अलाहाबाद : उत्तर प्रदेश राज्यातील पवित्र तीर्थस्थान. शहरगटाची लोकसंख्या ५,१३,९९७ (१९७१). दिल्लीच्या आग्नेयीस उत्तर रेल्वेने दिल्लीहून ६२७ किमी. व मध्य रेल्वेने मुंबईहून १,३६० किमी. अंतरावर गंगा-यमुनेच्या संगमावर, यमुनेच्या डाव्या तीराला वसले आहे. प्राचीन काळापासून पवित्र मानण्यात आलेले क्षेत्र ‘तीर्थराज प्रयाग’म्हणजेच अलाहाबाद. येथे किल्ला बांधून अकबराने सुभ्याचे मुख्य ठाणे केल्यापासून हे नाव आले. वाल्मीकी रामायणापासून पुराणांपर्यंत प्रयागचे अनेक उल्लेख आढळतात. इ.स.पू. तिसऱ्या शतकातील येथील शिलास्तंभावर सम्राट अशोक याने कौशांबीच्या राजांना उद्देशून केलेल्या आज्ञा खोदलेल्या आहेत. नंतरच्या लेखांत पाचव्या शतकातील सम्राट समुद्रगुप्ताच्या वैभवाचे वर्णन कोरले आहे. चिनी प्रवासी फाहियान याने पाचव्या व ह्यूएनत्संग याने सातव्या शतकातील आपल्या प्रवासवर्णनांतून प्रयागचे उल्लेख केलेले आहेत. मोगल साम्राज्याच्या पडत्या काळात १७३९ मध्ये मराठे येथपर्यंत येऊन भिडले होते. १८०१ मध्ये ब्रिटिशांचा अंमल आला. १८१४ त आग्रा व अवध या संयुक्त प्रांतांची राजधानी येथून आग्र्यास नेली होती. १८५७ च्या उठावात येथील देशी फौजा सामील झाल्या समोर दिसतील ते गोरे ठार करीत बंडखोरांनी सहा दिवस राज्य केले, पण गोऱ्‍या फौजांनी येऊन बंड मोडले व स्थिरस्थावर झाल्यानंतर प्रांताची राजधानी परत अलाहाबादला आली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर उत्तर प्रदेशाची राजधानी जरी लखनौला गेली तरी सर्वोच्च न्यायालय येथेच राहिले. जुन्या शहरातील इमारती कोंदट व रस्ते अरुंद आहेत. पण दारागंज छावणीसारख्या नव्या भागांची मांडणी आधुनिक व रस्ते प्रशस्त आहेत. नगरपालिका एक शतकाहून जुनी आहे. शहराला यमुनेच्या पाण्याचा पुरवठा होतो. राष्ट्रीय राजमार्ग, राज्य-रस्ते, लोहमार्ग व आकाशमार्गाचे अलाहाबाद हे एक महत्त्वाचे केंद्र असून डाक, तार, दूरध्वनी आदी आधुनिक संपर्कसाधनांनी सुसज्ज आहे. धान्य, ऊस, तेलबिया, कापूस अशा शेतीमालाच्या व्यापाराची ही एक मोठी पेठ तर आहेच, शिवाय येथील उद्योगसमूहात साखरेचे, काचेचे, साबणाचे, चामड्याचे, विटा-कौलांचे असे मोठमोठे कारखाने, मुद्रणालये व प्रकाशनसंस्थाही आहेत. न्यायालये, शासकीय कार्यालये व रुग्णालये यांखेरीज शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रांत अलाहाबाद विद्यापीठ व म्यूर सेंट्रल कॉलेजातील त्याचा विज्ञानविभाग, यूइंग ख्रिश्चन कॉलेज, नैनी कृषी संस्था, गंगानाथ झा संस्कृत संशोधन मंदिर, प्रयाग संगीत समिती, मेयो मेमोरिअल हॉल, अलाहाबाद संग्रहालय व विद्यापीठ संग्रहालय, राज्य व मध्यवर्ती ग्रंथालये तसेच सी. वाय्. चिंतामणि-स्मारक ग्रंथालये, ॲनी बेझंट भारतीभवन अशा अनेक नामवंत संस्था आहेत. शिवाय शहरात व आसपास भारद्वाज आश्रमासमोरील नेहरूंचे आनंदभवन, खुश्रूबागेतील मोगल कबरी, नैर्ऋत्येस ४९ किमी. वर वत्स कुलाच्या कौशांबीचे प्राचीन अवशेष अशा कित्येक ऐतिहासिक वास्तू आहेत. हे शहर हिंदी साहित्य व संस्कृतीचे माहेरघर समजले जाते. धार्मिक दृष्ट्या तर याचे स्थान अद्वितीय आहे. येथील गंगा, यमुना व सरस्वती (गुप्त) यांच्या त्रिवेणीसंगमावर दर वर्षी माघमेळा व दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो, तेव्हा स्‍नानासाठी लाखो भाविक लोटतात. त्रिवेणीमाधव, सोमेश्वर, वासुकीश्वर, भरद्वाजेश्वर शेष, प्रयागवेणीमाधव, भागीरथी, सरस्वती, यमुना अशी अनेक तीर्थस्थाने या क्षेत्राच्या परिसरात असून जुन्या किल्ल्याच्या तळघरात प्राचीन अक्षय्यवटाचे खोड अजून दाखविण्यात येते. या वृक्षाच्या फांद्यांवरून मोक्षार्थी यात्रिक नदीत देह टाकीत, ते थांबवण्यासाठी जहांगिराने हा वृक्ष तोडून टाकल्याचे नमूद आहे. शहरात राहण्याजेवण्याची सोय यात्रेकरूंसाठी क्षेत्रोपाध्ये व हौशी प्रवाशांसाठी पथिकाश्रम किंवा आधुनिक हॉटेले करतात.

ओक, शा. नि.

खुश्रू बाग, अलाहाबाद.
त्रिवेणी संगम, अलाहाबाद.