अबोर : एक भारतीय आदिवासी जमात. अरुणाचल राज्यातील सियांग भागात, ब्रह्मपुत्रेच्या उपनद्यांच्या दरम्यान असलेल्या दिहांग व सुबनसिरी या प्रदेशातील अबोर टेकड्यांचा सु. २०,७२० चौ. किमी. प्रदेश या जमातीने व्यापिला आहे. ‘अबोर’ म्हणजे ‘जंगली’ हे नाव त्यांना आसामी लोकांनी दिले, म्हणून अलीकडे ते स्वत:स ‘आदि’ म्हणवितात. हा बदल प्रशासनाने मान्य केला आहे. आदींच्या १५ समूहांपैकी गलोंग, पदम, मिन्योंग व शिमोंग हे मोठे समूह आहेत. अबोर ठेंगणे व मजबूत बांध्याचे लोक आहेत. ते वांशिक दृष्ट्या मंगोलियन वंशाचे असल्याने त्यांच्या शरीरावर व चेहऱ्यावर केसांचे प्रमाण फारच कमी असते.
त्यांचा मुख्य व्यवसाय शेती. जंगले कापून स्थलांतरी शेती ते करतात. भात हे त्यांचे मुख्य पीक. अलीकडे ते उसाचीही लागवड करावयास लागले आहेत. सकस अन्नामुळे त्यांचे आरोग्य चांगले असते. कुठलाही पदार्थ ते न तळता उकडून खातात. ते शिकारीचे शौकीन आहेत. वर्षातून एकदा सामुदायिक शिकार करण्याची प्रत्येक गावाची प्रथा आहे. हे लोक युद्धकुशलही आहेत.
धान्य ठेवण्याची भांडी बांबूची असतात. इतर भांडी लाकडाची असतात. धातूच्या भांड्यांचा उपयोग पैसा म्हणून केला जातो. मिथान, डुकरे व कोंबड्या यांचाही ते चलन म्हणून उपयोग करतात.
सर्व अबोर समूह बहिर्विवाही कुळींमध्ये विभागले गेले आहेच. वधूमूल्य द्यावे लागते. सोटे-लोटे-विवाहही होतात. एकविवाह सर्वमान्य आहे. विधवा स्त्री पतीच्या धाकट्या भावाशी व त्याने नाही म्हटल्यास मोठ्या भावाशी विवाह करू शकते. अविवाहित तरुणांकरिता प्रत्येक खेड्यात ‘मोशुप’ नावाची झोपडी असते. मोशुपचा उपयोग शय्यागृह व अतिथिगृह म्हणून, त्याचप्रमाणे खेळण्याकरिता व सभा भरविण्याकरिताही होतो. तसेच तरुणींच्याकरिता ‘राशेंग’ नावाची झोपडी असते. तेथी मुली झोपण्यापूर्वी सूत काततात व कापड विणतात. अबोरांच्या वेगवेगळ्या समूहांत मोशुप व राशेंग यांना वेगवेगळी नावे आहेत. ग्रामपंचायतीला ‘केबांग’ असे म्हणतात.
त्रास देणाऱ्या भूतपिशाचाकडे अबोर जास्त लक्ष देतात. निसर्गातील प्रत्येक वस्तूवर कोणत्या ना कोणत्या तरी भूताचे अथवा प्रेतात्म्याचे आधिपत्य असते, असे ते समजतात व त्याप्रमाणे त्यांची पूजा करतात व त्यांना बळी अर्पण करतात. ‘सेदी'(पृथ्वी) व ‘मिलो’ (आकाश) या बहीणभावंडांच्या मीलनातून सृष्टी निर्माण झाली, अशी त्यांची समजूत आहे. भारत-चीन-युद्धात सरहद्दीवरचा प्रदेश म्हणून या भागास व जमातीस बरेच महत्त्व आले होते.
संदर्भ : Roy, Sachin, Aspects of Padam-Minyong Culture, Shillong, 1960.
मुटाटकर, रामचंद्र