अंडे : प्राण्यांच्या माद्यांपासून किंवा उभयलिंगी प्राण्यांच्या स्त्री-जननग्रंथीपासून उत्पन्न झालेल्या पक्व जनन-कोशिकेला म्हणेज युग्मकाला ‘अंडे’ म्हणतात.अंडे ही अंडाशयात उत्पन्न झालेली एक कोशिकाच (संजीवांची शरीरे ज्यांची बनलेली असतात असे एकक किंवा घटक) असल्यामुळे ते जीवद्रव्याचे बनलेले असून त्याची सामान्य रचना इतर प्राणि- कोशिकांप्रमाणेच असते. अंडयाची बाहेरची कडा एका पारगम्य कलेने (पाणी व विरघळलेले पदार्थ कोशिकेत येऊ देणारा किंवा बाहेर जाऊ देणारा जीवद्रव्यापासून बनलेला अतिशय पातळ पापुद्रा) मर्यादित असते. अंड्यात असणाऱ्या जीवद्रव्याचे, तर कोशिकाप्रमाणेच,दोन भाग असतात-एक कोशिकाद्रव्य आणि दुसरा केंद्रक.
कोशिकाद्रव्य : हा गुतांगुतीच्या रचनेचा पदार्थ असून विभेदनाने त्यात स्पष्ट क्षेत्रे आणि अंगके (निश्चित आकार असलेल्या संरचना) तयार झालेली असतात. त्यात नेहमी निर्जीव पदार्थांच्या कणिका, सूक्ष्म बिंदू वगैरे विखुरलेले असतात. अंड्यात प्राय: कमीअधिक प्रमाणात पीतक (अंड्यात साठवलेले पोषक द्रव्य) असून त्याचा उपयोग अंड्यात वाढणाऱ्या भ्रूणाच्या पोषणाकरिता होतो. पीतक हे प्रथिने, वसा आणि कार्बोहायड्रेट या घटकांचे बनलेले असते.
केंद्रक : ही एक लहान, सामान्यत: वाटोळी किंवा दीर्घवृत्ताकृती रचना असते. एखाद्या प्राण्याच्या अंड्यातील केंद्रकाची सर्वसामान्य रचना त्याच प्राण्याच्या कोणत्याही देह-कोशिकेतील केंद्रकासारखीच असते. पण दोहोंत एक महत्त्वाचा फरक असतो पक्व अंड्याच्या केंद्रकातील ⇨गुणसूत्रांची संख्या नेहमी देह-कोशिकेच्या केंद्रकातील गुणसूत्रांच्या संख्येच्या निम्मी असते.
अंड्याची संघटना महत्त्वाची असते कारण प्राण्याच्या पूर्वविकासाची धाटणी ठरविण्यात तिचा बराचसा भाग असतो. सामान्यतः अंड्याची सममिती अरीय असते. पण पुष्कळ प्राण्यांची अंडी द्विपार्श्व-सममित असतात [→ प्राणि सममिती]. सममितीच्या मुख्य अक्षाला दोन टोके असतात, एकाला ‘सक्रिय ध्रुव’ म्हणतात आणि हा गुरुत्वीय प्रेरणेच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या अंड्याच्या भागात असतो दुसऱ्याला ‘अल्पवर्धी ध्रुव’ म्हणतात व तो गुरुत्वीय प्रेरणेच्या दिशेला असतो. केंद्रक सक्रिय ध्रुवाकडे सरकलेले असते आणि पीतक, पुष्कळदा, अल्पवर्धी ध्रुवाकडे गोळा झालेले असते. पीतकाचे अंड्यातील प्रमाण व त्याचे स्थान यांचा पूर्वविकासावर महत्त्वाचा परिणाम होतो. चापट कृमींच्या अंड्यांसारख्या काही अंड्यांत पीतक नसते (अपीतकी अंडी) काही अंड्यांत पीतक थोडे असून त्याचे कण कोशिकाद्रव्यात सगळीकडे पसरलेले असतात (समपीतकी), उदा., एकायनोडर्म प्राण्यांची अंडी शेवंड्यांच्या अंड्यांप्रमाणे कित्येक अंड्यांत बरेच पीतक केंद्रभागात साठलेले असते (केंद्रपीतकी) काही अंड्यांच्या अल्पवर्धी ध्रुवाकडील भागात पीतक साठते (गोलार्धपीतकी), उदा., बेडकाची अंडी. एखाद्या कालावधीत अंडाशयात उत्पन्न होणाऱ्या अंड्यांची संख्या आणि त्यांचे आकारमान यांच्यावरदेखील अंड्याच्या संघटनेचा परिणाम होतो. सामान्यतः फार मोठ्या अंड्यात पीतक पुष्कळ असते आणि प्रायः लहान अंडी मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होतात.
