अंडवाहिनी : अंडाशयातून ⇨अंड बाहेर पडल्यानंतर ते ज्या नलिकेतून गर्भाशयात जाते तिला ‘अंडवाहिनी’ असे म्हणतात.

रचना : गर्भाशयाच्या प्रत्येक बाजूस एक अशा दोन अंडवाहिन्या असतात. प्रत्येक अंडवाहिनीची लांबी सु. १० सेंमी. असते. तिचे आतल्या बाजूचे टोक गर्भाशयाच्या वरच्या कोपऱ्यातील कोनातून गर्भाशयात उघडते. बाहेरच्या बाजूचे सुटे टोक श्रोणि-पर्युदरगुहेत (ओटीपोटातील पोकळीत) अंडाशयाजवळ उघडते. या वाहिनीचे तीन भाग कल्पिले आहेत : (१) गर्भाशयाच्या कोनातील स्नायूमधून जाणारा सर्वात लहान भाग सु. १ सेंमी. लांब असतो, (२) मधला भाग सु. ३-३·५ सेंमी. लांब असून त्याला ‘सेतू’ असे म्हणतात,   (३) सर्वांत बाहेरचा भाग, सर्वांत लांब म्हणजे सु. ५ सेंमी. असून त्याचा बाहेरचा भाग पसरट असतो. या भागाच्या शेवटी नरसाळ्याच्या आकाराचे वाहिनीचे तोंड असून ते श्रोणि-पर्युदरगुहेत अंडाशयाच्या वरच्या बाजूस उघडे असते. या टोकाशी झालरीसारखी आकृती तयार झालेली दिसते त्या झालरीपैकी एका झालरीचे टोक अंडाशयाला चिकटलेले असून बाकीची टोके सुटी असतात.

अंडवाहिनी तीन थरांनी बनलेली असते. सर्वांत बाहेरचा थर पर्युदराच असून मधला थर स्नायूंचा बनलेला असतो. आतला थर श्लेष्मकलेचा (बुळबुळीत पापुद्रयाचा) बनलेला असून त्याच्यातील अधिस्तरकोशिका (वरच्या थरातील कोशिका) लोमयुक्त असल्यामुळे अंडाची वाहिनीतील प्रगती सुलभ होते.

कार्य: अंडाशयातून अंड बाहेर पडल्यावर ते झालरीयुक्त टोकातून वाहिनीमधून गर्भाशयाकडे जात असताना त्याचा शुक्रकोशिकेशी संयोग होतो. त्याला निषेचन म्हणतात. असे निषेचित अंड पुढे गर्भाशयात जाऊन तेथे त्याची वाढ पुरी होते.

अंडवाहिनीचे विकार : तीव्रशोथ (सूज) : हा विकार बहुधा जंतुसंसर्गामुळे होतो. गर्भाशय, गर्भाशयग्रीवा (गर्भाशयाचा खालचा भाग) आणि योनिमार्गातून संसर्ग अंडवाहिनीपर्यंत पसरतो. कधीकधी आंत्रपुच्छ (ॲपेंडिक्स) आणि बृहदांत्र (मोठे आतडे) यांचा शोथही अंडवाहिनीपर्यंत पसरतो.

अंडवाहिनी. (१) गर्भाशय- अंतःस्तर, (२) गर्भाशय-बुघ्न, (३) गर्भाशय-अंतर्मुख, (४) गर्भाशय-शरीर, (५) अंडकोश-बंध, (६) अंडवाहिनी, (७) अंडकोश, (८) विस्तृत बंध, (९) गर्भाशय व मलाशय यांमधील कोष्ठ, (१०) योनिमार्ग, (११) गर्भाशय-बहिर्मुख, (१२) गर्भाशय-ग्रीवा.

अंडवाहिनीचा क्षयरोग :हा प्रकार बहुधा फुप्फुस किंवा उदरातील क्षयरोगाचा उपद्रव असतो.

संसर्गी शोथ: प्रमेहगोलाणू, मालागोलाणू,पुंजगोलाणू आणि आंत्रदंडाणू या सूक्ष्मजंतूंच्या संसर्गाने अंडवाहिनीचा तीव्र शोथ होऊ शकतो. आंत्रदंडाणूमुळे होणारा शोथ बहुधा उजव्या अंडवाहिनीत होतो.

