहीशी सौम्य आहे एवढेच.

शेतीतील वर्गरचनेकडे पाहिले, तर स्थिती काहीशी समाधानकारक आहे. स्वकसणुकीच्या शेतकऱ्यांचे प्रमाण ७८% असून त्यांच्याकडे एकूण ७७% जमीन आहे. पूर्णतः भूमिहीन कुळांची टक्केवारी केवळ ८ असून त्यांच्याकडून कसली जाणारी केवळ ४% आहे. अशा रीतीने बव्हंश कसणारे शेतकरी जमिनीचे मालक असून बव्हंश जमीनही स्वकसणुकीखाली आहे.


आंतर-विभागीय फरक : या विवेचनासठी पश्चिम महाराष्ट्र (कोकण व देश), विदर्भ व मराठवाडा हे वेगवेगळे विभाग गृहीत धरले आहेत. कोकणातील जिल्ह्यांत लोकवस्ती दाट आहे तसेच शेतीवर अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. कुलाबा जिल्ह्यात ७७%, तर रत्नागिरीत ८१% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. कृत्रिम जलसिंचित जमिनीचे प्रमाण कोकणात अत्यल्प आहे (कुलाबा १%, ठाणे ०·५%, रत्नागिरी ०·५%). ही जमीन बहुधा नारळी, पोफळी, आंबा यांसाठी वापरली जाते. अर्थात पावसाचे प्रमाण कोकणात सर्वाधिक आहे. देशावरचा भाग एकूण महाराष्ट्रात (मुबंई सोडता) औद्योगिक दृष्ट्या अधिक विकसित आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण ६५% आहे. या भागातील सु. ७५% जमीन कसणाऱ्या मालकाकडे आहे. म्हणजेच शेतीतील वर्गरचना अधिक प्रगत आहे. सु. ९% जमीन कृत्रिम पाणीपुरवठ्याखाली आहे. पण पीकप्रबंध निकृष्ट आहे. कारण बहुतेक शेती निर्वाहस्वरूपाची आहे. पावसाचे प्रमाण अल्प असल्याने या भागातील काही प्रदेश दुष्काळी आहेत. सहकाराची प्रगती मात्र चांगली झालेली असून सहकारी संस्थांची आर्थिक स्थितीही अधिक चांगली आहे. शेतीच्या उत्पादनक्षमतेच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्हा सर्व महाराष्ट्रात अधिक प्रगत आहे. विदर्भात पाऊस फार जास्त पडत नसला, तरी बराचसा सुस्थिर आहे व तेथील शेती अधिक संपन्न आहे. व्यापारी पिकांचे अन्नपिकांशी प्रमाण ५० : ५० आहे. धारणाचे आकारमानही महाराष्ट्राच्या इतर भागांच्या तुलनेने मोठे आहे. शेतमजुरांचे प्रमाण इतर महाराष्ट्राच्या तुलनेने अधिक आहे. मराठवाड्याची शेती सर्वात मागसलेली आहे. पाणीपुरवठा फक्त ३% जमिनीला आहे. बहुतेक पिकांचे दर हे. उत्पन्न महाराष्ट्राच्या मानाने कमी आहे.

शेतीसुधारणा : महाराष्ट्रातील १,९०,२०,९०० हे. क्षेत्राला तुकडे जोडणीची जरूरी आहे. तुकडेजोडीच्या कार्यक्रमाला १९४९ साली प्रारंभ झाला व १९६८-६९ पर्यंत ६,६९५ खेड्यांतील ५३.६४ लाख हे. क्षेत्रावर जोडणीचे काम झाले. १,४५,६९,२०० हे. क्षेत्रावर बांधबंदिस्तीची (बंडिंग) जरूरी आहे. १९६६-६७ पर्यंत सु. ३३.५९ लक्ष हे. काम पुरे झाले. १९६७-६८ साली आणखी १,२१,४१० हे. उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. डोंगराळ भागातून उतारांवर होणारी धूप टाळण्यासाठी सोपनशेतीचे (टेरेसिंग) काम तृतीय योजनेच्या काळात २१,८५६ हे. वर पूर्ण करण्यात आले व १९६७-६८ पर्यंत आणखी २९.२३८ हे. वर ते पुरे करण्याचे उद्दिष्ट होते. पश्चिम किनाऱ्यावरील सु. ६०,७०५ हे जमीन समुद्राच्या पाण्यामुळे पिकांना निरूपयोगी झालेली आहे. जमीनसुधारणेच्या काही विशिष्ट कार्यक्रमांनी तिला वहितीत आणण्याचे काम ‘खार जमीन सुधारणा मंडळा’मार्फत केले जाते. जमिनीला समपातळी आणण्यासाठी ट्रॅक्टर व बुलडोझर यांच्या साह्याने प्रयत्न केले जातात. तिसऱ्या योजनेच्या काळात सु. ८०,९४० हे. वर हे काम चालले. पुढील दोन वर्षांत आणखी सु. ३२,३७६ हे. वर काम करण्याचे उद्दिष्ट होते.