अंड्याची निर्मिती आणि पक्वन : ज्या प्रक्रियेने आदि जननग्रंथि कोशिकांपासून निषेचनाला (अंडे आणि शुक्राणू याच्या संयोगाला) योग्य अशी पक्व अंडी तयार होतात तिला ‘अंडजनन’ म्हणतात. अंडाशयाच्या जनन-उपकलेपासून अंडाणुजनक कोशिका तयार होतात आणि याच वेळी उपकलेपासून कित्येक विशेषित पुटक-कोशिका उत्पन्न होऊन त्यांचे अंडाणुजनक कोशिकेभोवती संरक्षक आणि पोषक आवरण तयार होते. अंडाणुजनक कोशिका मोठी होऊन तिचे प्राथमिक अपक्वांड बनते. थोडयाच वेळात त्याचे अर्धसूत्री विभाजन (विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होणे) होऊन द्वितीयक अपक्वांड आणि प्रथम लोपिका (निरुपयोगी असणाऱ्या व म्हणून नाहीशा होणाऱ्या) तयार होतात. द्वितीयक अपक्वांडाच्या सूत्री विभाजनाने अंडाणू अथवा अंडे आणि द्वितीय लोपिका तयार होतात. लोपिकांची उत्पत्ती निरनिराळ्या प्राण्यांत वेगवेगळ्या अवस्थांत होते. लोपिका वेगळ्या होऊन नाहीशा झाल्यावर अंडे पक्व किंवा निषेचनाला योग्य होते. अशा प्रकारे एका अंडाणुजनक कोशिकेपासून एकच एकगुणित अंडे तयार होते. अशा एकगुणित अंड्यामध्ये गुणसूत्रांची संख्या निम्मी झालेली असते.
अंडकला : पक्व अंड्याच्या संरक्षणाकरिता त्याच्याभोवती एक किंवा अधिक वेष्टणे तयार होतात यांना ‘अंडकला’ म्हणतात. कोशिकाद्रव्याच्या स्त्रावापासून तयार होणाऱ्या कला प्राथमिक कला होत. यांपैकी पीतक-कला अथवा निषेचन-कला महत्त्वाची होय. एका ⇨शुक्राणूचा अंड्यात प्रवेश झाल्यावर पीतक-कला दृढ होऊन जीवद्रव्य-कलेपासून अलग होते आणि जास्त शुक्राणूंचा अंड्यात शिरकाव होऊ देत नाही. द्वितीयक अंडकला अंडाशयाच्या कोशिकांच्या (यात पुटक – कोशिकांचाही समावेश होतो) स्त्रावापासून तयार होतात. प्रारूपिकतया पीतक-कलेच्या बाहेर अशा प्रकारे एकच पारदशर्क अंडवेष्ट तयार होतो. शुक्राणू आत जाण्याकरिता यात एक किंवा अनेक छिद्रे-अंडद्वारे-असतात. प्रायः प्राथमिक आणि द्वितीयक कला निषेचनाच्या आधी उत्पन्न होतात. तृतीयक अंडकलांची उत्पत्ती अंडवाहिन्या आणी साहाय्यक संरचनांपासून होते. निषेचनानंतर या कला अंड्याभोवती तयार होतात. श्वेतक (पांढरा बलक), कवच – कला आणि कायटिनमय किंवा कॅल्शियममय कवच या तृतीयक कला होत [→कोशिका ].