लक्षणे : ३९ ते ३९·४ से. इतका ताप येतो. सर्व पोटात एकाएकी वेदना सुरू होऊन त्या काही वेळाने ओटीपोटात स्थिरावतात, ओटीपोट टणक व दडदडीत होते. क्वचित मूत्रावरोध होतो. रक्तातील श्वेतकोशिकांची संख्या १५ ते २५ हजार दर घ. मिमी. मध्ये असते. थोड्याशा दाबाने अथवा नुसत्या स्पर्शाने ओटीपोटातील वेदना वाढतात. पर्युदरशोथ (इंद्रियावरील आवरणाला सूज) झाल्यास ओटीपोटात गाठ लागते. उजव्या वाहिनीचा शोथ झाल्यास त्याची लक्षणे आंत्रपुच्छ शोथासारखी असल्यामुळे व्यवच्छेदक निदान कठीण असते.

चिकित्सा : पेनिसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन यांसारखी प्रतिजैवी औषधे रोगकारक जंतूनुसार दिल्यास उपयुक्त होतात.         योनिमार्गे ⇨ऊतकतापनचिकित्सा करतात तसेच वेदनानाशक औषधे (उदा., ॲस्पिरीन,) मलावरोधासाठी सौम्य रेचके, मूत्रावरोधासाठी कार्बाकॉल आणि झोपेसाठी शामके इ. औषधांचा लक्षणानुवर्ती उपयोग करतात.

चिरकारी शोथ : अंडवाहिनी-शोथ फार दिवस टिकून राहिल्यास संसर्गाच्या तीव्रतेप्रमाणे त्याचे रुपांतर वाहिनी जलसंचित, पूयसंचित अथवा रक्तसंचित आणि रक्तपूयमिश्रसंचित होण्यामध्ये होते.

लक्षणे : पाठ, कंबर व ओटीपोटात वेदना, ओटीपोटात दाबले असता दुखणे, ही लक्षणे अधूनमधून दिसतात.

चिकित्सा : अ-विशिष्ट प्रथिन म्हणून उकळलेल्या दुधाचे अंतःक्षेपण (इंजेक्शन) उपयोगी असते. परंतु दूषित अंडवाहिनी शस्त्रक्रियेने काढून टाकणे हा एकच प्रभावी उपाय आहे.

कर्करोग : हा अगदी क्वचित दिसतो. त्याचे निदान उदरपाटन (पोट उघडणे) केल्यानंतरच होते.

लक्षणे : योनिमार्गे रक्तस्त्राव अथवा रक्तमिश्रित पाण्यासारखा स्त्राव हे महत्त्वाचे लक्षण आहे. पोटात मुरडा व वेदना होतात. क्वचित ओटीपोटात गाठ लागते.

चिकित्सा : शस्त्रक्रियेने अंडवाहिनी काढून टाकणे. क्ष-किरण आणि रेडियम यांचाही थोडाबहुत उपयोग होतो.

विकृतस्थानीय (स्थानबाह्य) गर्भधारणा : गर्भाशयाबाहेर इतरत्र होणाऱ्या गर्भधारणेस ‘विकृतस्थानीय गर्भधारणा’ असे म्हणतात. पर्युदरगुहा, वपाजाल, आंत्रयुजा, विस्तृतबंध (आतडे बांधणारे थर) वगैरे जागी अशी गर्भधारणा होऊ शकते. त्यांपैकी सर्वांत अधिक प्रमाण अंडवाहिनीमध्ये गर्भधारणा झाल्याचे असते. अशा गर्भाची पूर्ण वाढ अगदी क्वचितच होते. अकाली गर्भपात हाच नियम असतो.

लक्षणे : मासिक पाळी २-४ महिने चुकलेली असते. एकाएकी पोटात तीव्र वेदना होऊ लागून योनिमार्गे रक्तस्राव होती. पर्युदरामध्ये अती रक्तस्राव झाल्यास अवसादाची (शॉक) लक्षणे दिसतात. ओटीपोटात दाबले असता तीव्र वेदना होतात.

अंडवाहिनीच्या जन्मजात विकृती अथवा शोथ यांमुळे अशी विकृतस्थानीय गर्भधारणा होते.

वाहिनीतच गर्भ मृत होतो. अंडवाहिनी फुटून गर्भ बाहेर पडल्यास रक्तस्राव आणि अवसाद-लक्षणे होऊन मृत्यूही संभवतो.

चिकित्सा : त्वरित शस्त्रक्रिया करून गर्भ आणि अंडवाहिनी काढून टाकून रक्तस्राव बंद करावा लागतो.

भालेराव, कमल य.