महाराष्ट्रातील पाण्याखालील एकूण क्षेत्रापैकी फक्त २०% क्षेत्राला मोठ्या कालव्यांचे पाणी मिळते. विहिरीच्या पाण्यावर भिजणारी जमीन ५७% व तळ्याच्या पाण्यावर भिजणारी १७% आहे. अशा रीतीने पाणीपुरवठ्याच्या साधनांत लहान साधनांना महाराष्ट्रात मोठे स्थान आहे. १५ लाख रु. किंवा त्यांहून कमी खर्चाची तळी व बंधारे बांधणे, विहिरी बांधण्यास व दुरुस्त करण्यास मदत करणे, लिफ्ट सोसायट्यांना उत्तेजन देणे, पंप बसविण्यास मदत करणे इ. कार्यक्रम राज्य सरकारने चालू ठेवले आहेत. एकूण सिंचनशक्तीपैकी फक्त ४५% शक्तीचा वापर आतापर्यंत होत होता. ही स्थिती सुधारण्यासाठी मोठ्या व मध्यम योजनांच्या पाण्याच्या वापराबद्दलचे तपशीलवार अहवाल सरकारने तयार केले असून शेती, सहकार व पाणीपुरवठा खात्यांचा अधिकाऱ्यांना वापर अधिक वाढविण्याचे प्रयत्न करण्यासाठी नियुक्त केले आहे. शेतात काढावयाचे पाटही काही मर्यादेपर्यंत सरकारतर्फे वाढविण्याची व्यवस्था केली आहे. नव्या योजनेतील पाणीपुरवठ्याच्या प्रारंभी चार वर्षांच्या काळात पाण्याचे दरही सर्वसाधारण दराच्या २५%, ५०% व ७५% असे ठेवले आहेत. एकूण पाणीपुरवठ्याचे क्षेत्र १९५५-५६ साली कसणुकीच्या निव्वळ क्षेत्राच्या ४·९२% होते, ते १९६५-६६ साली ६·७८% झाले.

राज्यातील सु. १,२९,५०,४०० हे. जमीन अन्नधान्यांखाली आहे. तीमधील १,०१,१७,५०० हे. वर उपयुक्त ठरतील, अशा सुधारलेल्या  बेण्यांच्या  जाती  निर्माण  करण्यात  आल्या आहेत. केवळ  बीउत्पादनासाठी  प्रत्येक  पंचायत  समितीच्या क्षेत्रात पाच-सहा खेडी राखून ठेवण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. या खेड्यांतून बी घेऊन राज्य खरेदी-विक्री संघाने त्याचे वितरण करावे, अशी व्यवस्था आहे. अशी सु. ९०० खेडी स्वेच्छेने या कार्यक्रमात सामील झाली आहेत. कर्जरूपानेही बी देण्याची व्यवस्था केली आहे. याखेरीज अधिक उत्पादन देणाऱ्या मका, ज्वारी, बाजरी, तांदूळ व गहू यांच्या जातींचा प्रसारही करण्यात येत आहे. १९६६-६७ साली ६,०७,०५० हे. वर या जातींचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट होते, पण प्रत्यक्षात २,१६,१०९ हे. वर तो झाला. १९६७-६८ साली २१,८५३ हे. वर प्रसार करण्याचे उद्दिष्ट होते.

महाराष्ट्रातील जमिनीत सर्वच प्रकारच्या पोषण-द्रव्यांची, विशेषतः नायट्रोजनची, फार मोठी उणीव आहे. नायट्रोजनयुक्त खतांचा वापर पहिल्या योजनेच्या काळापासून १९६६-६७ पर्यंत सहा पटींच्यावर वाढला आहे.