अंड्याचे निषेचन : नव्या जीवाची उत्पत्ती सामान्यतः निषेचित अंड्यापासून होते. मादीचे पक्व अंडे आणि नराचा शुक्राणू याच्या संयोगाला ‘निषेचन’ म्हणतात. निषेचन नेहमीच जलीय अथवा आर्द्र माध्यमात घडून येते, मग ते खारे अथवा गोडे पाणी असो किंवा मातृ-जीवाच्या शरीरातील एखादा द्रव पदार्थ असो. पुष्कळ समुद्री अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेले) प्राणी आपले युग्मक समुद्राच्या पाण्यात सोडतात आणि त्या ठिकाणी निषेचन होते इतर प्राण्यांत विशिष्ट जननेंद्रियांमुळे शुक्राणू आणि अंडे यांचा संयोग सुलभ होतो. जरायुज (पिल्लांना जन्म देणाऱ्या) पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये निषेचन आणि त्यानंतरचा भ्रूणाचा आणिगर्भाचा विकास हे दोन्हीही मादीच्या जननतंत्रात होतात. निषेचनक्रियेत शुक्राणू अंड्याला भोक पाडून आत शिरत नाही तो अंड्याच्या आत ओढून घेतला जातो. शुक्राणूने अंड्यात प्रवेश केल्यावर त्याच्या केंद्रकाचा अंड्याच्या केंद्रकाशी संयोग होतो या क्रियेला युग्मनज (अंडे व शुक्राणू यांच्या संयोगानंतरची कोशिका) तयार होतो. युग्मनजापासूनच पुढे विभाजनाने अनेक कोशिका तयार होऊन विकसित सजीवांची वाढ होते. पुं-आणि स्त्री- केंद्रकांच्या सायुज्यनाने (एककीकरणाने) निषेचन पूर्ण होते. वेगवेगळ्या जातींत अंड्याच्या पक्वतेच्या निरनिराळ्या अवस्थांमध्ये शुक्राणू अंड्यात प्रवेश करतो, पण अंडे पूर्णपणे पक्व झाल्यानंतरच दोन्ही युग्मकांच्या केंद्रकांचे सायुज्यन होते.
काही प्राण्यांच्या निषेचनक्रियेत सबंध शुक्राणू अंड्यात शिरतो, पण बहुतेकांत त्याचे शीर्ष आणि मध्य-खंड हे दोन भागच आत शिरतात. शुक्राणूचे शीर्ष शिरल्याबरोबर सामान्यतः अंडे क्रियाप्रवण होते, त्यात रसायनिक विक्रिया सुरू होऊन कोशिकाद्रव्यात बदल होतो, पीतक-कला दृढ झाल्यामुळे जास्त शुक्राणू अंड्यात शिरू शकत नाहीत. प्रायः शुक्राणूच्या मध्यखंडातून ताराकेंद्राचा (सूत्री विभाजनातील गतिमान क्रियाशीलतेचे केंद्र) अंड्यात प्रवेश होतो. शुक्राणूचे गोठलेले केंद्रक वाढून बरेच मोठे होते. या आणि अंड्याच्या केंद्रकाला यावेळी ‘प्राक्केंद्रक’ म्हणतात. दोन्ही प्राक्केंद्रके कोशिकाद्रव्यातून त्यांच्या एकीकरणाच्या स्थानाकडे जात असताना शुक्राणु-केंद्रक अशा तऱ्हेने वाटोळे फिरते, की त्यामुळे ताराकेंद्र त्याच्या आणि अंड्याच्या केंद्रकाच्या मध्ये येते. दोन्ही एकगुणित केंद्रके जवळ येतात, तारा केंद्राचे द्विभाजन होते, केंद्रकावरण नाहीसे होते, एक प्रारूपिक अवर्णी तर्कू (रंग न घेणारा तर्कूच्या आकाराचा तंतूंचा जुडगा) उत्पन्न होतो, आणि माता व पिता यांच्याकडून आलेल्या गुणसूत्रांची तर्कूच्या मध्य रेषेवर एकमेकांशेजारी मांडणी होते. या वेळी विदलनक्रियेतील पहिल्या विभाजनाची तयारी झालेली असते. प्रत्येक गुणसूत्राचे व्यक्तित्व कायम असते. प्रत्येक जनन-कोशिका पक्वनानंतर एकगुणित असते पण निषचनाने जातीच्या गुणसूत्रांची पूर्णसंख्या पूर्वपदावर येते. यानंतर लवकरच युग्मनजाच्या विदलनाला सुरुवात होऊन क्रमाक्रमाने नवीन जीव वाढू लागतो.
