अलिबाग : कुलाबा जिल्ह्याचे व अलिबाग तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ११,९२८(१९७१). हे मुंबईच्या दक्षिणेस ३१ किमी. वर असून भारताच्या प. किनाऱ्यावरील साखर-खाडीच्या मुखाशी वसलेले बंदर आहे. अलिबागचे क्षेत्रफळ १·१ चौ.किमी. असून १८६४ साली येथे नगरपालिकेची स्थापना झाली. येथे दोन तांत्रिक शाळा, एक महाविद्यालय व अनेक माध्यमिक शाळा आहेत. दोन मराठी साप्ताहिके व एक मासिक येथून प्रसिद्ध होते. येथे एक भूभौतिकीय वेधशाळा १९०४ पासून कार्य करीत असून तिला आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. तांदूळ, भाजीपाला, मासे, कलमी आंबे, सुपारी इ. माल येथून रेवसमार्गे बोटीने व धरमतर-पेण-पनवेलमार्गे मोटारीने मुंबईस पाठविला जातो.
सु. तीनशे वर्षांपूर्वी अली नामक एका श्रीमान मुसलमानाने बऱ्याच विहिरी खणून आंब्याच्या व सुपारीच्या बागा ह्या भागात तयार केल्या, असे म्हणतात. त्यावरून ‘अलिबाग’ हे नाव पडले असावे. सरदार कान्होजी आंग्र्यांच्या ‘हिराकोट’ ह्या तसेच इतर वाड्यांचे अवशेष अजूनही गावात आहेत. शहराच्या नैर्ऋत्येस दोनशे मी. अंतरावर एका छोट्या बेटावर कुलाब्याचा किल्ला आहे. तेथे मायनाक भंडारी ह्या शिवाजीच्या नाविक सरदाराचे मुख्य ठाणे होते. हा किल्ला भक्कम असल्याने पुढे आंग्र्यांनीही आपले मुख्य ठाणे येथेच ठेवले होते. किल्ल्यात भवानी, गणपती, मारुती, वेताळ इत्यादींची देवळे असून चैत्री पौर्णिमेस येथे यात्रा भरते.
कुलकर्णी, गो. श्री.
“