जमीनवाटपातील विषमता कमी व्हावी, या उद्देशाने केंद्रीय शासनाने आखलेल्या धोरणानुसार ऑगस्ट १९७२ मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र जमीनधारणा मर्यादा अधिनियम, १९६१ हा दुरूस्त केला. दुरूस्त कायद्यान्वये कोरडवाहू जमीन धारणेची कमाल मर्यादा दर कुटुंबास ५०·४ हे. (१२६ एकर) ऐवजी २१·८५ हे. (५४ एकर) पर्यंत कमी केली. त्याचप्रमाणे सिंचित जमीनधारणेची कमाल मर्यादा १९.२ हे. (४८ एकर) ऐवजी चार महिने सिंचित होणाऱ्या जमिनीकरिता १४·५६ हे. (३६ एकर) पर्यंत कमी केली. आठ महिने पाणीपुरवठा मिळणाऱ्या जमिनीसाठी कमाल मर्यादा १०·९२ हे. (२७ एकर) व बारा महिने पाणीपुरवठा मिळणाऱ्या जमिनीच्या बाबतीत कमाल मर्यादा ७·२८ हे. (१८ एकर) ठेवण्यात आली आहे. कुटुंबाची व्याख्या पती, पत्नी व तीन अज्ञान मुले अशी करण्यात आली आहे. जी व्यक्ती शेतीची मालक नाही व जिचे उत्पन्न वर्षास रु. २४,००० हून अधिक आहे, अशा व्यक्तीस शेतीसाठी जमीन खरीदता येणार नाही, असे बंधनही दुरूस्त कायद्याने घातले असून या कायद्याची अंमलबजावणी २६ सप्टेंबर १९७० पासून करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे.

पशुसंगोपन, दुग्धोद्योग इत्यादी : महाराष्ट्र राज्यातील शेतीत पशुसंगोपनाचा वाटा फारच मोठा आहे. जनावरांच्या अवलादी सुधारणे, पशुवैद्यकीय सोयींचा प्रसार करणे, चाऱ्यात सुधारणा घडवून आणणे इ. कामे सरकार करीत असते. १९७१-७२ साली राज्यात ९ सर्वोपचार केंद्रे, ३३४ गुरांचे दवाखाने, ९९७ पशुवैद्यकीय मदत केंद्रे, ६ अल्पकालीन रोगनिवारण केंद्रे व ६ बुळकांडी निमूर्लन केंद्रे कार्य करीत होती. औरंगाबाद, नासिक व नागपूर या ठिकाणी तीन विभागीय पशुरोग संशोधन शाळा असून पुणे येथे राज्य पातळीवरील रोगसंशोधन केंद्र आहे. येथे अनेक उत्तम पशुजनन केंद्रेही आहेत. काही विशिष्ट क्षेत्रांतून जनावरांची सुधारणा करण्यासाठी सघन कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. मेंढ्या, कुक्कुटपालन इत्यादींसाठीही काही योजना कार्यवाहीत आहेत.

शहरांना दूधपुरवठा करण्यासाठी बृहन्मुंबई, पुणे, मिरज, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, नासिक, नागपूर, अमरावती, अकोला, औरंगाबाद, रत्नागिरी, अहमदनगर, चाळीसगाव, चिपळूण, कणकवली, महाड, खालापूर, महाबळेश्वर, आर्वी व कासा या शहरांच्या परिसरांत योजना चालू करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे आणि धुळे येथील दूध योजना पूर्ण उत्पादनशक्तीसहित काम करीत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील उदगीर येथे एक लोणीउत्पादन प्रकल्प चालू आहे. इतर ठिकाणच्या योजना उदा., दापचरी दूधप्रकल्प, विकासाच्या वेगवेगळ्या अवस्थांत आहेत. आजूबाजूचे दूध गोळा करणे, त्याचे शुद्धीकरण करणे व वाटप करणे ही कामे या योजनांतर्फे होतात. १९७२ मध्ये दूध गोळा करण्याचे सरासरी प्रमाण प्रतिदिनी ३३० किलोलिटरपर्यंत गेले.

