अखो भगत : (सु. १५९१—१६५६). एक गुजराती भक्तीकवी. अखा भगत म्हणूनही तो ओळखला जातो. त्याचे मूळ गाव गुजरातमधील जेतलपूर (जेतलसर ?) हे होते. पुढे तो अहमदाबाद येथे स्थायिक झाला. तो जातीने सोनार होता. काही आख्यायिका सोडल्या, तर त्याच्या जीवनाबाबत काहीच अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पत्नी व इतर स्वकीयांचे लागोपाठ अकाली मृत्यू आणि जगाचा त्याला आलेला कटू अनुभव यांमुळे त्याचे मन संसारास विटले आणि तो संसारत्याग करून काशीस गेला. तेथे त्याने गुरूपदेश घेऊन शंकराचार्यप्रणीत अद्वैत वेदान्ताचे अध्ययन केले. त्यामुळे त्याच्या मनास शांती लाभली. अहमदाबादला परत येऊन तो संपूर्ण वैराग्यशील जीवन जगू लागला.आयुष्याच्या शेवटी त्याने आपले अनुभव काव्यबद्ध केले.

आपल्या काव्यातून त्याने अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला. त्याने गुजराती भाषेत रचिलेले काव्यग्रंथ म्हणजे अखेगीता, चित्तविचारसंवादपंचीकरण, गुरुशिष्यसंवाद, नुभवबिंदूकैवल्यगीता आणिपरमपदप्राप्ति हे होत. यांशिवाय पंचपदीतात्पर्य आणि ब्रह्मलीला हे त्याचे हिंदी ग्रंथ आहेत. स्फुट कवितेच्या सदरात मोडणारे सु. सातशे छप्पे (चौपद्या) आणि सु. साठ पदेही त्याने गुजरातीत रचिली आहेत. त्याच्या छप्प्यांचे आणि पदांचे साहित्यक मूल्य फार मोठे मानले जाते. त्याच्या ग्रंथांचा ‘प्राकृत उपनिषदे’ म्हणून गौरव केला जातो.

केवळ अभिव्यक्तीचे एक साधन म्हणूनच त्याने काव्याचा स्वीकार केला. स्वत:स तो कवी म्हणवून घेण्याऐवजी ‘ज्ञानी’ म्हणवून घेई. तथापि स्वत:च्या अनुभवाचे सच्चे बोल व्यक्त करताना त्याच्या वाणीने काव्यारूप धारण केले. त्याच्या काव्याचे ओज व माधुर्य हे उल्लेखनीय गुण होत. सांकेतिक रचनेच्या आहारी गेलेल्या तत्कालीन कवितेच्या तुलनेने त्याची कविता साधी व सखोल आहे. त्याच्या रचनेत सूक्ष्म अवलोकन आणि तीव्र संवेदनशीलता आढळते. समाजातील अज्ञान, स्वार्थ, अहंकारादी दुष्ट प्रवृत्तींवर त्याने उपरोधपूर्ण कोरडे ओढलेले आहेत.

 

पेंडसे, सु. न.

     “