ॲस्टर : फुलझाडांच्या ह्या वंशाचा समावेश ⇨कंपॉझिटी कुलात केलेला असून ॲस्टर ॲमेलस ही त्यातील एक जाती आहे. तिला इंग्रजीत ‘मिकॅल्मस डेझी’ म्हणतात. ही थंड प्रदेशातील बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) लहान ओषधी [→ ओषधि] विशेषकरून अमेरिकेतील बागांत मोठ्या प्रमाणात लावतात. भारतातही हिचे अनेक प्रकार लावतात. पाने एकाआड एक, साधी, लांबट, खरखरीत, दातेरी, भाल्यासारखी भारतात थंडीत जांभळ्या फुलांची अनेक स्तबके येतात लालसर, पांढरे, निळे असे भिन्न प्रकारही असतात. स्तबकात बाहेरची किरण-पुष्पके जिव्हाकृती, द्विलिंगी व फलनक्षम आतील बिंब-पुष्पके तशीच पण नलिकाकृती व पिवळट [→ कंपॉझिटी फूल] फळे शुष्क व एकबीजी (संकृत्स्‍न) चपटी, १–३ व रेषांकित. बागेला शोभा आणण्याशिवाय या झाडाचे इतर उपयोग म्हणजे चीनमध्ये खोकला व फुप्फुसाच्या विकारावर हिचे मूळ देतात, तसेच ते हिवतापावर व रक्तस्रावावरही वापरतात.

पराडकर, सिंधू अ.

या शोभेच्या फुलांच्या झाडाची उंची, फुलोरे व फुलांचा आकार, रंग व टिकाऊपणा वगैरे बाबींवरून त्याचे प्रकार ठरवितात. त्याचे अनेक प्रकार आहेत. महाराष्ट्रात खरीप व रबी हंगामात, सामान्यत: जमिनीची चांगली मशागत करून कुजलेले शेणखत भरपूर घालून तयार केलेल्या लांब वाफ्यातून त्याची रोपे लावतात. मोठ्या प्रमाणावर रोपे तयार करण्यासाठी बी गादीवाफ्यावर पेरतात. लहान प्रमाणावर परड्यांत अगर टोपल्यांत खतावलेली माती घालून तिच्यात मे–जून किंवा ऑगस्ट–सप्टेंबरमध्ये बी पेरतात. बी पेरल्यापासून ४–५ आठवड्यांत रोपे बदलून लावण्यालायक होतात. खरीपातील लागण ऑगस्ट–सप्टेंबरमध्ये आणि रबीतील लागण ऑक्टोबर–नोव्हेंबरमध्ये करतात. लागणीपासून ॲस्टरच्या प्रकाराप्रमाणे ६–८ आठवड्यांत फुले येतात. फुलांचा बहार सु. महिनाभर टिकतो.

चौधरी, रा. मो.

रोग : (१) मर : हा रोग फ्यूजेरियम ऑक्सिस्पोरमच्या कॅलीस्टेफी या प्रकारच्या ⇨ कवकामुळे होतो व तो झाडाच्या रोपापासूनच्या पुढील सर्व अवस्थांत होतो. रोगामुळे झाडे खुरटतात, सुकतात व मरतात. कित्येकदा झाडाची खालील पाने सुकतात व फुलोरायुक्त शेंडा मलूल होऊन खाली वळतो. अशी झाडे कापून त्यांचा छेद घेतल्यास आतला वाहकवृंद (अन्नरसाची व पाण्याची ने–आण करणारे पेशी-समूह) काळसर पडलेला आढळतो. काही वेळा झाडाच्या बुंध्याभोवती कवकाच्या पिंगट बीजुकांचा पुंजकाही दिसून येतो. रोगप्रसार प्रामुख्याने बियांद्वारे तसेच कवकयुक्त जमिनीतून होतो, म्हणून रोगप्रतिकारक वाणाचे बी लावतात. बी रोगमुक्त करण्यासाठी ते मर्क्युरिक क्लोराइडाच्या (१:१,०००) विद्रावात अर्धा तास बुडवून व नंतर ४–५ वेळा पाण्याने धुवून लावतात.

(२) पीत रोग : हा विषाणुजन्य (व्हायरसजन्य) रोग असून त्यामुळे पानाच्या शिरा पिवळ्या पडतात व त्या झाडावर पिवळसर फुटवा येतो. फुले आल्यास ती लहानसर व हिरवी आढळतात. झाडांची पेरी लहान होऊन ती खुजी होतात.रोगप्रसार तुडतुड्यामुळे होतो. रोगावर निश्चित उपाय नाही. रोगाचे प्रमाण कमी होण्यासाठी रोगट झाडे नष्ट करून १० टक्के डीडीटीसारख्या कीटकनाशकांचा फवारा ८-१० दिवसांच्या अंतराने पिकावर मारतात. 

कुलकर्णी, य. स.

ॲस्टर