दुग्धोत्पादन-व्यवसायाच्या विकासासाठी उत्पादकांना कर्जे आणि उत्पादक जनावरे, चाऱ्याची सुधारणा इ. प्रकारची मदत सहकारी संस्थांमधून संघटित करून देण्यात येते.

शेतीसंशोधन, शिक्षण इत्यादी: महाराष्ट्रात एकूण ८ प्रमुख संशोधन केंद्रे असून निरनिराळ्या विभागांसाठी नवी अधिक उत्पादक बेणी शोधून काढण्याकडे त्यांचे मुख्य लक्ष असते. आतापर्यंत अन्नधान्यांच्या ८, कापसाच्या ९, तेलबियांच्या १३ आणि उसाच्या ५ जाती शोधून काढण्यात आल्या आहेत.

कृषी महाविद्यालयांची एकूण संख्या ९ असून ती बहुतेक महत्त्वाच्या शेती-विभागांत काम करीत असतात. यांतून सु. १,२०० विद्यार्थ्यांना दरसाल प्रवेश दिला जातो. एक आधुनिक प्रकराचे महात्मा फुले कृषिविद्यापीठ राहुरी (जि. अहमदनगर) येथे स्थापण्यात आले असून जून १९६८ पासून सर्व शेती महाविद्यालये या विद्यापीठाला जोडली गेली. शिवाय पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना अकोला येथे झाली असून मराठवाडा व कोकण विभागांसाठी अनुक्रमे परभणी व दापोली येथे कृषिविद्यापीठे सुरू झाली आहेत. कृषिशाळांची संख्या २५ आहे. ग्रामसेवकांना शिक्षण देणारी ११ केंद्रे आहेत. याशिवाय प्रत्यक्ष शेतकऱ्यांना नवीन प्रकारची शेती शिकवण्यासाठी काही योजना चालू झालेल्या आहेत. बारा जिल्ह्यांतून शेतकऱ्यांना शिक्षण देण्याचे वर्ग सुरू झाले आहेत.

सहकार : १९५५-५६ साली प्राथमिक शेती सहकारी संस्थांची संख्या ११ हजार होती, ती १९७१ साली सु. ४२,६०० झाली याच काळात सभासद संख्या १० लाखांवरून ८६ लाखांपर्यंत गेली, भाग भांडवल ५ कोटींवरून २२८ कोटींवर वाढले आणि त्यांनी वाटलेले कर्ज १५ कोटींवरून ३२८ कोटींवर वाढले. अखिल भारताच्या तुलनेने विचार करता महाराष्ट्रात सहकाराची, विशेषतः सहकारी कर्जाची, वाढ मोठ्या प्रमाणावर झाली आहे. भारतीय शेतकऱ्यांच्या एकूण कर्जाच्या गरजेपैकी सु. २५ टक्क्यांची गरज सहकारी संस्थांमार्फत भागविली जाते. महाराष्ट्रात हे प्रमाण ४५ टक्क्यांच्या आसपास आहे. १९६५-६६ साली अखिल भारतात प्रत्येक सहकारी सभासदाला सरासरी १२८ रु., तर महाराष्ट्रातील सहकारी सभासदाला सरासरी २७७ रु. कर्ज मिळाले.

सहकारी खरेदी-विक्रीची प्रगतीही उर्वरित भारताच्या तुलनेने अधिक बरी आहे. १५% खेडी आणि ९८% व्यापारी पेठा यांत सहकारी खरेदी-विक्री संस्था काम करीत आहेत आणि एकूण सहकारी कर्ज संस्थांपैकी जवळजवळ निम्म्या संस्था खरेदी-विक्री संस्थांशी जोडलेल्या आहेत. इतर काही राज्यांच्या तुलनेने ही प्रगती लक्षणीय दिसत असली, तरी सहकारी चळवळीला या क्षेत्रात फारच लहानसे स्थान आहे. खरेदी-विक्री संस्थांच्या सभासदांची संख्या एकूण शेतकऱ्यांच्या संख्येच्या फक्त २% आहे. विशिष्ट पिकांचा विचार केला, तर असे दिसते की २०% ऊस, ८% अन्नधान्ये व ५% कापूस यांचा व्यापार सहकारी संस्थांमार्फत होतो. काही विशिष्ट क्षेत्रांत सहकारी व्यापार संस्था विशेष प्रगत आहेत. उदा., सिन्नर पेठेतील ८०% गहू आणि पंढरपूर पेठेतील ६०% बाजरी सहकारी संस्थांमार्फत हाताळली जाते. सहकारी शेतीतही महाराष्ट्राची प्रगती इतर सर्व राज्यांच्या मानाने अधिक झाली आहे.