निषेचनाने दोन महत्त्वाच्या गोष्टी साध्य होतात : (१) शुक्राणु-प्रवेशाने अंड्याचे उद्दीपन होऊन त्यात नवीन जीव वाढू लागतो, आणि (२) आनुक्रमिक पिढ्यांना जोडणारा जनन-कोशिका हा एकमेव भौतिक मार्ग असल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या नव्या जीवाला निषेचनामुळे दोन भिन्न पूर्वजपरंपरांच्या आनुवंशिक गुणांचा वारसा मिळतो. हल्ली अंड्याचे उद्दीपन अनेक कृत्रिम उपायांनी करता येते, परंतु अशा विकासापासून उत्पन्न होणाऱ्या संततीच्या पाठीशी एकच पूर्वजपरंपरा असते. निषेचनाचा मुख्य उद्देश पिढीजात गुण एकत्र मिसळणे म्हणजेच ‘आनुवंशिक भिन्नता’ सुरक्षित ठेवणे किंवा पक्की करणे हा होय.
अंड्याचा अन्न म्हणून वापर : अंडे हा एक अत्यंत पौष्टिक असा अन्नपदार्थ असल्याने, मानवी आहारात त्याचा उपयोग वर्षानुवर्षे होत असून, त्याचे प्रमाणही सतत वाढत आहे. माणसाच्या खाण्यात मुख्यत्वे कोंबडी, बदक, हंस, टर्की, शहामृग इ. पक्ष्यांच्या अंड्यांचाच वापर केला जात असला तरी त्यातल्या त्यात सर्वाधिक खप पाळीव कोंबडीच्याच अंड्यांचा होतो. अंड्यांच्या पैदाशीबरोबरच शीतगृहाचा वापर करुन, प्रसंगी खाण्यालायक खनिज तेल अंड्यावर फवारून किंवा त्यात अंडी बुडवून ठेवून त्याचा टिकाऊपणा वाढविण्याचा प्रयत्न केला जातो.
भारतात दरवर्षास, दरडोई सुमारे १२ अंडी उपलब्ध होतात तर अमेरिकेत हे प्रमाण २९५, कॅनडात २८२ व पश्चिम जर्मनीत २४५ इतके आहे. भारतातील कोंबडीच्या अंड्याचे वजन सुमारे ३० ग्रॅम असते. अंड्याचे कवच, पांढरा बलक व पिवळा बलक असे तीन प्रमुख भाग पडतात. अंड्याच्या एकूण वजनापैकी सुमारे १० टक्के वजन कवचाचे, ५८ टक्के वजन पांढऱ्या बलकाचे व ३२ टक्के वजन पिवळया बलकाचे असते. अंड्याची प्रत त्यातील बलकावरून ठरविली जाते.कवचात मुख्यत्वे कॅल्शियम असतो, पांढऱ्या बलकात पाणी व प्रथिन व पिवळ्या बलकात पाणी, वसा व प्रथिन असतात.अंड्यातील प्रथिनामध्ये माणसाच्या वाढीस आवश्यक असलेली सर्व ॲमिनो अम्ले असतात. तसेच पिवळ्या बलकातील वसेत असंतृप्त वसाम्लांचे व आवश्यक अशा ओलेइक अम्लांचे प्रमाणही बरेच असते. ह्याखेरीज क्षार, क जीवनसत्त्वाव्यतिरिक्त इतर जीवनसत्त्वेही असल्याने अंडी पौष्टिक असतात. अंड्यातील दोन्ही प्रकारच्या बलकांवर, सुकविणे, भुकटीकरणे, द्रवस्थितीत ठेवणे इ. टिकाऊ स्वरुपाच्या व गुंतागंतीच्या विविध प्रकिया केल्या जातात. अशा बलकाचा उपयोग केक, सॅलड, कँडी, आईसक्रीम, मेयोनेझ इ. रुचकर व स्वादिष्ट खाद्यपदार्थ तसेच लहान मुलांचे अन्न तयार करण्यासाठी केला जातो. तसेच अंडे (कच्चे) दुधातून, उकडून अगर पोळी इ. प्रकार करुनही खाल्ले जाते. अंड्याच्या कवचाची भुकटी करुन कोंबड्यांच्या खाद्यात मिसळल्याने त्यांना कॅल्शियम मिळू शकतो.
पहा : आनुवंशिकी कोशिका कुक्कुटपालन.
कर्वे, ज.नी. परांजपे , स. य.