अभिज्ञान शाकुंतल : कविकुलभूषण कालिदासाचे संस्कृत नाटक. ðकालिदासाने लिहिलेल्या एकूण तीन नाटकांत हेच अखेरचे असावे, असा सामान्यतः तर्क केला जातो. या नाटकाच्या हस्तलिखित प्रती उपलब्ध असून लिपिभिन्नतेनुसार त्यांचे देवनागरी, बंगाली आणि दक्षिण भारतीय असे प्रकार आढळतात. परंतु देवनागरी आणि दक्षिण भारतीय प्रतींतून आढळणारे या नाटकाचे रूपच मूळ नाटकाच्या जास्त जवळचे असून बंगाली प्रतींमध्ये पाठभेद आणि प्रक्षिप्त मजकूर अधिक प्रमाणात असावा, असा अनेक अभ्यासकांचा निष्कर्ष आहे.
या नाटकाचे संविधानक थोडक्यात असे : शिकारीच्या निमित्ताने अरण्यात आलेला राजा दुष्यंत कण्वाश्रमात येतो. तेथेच त्याला शकुंतला ही कण्वमुनींची मानलेली मुलगी भेटते. परस्परांवर अनुरक्त होऊन ते गांधर्वविधीने विवाहबद्ध होतात. राजा आपले नाव असलेली अंगठी तिला देऊन राजधानीकडे निघून जातो. तो शंकुतलेला नंतर घेऊन जाणार असतो. त्यानंतर एकदा शकुंतला दुष्यंताच्या चिंतनात गढून गेल्यामुळे अतिथी म्हणून आलेल्या दुर्वासमुनींच्या हाकेकडे तिचे दुर्लक्ष होते. ‘ज्याचे चिंतन तू करीत आहेस त्याला तुझी विस्मृती होईल’ असा शाप ते संतापून देतात. प्रियंवदा आणि अनसूया ह्या शंकुतलेच्या मैत्रिणींचे तिकडे लक्ष असते. प्रियंवदेकडून क्षमायाचना झाल्यानंतर अभिज्ञान किंवा ओळख म्हणून एखादा अलंकार दाखविला असता शापाचा अंत होईल असा उःशाप दुर्वासमुनी देतात. हे सारे चालू असता शकुंतला आपल्याच विचारात असते. तिच्या सख्याही, याची कल्पना तिला द्यावयाची नाही, असे ठरवतात. शंकुतलेकडे असलेली अंगठी तिला शापातून वाचवील, अशी त्यांची खात्री असते. दुष्यंत शंकुतलेला न्यावयास येत नाही. राजाच्या बोलावण्याची वाट पाहून ती स्वतःच त्याच्या दरबारी हजर होते. तथापि राजा गर्भवती शंकुतलेला ओळखीत नाही व तिचा अव्हेर करतो. त्यावेळी तिची अंगठी हरवल्याचे तिच्या लक्षात येते. शंकुतलेचा निरुपाय होतो. त्यानंतर एक ज्योतिर्मयी स्त्री तिला अप्सरस्तीर्थाकडे घेऊन जाते. पुढे एका कोळ्याला माशाच्या पोटात ती खुणेची अंगठी सापडते आणि त्याच्याकडून ती राजाकडे येते. ती पाहताच मागचे सारे आठवून राजा व्यथित होतो. अशा अवस्थेतच इंद्राच्या आमंत्रणावरून असुरांशी लढण्यासाठी तो स्वर्गलोकी जातो. परत येताना हेमकूट पर्वतावर मारिचाश्रमात त्याला शकुंतला व तिला झालेला सर्वदमन हा पुत्र भेटतो. सर्व गोष्टींचा उलगडा होऊन त्यांचे मिलन होते.
दुष्यंत-शंकुतलेची कथा महाभारताच्या आदिपर्वात आली आहे. तसेच पद्मपुराणाच्या काही प्रतींतही ती आढळते. मात्र पद्मपुराणातील कथा या नाटकाचे वाचन केलेल्या कोणा उत्तरकालीन लेखकाने लिहून ती पद्मपुराणात घातली असावी असे मानले जाते. आपल्या नाट्यकृतीसाठी कालिदासाने महाभारतातील कथेचाच आधार घेतला असावा. मात्र मूळ कथानकात त्याने महत्त्वाचे बदल केले आहेत. महाभारतातील शकुंतला ‘माझ्या मुलाला युवराज करशील तरच तुझ्याशी विवाह करीन’ अशी अट राजाला घालते. नंतर शकुंतला राजधानीत आपल्या पुत्रासह आली असता दुष्यंत बुद्ध्याच शकुंतलेला ओळख देत नाही. कालिदासाची शकुंतला कोणतीही व्यावहारिक अट न घालता राजाशी प्रेमापोटी विवाहबद्ध होते. तसेच,कालिदासाने दुर्वासमुनींचे प्रकरण घालून दुष्यंताच्या चारित्र्याला कमीपणा येऊ दिला नाही. मूळ कथेत मुलाला सोबत घेऊन शकुंतला दरबारात येते. तिचा अव्हेर झाल्यानंतर आकाशवाणी होऊन राजा तिचा स्वीकार करतो. कालिदासाने मात्र दुष्यंत आणि शकुंतला यांच्या मीलनासाठी काही काळ जाऊ देऊन विरहाच्या पार्श्वभूमीवर दुष्यंत-शंकुतलेचे प्रेम उठावदारपणे चित्रित केले आहे. कालिदासाच्या प्रतिभास्पर्शाने मूळ कथा एक नवेच आकर्षक रूप घेऊन नाट्यबद्ध झाली. अनेक प्रसंग आणि व्यक्तिरेखा यांनी नटली. या नाटकातून कालिदासाच्या रेखीव नाट्यरचनेचा, मनुष्यस्वभावाच्या सखोल ज्ञानाचा, जिवंत पात्रनिर्मितिक्षमतेचा आणि काव्यात्म संवादलेखनाचा उत्कट प्रत्यय येतो. अभिज्ञानशाकुंतलाची ही कथा म्हणजे शारीरिक प्रेमाचे आध्यात्मिक प्रेमात रूपांतर झाल्याची कथा आहे, असा रविंद्रनाथ टागोरांचा अभिप्राय आहे. कालिदासाच्या सर्व नाटकांत हे नाटक श्रेष्ठ समजले जाते.
जागतिक कीर्तीच्या अभिजात साहित्यकृतीत शाकुंतलाची गणना होते. सर विल्यम जोन्स यांनी या नाटकाचे इंग्रजीत प्रथम भाषांतर करून पाश्चिमात्यांना त्याचा परिचय करून दिला (१७८९). त्यानंतर जर्मन, फ्रेंच, डॅनिश, इटालियन अशा अनेक यूरोपीय भाषांत त्याची भाषांतरे झाली. गटे, श्लेगेल, हंबोल्ट यांसारख्या पाश्चिमात्य साहित्यश्रेष्ठींनी या नाटकाची मुक्तपणे प्रशंसा केली आहे. या नाटकाचा मराठी अवतार अण्णासाहेब किर्लोस्करांनी घडविला (१८८१).
संदर्भ : 1. Keith, A. B. The Sanskrit Drama, London, 1924.
2. Williams, Monier, Sakuntala, Varanasi, 1961.
३. कंगले, र. पं. कालिदासाची नाटके, मुंबई, १९५७.
भट, गो. के.