कृषिनियोजन आणि विकास: महाराष्ट्र राज्याच्या दुसऱ्या योजनेत एकूण नियोजित खर्चापैकी १५·८% व तिसऱ्या योजनेत २०·७% खर्च शेती आणि संबद्ध व्यवसायांवर करण्यात आला. १९६६–६७ साली एकूण नियोजनखर्च सु. १२५ कोटी रु. करण्यात आला त्यात ३८ कोटी रु म्हणजे सु. ३०% खर्च शेती व संबद्ध कार्यक्रमांवर झाला. १९६७–६८ च्या सु. ११० कोटींच्या नियोजित खर्चातील सु. २९ कोटी रु. शेतीवर खर्च करण्याचा संकल्प होता. हे प्रमाण सु. २६% पडते. शेतीकार्यक्रमांबरोबरच मोठ्या योजनांखालील पाणीपुरवठा व पंपांचे विद्युतीकरण  यांवरील  खर्च  ध्यानात  घेतला,  तर  १९६७-६८  च्या

 

प्रत्येक पंचवार्षिक योजनेतील

 

सरासरी वार्षिक उत्पादन (लक्ष टन)

सरासरी वार्षिक दर एकरी उत्पादन (पौंड)

 

पहिलीयोजना

दुसरी योजना

तिसरी योजना

पहिली योजना

दुसरी योजना

तिसरी योजना

अन्नधान्ये

५४·८

६५·९

६२·७

३९७

४६२

४१९

कापूस(लक्ष गासड्या)

१०·०

१२·१

१२·९

६३

७४

७४

तेलबिया

६·२

७·३

७·२

५५१

५७३

५७३

ऊस

६·०

९·४

१२·८

६,३९३

६,६७९

७,८२६

नियोजित  ११० कोटी  रु.  पैकी सु. ५१  कोटी रु. निरनिराळ्या रीतींनी शेतीविकासासाठी खर्चण्यात यावयाचे होते, असे दिसते. हे प्रमाण ४६% पडते. अन्नधान्यांच्या बाबतीत शक्य तेवढ्या लवकर स्वावलंबी होण्याचे ध्येय महाराष्ट्र सरकारने गेली काही वर्षे आपल्या डोळ्यासमोर ठेवले आहे व त्या अनुरोधाने प्रत्येक योजनेत शेतीला चढता अग्रक्रम मिळत राहिल्याचे वरील आकडेवारीवरून ध्यानात येते.

तीन योजनांतील प्रमुख शेतीउत्पादनाचा त्रोटक आढावा मागील पानाच्या सारणीत दिला आहे.

सर्व पिकांचे उत्पादन दुसऱ्या योजनेपर्यंत वेगाने वाढले, पण तिसऱ्या योजनेत अन्नाधान्यांते उत्पादन दुसरीपेक्षा कमी झाले. १९६५–६६ साली तर अन्नधान्यांचे उत्पादन फक्त ४७·२ लक्ष टन झाले. हे वर्ष फार मोठ्या अवर्षणाने गेल्यामुळे सबंध तिसऱ्या योजनेची सरासरी त्याच्यामुळे खाली आली आहे. अन्नेतर पिकांचे उत्पादन दुसऱ्या योजनेपर्यंत वेगाने वाढले, पण तिसरीत ते सर्वसाधारणपणे स्थिर राहिले. खते वगैरे साधनांची टंचाई आणि प्रतिकूल हवामान, ही याची मुख्य कारणे आहेत.

महाराष्ट्र शासनाने १९६०–६१ ते १९७०–७१ या दहा वर्षात विविध कृषिविकास योजनांवर एकूण ७०० कोटी रु. खर्च केले. महाराष्ट्र शासनाने १९६६–६७ पासून १९७०–७१ पर्यंत कृषिविकासाच्या कार्यक्रमांवर केलेला खर्च खालील तक्त्यात दिला आहे :

वर्ष

कृषिविषयक

कार्यक्रम

सहकार

सिंचन

एकूण

(कोटी रु.)

