अचल प्रतल : एखाद्या ग्रहमालेमधील ग्रहोपग्रहांची द्रव्यमाने, कक्षा, कक्षीय व अक्षीय परिभ्रमणांचे वेग इ. परस्परभिन्न असतात. परंतु इतर ताऱ्यांच्या संदर्भात अचल प्रतल हे ग्रहमालेचे न बदलणारे लक्षण असते. हे प्रतल ग्रहमालेच्या वस्तुमध्यातून जाते व ते एकत्रितकोनीय संवेगाचे (निरूढी परिबल × कोनीय वेग, → यामिकी) निदर्शक असते.त्यात मालेतील ग्रहोपग्रहांच्या कोनीय संवेगांची बेरीज अधिकतम असते. ग्रहोपग्रहांचे परांचन (अक्षाचे वलन,→ अक्षांदोलन) कक्षीय व अक्षीय परिभ्रमणात्मक कोनीय संवेगातील देवघेव इत्यादींमुळे होणारे सूक्ष्म परिणाम वगळल्यास, अंतर्गत स्थलांतरामुळे हे प्रतल बदलत नाही. सूर्यकुलाचे अचल प्रतल गुरू व शनी यांच्या कक्षांच्या पातळ्यांमध्ये पण गुरूच्या पातळीस अधिक जवळ असते.
काजरेकर, स. ग.