ओवा,खोरासनी : (खुरासनी ओवा हिं. खुरासनी अजवैन गु. खोरासनी अजमो  क. खुरसानीवदकी सं. दीप्या, पारसिकय, मदकारिणी इं. हेनबेन लॅ. हायसायमस नायगर कुल-सोलॅनेसी). ही सु. १ मी. उंचीची, केसाळ, सरळ, दुर्गंधी व वर्षायू (एक वर्ष जगणारी) किंवा द्विवर्षायू ओषधी [→ ओषधि] पश्चिम हिमालयात (काश्मीर ते गढवाल) सु. १,५६० — ३,७२० मी. उंचीपर्यंत आढळते. काश्मीर, पंजाब, उ. प्रदेश, अजमेर, महाराष्ट्र, निलगिरी इ. ठिकणी हिची यशस्वीरीत्या लागवड केलेली असून काश्मिरातील यारिकात पद्धतशीर लागवड चालू आहे. या वनस्पतीची पाने साधी व एकाआड एक मूलज पाने (मुळापासून निघतील अशी वाटणारी पाने) मोठी व दातेरी आणि स्कंधोद्‍भव पाने (खोडापासून निघालेली पण जमिनीलगत न येणारी पाने) लहान व काहीशी खंडयुक्त. फुले पिवळट हिरवी व त्यांवर जांभळट रेषा असून व्यास २–३ सेंमी. व देठ फार लहान. ती एकएकटी किंवा फांद्यांच्या टोकास सर्पगती वल्लरीवर येतात इतर सामान्य लक्षणे ⇨ सोलॅनेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. शुष्क फळ (करंडरूप) १·२ सेंमी. व्यासाचे, गोलसर, डबीप्रमाणे उघडणारे व दीर्घस्थायी संवर्ताने (फुलाच्या सर्वांत बाहेरच्या मंडलाने) वेढलेले असते. बिया अनेक, बारीक, काहीशा मूत्रपिंडाकृती, लंबगोल व तपकिरी असतात. ह्या वनस्पतीच्या वर्षायू व द्विवर्षायू प्रकारांत किरकोळ लक्षणांचे फरक आढळतात. द्विवर्षायूची लागवड विशेषतः औषधी उपयोगाकरिता करतात. सुकी पाने व फुलोरे औषधाकरिता वापरतात. तिची नवीन लागवड बियांपासून करतात.

मुळे, फांद्या, पाने व फुले ह्यांमध्ये हायसायामीन, स्कोपोलामीन आणि थोडे ॲट्रोपीन ही विषारी ⇨ अल्कलॉइडे भिन्न प्रमाणात असतात. यांखेरीज या वनस्पतीपासून काढलेल्या औषधी अर्कात (हेनबेन) ⇨ बेलाडोनाच्या पानातील बाष्पनशील (उडून जाणारे) द्रव्यासारखे पदार्थ, हायसिपिक्रीन (एक कडू पदार्थ), कोलीन, श्लेष्मद्रव्य (गिळगिळीत पदार्थ),अल्ब्युमीन इ. असतात.

बियांमध्येही अल्कलॉइडे असतात. बियांचे चूर्ण विषारी व स्तंभक (आकुंचन करणारे) असून दुखऱ्या भागांवर बाहेरून लावतात त्यांचे परिणाम अफूप्रमाणे मादक व धोतऱ्याप्राणे विषारी असतात. दाढदुखीवर व हिरड्यांतून रक्त येत असल्यास बियांचा धूर आणि चूर्ण वापरतात. धुरामूळे गुंगी येते म्हणून चूर्ण तंबाखूप्रमाणे ओढतात. या वनस्पतीचा अर्क डोळ्यातील बाहुलीच्या विस्ताराकरिता बेलाडोनाऐवजी वापरतात. पाने शामक, मादक, वेदनाहारक, जंतुनाशक असून तंत्रिकांच्या (मज्‍जातंतूंच्या) विकारांवर उपयुक्त असतात. अर्काचा उपयोग खोकला, माकडखोकला (डांग्या खोकला), दमा, आकडी, गुंगी व झोप आणणे, मनस्ताप इत्यादींबाबत करतात. मधुमेहावरच्या औषधातही अर्क वापरतात. हायसायमस म्यटिकस (ईजिप्शियन हेनबेन) ही  दुसरी जाती ईजिप्तपासून पूर्वेस पाकिस्तानापर्यंत पसरलेली असून तिची काश्मीर व सहाराणपूर येथे लागवड केली आहे तिलाही खोरासनी ओवा म्हणतात.या ओषधीत तीच अल्कलॉइडे अधिक प्रमाणात असतात त्यांपासून विशेषेकरून ॲट्रोपीन बनवितात.इतर गुणधर्म खोरासनी ओव्याप्रमाणे आढळतात. बाजारात मिळणाऱ्या खोरासनी ओव्याच्या बिया मध्यपूर्वेतून आयात केलेल्या असून त्या ह्या व इतर जातींच्या असाव्या.

थीओफिलस, एस्. (सी). (इं.) परांडेकर, शं. आ. (म.)