१९६६-६७

३१·९३

५·६६

१६·११

५३·७०

१९६७-६८

३०·०८

४·१८

१८·२९

५२·५५

१९६८-६९

३४·९५

४·४०

२२·२९

६१·६४

१९६९-७०

३४·३४

४·४८

२३·९६

६२·७८

१९७०-७१

३५·३१

६·४७

२७·०९

६८·८७

एकूण

१६६·६१

२५·१९

१०७·७४

२९९·५४

(स्टॅटिस्टिकल ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ महाराष्ट्र, १९७०–७१)

विशेष समस्या : महाराष्ट्रात शेतीला फार वरचा अगक्रम देण्यात आला आहे आणि अन्नस्वंयपूर्णतेचे धोरणही राज्य सरकारने आपल्यापुढे ठेवलेले आहे. अन्नधान्यांची चांगल्या भावाने एकाधिकार खरेदी करून उत्पादकांना उत्तेजन दिले आहे. अन्नेतर पिकांखालील २५% जमीन अन्नधान्यांकडे वळविली आहे. निरनिराळ्या प्रकारची मदत विपुलपणे शेतकऱ्यांकडे पोहोचविली जात आहे. या सर्व प्रयत्नांमागे विशेष प्रकारची तळमळ दिसते. परंतु महाराष्ट्राच्या शेतीचे एकूण स्वरूप पाहता असे दिसते की, इतर काही राज्यांच्या तुलनेने तीत फार मोठ्या प्रगतीला वाव नाही, बहुतेक महाराष्ट्र हा कमी पावसाचा प्रदेश आहे. पाणीपुरवठ्याची स्थिती शोचनीय आहे ती केवळ ६% क्षेत्रच पाण्याखाली आहे या अर्थाने नव्हे, तर सुप्त शक्तींचा व साधनांचा उपयोग करूनही अंतिम सिंचनशक्ती २५–२६ टक्क्यांवर जाणार नाही, या अर्थानेही आहे. अशा स्थितीत जमिनीवरचा भार कमी करण्यासाठी व जीवनमान सुधारण्यासाठी शेतीविकाबरोबरच औद्योगिक उपक्रमांना, विशेषतः ग्रामीण औद्योगिकीकरणाला, महाराष्ट्राने प्राधान्य द्यावयास हवे. महाराष्ट्रात आर्थिक समृद्धी आणण्याची जबाबदारी उत्तरोत्त उद्योगधंद्यांनाच जास्तीतजास्त सांभाळावी लागेल, हे उघड आहे.

प्रत्यक्ष शेतीतील विकासप्रयत्नाच्या दिशा सर्वसाधारणपणे इष्ट आहेत. महाराष्ट्राची मुख्य शेती कोरडवाहू आहे आणि राहणार आहे. त्यामुळे अशी दुर्जल शेती सुधारून अधिक उत्पादक व्हावी, या दृष्टीने ज्या प्रकारचे प्रयत्न केले जाणे आवश्यक आहेत, तसे केले जात आहेत. त्यांतील त्रुटी  मुख्यतः  प्रशासकीय  कारणांमुळे उद्‌भवणाऱ्या आहेत. नव्या बेण्यांमुळे जी हरित क्रांती घडून येत आहे, तिचा लाभ येथून पुढे मुख्यतः भरपूर व शाश्वतीचा पाणीपुरवठा असणाऱ्या प्रदेशांना होणार आहे. जिराइती शेतीत लावावयाच्या पिकांबाबत आणि एकूण जिराइती  शेतीबाबतही अधिक संशोधन होण्याची फार निकड आहे.

संदर्भ : 1. Gadgil, D. R. Industrial Evolution in Indian in Recent Times, Oxford, 1944.

             2. Ghoshal, U. N. Agrarian System in Ancient India, Calcutta, 1930 .

             3. Government of IndiaPlanning Commission, Draft Outline of the Fourth Five-Year Plan, 1969.

             4. Moreland, W. H. The Agrarian System of Moslem India, Cambridge, 1929.

             5. Randhawa, M. S. Agriculture and Animal Husbandry in India, New Delhi, 1958. 

            ६. पटवर्धन, का. न. दुर्जल कृषि पद्धति अथवा शास्त्रशुद्ध कोरडवाहू शेती, पुणे, १९४३.

 

देशपांडे, स. ह.