अर्धशिशी : पुन्हा पुन्हा उद्भवणाऱ्‍या डोक्याच्या एका बाजूच्या तीव्र डोकेदुखीस ‘अर्धशिशी’ असे म्हणतात. डोके दुखू लागण्यापूर्वी शारीरिक अस्वस्थता, कंप, घेरी वगैरे लक्षणे होतात व शेवटी ओकारी होऊन डोके दुखणे कमी होते.

 

अवस्था : या रोगाच्या दोन अवस्था आहेत. पहिल्या अवस्थेत चक्कर येणे, कंप सुटणे, दृष्टिक्षेत्राच्या अर्ध्या भागात अंधत्व (अर्धांधत्व), डोळ्यापुढे तट-बुरुजासारख्या झगझगीत आकृती दिसणे वगैरे लक्षणे आढळतात. क्वचित अर्धशरीरात बधिरता, वाचादोष वगैरे लक्षणेही दिसतात.

 

दुसऱ्या अवस्थेत अर्धांधत्व हळूहळू जसजसे कमी होत जाते तसतशी डोक्याची एक बाजू दुखू लागते. ही डोकेदुखी वाढत जाऊन डोक्यात कोणी ठोके मारीत असल्यासारख्या तीव्र वेदना होतात. उजेडाकडे पाहवत नाही. रोग्याला अंधारात स्वस्थ पडून राहावेसे वाटते. या अवस्थेच्या शेवटी ओकारी होऊन डोकेदुखी थांबते.

 

कारणे : हा रोग आनुवंशिक आहे असे मानतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांत याचे प्रमाण जास्त असते. टापटीप, व्यवस्थितपणा, वेळच्या वेळी गोष्टी करणे अशा स्वभावाच्या व्यक्तींमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त असते. नेहमीच्या शिस्तीप्रमाणे कामे झाली नाहीत तर वैफल्य, असमाधान, क्षोभ, दुःख वगैरे भावनांचा उद्रेक होऊन या रोगाची बाधा होते.

 

अर्धशिशीत मुख्य विकृती म्हणजे डोक्याकडे रक्त नेणाऱ्‍या रोहिण्या प्रथम आकुंचन पावून नंतर फार प्रसरण पावतात. त्या आकुंचन पावत असताना पहिल्या अवस्थेची लक्षणे व त्यांचे प्रसरण झाल्यानंतर दुसऱ्‍या अवस्थेची लक्षणे दिसतात. विशेषतः मानेतून पुढच्या बाजूने डोक्याकडे जाणाऱ्‍या रक्तवाहिनीच्या आकुंचन-प्रसरणामुळे त्या बाजूचे डोके दुखते. नाडीच्या प्रत्येक ठोक्याबरोबर डोक्यावर घाव मारल्यासारखा ठणका लागतो.

 

उपाय : अर्धशिशीवर उपाय म्हणजे रक्तवाहिनीचे आकुंचन करणारी अरगट वा त्यासारखी औषधे होत. या औषधाने डोकेदुखी त्वरित थांबते. डोके दुखण्यावरील इतर उपचारही प्रसंगी उपयोगी पडतात. प्रत्यक्ष डोके दुखत नसताना नियमित व्यायाम, आहारविहार वगैरे गोष्टींचा प्रतिबंधात्मक उपयोग होऊ शकतो. मानसिक त्रास, क्षोभ वगैरे गोष्टी टाळाव्या.

 

आयुर्वेदीय चिकित्सा : पहा : शल्यतंत्र व शल्यशालाक्य.

 

पहा : डोकेदुखी.

ढमढेरे, वा. रा.