अंग्युलेटा : (खुरी प्राणी). पायांना खूर असलेल्या अपरास्तनी (ज्यांच्या गर्भाला वार असते असे सस्तन प्राणी) प्राण्यांच्या गटाला हे नाव दिलेले आहे. प्राण्यांच्या ठराविक वर्गीकरणात जरी या नावाचा फारसा उपयोग करण्यात येत नसला तरी पिल्लांना जन्म देणाऱ्या‍ (जरायुज) सस्तन प्राण्यांपैकी जे खूर असलेले शाकाहारी चतुष्पाद आहेत त्यांचा उल्लेख या संज्ञेने करणे सोयीचे होते. या गटाचे चार महागण पाडले आहेत : (१) प्रोटोअंग्युलेटा, (२) पीनंग्युलेटा, (३) मीझॅक्झोनिया आणि (४) पॅरॅक्झोनिया.

प्रोटोअंग्युलेटा : या महागणात खूर असलेल्या पुरातन प्राण्यांचा समावेश होतो. हा महत्वाचा गट असून तो अर्वाचीन खुरी प्राण्यांना आद्य जरायुज पूर्वजांशी जोडणारा आहे. या महागणातील काँडिलार्थ्रा गणातल्या प्राण्यांची उत्तरेकडील प्रदेशात पॅलिओसीन कालात (सहा कोटी वर्षांपूर्वी) व इओसीन कालात (चार कोटी वर्षांपूर्वी) अतिशय भरभराट झालेली होती, आणि ते विविध प्रकारचे होते. दक्षिण अमेरिकेतदेखील त्यांची चलती होती. एके काळी ऊर्जितावस्थेत असलेले हे प्राणी हल्ली नामशेष झालेले आहेत. पण आफ्रिकेत आढळणारा ⇨ आर्डव्हॉर्क हा त्यांचा एकमेव प्रतिनिधी भूतलावर शिल्लक राहिलेला आहे. 

पीनंग्युलेटा : या महागणाची उत्पत्ती आफ्रिकेत झाली असावी आणि नंतर उत्तरेकडील प्रदेशात आणि दक्षिण अमेरिकेतदेखील त्यांचा प्रसार झाला असावा असे दिसते. या गटात हल्ली जिवंत असलेले प्राणी थोडे असून ते मुख्यतः आफ्रिकेत आणि दक्षिण आशियात आहेत. या महागणातील प्रोबॉसिडिया गणातील हत्ती, हायरॅकॉयडिया गणातील हायरॅक्स आणि सायरेनिया गणातील समुद्र-गाय ही हल्ली जिवंत असलेल्या प्राण्यांची उदाहरणे होत. या गटातील काही प्राणी इतके मोठे होते की, जमिनीवरील सस्तन प्राण्यांत त्यांच्या इतके प्रंचड प्राणी कधीही नव्हते व आजही नाहीत.

मीझॅक्झोनिया : या महागणात पेरिसोडॅक्टिला (विषम खुरी) हा एकच गण आहे. यातील प्राण्यांच्या पायाच्या खुरांची संख्या विषम असते. या महागणाला उतरती कळा लागली आहे असे म्हणता येईल, कारण घोडा, टॅपिर आणि गेंडा हेच काय ते याचे हल्ली अस्तित्वात असलेले प्रतिनिधी आहेत. इतिहासपूर्व काळात खूर असलेल्या प्राण्यांचा हा एक महत्त्वाचा गट होता. आफ्रिकेत आणि उत्तरेकडील प्रदेशांत यातील प्राणी मुबलक होते. यांचे अवशेष विपुल आणि इतक्या सुस्थितीत आढळले आहेत की, त्यावरून घोडयाचा क्रमविकास इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा जास्त पूर्णपणे आपल्याला कळू शकतो. टॅपिर आणि गेंडा यांची संख्या फारच थोडी असून ते नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत.

पॅरॅक्झोनिया : या महागणात आर्टिओडॅक्टिला (सम खुरी) हा एकच गण आहे. या गणातील प्राण्यांच्या पायावरील खुरांची संख्या सम असते. हल्लीच्या काळात विपुल असणारे विविध प्रकारचे जिवंत सस्तन खुरी प्राणी या गणातलेच आहेत. डुक्कर, हिप्पोपोटॅमस, उंट, हरिण, जिराफ, मृग, शेळ्या-मेंढ्या, गायी-म्हशी वगैरे या प्राण्यांची परिचित उदाहरणे होत. या महागणात कित्येक महत्त्वाच्या निर्वंश झालेल्या प्राण्यांच्या ⇨जीवाश्मांचाही समावेश होतो.

पहा : खूर आणि नखर.

संदर्भ : WalterH. E. Sayles, L. P. Biology of the Vertebrates, New York, 1957.

जोशी, मीनाक्षी र.